माया जडली पिंजर्यावरी, दार उघडता कशास आता?
उडावयाची उमंग मेली, सक्षम करता परास आता!
बालपणीच्या गोष्टीमधले, कासव होते कधी जिंकले
जुनी काल्पनिक गोष्ट सांगुनी, का दुखावता सशास आता?
बंद पापण्यांमधील जगणे भणंग अन् भयमुक्त असावे
बघा गुलाबी स्वप्ने बेशक, ना आवरता मनास आता
ओल अंतरी जिच्यामुळे ती पोखरते वाळवी प्रमाणे
दात आपुले, ओठ आपुले दोष लावता कुणास आता?
धूळ चारली शत्रूंना अन् अश्वमेध संपन्न जाहला
आपुल्यातल्या वैर्यांना का सोडुन, धरता उरास आता
"स्वराज्य माझा हक्क असोनी मिळवीनच तो" सिंहगर्जना
विसरुन पिग्मी नेत्यांनो का अखंड लुटता जनास आता ?
बकाल वस्तीतही पाहिली माणुसकीची प्रचंड हिरवळ
अमीर निवडुंगांचा वाटे नको राबता जिवास आता
शिक्षणसाम्राटांनी केले बटीक शाळा कॉलेजांना
सरस्वतीच्या समोर भासे कनकदेवता झकास आता
अनेक वाटा, ध्येये दिसली "निशिकांता"ला किती उशीरा!
वृध्दत्वा चल! शांत बसू दे, पुरे ठणकता प्रवास आता
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--वनहरिणी
मात्रा--८+८+८+८=३२