शहाण्याचीच दुनिया ही, कुणी कोणास सांगावे?
इथे सामोपचाराऐवजी मतभेद ऐकावे
उद्याचे कोण बघतो आजसंगे मौज करताना
सुखाचे वर्तमाना सोबती आयुष्य कंठावे
जरी का गंध वाटप शक्य नसतो पण तरी सखये
फुले तू माळता गंधाळलेले श्वास मी घ्यावे
सुताने स्वर्ग गाठाया निघाले रोमिओ सारे
जरा ढळता पदर का ढाळल्याचे अर्थ काढावे?
थव्यांनो आठवांच्या, दूर जा सोडून क्षण कांही
प्रभूला, वाटते स्मृतिभ्रंश हे वरदान मागावे
अता ना वाढता दिसतो कुठेही शब्द शब्दाने
अभासी या युगी कोणी कधी प्रत्यक्ष बोलावे?
कशी ही संस्कृती! आम्ही सुशिक्षित फेकतो कचरा
कमी शिकल्या मजूरांनीच रस्ते स्वच्छ ठेवावे
न फुंकर मारण्या कोणी, निखारे सर्व विझलेले
कुणी रुदनास जनतेतील, आक्रोशात बदलावे?
धडा "निशिकांत" घे हा राजकारण खेळण्यासाठी
कुणावर फूल उधळावे, कुणाला खोल गाडावे
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--वियदगंगा
लगावली--( लगागागा ) X ४