हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १३: एक अविस्मरणीय ट्रेक (२६ किमी)

Submitted by मार्गी on 22 February, 2022 - 04:36

हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १: प्रस्तावना
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) २: सत्गड परिसरातील भ्रमंती
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ३: अग्न्या व बुंगाछीना गावामधील ट्रेक
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ४: गूंजीच्या दिशेने...
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ५: है ये जमीं गूंजी गूंजी!
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ६: गूंजीचा हँगओव्हर!
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ७: सत्गड- कनालीछीना ट्रेक
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ८: ग्रामीण जीवनाची झलक
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ९: अदूसोबत केलेला ट्रेक
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १०: ध्वज मंदिराचा सुंदर ट्रेक
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ११: उद्ध्वस्त बस्तडी गावाच्या परिसरातील ट्रेक
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १२: रमणीय चंडाक हिल परिसरात २० किमी ट्रेक

८ नोव्हेंबरची सकाळ. लवकरच हिमालयाचा निरोप घ्यायचा आहे! पिथौरागढ़ जिल्ह्यातच पाताल भुवनेश्वर हे अतिशय सुंदर गुहेतलं‌ मंदिर आहे. ते बघायला जाण्याचा प्लॅन सुरू आहे. ते दुस-या दिवशी जायचं ठरलं. त्यामुळे आज मला हवा तसा मोठा ट्रेक करता येईल. काल २१ किलोमीटर चाललो होतो आणि आज २६ किलोमीटर फिरेन. त्या दिवशी जीपमधून बघितलेल्या अगदी आतल्या बाजूच्या नितांत सुंदर रस्त्यावर फिरेन. विचार करून कसं व किती दूरपर्यंत जायचं ते ठरवलं. इथे आता शाळा सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे सुरुवातीला सत्गडवरून कनालीछीनापर्यंत मुलांसोबत पायवाटेने जाईन. त्या दिवशी गेलो होतो तीच पायवाट, पण किंचित वेगळ्या बाजूने. आणि कनालीछीनापासून पुढे रस्त्याने फिरेन. आणि येताना कनालीछीनावरून रोडनेच सत्गडला येईन. असे एकूण २६ किलोमीटर व साधारण सव्वाचार तास होतील. सकाळी ८ वाजता मुलांसोबत निघालो. डोंगराच्या आणि शेतांच्या मधून जाणारी पाय वाट! हे क्षण अक्षरश: मनामध्ये सामावून घेतोय!


.

.

ही पायवाट थोडं पुढे जाऊन परत मेन रोडला मिळते व परत आत शिरते. मुख्य रस्ता जरा फिरून खाली उतरतो. पाय वाट अर्थातच शॉर्ट कटने जाते. छोटी छोटी घरं, झाडी आणि प्रसन्न आसमंत! कडक थंडीनंतर असं ऊन अंगावर घेणं म्हणजे सुख आहे. ह्या पायवाटेलगत काही ठिकाणी गावाच्या अंतर्गत रस्त्याचं काम झालं आहे. कुठे कुठे जीपचा रस्ताही आहे. पण इथे दाट झाडी असल्यामुळे हिमशिखर मात्र त्यांच्यामध्ये लपलेली आहेत. अर्ध्या तासामध्ये कनालीछीनाला पोहचलो. सत्गड जास्त उंचावर असल्यामुळे उतार होता. आणि पुढेही मला अर्ध्या वाटेपर्यंत उतारच उतार लागेल. आणि येताना सगळा चढ असेल. कनालीछीनामध्ये मुलांना बाय केलं आणि थोडं अंतर पिथौरागढ़- धारचुला हायवेवर चालत निघालो. ह्या टप्प्यामध्ये हा मार्ग प्रशस्त आहे आणि खूप पक्का आहे. पूर्वी हिमाचल- लदाख़मध्ये सायकल चालवली होती त्या रस्त्यांची आठवण करून देणारा रस्ता! काही अंतर पुढे गेल्यावर डावीकडे एक फाटा फुटला आणि तिकडे वळालो.


.

.

हा अंतर्भागात जाणारा रस्ता अगदी निर्जन आहे. हळु हळु कनालीछीनाच्या आसपासची घरं मागे पडली आणि देवदारांच्या वनाचा प्रदेश सुरू झाला. अक्षरश: देवदारांचं नंदनवनच! ह्या रस्त्यावर वाहतुक अगदी थोडी. त्यामुळे थोड्या वेळानेच एखादी गाडी भेटतेय. क्वचित कोणी बाजूच्या गावामधले ग्रामस्थ. दूरवर दरीच्या पलीकडे ढग दिसत आहेत! खरोखर मी कमालीचा नशीबवान आहे. ओंजळीत मावत नाही इतकं काही मिळतंय. निसर्गाचा सत्संग ओसंडून वाहतोय. शांत वातावरणामध्ये एका लयीत चालत राहिलो. फास्ट वॉक सुरू ठेवला. खूप वेळाने बाजूला काही घरं दिसली. रस्त्यात छोटे छोटे झरे लागत आहेत. कुठे कुठे रस्त्याची हानीही झालेली दिसतेय. काही अंतर meditative songs ऐकत चाललो आणि मग निसर्गाला ऐकत जात राहिलो. अंतराचा एकूण हिशेब करून ठरवलं होतं की, मुख्य रस्ता सोडल्यापासून साधारण आठ किलोमीटर पुढे आलो की परत फिरेन. पुढे एका ठिकाणी लांब एक रस्ता व एक फाटा फुटतोय. कदाचित तिथपर्यंत जाऊन परत येईन. पण रस्ता सरळ नव्हता. पुढे बरीच वळणं लागली. दोन छोटी गावं लागली. ग्वेता आणि कापडी. आसमंत बदलला. पलीकडच्या डोंगररांगा व लँडस्केप दिसायला लागला. पण ते वळण काही आलं नाही! अंतरं इथे अशी फसवी असतात. साधारण साडे अकरा किलोमीटर झाल्यावर परत फिरलो. कारण परत जाताना पायवाटेच्या ऐवजी रस्त्यानेच जाईन, त्यामुळे तिथे अंतर जास्त भरेल.


.

.

परत फिरल्यावर एका वेळी अचानक पोटात खड्डा पडला. इथे वाटेत अगदी तुरळक गावं व घरं आहेत. किराणचे दुकानं आहेत. पण चहाचंही हॉटेल दिसलं नाहीय. अर्थात् त्याची कल्पना होतीच. त्यामुळे सोबतच्या चिक्क्यांचा समाचार घेतला. पाणीही पिऊन घेतलं. आता दुपार होतेय, त्यामुळे अधून मधून गरम होतंय. अर्थात् देवदारांचं छत्र सावली देत आहेच. चिक्क्यांचा नाश्ता केल्यानंतर ऊर्जा आली. पण गंमत बघायला मिळाली. ज्या क्षणी शरीर दमतं, त्या क्षणी मनही दमायला लागतं. काही मिनिटांसाठीच पण ताण वाटला की, अंतर जास्त तर होणार नाही? मानसिक दृष्टीने अंतर जास्त वाटलं. पण शरीरात जशी ऊर्जा आली, तरतरी आली, तसं मनही परत ताजं तवानं झालं. आणि पुढचे छोटे टप्पे मनासमोर ठेवले की, आता परत फिरून चार किलोमीटर झाले, म्हणजे साधारण सात किलोमीटरवर हायवे लागेल. तिथून एक किलोमीटर पुढे कनालीछीना आणि मग सहा किलोमीटरवर सत्गड. शिवाय हायवेवर हॉटेलही मिळेल. त्यामुळे नंतर तसा ताण वाटला नाही आणि रमणीय निसर्गाचा आनंद घेता आला. डेस्परेट व्हायला झालं नाही. एका टेंपोवाल्याने माझी चौकशीसुद्धा केली लिफ्ट हवी का. त्याला सांगितलं की फिरायचं म्हणून चालतोय. उलट्या रस्त्याने येताना दुपारचा निसर्ग बघायला मिळाला. काही ठिकाणी झ-यांचं पाणी रस्त्यावर मिळालं. हळु हळु कनालीछीनाच्या खालची घरं दूर डोंगरात दिसायला लागली. वरून जाणारा हायवेही दिसला आणि थोड्याच वेळात हायवेला पोहचलोसुद्धा.


.

.

मला अदूने निघताना तिला खेळायला टिश्यु पेपर आणायला सांगितला होता! इथे मेडीकलमध्ये तो नाही मिळाला व एनर्जालही नाही मिळालं. आणि हायवेवर हॉटेलही चांगले वाटले नाहीत. थोडा वेळ बघत राहिलो आणि नंतर वाटलं की, सत्गडच्या खाली रोडवर आता ओळखीचं झालेलं हॉटेल आहे, तिथेच जेवेन. आणि आता अंतरही कमी उरलंय. २१ किलोमीटर पूर्ण झाले आहेत, सो आता ५ किलोमीटरच बाकी आहेत. कनालीछीना गाव हळु हळु मागे पडलं. नवीन तालुक्याचं ठिकाण, त्यामुळे बरीच वस्ती आहे. सरकारी कार्यालयं आहेत. शेती संबंधित दुकानं आहेत. गाव गेल्यानंतर चढ सुरू झाला. आणि पुढे तर घाट म्हणावा असा मस्त रस्ता लागला. अशा रस्त्यांवर सायकलिंगच्या ऐवजी पायी फिरण्याचा आनंद पुरेपूर घेतला. दुपारची वेळ असल्यामुळे व्हिजिबिलिटीसुद्धा चांगली आहे व त्यामुळे आता परत दूरवरची शिखर दिसत आहेत! न थांबता वेगात चालत राहिलो.


.

.

.

.

छोटा पण मस्त घाट आहे हा. सायकलीवर खरंच मजा आली असती. चढ किमान ६% -७% चा तरी असेल. पायी जाताना चढाचा फरक इतकाच होतो की, वेळ जास्त लागतो. हळु हळु सत्गड जवळ येत गेलं. ते हॉटेल सत्गडमध्येच येतं. तिथे पोहचलो. चहा आणि दोन पराठे खाल्ले. ते सत्गडच्या नातेवाईकांचे नातेवाईकच लागतात. आणि पुण्यात त्यांनी जॉबही केला आहे. त्यामुळे मस्त गप्पा झाल्या. इथे एक भटका भेटला. मोटरसायकलवर तो अयोध्येवरून केदारनाथला जातोय आणि वाटेत लागतील त्या मंदिरांना भेट देतोय. जसे लोक भेटतील, ते जिकडे जा सांगतील, तिकडे तो फिरतोय. इथून तो थल- बागेश्वर- ग्वालदाम मार्गे गढ़वाल भागात जाईल. जेवण झालं, थोडा आरामही झाला. आता फक्त दिड किलोमीटर बाकी. २५ किलोमीटर चालल्यानंतर सत्गडचा ट्रेक छोटा असला तरी तीव्र चढामुळे थोडा कठीण जाईल असं वाटलं होतं. पण एका लयीत- रिदममध्ये व आरामात पोहोचलो. ८ ला निघून साधारण सव्वा वाजता पोहचलो. स्ट्राव्हावर बघितलं तर चालण्याच्या साडेचार तासांमध्ये २६ किलोमीटर झाले आहेत. आणि किती जबरदस्त आतला निसर्ग बघायला मिळाला! जीवनाला मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटत आहेत!


.

.

पुढील भाग: हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १४: थरारक पाताल भुवनेश्वर

(माझे हिमालय भ्रमंती, ध्यान, सायकलिंग, ट्रेकिंग, रनिंग व इतर विषयांवरचे लेख वरच्या ब्लॉगवर उपलब्ध. निरंजन वेलणकर 09422108376 niranjanwelankar@gmail.com फिटनेस, ध्यान, आकाश दर्शन, ट्रेकिंग, मुलांचे ज्ञान- रंजन इ. संदर्भातील उपक्रमांचे अपडेटस हवे असतील तर आपला नंबर आणि नाव वरील क्रमांकावर पाठवू शकता. धन्यवाद.)

Group content visibility: 
Use group defaults

मस्त!! एकट्याने २६ किमी चालायला कसे वाटते? बाहेर इतका सुंदर निसर्ग असताना खरे तर वेळ कसा जातोय ते कळतही नसेल ना.

निसर्ग इतका इतका सुंदर असतो की, कितीही फिरलं तरी कमी वाटतं. एकट्याने जाताना निसर्गासोबत ट्युन इन होता येतं! Happy

फोटो निव्वळ अप्रतीम ! हिमालयाला देव भूमी का म्हणतात याचा जागोजागी प्रत्यय येतोय.