गोएचला उर्फ कांचनगंगा बेस कँप ट्रेकची कहाणी : दिवस २ - छोका

Submitted by आशुचँप on 19 February, 2022 - 13:08

https://www.maayboli.com/node/81025
दिवस पहिला - साचेन

====================================================================================

सकाळी जाग आली तीच कुणीतरी गदागद तंबु हलवण्याने. वर बाहेरून उठो उठो चा आवाज. ए म्हणलं काय त्रास आहे. त्या स्लिपिंग बॅगमधून कसेतरी उठत तंबूची चेन उघडली तर आमचा किचन स्टाफ. हातात चहाचा ट्रे आणि किटली आणि दे दणादण प्रत्येकाला हातात चहाचा पेला कोंबत चालले होते. चहा म्हणजे बिनदुधाचा कोरा चहा. आयुष्यात पहिल्यांदाच बेड टी मिळत होता, तोही असा डोंगरात. मज्जाय म्हणलं.
त्या स्लिपिंग बॅगमध्ये घुसणे आणि त्यातून बाहेर येणे, तेही तंबुतल्या टिचभर जागेत ही एक मोठी कसरत होती. ती कशीबशी करून बाहेर आलो तर काहीजण माझ्यासारखेच आळोखेपिळोखे देत बाहेर येत होते. काहीजण पोर्टेबल टॉयलेट टेंट च्या बाहेर संचित मुद्रेने उभे होते. काही अजून झोपेतच पेंगल्यासारखे हँग झालेले उभे होते.
लीडर आणि स्टाफ मात्र कोणत्याही क्षणी प्रलय येईल अशा आवेशाने पळापळ करत होते. त्यांचेही बरोबर होते. त्यांना आम्हाला इथे चहा नाष्टा देऊन, सगळी आवराआवरी करून, सामान खेचरांवर लादून आमच्या आधी पुढच्या मुक्कामाला जाऊन तिथे जेवण खाण्याची तयारी करायची असे. आमच्यासारखे राजेशाही थोडीच होते. त्या अख्ख्या ट्रेकमध्ये त्यांनी जी काही सर्विस दिली आम्हाला ती अक्षरश लाजवणारी होती. म्हणजे अक्षरश पंचतारांकित सुविधा असाव्यात इतपत (ट्रेकच्या तुलनेत). शेवटी आम्ही सर्वांनी वेगळी वर्गणी काढून प्रत्येकाला थोडी थोडी रक्कम सदिच्छाभेट म्हणून दिली. त्यांचे कष्ट खरेच हॅट्स ऑफ आणि सदैव हसतमुख. त्यांच्याकडे बघूनच छान वाटायचे.

सगळे विधी आटपून, टेंट काढले, स्लिपिंग बॅगची गुंडाळी करून ती त्याच्या बॅगेत कोंबण्याचा त्रासदायक प्रकार पार पाडला, सामान फारसे बाहेर काढले नव्हतेच त्यामुळे बॅग फारशी भरण्याचा त्रास नव्हता. आणि मग नाष्ट्याला गेलो. तर बघुन उडालोच, नाष्ट्याला या बहाद्दरांनी चक्क पॅन केक दिलेले, सोबत जॅम आणि मध, आणि पास्ता. होय पास्ता. मी शेवटी कुणाला तरी म्हणालो आपल्या ट्रेकच्या रकमेत खाण्यापिण्याचे पैसे धरलेत ना, का नंतर वेगळे घेणारेत. आजवर आमच्या ट्रेकचा नाष्टा म्हणजे आदले दिवशी उरलेली मुगाची खिचडी गरम करून परत खाणे. असला नाष्टा मी बापजन्मात कधी ट्रेकला खाल्ला नव्हता.

तर भरपेट नाष्टा करून निघालो. आजही पॅकलंच नव्हता कारण आपण दुपारपर्यंत पोचू असे लीडर म्हणाला. आजचा ट्रेक होता ७ किमीचा. साचेन (७,२०० फूट) वरून बाखीम (८,६०० फूट) आणि तिथून पुढे शोका किंवा छोका (Tshokha) होते ९,७०० फूट. म्हणजे आजही दमदार चढ असणार होते. लीडर म्हणाला काही ट्रेक आयोजक पहिल्याच दिवशी छोका गाठायला बघतात, पण मग ट्रेकरची पार दमछाक होते हे बघून आम्ही आता साचेन ला पहिला मुक्काम करतो. म्हणलं नशिब, पहिल्याच दिवशी इतकं चालून फाफललोच असतो. तर हुप्पा हुय्या करून निघालो. कालच्या चालण्यामुळे एक रिदम सेट झाला होता तो धागा तसाच खेचून त्याच चालीत निघालो. आजची वाटही घनदाट जंगलातून जात होत होती आणि साधारण एक किमी नंतर तर मस्त पायऱ्या, म्हणजे दगडी नाही तर चक्क लाकडी ओंडके आणि फळ्या टाकून. वळणावळांनी ती वाट वरती चढत चालली होती. या वाटेवर चालणे अगदी सोप्पे होते पण चढ दमछाक करणारा होता. शेवटी मी लीडरला विचारलेच ही कुणी इतकं काम केलं आहे तर म्हणाला पावसाळ्यात या वाटेची अगदी वाट लागते, खेचरांना पण चालणे मुश्किल होते त्यामुळे इथल्याच स्थानिक लोकांनी स्वकष्टाने ही वाट बांधली आहे नैतर पावसाळ्यात वरच्या कँपला जाणेच अशक्य व्हायचे. म्हणलं कमाल आहे.

माझ्या मते ट्रेकमधला सर्वात बेस्ट रुट हाच होता. दोन्ही बाजूला किंवा जिथे नजर जाईल तिथे ओक, देवदार आणि रोऱ्होडेंड्रॉनचे वृक्ष. आणि आभाळाला भिडलेले डोंगर आणि मध्येच लांबवर दिसणारे पंडीम आणि टेंझीखाय डोंगरांची बर्फाच्छदित शिखरे. काही ठिकाणी मेपलची पण झाडे दिसली. त्यांची मस्त पानगळ झालेली आणि वाटेवर पानांचा खच पडलेला. हवेत चांगलाच गारवा होता आणि चालायला धमाल येत होती. चढावर दम लागला की थांबून निसर्ग न्याहाळावा आणि पाण्याचा एक घोट घेऊन पुन्हा चालू पडावे.

अशा सुंदर वाटचालीतच बाखिम कधी आले ते कळलंच नाही. लीडर सगळ्यांना थांबले की यहां नही अभी बाखिम मै रुकेंगे, असे सांगतच चालवत होता. त्यामुळे मला वाटलेलं की गाव वगैरे असेल. पण प्रत्यक्षात तिथे एक झोपडी होती. पण हा सगळ्याच ट्रेकर, पोर्टर यांचा हक्काचा थांबा होता. तिथेच त्यांनी चहा, मॅगी, कोल्ड्रींग वगैर विकायला ठेवली होती. आणि मुख्य म्हणजे अख्ख्या ट्रेकमध्ये फक्त याच ठिकाणी मोबाईलला रेंज असते. हे लीडरने सांगायचा अवकाश, सगळ्यांचे मोबाईल बाहेर आहे. लोकांनी दे दणादण घरी फोन लावले, काहींनी तर व्हिडीओ कॉल वगैरे केले. मी असले काही केलं असतं तर घरच्यांना टेन्शनच आले असते त्यामुळे आम्ही सुखरुप आहोत, ट्रेक व्यवस्थित सुरु आहे आता एकदम १० दिवसांनी फोन करीन ट्रेक संपल्यावर एवढा मेसेज टाकला. अमेयने तेवढेही केलं नाही त्यामुळे त्याच्या वतीने मीच मामाला मेसेज केला.

तोवर एक मुलगी कुणाला कॉफी हवीय का, मी ऑर्डर करतेय, एकत्र केलं तर पटकन मिळेल असे विचारत फिरत होती. मला एकदम आनंदाचे भरते आले. म्हणलं मी मी. ती पण खुष झाली आणि आमचे चांगले सूर जमले. तीही पट्टीची ट्रेकर होती आणि याआधी बरेच ट्रेक्स केलेले तिने.
कॉफी येईपर्यंत तिथेच एक गुबगुबीत भुभ्या उन्हे खात मस्तपैकी पहुडला होता. मी त्याला ये म्हणलं लाड करतो, मग काय गडी खुष.

तोवर सगळे येऊन ठेपलेच होते. इथे खायला मिळतयं म्हणल्यावर लोकांच्या दणादण ऑर्डर सुटु लागल्या, ऑम्लेट, मॅगी. लीडर पण वैतागला, म्हणे आपण नाष्टा करून निघालोय, जेवायला पोचणार आहोत. पण त्यालाही काही बोलता येण्यासारखे नव्हते कारण हे मधल्या वेळचे खाणे ट्रेकच्या खर्चात नव्हते आणि चहा कॉफी सकट आपपाल्या खर्चाने घ्यायचे होते. मी त्या मुलीला कॉफीचे पैसे द्यायला गेलो तर घेतलेच नाहीत, म्हणलं ठिके येताना परत इथेच अशीच कॉफी घेऊ, ती माझ्याकडून.

तर सगळ्यांचे खाऊन पिऊन उरकल्यावर पुढे निघालो तर वळणावरच एक सुंदरशी झोपडी. ते दृश्य इतकं सुंदर होते की बस. निळे आकाश, त्याच्याशी सलगी करणाऱ्या डोंगर रांगा, समोर खोलवर दरी, घनदाट वृक्षांची दाटी आणि त्यातून मुरके घेत चाललेली वाट आणि त्या वळणावर मोकळ्या जागेत ही झोपडी. असं वाटलं की कधीतरी नुसतेच यावे आणि इथे मस्त मुक्काम करून रहावं, बाकी काही करू नये. कुठं जायची यायची घाई नको, काही अचिव्ह करण्याचे प्रेशर नको, बस निसर्गाच्या कवेत असेच पडून रहावं निवांत. रात्री शेकोटी पेटवून, लखलख चांदण्या मोजत अंगणात बसावं आणि थंडी वाढू लागताच त्या लाकडी खोपटात झोपायला जावं. सकाळच्या झुंजुमुंजु धुक्यात पुन्हा बाहेर यावं.

सगळ्यांचे आटपत आले तसे लीडरने पुन्हा एकदा घाई करायला सुरुवात केली. मला कळतच नव्हती त्याची घाई, आता त्यांच्या म्हणण्यानुसार दोन तीन किमीच अंतर शिल्लक होते. आणि जवळपास अख्खा दिवस होता हातात. पण नंतर कधीतरी तो बोलताना म्हणाला, की हिमालायात असं हवामानावर विसंबुन राहता येत नाही, कोणत्याही क्षणी ढग येतात आणि बेदम पाऊस पडायला लागतो. त्यामुळे शक्य तितक्या लवकर लोकांना मुक्कामाच्या ठिकाणी पोचता येईल असे बघतो. स्पेशली दुपारनंतर हवामान फार अनस्टेबल राहते. आता इथून पुढचा रस्ताही मध्येच सपाट, मध्येच एकदम चढ तर कधी थोडे उतार पण चक्क. त्यामुळे मस्त रमत गमत, फोटो काढत छोका ला पोचलो. ते म्हणजे मोठे गावच असल्यासारखे होते. लाकडी बांधकाम केलेल्या झोपड्या आणि इमारती, एक तर दुमजली होती, लाकडी टॉयलेट्स, अनेक ठिकाणी ट्रेकर टेन्ट दिसत होते. आम्ही जिथे राहणार होतो तिथे एक कंबरेच्या उंचीचे लाकडी कुंपण होते, त्याला ढकलते दार वगैरे आणि दारात आमचा स्टाफ हातात चहाची किटली घेऊन उभा. एकेक जण हातात चहाचा ग्लास घेऊनच पुढे सरकत होता. ती लाकडी खोपटे चांगलीच प्रशस्त होती, म्हणजे एक भला मोठा हॉल, त्याला लागून दोन खोल्या, थोडेसे अंतर सोडून अजून एक वेगळी खोपटे आणि तिथे किचन. खरे तर त्या सगळ्याला खोपटे म्हणणे चुकीचेच आहे. पूर्ण म्हणजे फ्लोरींग ते छत, भिंती खुर्च्या, टेबल, खिडकीपाशी टेकायला सगळं काही लाकडात बनवले होते.

तोवर टेन्ट उभे करायची तयारी सुरुच झाली होती. कालच्या तुलनेत आजची जागा खूपच प्रशस्त होती. काल म्हणजे दरीत, जंगलात थोडीशी जागा मोकळी करून राहीलो होतो. आज जवळजवळ डोंगरमाथा म्हणता येईल अशी जागा होती. समोरच लांबवर गेलेल्या डोंगररांगा दिसत होत्या.

सह्याद्रीत गडमाथा गाठल्यावर दिसते तसेच दृश्य होते हे. मी आणि अमेयने चपळाई करून चांगल्या जागेवरचा टेंट पटकावला. मुक्कामी लवकरच पोचण्याचा हा फायदा, कारण निवांत मंडळी अगदीच निवांतपणे यायची, तोवर आम्ही टेन्ट उभारून आत संसार पण थाटून मोकळे व्हायचो. तोवर जेवणाची वर्दी आली. मस्त गरमागरम जेवणावर ताव मारला. आता जाऊन पडावं असा विचार करत असतानाच लीडर म्हणाला आपल्याला आता एक छोट्या हाईकवर जायचं आहे. म्हणलं इतका वेळ तेच तर करत होतो की. पण तो सांगतो आता अक्लमाटझेशन ची प्रोसेस सुरु करायची आहे. आपण आता थोडं उंचीवर जाऊ, थोडावेळ थांबू आणि परत येऊ. म्हणजे रात्री कुणाला त्रास होणार नाही. त्यामुळे कुणालाच काही हरकत नाहीये, सगळे तयार होऊन निघतात, आता सॅक नाही काही नाही, जस्ट एक अर्ध्या तासाची चक्कर. त्यामुळे पाणीही घेतले नाही सोबत. आणि थोडा चढ चढून जाताच कष्ट वसूल. अतिशय सुंदर लँडस्केप, एक दृष्ट लावणारे सुंदर तळे, त्याच्या भोवती सगळीकडे तिबेटी पताका लावलेल्या आणि समोरच एका डोंगरावर उभे असेलली तिबेटी मॉनेस्ट्री. इतके तिकडे चरणारे घोडे (खेचर) आणि याक. अरुंद पायवाटेने वरती जाताच थंडी जाणवायला लागली आणि लगेच जॅकेट कानटोपी चढवली.

मग तिथेच थोड्या गप्पा टप्पा झाल्या, ओळखी वाढू लागल्या, समान आवडी निवडी कळू लागल्या. अंधार पडू लागला तसे परतलो. गरमागरम सूप घेतले आणि जेवायची वेळ होईपर्यंत कुणालाच तंबुत जायचे नव्हते त्यामुळे काही जण गाण्याच्या भेंड्या, काही डंबशेरज असलं काहीबाही खेळत बसले. सगळ्यांचे फोन सक्तीने बंद असल्याने कुणाला आत्ममग्न राहायची काही सोयच नव्हती. एका मुलीने चेस बोर्ड आणलेला. तो बघताच मी तुडुंब खुष झालो. मी सतत मोबाईल वर ऑनलाईन चेस खेळत असतो त्यामुळे मला म्हणजे अगदी हक्काची एंटरटेनमेंट मिळाली. मग जेवणाचा ब्रेक घेतल्यावरही ती आणि मी रात्री उशीरापर्यंत खेळत बसलेलो. शेवटी लीडरने उद्या आपल्याला मोठा पल्ला गाठायचा आहे, विश्रांती घ्या म्हणून झोपायला पिटाळले. एकुणच आजचा दिवस फारच धमाल गेला. आणि हळूहळू या वातावरणाला, हवामानाला आणि ग्रुपला सरावू लागलो होतो. हा ट्रेक फारच मस्त होणार याची जणू खात्रीच या पहिल्या दोन दिवसांनी मला दिली. त्याच आनंदात तंबूत जाऊन पडी टाकली.

(इथे दिलेले सगळे फोटो मी काढलेले नाहीत. पण सगळ्यांनी ग्रुपवर टाकलेले त्यातले काही चांगले
निवडले आहेत. आणि आता कुणाचे कुठले ते शोधणे फार वैताग काम आहे. त्यामुळे फोटोचे क्रेडीट मित्रमैत्रीणींचे, माझे नव्हे. )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान वर्णन! फक्त फूट आणि मीटरची गड्बड झाली आहे. ९७०० मी. म्हणजे एव्हरेस्ट्पेक्षाही ९०० मी. जास्त.

धन्यवाद सर्वांना,
त्रिशंकू - धन्यवाद, केलाय बदल
फारच मोठा प्रमाद झालेला Happy

सीमंतिनी - ती कोरी कॉफ़ी आहे, तिकडे सगळं एकसारखेच असतं Happy

दिव्या - ट्रेक द हिमालयाज तर्फे केलेला

उशीर केला चँप या वेळी. Happy पण ही तक्रार माझ्यासारख्या लिखाणाचा कंटाळा करणार्‍याने करावी म्हणजे Lol
सगळी व्यवधानं सांभाळून इतकं छान लिहीताय हेच खूप आहे. हा भागही सुंदर झाला आहे. फोटोंमुळे मजा आली. केसाळ कुत्री पाहून काही आठवणी जाग्या झाल्या.
(तुम्हाला कुठेच आयटीबीपी / बॉर्डर रोड ऑर्गेनायझेशन / ग्रेफ किंवा बॉर्डर पोलीस असे काहीच लागले नाहीत का ? मी आजवर जेव्हढे बॉर्डरवर काम केलेय तिथे या लोकांच्या सत्रांदा तपासण्यातून पार पडलोय. लडाख मधे तर आर्मीच आहे. तिथे अशी केसाळ कुत्री होती. कारगिल युद्धाच्या वेळी नागा पलटण इथे होती. ते गेल्यानंतर काळ्या रंगाची केसाळ कुत्री गायब झाली.
याक दिसला असेल तर फोटो टाका).

धन्यवाद शांत माणूस
आर्मी किंवा पोलिसफक्त युक्सुम ते न्यू जैपैगुरी रस्त्यात दिसले
तेही फक्त मास्क लावले अहेतक नाही एवढंच चेक करत होते

ट्रेक च्या रस्त्यावर ट्रेकर आणि पोर्टरसोडून एक माणूस नव्हता
इतक्या अडबाजुला कोणी येण्याची शक्यताही नाही

कुठं जायची यायची घाई नको, काही अचिव्ह करण्याचे प्रेशर नको, बस निसर्गाच्या कवेत असेच पडून रहावं निवांत. रात्री शेकोटी पेटवून, लखलख चांदण्या मोजत अंगणात बसावं आणि थंडी वाढू लागताच त्या लाकडी खोपटात झोपायला जावं. सकाळच्या झुंजुमुंजु धुक्यात पुन्हा बाहेर यावं.>>>

अगदी अगदी !!!

धन्यवाद सर्वांना

निसर्गाच्या सानिध्यात मनाला जी शांतता मिळते ती खरच दैवीच असावी>>>>
खरंय मला तसाच एक अनुभव आला पुढे, लिहितो त्याबद्दल नंतर

असं वाटलं की कधीतरी नुसतेच यावे आणि इथे मस्त मुक्काम करून रहावं, बाकी काही करू नये. कुठं जायची यायची घाई नको, काही अचिव्ह करण्याचे प्रेशर नको, बस निसर्गाच्या कवेत असेच पडून रहावं निवांत. रात्री शेकोटी पेटवून, लखलख चांदण्या मोजत अंगणात बसावं आणि थंडी वाढू लागताच त्या लाकडी खोपटात झोपायला जावं. सकाळच्या झुंजुमुंजु धुक्यात पुन्हा बाहेर यावं. >> आहाहा... काय मस्त वाटलं वाचुन ..(फक्त चहा/जेवण आयतं मिळालं पाहिजे Wink )
मस्त भाग हा पण... पुढचे भाग येउदेत आता पटापट

खूप छान आशुचँप!

असं वाटलं की कधीतरी नुसतेच यावे आणि इथे मस्त मुक्काम करून रहावं, बाकी काही करू नये. कुठं जायची यायची घाई नको, काही अचिव्ह करण्याचे प्रेशर नको, बस निसर्गाच्या कवेत असेच पडून रहावं निवांत. रात्री शेकोटी पेटवून, लखलख चांदण्या मोजत अंगणात बसावं आणि थंडी वाढू लागताच त्या लाकडी खोपटात झोपायला जावं. सकाळच्या झुंजुमुंजु धुक्यात पुन्हा बाहेर यावं. >>>>>>>>>> ++++++१११

नाही ना, आम्ही गेलो तो सिजन नव्हता, त्यामुळे फुललेले ऱ्होरोडेंड्रॉन पण बघायला नाही
मिळाले. पण आम्हाला स्वच्छ निळेभोर आकाश मिळाले

मस्त. . नावांचे उल्लेख सोडल्यास आपल्याच ट्रेकच वर्णन वाचतो आहोत असं वाटलं.