शेजाऱ्याचा डामाडुमा - संवाद चित्रे - मालदीव भाग १

Submitted by अनिंद्य on 23 February, 2022 - 05:06

प्रस्तावना:

माझ्या 'शेजाऱ्याचा डामाडुमा' मालिकेतील नेपाळबद्दलचे ११ लेख माबोकरांनी वाचले. काहींनी लेखांवर उत्साहवर्धक प्रतिक्रिया देऊन तर काहींनी व्यक्तिगत संदेश पाठवून लेखन आवडल्याचे सांगितले. मालिकेला मायबोलीच्या मुखपृष्ठावर स्थान मिळाले. हुरूप वाढला, आनंद झाला.

आता लिहायला घेतोय भारताच्या दुसऱ्या सख्ख्या शेजाऱ्याबद्दल - मालदीव बद्दल. नेपाळप्रमाणेच मी ह्या नितान्तसुंदर देशाच्याही प्रेमात आहे म्हणून नेपाळनंतर दुसरा नंबर मालदीवचा. पहिल्या भागात फक्त काही चित्रे आणि संवाद .... वाचकपसंती लाभल्यास पुढे जाऊ Happy

623B4393-91BF-4953-A193-43560B14BDD3.jpeg

* * *

मी राहायला असलेल्या अतिमहागड्या रिसॉर्टच्या प्रवेशद्वारावर कलात्मक अक्षरात लिहिलेली पाटी :-
In this peaceful heaven, made from Kanuhura are:-
- The steps from your villa down to the water
- The child’s play desk overlooking white beach sand
- The mahogany clasp on your Heidi Klein bikini
- The old chess set at the Handhuvaru bar

(मी - ओक्के, कानुहुरा म्हणजे लाकूडच ना ?)

* * *

या या या ... तुमची बोट येण्याचीच वाट पाहत होते. थोडं बाहेरच थांबा, हा कलिंगड कापते आणि मग आमच्या ह्या बेटावर तुमचे 'ऑफिशियल' स्वागत करते. नाहीतर उगाच वादळ यायचे...

(मी - !)

* * *

सर, तुमच्या शरीराचे वजन ८ किलो जास्त आहे. त्या हनीमाधू बेटावर फार लोक जात नाहीत ना, म्हणून विमान छोटे ४ सीटचे आहे. ह्या विमानात तुम्हाला घेतले तर आम्हाला फातिमाऐवजी कोणी कमी वजनाची अटेंडंट घ्यावी लागेल. बघते मी, प्लीज वेट.

(मी - !!)

173886B9-8EE8-45B7-ACF6-408D60E36083.jpeg

* * *

अरे आज नळाला पाणी नाही, काय चाललंय काय? लेट मी टॉक टू द गव्हर्मेंट. थांब, तुझ्या समोरच सरकारची खरडपट्टी काढतो. .... अगं आथिया, तुझं ते डिपार्टमेंट काय करतंय, झोपा काढताय काय तुम्ही मालेची लोकं ?

(मी - !!! )

* * *

अरे ये ना माझ्या साईट ला, अलीची बोट पाठवतो तुझ्यासाठी. मस्त मोठे बेट बनवतोय आम्ही समुद्रात. माझे ३ ड्रेझर आणि इंडोनेशियातली पूर्ण टीम आली आहे. रात्री तिथेच मुक्कामी राहू आणि पार्टी करू कामगारांसोबत.

(मी - ?)

* * *

ही माझी नॉर्वेजियन बायको, माझ्या ७ मुलांची प्रेमळ आई. पण हिचं अन माझ्या आईचं काही पटत नाही रे...एकमेकींची भाषा अजिबात येत नाही तरी रोज भांडतात. वैताग नुसता.

(मी - ??)

* * *

ओळख करून देतो सर - हे माझे ७ भाऊ माझ्यापेक्षा मोठे आहेत. आणि हे ६ माझ्यापेक्षा लहान. ही आम्हा ‘सर्वांची’ आई. हे ‘या सर्वांचे’ बाबा. माझ्या ‘एकट्याचे’ बाबा वेगळे आहेत पण ते दुसऱ्या बेटावर राहतात......

(मी - बापरे !)

* * *

हॅलो हॅलो ... खासदारसाहेब, माझ्या सुनेच्या डेलिव्हरीची वेळ जवळ आली. लवकर तुमची बोट पाठवा, हॉस्पिटलला न्यायचेय. मागच्या वेळी केला तसा उशीर करू नका नाहीतर बोटीतच बाळाचा जन्म होईल. आता पहाटेचे २ वाजलेत, ३च्या आधी बोट पोहचेल असे बघा.

(मी - ….. )

* * *

तुम्ही विदेशी टुरिस्ट लोकं, तुम्ही मजा करणार. सिंगल माल्ट काय, वाईन काय, बिअर काय... आम्ही पडलो अल्लाह के बंदे. पण काय करू, रसूल पाक बघतोय रे वरून, नको मला वाईन...... बरं दे थोडी - पण चहाच्या मोठ्या कपात दे, उगाच कोणी बघितले तर मला त्रास आणि तुलाही.

(मी - वा ! )

* * *

नाही, माझी गन काही तुझ्या हाती देता येणार नाही. कोणी पाहिले तर नोकरी जाईल माझी. मालदीवमध्ये आता सरकारी नोकऱ्या मिळणे किती कठीण आहे ते तुला माहित आहे ना ?

(मी - ….. )

* * *

दगडांचा हा ढीग म्हणतोस? अरे माझे आजोबा लहान असल्यापासून तो तसाच आहे. त्याच्याखाली बुद्धमंदिर आहे बहुतेक. जेंव्हा आमच्या ह्या लामू बेटावरच्या सर्व लोकांनी धर्म बदलला तेंव्हा ते मंदिर न तोडता त्यावर दगड रचण्याची आज्ञा आमच्या राधूननी दिली होती असे जुने लोक सांगतात ....

(मी :- !!!! तुमचा राधून म्हणजे राजा ना ?)

* * *

आमच्या देशाच्या प्रेसिडेंट नाशिदनी खोल समुद्रात पाण्याखाली कॅबिनेट मिटिंग घेतली गेल्या महिन्यात. सगळ्या जगातून पत्रकार आले होते कव्हर करायला. तुम्ही बघितला का तो सोहळा टी व्ही वर ?

(मी :- !!!!!)

* * *

हो, गेल्या सुनामीच्या वेळी हे नवे बेट तयार झाले समुद्रात. आता त्यावर आम्ही मत्स्योत्पादने निर्यात करण्यासाठी एक सेंटर बांधणार आहोत. पैसे बहुतेक ब्रिटिश सरकार देईल...

(मी:- वा !)

* * *

सुखातला जीव दुःखात घातला मी हे मंत्रिपद स्वीकारून, किती कटकट. बाहेरदेशी प्राध्यापकी करत होतो तेच बरे होते. तरी बरं मला राजकारणात काही इंटरेस्ट नाही ते.

(मी:- क्काय ?)

* * *

मी शक्य तेंव्हा येते ह्या गान बेटावर. माझे बाबा ब्रिटिश नेव्हीत असतांना इथे काही वर्षे होते. १९५७ मध्ये रॉयल नेव्हीने हा एयरबेस आमच्या ब्रिटिश रॉयल एरफोर्सला दिला तेंव्हा ते बेस कमांडिंग ऑफिसर होते इथे. लास्ट नेव्ही मॅन टू कमांड धिस स्मॉल ब्रिटिश बेस. माय होल फॅमिली फील्स सो कनेक्टेड टू मालदिव्स.

(मी :- कॅन अंडरस्टॅंड यंग ओल्ड लेडी ! )

* * *

आता कोणीच बोलत नाही त्याबद्दल, पण आमची एक पिढी बरबाद झाली हो ड्रगच्या व्यसनामुळे. मी त्यातून पूर्णपणे बाहेर पडलोय. आता ड्रगविरुद्धचे कायदे फार म्हणजे फारच कडक आहेत. तेच बरं आहे. आता खरे आव्हान म्हणजे धार्मिक कट्टरतेचे, पण त्याबद्दल जास्त बोलायची सोय नाही.

(मी :- काय बोलू ?)

* * *

तुमचे ते इंडियन दीडशहाणे लोक, आमच्या लोकांना सारखी अक्कल शिकवायला बघतात. अरे मी सुद्धा जग फिरलोय. माझ्यासारखी अशी राजेशाही बोट तुमच्या इंडियात काय स्वीडनमध्येही कोणाकडे नसेल.

(मी - ….. )

* * *

हे बघा, हे सुंदर ऑडिटोरियम आम्हाला चीनच्या सरकारने फुकट बांधून दिले, तेही फक्त ३ महिन्यात. आता ही कॉन्फरन्स संपली की फार कमी वापर होईल याचा. पण चिनी मॅनेजर राहील इथे, आजन्म.

(मी - ….. )

* * *

आई खूप आजारी आहे हो. इथल्या इंदिरा हॉस्पिटलचे डॉक्टर करून झाले. आता भारतात नेत आहे, शेवटी आम्हा मालदीवच्या लोकांना खरी मदत तुमच्याच देशात मिळते.

(मी - ….. )

* * *

टेंडरसाठीची सर्व कागदपत्रे तयार आहेत, आकडे रुफिया आणि डॉलर्समध्ये बरोबर भरले आहेत. आता तुम्ही मला चांगला मुहूर्त सुचवा, म्हणजे लतीफ हे बिड डॉक्युमेंट मंत्रालयाच्या वेबसाईटवर अपलोड करायला घेईल. चांगल्या मुहूर्तावर सुरवात झाली तर काम माझ्या कंपनीला मिळेलच.

(मी :- अरे देवा ! )

* * *

चहा तर संपवा हो, थांबेल ते विमान तुमच्यासाठी, फोन केला आहे मी कंट्रोलरूमला.....

(मी - !!!!! )

* * *

हो, मलाच मालदीवचा शाहरुख खान म्हणतात. माझे सगळे सिनेमे सुपरहिट असतात. आजही 'धी' वर दाखवतील माझा हिट सिनेमा, त्यातली गाणी तुला पटकन ओळखता येतील. सेम टू सेम शाहरुख सारखी बसवली आहेत - सीन बाय सीन.

(मी - ….. क क क .....क्या बात है ! )

* * *

संसदेत आज थोडी मारामारी झाली म्हणून फाटला हा शर्ट. फार काही लागले नाही. चला आता आपल्या प्रोजेक्टच्या चर्चेला सुरवात करू या.

(मी - घरोघरी मातीच्या चुली )

* * *
क्रमश:
(मालिकेतील काही चित्रे / नकाशे जालावरून साभार)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरीच !!
पुभाप्र...
आता उजळणी होईल

भारीच! वेगवेगळ्या व्यक्तींशी वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या परिस्थितीत साधलेल्या लघुतम संवादांतून तयार झालेले सुंदर कोलाज. मालदीवचे अंतरंग दाखवणारे.

वाचण्यास खूप उत्सुक.. खरतर लेखमाला पूर्ण झाल्यावरच वाचणार होते, हुरहुर टाळण्यासाठी. पण राहवलं नाहीच.

विषयारंभ आवडला.
प्रचि सुंदरच!
हीरा यांचा प्रतिसाद अगदी चपखल!
......वाट बघतोय.

पहिल्या चित्रानेच फिदा झालो!
ईश्वराच्या; केरळला चितारण्यासाठी हिरवाइच्या अद्भुत रंगाने सज्ज केलेल्या कुंचल्याचे काही थेंब अनवधानाने निळाइच्या कॅन्व्हासवर सांडल्यासारखी मालेची चिमुकली बेटं....!! केवळ अप्रतीम....
बघुया केंव्हा योग येतो प्रत्यक्ष भेटीचा तें...
तोपर्यंत आपल्या सदबहार लेखांच्या प्रतिक्षेत.

@ हर्पेन,

अन्यत्र तुमच्या प्रतिसादांमुळे तुमचे काही मालदीव कनेक्शन आहे असे जाणवते. पुढे मालिकेतल्या मुद्द्यांवर तुम्ही स्वानुभवाची भर घालाल अशी अपेक्षा Happy

@ कुमार१,

... आता उजळणी होईल...
हो.

डामाडुमा इथे माबोवर येण्याचे प्रमुख कारण - तुमचे प्रोत्साहन आणि आग्रह Happy

@ मामी
@ BLACKCAT
@ maitreyee
@ सिंडरेला

आभार !

@ हीरा,

आभार.
..लघुतम संवादांतून कोलाज.....
स्वतःबद्दल/ व्यक्तिगत बोलायला फारसे आवडत नाही. त्यामुळे माझ्यासाठी 'संवाद' म्हणजे अधिक 'ऐकणे'. सगळीकडे मी मी मी वाल्यांची गर्दी असल्यामुळे माझे फावते Happy


@ सुहृद,
@ विवेक.,

तुम्ही न चुकता प्रतिक्रिया कळवता, फार आवडते.


@ धनि,

मालदीवची कहाणी नेपाळपेक्षा थोडी वेगळी असली तरी बोर होणार नाही असे वाटते. कमी भाग लिहीन, ६-७ फार तर.

मस्तच! पुढचे भाग येण्याच्या प्रतिक्षेत!
मालिकेतील या आधीचे लेखांचे मथळे नेहमी खुणावत राहिले पण वाचणे झाले नाही. वाचायलाच हवेत.

नेपाळ सफरीचा दणदणीत प्रतिसादानंतर आमचं इमान मालदीवच्या दिशेने कूच करणार आहे. यात्रिगण अपने कुर्सी की पेटी बांध लो...

@ गजानन,

...लेखांचे मथळे नेहमी खुणावत राहिले पण वाचणे झाले नाही. ...

सवडीने वाचा, अभिप्राय अवश्य कळवा.

@ यक्ष,

तुम्हाला निळ्या कॅनव्हासवर हिरवे थेंब दिसले त्या चित्राला माझ्या एका मैत्रिणीने 'Demon's Footprints म्हटलेले आठवले Happy Wink

तुम्हाला मालदीव भेटीचा योग सत्वर येवो !

@ सुनिती.,
@ यक्ष,

@ साद,
@ आबा.,
@ फलक से जुदा,

उत्साहवर्धनासाठी सर्वांचे आभार _/\_

@ सीमंतिनी,

आभार.

नेपाळ, कोलकाता मालिकांपेक्षा थोडी वेगळी सुरुवात करावी म्हणून केले Happy

@ SharmilaR
@ देवकी
@ अदिति

आभार !

Pages