राणीबागेतला पाणघोडा - विडिओसह

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 February, 2022 - 05:47

विडिओ आधी बघितला तरी चालेल
Hippo at Ranibaug. राणीबागेतला पाणघोडा.
https://www.youtube.com/watch?v=zyqQPwG2HOo

........................

एक काळ होता जेव्हा राणीबाग म्हणजे जणू आमच्यासाठी सोसायटीचे गार्डन होते. सुट्टीच्या दिवशी बिल्डींगच्या गल्लीत क्रिकेट खेळायचा वैताग आला की पंधरा मिनिटांची तंगडतोड करत राणीबाग लगतच्या मैदानावर क्रिकेट खेळायला जायचो. ऊन्हं डोक्यावर आली आणि क्रिकेटचा खेळ थांबला की कंपाऊंडवरून उडी मारायचो, ती थेट माकडांच्या जुन्या पिंजर्‍यासमोर पडायची. पिंजरे रिकामे असायचे. ते माकडांचे की मोरांचे यावरून नेहमी वाद व्हायचे. तो वाद घालत आम्ही तिथेच घटका दोन घटका रमायचो. कारण त्यानंतर आत गेले की प्राणी बघायला दूरदूरहून आलेल्या लोकांची नेहमीची वर्दळ. जी आम्हाला नकोशी वाटायची. आम्हाला प्राण्यांचे कौतुक होते, पण नवलाई नव्हती. कारण त्या वातावरणातील कण न कण आमचा पाठ झाला होता.

हो, खरेच. आज त्या प्राण्यांची नावेही मला आठवत नाही. पण तेव्हाचे वाघ, सिंह, हत्ती, गेंडे सर्वांची नावे पाठ होती आणि त्यांना नावानेच हाक मारली जायची. हरणांच्या बागेत किती हरणे होती हे ठाऊक होते. काळवीटे किती, नीलगाय किती, सांबर किती हे त्यांच्या वर्गीकरणासह माहीत होते. त्यातली किती ठिपक्यांची आणि किती बिनठिपक्यांची हे मोजून झाली होती. माकडांच्या पिंजर्‍यातील कोणत्या माकडामध्ये सर्वात जास्त किडे आहेत याची कल्पना होती.

मोराचा पिसारा फुलवायची वेळ माहीत होती, दर्शक ताटकळत असताना खुशाल झोपा काढणार्‍या अस्वलाच्या वामकुक्षीचा टाईम माहीत होता. वाघ केव्हा गर्जना करायचा, हत्तीला केव्हा पाण्यात मस्ती करायचा मूड यायचा, तळ्याकाठी साधू बनून पडलेल्या मगरींना कुठे खडा मारल्यावर त्या डोळ्या उघडतात हे सारे जाणून होतो.

अजगर खोडाच्या पोकळीत नेमका कुठे दडून बसलाय हे आम्हीच पब्लिकला दाखवायचो. पक्ष्यांना शिट्ट्या मारून त्यांचा रिस्पॉन्स मिळवायचो. माकडांशी शेंगांच्या कॅच कॅच खेळायचो. गेंड्याच्या कंपाऊंडवर चढून त्याला माज करून दाखवायचो. तेव्हा मोबाईल नव्हते, कॅमेरे नव्हते, सेल्फी काढायची पद्धत नव्हती. जे पाहू ते अनुभवले जायचे आणि आठवणीत कैद व्हायचे.

पण या आठवणीत एक आठवण अशी होती, जी या आठवणींचा भाग कधी झालीच नाही. या सर्व प्राण्यांमध्ये एक प्राणी असा होता, जो कसलाही माज न दाखवता आमचा माज उतरवायचा. जो आम्हाला भावच द्यायचा नाही.

तो पाण्यात डुंबत राहायचा. आणि आम्ही बघत राहायचो. पण तो पाण्याच्या बाहेर येऊन कधी दर्शन द्यायचा नाही. आताच्या पब्लिकला कदाचित माहीत नसेल, पण तेव्हा राणीबागेत हत्ती, घोडे, ऊंट या प्राण्यांवर तिकीट काढून स्वार होऊन राणीबागेत फिरता यायचे. पण या स्पेशल प्राण्याची सवारी मात्र फक्त कावळे मामांसाठी होती. तो मस्तपैकी पाण्यात पाठ तेवढी उघडी टाकून बुडालेला असायचा आणि कावळे त्याच्या पाठीवर निवांत बसलेले असायचे. ते पाहून वाटायचे की टाकावी भिंतीवरून एक उडी आणि शिरावे त्याच्या मैदानात. उतरावे त्याच्या छोट्याश्या तळ्यात आणि बसावे त्याच्या अंगावर. झोपावे, लोळावे त्याच्या अवाढव्य पाठीवर. तसेही एवढे दिवस जो आपल्याला दर्शन द्यायला उठला नाही तो आता काय उठणार... मग कसली भिती..

पण ही ईच्छा कायम ईच्छाच राहिली. ना तो पाण्यातून उठला, ना आमची कधी भिंत ओलांडायची हिंमत झाली. सारे बालपण त्याला पाण्यात डुंबताना बघण्यातच गेले. आणि मग आयुष्य पुढे सरकले तसे राणीबागेत हक्काने जाणे बंद झाले.

...........

आणि मग आयुष्याच्या दुसर्‍या टप्प्यावर एके दिवशी खास राणीबागेत जायचा प्लान बनवला. जिथे एके काळी वाट्टेल तेव्हा कंपांऊंडवरून उड्या मारून जायचो तिथे तिकीट काढून जायचा बेत ठरवला. पोरगी थोडी मोठी झाली होती. काऊ कब्बूंशी खेळू लागली होती. तिला चार पशूपक्षी दाखवूया म्हटले जे आजवर ती केवळ कार्टून्समध्ये बघत होती.

राणीबागेतल्या प्राण्यांची शान तशी जरा कमी झाली होती. पण आजही तो पाण्यात डुंबणारा पाणघोडा तसाच होता. म्हटले चला बघूया, आता तरी तो सुधारला का? तो तोच लहानपणीचा होता की त्याची पुढची पिढी आलेली कल्पना नाही. पण तो होता. तसाच पाण्यात डुंबत होता. पण यावेळी चमत्कार झाल्यासारखे तो उठला. नुसता उठलाच नाही तर त्याने मोठ्ठा ऑ करून जबडा वासला. मोठ्या ऐटीत पाण्याबाहेर आला. आणि आम्हाला सलामी देत आपल्या घरट्यात गेला. पाठोपाठ त्याचा जोडीदारही उठला, आणि तो ही त्याच्याच पावलांवर पाऊल टाकत आत गेला.

माझ्यासाठी हा एकूणच अदभुत क्षण होता. जे बघण्यासाठी माझे अख्खे बालपण तरसले होते ते लेकीने तिच्या पहिल्याच भेटीत अनुभवले. सोबत बायकोही होते. तिनेही नशीब काढले. नशीबाने मोबाईल माझ्या हातात होता. त्याने पाण्यातून बाहेर येताना मोठ्ठा आं वासला तो निसटला, पण त्याच्या डौलदार चालीला कॅमेर्‍यात कैद करायचे भाग्य मला लाभले. पहिल्याला दुरून टिपले तर दुसर्‍याला छान झूम करून बघितले. त्याचे ते गोलाकार अवाढव्य शरीर, जणू मागून पाहता दुधाचा टँकर वाटावे अशी देहयष्टी, चार बारीकश्या पायांवर तोललेली बघून तो पाण्यातून सहसा ऊठायचा का नाही हे देखील समजले. आणि त्याच्यावरचा रागही गेला Happy

वरच्याच विडिओची लिंक पुन्हा एकदा देतो,
Hippo at Ranibaug. राणीबागेतला पाणघोडा.
https://www.youtube.com/watch?v=zyqQPwG2HOo

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालच मराठी भाषा गौरव दिन साजरा झाला.

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्राहलय म्हणायला हवं... मराठी असुनही मराठी माणसांबद्दल इतका दुराग्रह बरा नव्हे..!! (मराठी माणसांचा दुराग्रह का? यावर एक धागा येऊ द्या..!)

राणीबाग हे मराठीतच लिहिले आहे. क्वीन्स गार्डन म्हटले असते तर ते ईंग्लिश झाले असते.
राहिला प्रश्न जिजाबाईंचा तर त्यांना वा कुठल्याही महान व्यक्तींना मराठीचा वा कुठल्याही भाषेचा, प्रांताचा टॅग नका लाऊ ही विनंती..

कुठेतरी आपले व्हर्च्युअल कनेक्शन त्याला जाणवले असेल. राणीच्या बागेतल्या पाघोला माबोवर यायला शिकवले आहे. आता त्याला एक ईमेल काढून माबोचं अकाऊंट काढून दिलं की प्रत्येक माबोकराला अशीच सलामी देईल. शहाणा आहे आमचा बाल तो !

(असे व्हिडीओ नकोत टाकायला. बघणार्‍याच्या तोंडाला पाणी सुटते. पाघोची चटणी हा एक तोंपासू प्रकार असल्याचे एका माबोकरणीने म्हटल्यापासून काळजीच वाटते).

पाणघोडा तर सर्वांनी पाहिला. आता आपण एक खेळ खेळूयात. खाली जी चित्रे दिली आहेत ती काळजीपूर्वक पाहून यातले प्राणी ओळखून दाखवा. चेहरे ओळखू येऊ नयेत यासाठी बुरखा घातला आहे. प्रयत्न केले तर अशक्य काहीच नाही.

Identify1.jpgidentify2.jpg

शांत माणूस मी ओळखले. ईतरांसाठी थांबतो. उत्तरे फोडत नाही.
यावरून आठवले की लहानपणी एका वयापर्यंत मला गेंडा आणि पाणघोडा यातील फरक कळायचा नाही Happy
आणि जेव्हा कळू लागला तेव्हा पुढे काही वर्षे दोघांच्या ईंग्लिश नावात गोंधळ घालायचो. पाघोला हिप्पो आणि गेंड्याला र्हाईनो बोलायचो.

असो, पण आजही राणीबागेत येणार्‍या कित्येक जनतेला काळवीट, सांबर, हरीण, चितळ, नीलगाय ईत्यादींमधील फरक कळत नाही. मनाला येईल ते नाव घेतात किंवा पाटी वाचावी लागते Happy

एका वयापर्यंत मला गेंडा आणि पाणघोडा यातील फरक कळायचा नाही >> सर्वांचं होतं असं. मग सोपी युक्ती केली. पाघोचे मागचे दोन पाय मागे असतात आणि गेंड्याचे पुढचे दोन पाय पुढेच असतात हे लक्षात ठेवले. नंतर कधीही गोंधळ झाला नाही. तरी गोंधळ झालाच तर "ए घोड्या" किंवा "ए गेंड्या" अशी कानात हाक मारायची. जर तो पाणघोडा नसेल तर गेंडा म्हटल्यावर त्याला राग येईल , आणि गेंड्याला घोडा म्हटल्यावर राग येईल. आणि जर नाही आला तर आपण बरोबर आहोत हे कळते. Happy

हो सीमंतिनी लेकच आहे. माझ्याकडे पाहून वाटायची नाही तेव्हा ते वेगळे Wink

युट्युबच्या, आपल्या माबो अकाऊंटवरती आहे.
>>>>
धन्यवाद सामो, आमच्याकडेही फार आवडीचा आहे तो विडिओ. त्या फेजमध्ये रोज जेवतानाचा कार्यक्रम होता हा स्टोरीटेलिंग..
या बाबतीत ती सेम माझीच कॉपी. स्टोरीज ऐकण्यापेक्षा सांगण्यात जास्त रस Happy

छान आठवणी .
माबो चे यु ट्यूब अकाउंट आहे माहीत नव्हते. धन्यवाद सामो.
गोष्ट सांगणारा व्हिडीओ फारच गोड आहे. क्युट .

धन्यवाद,
आठवणी अश्या खरे तर या लेखात फारश्या लिहिल्या नाहीत, फक्त त्या आठवणी आहेत आणि राणीबागेशी कसे घनिष्ठ संबंध होते याचे वर्णन केलेय. बर्‍याचश्या धूसर आहेत, पण कधीतरी आठवून लिहायला हवे. आमच्या घरापासूनच राणीबाग जवळ होते त्यापेक्षा आईचे, मामाचे घर जवळ होते. भायखळ्यालाच पलीकडे होते. त्यांच्याकडे एकेकाळी वाघसिंहाच्या डरकाळ्या गर्जनाही रात्रीच्या वेळी ऐकू यायच्या Happy

मी मुकुंदनगर परिसरात रहाते. आमच्याकडे पूर्वी, विशेषतः थंडीत, पेशवे बागेतल्या सिंहाच्या गर्जना ऐकू येत.

विशेषतः थंडीत, पेशवे बागेतल्या सिंहाच्या गर्जना ऐकू येत.>> सामो, तुम्हाला सिंहाचे कुडकुडने म्हणायचे आहे का Happy

मस्त आठवणी ...!
विडियोतल्या मायलेकी ही गोड दिसतायेत..
लॉकडाऊनच्या आधी गेलो होतो आम्ही मुलांना घेऊन राणीच्या बागेत .. पाण्यात डुंबत बसलेल्या पाणघोड्याला उगीच काही खोडकर लोक दगड मारत होते.. बाहेर निघाला असता तर पळता भुई झाली असती सगळ्यांना...!

बाहेर निघाला असता तर पळता भुई झाली असती सगळ्यांना...!
>>>
त्याची चाल आणि वेग पाहून वाटत नाही आपली पळता भुई होईल Happy

Pages