मांडली आरास आहे, भोगलेल्या वेदनांची
तोरणे दारास माझ्या जीवनाच्या लक्तरांची
मेजवानी नित्त्य येथे दु:ख, ओल्या आसवांची
झोप नांदे, ठीक असती स्पंदनेही काळजांची
आमुच्या वस्तीत दु:खांना छटा असते सुखांची
आसवांनीही हसावे रीत इथल्या पामरांची
सुरकुत्यांच्या आड मी आहे कहाणी वादळांची
का दयेची भीक देता? जात माझी कातळांची
कष्टल्याने घाम देई दर्प अंगाला असा की
धुंदतो, मग का असावी ओढ ऊंची अत्तरांची?
कोण धोकेबाज होते? वादळी चर्चा कशाला?
डायरी भिरकावली मी नोंदलेल्या वंचनांची
सर्व धर्मांनीच अपुले थाटले बाजार इतके!
लूट असते नेहमी भक्ताळलेल्या भाविकांची
तारखेवर तारखा पडतात पण न्यायाधिशांना
जाण नसते अर्जदारांच्या जराही यातनांची
नाव तू "निशिकांत" लिहिशी नेहमी मक्त्यात अपुले
लागते गझलेत चाहुल, का सखीच्या पैंजणांची?
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
(वृत्त-व्योमगंगा)
लगावली--गालगागा X ४