गोएचला उर्फ कांचनगंगा बेस कँप ट्रेकची कहाणी : दिवस पहिला - साचेन

Submitted by आशुचँप on 5 February, 2022 - 13:48

दुसऱ्या दिवशीची पहाट उगवली तीच लगबगीने. कुणीतरी दार ठोठावत होते. कुणीतरी उघडले, कुणीतरी सांगितले सब को तयार होने के लिये बोला है, ओर चाय पिने के लीये आ जाव. कुणीतरी म्हणाले, ठीक है आते है. परत दार लावल्याचा आवाज. पण त्यातल्या चाय शब्दाने माझी झोप उडाली. एरवी मी तसा कॉफी प्रेमी पण बाहेर गेल्यावर विशेषत ट्रेकला तर मग चहा ( त्याचे कारण ट्रेकवर कधीच चांगली कॉफी मिळत नाही हेही आहे). मोठ्या अनिच्छेने ते उबदार पांघरूण दूर करून उठलो, आणि रुमबाहेर आलो तर एकदम शिरशीरी आली. चांगलाच गारठा होता बाहेर. तसाच हाताची घडी करून कँटीन कडे गेलो, तिथे एकजण गरमागरम चहा स्टीलच्या कपात ओतून देत होता. दोन्ही हातात तो कप पकडून मी त्या उबदार द्रव्याचा आनंद घेऊ लागलो. बाकीचे एकेक जण येत होते, काही तिकडेच झोपले होते का काय अशा आरामात बसले होते. गुड मॉर्निंग वगैरे करून झालं.

मग लीडर उगवला आणि म्हणाला जे लोकं सामान खेचरावर देणार आहेत त्यांनी द्या पटकन, कारण पोर्टर आणि खेचर आधी निघणार. मला आठवलं आपण याचे पैसे भरले आहेत आणि आपल्याला द्यायचं आहे. मग पळत पळत रुमवर गेलो. माझी एक चांगली सवय म्हणजे मी कपडे, गरम कपडे, बाकी कपडे, आणि इन जनरल सगळ्याच वस्तु कॅटेगिरी करून वेगवेगळ्या प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये भरून ठेवतो. त्यामुळे ऐन वेळी सॉर्टिंग करणे वगैरे करावे लागत नाही. आणि वाईट सवय म्हणजे मी कुठल्या पिशवीत काय भरून ठेवलं आहे ते विसरतो, त्यामुळे मला प्रत्येक पिशवी उघडून चेक करावं लागतं यात काय आहे. आणि कुठल्या पिशवीत काय आहे हे पाठ होईहोईपर्यंत ट्रेक संपतो.

तर ठरल्याप्रमाणे मी मोठी सॅक खेचरावर द्यायला तयार केली. अमेय आधी म्हणाला होता की तो पूर्ण सॅक घेऊन करणार पूर्ण ट्रेक. मग त्याला कसेतरी मनवले आणि त्याच्या सामानातले वजनी सामान माझ्या सॅकमध्ये कोंबले. एकूण ११ किलोपेक्षा जास्त वजन असता कामा नये असे आम्हाला बजवाण्यात आले होते. माझ्या मते ते कमीच होते. मग माझ्या छोट्या सॅकमध्ये वस्तु कोंबल्या. ट्रेकला आणि तोही हिमालयातल्या कधीही हलक्यात घेऊ नये हे अनेक जणांनी सांगितल्याने आणि वाचल्याने मी जय्यत तयारी केली होती. त्यामुळे माझ्या डे सॅकमध्ये एक पोंचो, एक थंडीचे जॅकेट, एक स्पेअर टीशर्ट, मोजे, एक कानटोपी, थोडं खाऊ पिउचे सामान, माझा अवजड एसलेरआर आणि दोन पाण्याच्या बाटल्या. इतकं भरल्यावर ती सॅकसुद्धा पाच किलोच्या वरती गेली.

या ट्रेकचा वैताग म्हणजे वाटेत खूप झरे, ओढे वगैरे नाही लागत, अगदीच कमी आहेत. त्यामुळे पाणी सोबत कॅरी करावेच लागते. आणि त्रास होऊ नये आणि लवकर अक्लटमाईज व्हायला भरपूर पाणी पीत रहा, तहान लागलेली नसतानाही असा सल्ला अनेकांनी दिलेला. त्यामुळे दोन लीटर पाणी मी कायम सोबत ठेवत होतो. नंतर नंतर मग थंडी वाढू लागली तसे फ्लास्कमध्ये गरम पाणीही नेऊ लागलो. तर अशा रितीने अवजड सामान खेचरावर आणि थोडेसे जड सामान पाठीवर लादून सज्ज झालो. त्याआधी नाष्ट्याला जॅम सँडविच आणि परत वरती चहा असे रिचवले. ट्रेकला काय काय आणायचं या यादीत एक टिफीन बॉक्सपण होता म्हणे, तो काही आम्हाला दिसला नाही पण तिकडे गेल्यावर सगळ्यानी आणलेला दिसला. नशिबाने आम्ही ज्या हॉटेलवजा लॉजमध्ये उतरलो होतो त्याच मालकाकडे काही सोवेनियर विकायला होते त्यात एक खाऊचा डब्बा दिसला. अक्षरश केजीच्या बाळांना देतात तसला, म्हणलं काम भागलं.

ट्रेक सुरु होण्यापूर्वी लीडरने सर्वांना एका गोलात उभे करून बऱ्याच सूचना केल्या. त्यात मुख्य म्हणजे, हा ट्रेक आहे पिकनिक नाही, वाटेत कचरा करू नका, चढ आणि उतार असतील तिथे सांभाळून चाला, फोटोच्या नादात सुरक्षीतता फाट्यावर मारू नका, खेचरे किंवा पोर्टर क्रॉस होत असतील तर डोंगराच्या बाजूला सरकून त्यांना जायला जागा द्या इ. इ. मग High-altitude pulmonary edema (HAPE) आणि High-altitude cerebral edema (HACE) बद्दल सांगूनही बरेच घाबरवले. कुणालाही कसलाही त्रास होत असेल तर लपवू नका, आणि तातडीने लीडर किंवा स्टाफ ला सांगा. या भागात हेलिकॉप्टर नाहीत त्यामुळे रेस्क्यु सुद्धा पायीच करावे लागते आणि त्यात काहीही होऊ शकते. वगैरे वगेरे. काहींनी सिरियसली ऐकले काहींना टिवल्या बावल्या केल्या. मी याबद्दल बरेच वाचले होते त्यामुळे मीही कर्तव्यभावना म्हणून ऐकले. सगळ्यांना कधी एकदा ट्रेक सुरु होतोय असे झालेलं. मग बजरंगबली की जय म्हणत सगळे चालू पडले.

लीडर सगळ्यात पुढे आणि बुधाभाई नावाचा एक शेर्पा सगळ्यात मागे, यामध्ये आमची २४ डब्ब्यांची ट्रेन. कुणीही लीडरच्या पुढे जायचं नाही आणि बुधाभाईच्या मागे रहायचे नाही असे सांगण्यात आले आणि प्रत्येकजण आपापला पेस पकडून चालू लागला. उत्साही मंडळी लीडरच्या पावलावर पाऊल टाकून पुढे सरकली तर आमच्यासारखी मध्यम गटातली त्यांच्या मागे आणि एकदम निवांत कारभार असलेले सगळ्यात शेवटी असे करत ट्रेक एकदाचा सुरु झाला. युकसुम गाव जसे मागे पडले तसा वळणावळणांनी रस्ता थेट डोंगरात आणि दाट झाडीत घुसला. हा सगळा भाग कांचनगंगा अभयारण्यात येतो, त्यामुळे अगदी सह्याद्रीतलाच जंगल ट्रेक करतोय का काय असे वाटावे अशी परिस्थिती. तशाच बारक्या वाटा, दोन्ही बाजूला घनटाट झुडपे, मधूनच वाहणारे ओढे आणि वर गेल्यावर दिसणाऱ्या खोलवर दऱ्या आणि डोंगरांचे विहंगम दृश्य. फक्त इथे जाणवण्याइतपत थंडी होती आणि डोंगरांवर बर्फाचे खोबरे शिवरले होते.

वाटेत पहिला झुलता पूल आणि कांचनगंगा अभयारण्याचे गेट लागले.

आणि तिथे काळा कुत्राही नव्हता असे कोणी म्हणू नये म्हणून अक्षरश तिथे एक काळा कुत्रा होता. तो नंतर आमच्यासोबत सगळीकडे हिंडला त्याचे नाव कालू. मी आपला बेबी स्टेप्स टाकत, श्वासावर नियंत्रण ठेवत एकेक पाऊल टाकत निवांत चालत होतो. युकसुम समुद्रसपाटीहून ५६७० मी आहे आणि आम्ही ८ किमी चा ट्रेक करून ७२०० फुटांवर पोचणार होतो. एलेव्हेशन गेन व्यवस्थित होता त्यामुळे लीडर कितीही म्हणाला ज्यादा चढाई नही है तरी मला माहीती होते की असणारे व्यवस्थित. आणि तो अंदाज खरा ठरला, तब्येतीत चढ आणि तितकेच खोल उतार होते.

मध्ये शुशे धबधबा लागला. आणि तो पर्क नदीला जाऊन मिळतो असे लीडर म्हणाला. मग परत प्रचंड चढ आणि दुसऱ्या झुलत्या पुलावर जायला तितकाच खोल उतार.

दरम्यान, एकेक सहप्रवासी कळत चालले होते. एक माऊंटन कपल म्हणता येईल असे जोडपे होते. दोघांच्या अंगावर गुंजभरही फॅट्स नसतील. दोघेही प्रचंड काटक आहेत दिसत होतेच आणि तितक्याच सफाईदारपणे चालत होते. दोघांनाही ट्रेकिंगचा खूपच अनुभव होता हे त्यांनी ओळख परेडच्या वेळी सांगितले होते. त्यांची चांगली ओळख करून घ्यावी असा एकदा विचार आलेला पण त्यांनी तशी काही संधीच दिली नाही. दोघे एकमेकांच्या आकंठ प्रेमात होते आणि सतत आपल्याच विश्वात होते. म्हणजे तसे असायलाही हरकतही नव्हती पण त्यांच्या पीडीए ने वैताग आणला. सतत चिकटाचिकटी आणि एकमेकांच्या गळ्यात पडून फोटो. आणि पूर्ण ट्रेकभर जागोजागी हेच.

आजूबाजूचा निसर्ग इतका सुंदर आणि हवा बेतशीर गार त्यामुळे श्रम असे फार जाणवलेच नाहीत आणि म्हणे म्हणेपर्यंत पहिल्या मुक्कामाची जागा आलीच. आकाश ढगाळलेले होते आणि दाट झाडी, जंगलच होते त्यामुळे वेळेचा काही अंदाजच नव्हता. वेळ बघितली तर दोनच वाजले होते. मला संध्याकाळचे पाच सहा वाजल्यासारखे वाटत होते. आता इतक्या दुपारीच येऊन पोचल्यामुळे पुढे आता दिवसभर काय करावे हा प्रश्न मनात आला. पण करायला भरपूर गोष्टी होत्या. आमच्या आधी पोचलेल्या कुकिंग स्टाफने तयारी करून सर्वांसाठी गरमागरम चहा उकळत ठेवला होता. गेल्या गेल्या सर्वांना ग्लासभरून चहा आणि सोबत बिस्किटे. म्हणलं हे बेस्ट आहे. कारण सह्याद्रीत मी कुठल्या संस्थेसोबत फारसे ट्रेक कधीच केले नव्हते. एक लिंगाणाचा अपवाद वगळता. त्यामुळे गेल्या गेल्या आम्हालाच चूल, स्टोव्ह पेटवून बाकी उद्योग करावे लागायचे. इथे सगळं रेडीमेड हातात त्यामुळे सुख सुख म्हणतात ते हेच असावं. तोवर लीडर आणि बाकी टेंट उभारणीला लागले. आम्हीही फारसे दमलो नव्हतो त्यामुळे आम्हीही हातभार लावला. टेंट आम्ही एरवी वापरतो तसलेच होते पण चांगल्या क्वालिटीचे होते त्यामुळे पटापट उभारायला लागलो. ज्याना माहीती नव्हते त्यांना लीडरने एक टेंट लावून दाखवला त्याप्रमाणे बाकी जण करू लागले.

तोवर एकेक करत मेंबर येतच होते. सगळे टेंट लावून झाले प्रत्येकाला ते अलॉट झाले. त्याप्रमाणे स्लिपींग बॅगचे वाटप झाले आणि एकेक लायनर, म्हणजे उत्कृष्ठ ब्लँकेट होते, त्याची घोळदार पिशवी होती, ती आत पांघरून मग स्लिपींग बॅगमध्ये घुसायचे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने दिलेली स्लिपींग बॅगचा नंबर लक्षात ठेऊन ट्रेक संपेपर्यंत तेच वापरायचे होते तर लायनर सोबत बाळगायचे होते. त्याची भली थोरली गुंडाळी होत होती, म्हणलं आता हे सोबत म्हणजे बाकी सामानाला जागाच उरणार नाही. टेंट अलॉट करतानाची पण एक गंमत. दोघात एक टेंट दिला जात होता. नवरा बायको असतील तर त्यांना एक. अशा तीन जोड्या होत्या नवरा बायकोच्या. एक निलांजन म्हणून गमत्या ट्रेकर होता. एकदम धमाल आणि दिलखुलास व्यक्तिमत्व. तो आला होता त्याच्या मैत्रीणीसोबत आणि त्यांनी काही सामान शेरींगमधे आणले होते त्यामुळे त्यांनाही एकच टेंट मिळाला तर हवा होता. पण तोवर लीडरच्या लक्षात आले की एकच मुलगी एकटी उरत आहे त्यामुळे मग त्याने नाईलाजाने ही जोडी फोडून मैत्रीणीला तिच्या टेंटमध्ये पाठवले. सगळ्यांच्या समोरच हा प्रकार झाल्याने आम्हाला वाटले की ते नवरा बायकोच आहेत. आणि मग तो इकडे तिकडे भटकत असताना तिला काहीतरी हवे म्हणून ती त्याला शोधत होती तर एकाने आवाज दिला, अरे भाई तेरी बिवी बुला रही है तुझे. झालं, यावर ती चवताळून बाहेर आली, ओय मै बिवी नही हूं उसकी. तेवढ्यात तो आलाच आणि त्यावरही बरसली, तुने क्या हम शादीशुदा है करके बोल रहा है क्या. तो बिचारा इतका गांगरला. आम्ही अक्षरश तोंड फिरवून कसेतरी हसू दाबत होतो.

तोवर पाच वाजत आलेले, पुन्हा एकदा चहाची फैर झडली. आणि लीडरने सर्वांना रोजचे टाईमटेबल सांगितले. म्हणाला, पहाटे लवकर सुरु करायचे चालायला. सहा वाजता चहा आणि सात वाजता नाष्टा आणि त्यादरम्यान आवरून साडेसात किंवा आठला चालू पडायचे. आज पहिलाच दिवस असल्याने काहीजण निवांत आटपून आलेत हे उद्यापासून चालणार नाही. सगळ्यांनी वेळेत हजर रहायचे. संध्याकाळी पाच वाजता चहा, सहा वाजता सूप आणि रात्रीचे जेवण सात वाजता. आणि आठ वाजता गुड नाईट. हे ऐकल्यावर मी हबकलोच. मी म्हणजे निशाचर माणूस आणि रात्रीचे जेवण नउ किंवा दहाच्या आत कधी होत नाही. म्हणलं सातला जेवण झाल्यावर परत दहाला भूक लागली तर काय. आणि आठला कसली झोप लागतीय मला. पण माझ्या सगळ्या शंका निर्रथक ठरल्या. कारण तासभर आधी सूप घेतल्यावर आणि दिवसभर चालून आल्यावर कडकडून भूक लागलेली असायची. तब्येतीत जेवण केल्यावर थंडी वाढलेली असायची आणि कधी एकदा टेंट मध्ये जाऊन स्लिपिंग बॅग मध्ये गुरफटून घेतोय असे व्हायचे. आणि दिवसभराच्या श्रमाने कधी डोळे मिटायचे कळायचं देखील नाही. असेही तिथे शून्य रेंज होती त्यामुळे सगळ्यांचे मोबाईल एरोप्लेन मोडमध्ये होते त्यामुळे ते डिस्ट्रॅक्शनदेखील नव्हते. एकदम आदर्श टायमिंग होते आणि माझ्यासारख्या सगळ्या वाईट सवयी असलेल्या माणसाला तर डॉटॉक्सचेच फिलींग आले आणि मला या ट्रेकला आल्याबद्दल मनापासून आनंद झाला.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच. अधाशाप्रमाणे वाचून काढले.
टेण्ट मस्त दिसताहेत.
ते दोघे तुलचमासव भाऊ बहिणी असतील. त्यांना नवरा बायको समजण्यात चूक तुमचीच आहे. Happy
( जेण्डरलेस मैत्री)
चहाचे निरीक्षण एकदम आवडले आणि पटले पण. कॉफी अशा ठिकाणी बेचव मिळते याला अनुमोदन !
लिखाण तर सहीच, पण हा दिवस एकदम आवडला.

धन्यवाद, शा मा
नई ते खरोखरच चांगले मित्र मैत्रीण होते,कॉलेजपासून एकत्र
आमची नंतर खुप छान मैत्री झाली पण त्या दोघांना चिडवायला आम्हाला निमित्त पुरले, मूह बोली बिवी असे आम्ही तिला नाव पाडले
तीही तितकीच दिलखुलास होती, त्यामुळे तिने कधी त्यावरून इशू नाही केला
सगळं ग्रुपच तसा धमाल होता, लिहितोच सगळ्यांबद्दल थोडे थोडे

मस्तच. तुम्ही ज्या बारकाव्यांसकट लिहिता त्यामुळे डोळ्यासमोर ऊभं रहातं सगळं. लगेच उठून ट्रेक सुरू करावासा वाटतो.

धन्यवाद सर्वांना

ट्रेकला भेटणाऱ्या लोकांच्या personalities हा खास विषय आहे>>>
अगदी खरंय Happy
तरी मला बराच संयम ठेऊन लिहावं लागत आहे
बऱ्याच लोकांच्या गमतीदार गोष्टी झाल्यात या ट्रेक ला Happy

पक्षी दिसले थोडेफार, पण प्राणी एकही नाही. एकतर या वाटेने अनेकजण प्रवास करत असतात. त्यात पोर्टरची विचित्र सवय म्हणजे, मोठ्याने मोबाईल स्पीकरवर गाणी लावून चालत राहतात. त्यांची ओझी उचलण्याची क्षमता बघून त्याबद्दल त्यांना काही म्हणावंही वाटत नाही. आणि स्थानिक भाषेतली ते इंग्रजी ट्रान्स पर्यंत काय वाटटेल ती व्हरायटी असते. त्या आवाजाने कुणी प्राणी येत असतील असे वाटत नाही.

सुरेख वर्णन आहे. ब्रिजचा फोटो इथेही सुरेख.
लेखाच्या सुरूवातीला व शेवटी आधीची व नंतरची लिंक टाकू शकाल का? म्हणजे सर्व भाग असल्यावर सलग वाचायला मदत होईल.

मस्त. टेंट लावायला जागा चांगली स्वच्छ मिळाली आहे की. आणि टेंटही नविन आणि प्रशस्त दिस त आहेत !
नशिबाने आम्हाला त्याच स्लिपींङ बॅग आणि लायनर वापरा असं करावं लागलं नाही.

बाकी सगळं वर्णन वाचून पुन्हा आठवणी जाग्या झाल्या.

उलट मला ते बरं वाटलं, लोकांचे घामट लायनर वापरण्यापेक्षा आपलं आपल्याकडे असलेलं बेस्ट. कारण बाहेर कितीही थंडी असली तरी त्या लायनर मध्ये थोडाफार घाम यायचाच
हायजीन च्या दृष्टीने पण तेच योग्य