प्रथमच मी माझ्या वीक एंड लिखाणाचा भाग दोन लिहीत आहे. त्याला कारणही तसेच आहे. हे लिखाण जे मी गेल्या रविवारी म्हणजे ३१.०१.२०२२ रोजी प्रकाशित केले त्याला रसिकांचा/ वाचकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. आलेल्या प्रतिसादापैकी दहा प्रतिसाद खाली माहितीसाठी आहे. हे प्रतिसाद मी माझी टिमकी वाजवण्यासाठी देत नसून फक्त लोकांना मतप्रवाह कळावा एवढेच स्तिमित माझे ध्येय आहे. ते प्रतिसाद असे----
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१) नमस्कार खूप सुंदर असतं तुमचं आठवड्याच्या शेवटचा लेख.या वयातली ही ऊर्जा नक्कीच वाचकांना नवी उमेद देऊन, नवनवीन कांहीतरी लिहिण्यासाठी प्रवृत्त करत असतं. आणि शेवटी मनातील भावना , ज्या लेख वाचून निर्माण होतात, त्यांनाशब्दरूपात कागदावर उतरविण्याला उत्साह देतात. मी पण मराठवाड्यात वाढल्यामुळे खरोखर या सर्वआठवणींना उजाळा मिळाला. पण एक सांगते, आम्ही दहा भावंडं मात्र मुलं मुली हा भेदभाव कधीच अनुभवायला नाही आला आमच्या घरी. माझ्या संदर्भात एक तसा प्रसंग झाला होता. आमच्या घरी हिवाळ्यात न चुकता मूग आणि उडदाची डाळ मिक्स करून , त्यात भरपूर सुका मेवाघालून लाडू बनवायचे. सर्वांना21 लाडू, मोठ्या आवळ्याच्या आकाराचे , डब्यात घालून आमच्या स्वाधीन करायचे. हा शिरस्ता अगदी शेवट पर्यंत आईबाबांनी पाळला होता. एका वर्षी लाडू कमी झाले शेवटी ते मला देत होती आई, तेंव्हा मात्रमी माझा हक्क सोडला नाही, आणि आईला असं करायला नको होतं हे कळलं होतं. मग आईंनी सगळ्यांच्या हिस्यातले एक का दोन लाडू माझ्या डब्यात घातले आणि समानता जपली. खूप मजा आली आज आपला लेख वाचून. खूप खूप आठवणी आठवल्या. दूध दुभतं, गाई म्हशी, दही ताक, खरवड, गुलाबी दूध, दूध तापवायची ती थाळी , मोठंमडक, शिंपलं ... काय काय मस्त
२) कधीकाळी पाहिलेल्या गोष्टींचे संदर्भ वय परत्वे उलगडत जातात आणि जेव्हा त्याचा खरा अर्थ आणि त्यामागचा हेतू कळतो तेव्हा त्यातली विषमता सुद्धा तेवढ्याच तीव्रतेने मनाला भिडते सर.आपण आयुष्यात ज्याज्या गोष्टी बघितल्या त्यांचे सूक्ष्म निरीक्षण तुमच्या मनात खोलवर घर करून बसलेले आहेत आणि त्यांच्यातील अर्थ आज वयाच्या ह्या टप्प्यावर एकेक करून उलगडत आहेत. कळत आहेत.आणि त्यावेळच्या त्या प्रसंगातील भीषणता आज मानलं वेदना देऊन जात आहे.मनाच्या ह्या संवेदनशीलतेला मी अगदी सहृदय सलाम करतो सर.अशाच प्रसंगातून कवी मन घडत जाते सर.कारण कवी हा मुळातच संवेदनशील असतो आणि पाहिलेल्या प्रत्येक प्रसंगाची तीव्रता त्याच्या स्वतःच्याच अनुभूती असतात हा अनुभव तो कवी आयुष्यभर घेत असतो.म्हणून हे असे मनाला भिडणारे लिखाण घडत असते त्याच्या हातून..तुम्ही तर पराकोटीचे संवेदनशील आहात सर. ईश्वराने मला तुम्हाला भेटायचा योग आणला पाहिजे एवढी हीच इच्छा पूर्ण व्हावी .तुम्हाला उदंड आयुष्य मागतो सर
३) आवडले आजचे वीकएंड लिखाण..आपली लेखनशैली खूप छान आहे त्यामुळे कोणताही विषय वाचायला मन लगेच तयार होते.ओळ न ओळ डोळ्यापुढे चित्र उभे करते..मुलगा मुलगी हा भेदभाव खरोखर त्याकाळी नक्कीच जास्त प्रमाणात होता.समानता फार दुर्मिळ.. आताची पिढी या बाबतीत भाग्यवान म्हणावी लागेल..विशेष आठवण आवडली ती दुधाची.. लिहिलेत इतके साधे पण खुमासदार की जिभेवर ती तुपट गोडसर खरवड उतरली शब्दातून..वीकेंड लिखाण संस्मरणीय
४) याबाबतीत महात्मा फुले दाम्पत्याचे कार्य अकाशायेवढे आहे . म्हनून आता खुप बदल झालाय अस मला वाटत .
५) विचार करायला लावणारे वीक एंड लिखाण.... किम्बहुना आज ही समाजाला सांगावे लागते *बेटी बचाओ बेटी पढाओ* काळ बदलला तरी मानसिकतेत फारसा बदल झालेला नाही.
६) आई लाडाने मुलास शाळेत सोडायला जाणे, बहीण दफ्तर पकडणे हे दाखवते माया एकोपा,लेकीला लाडाची व महत्वाची समजणे,हे सगळे स्नेहबंध आज झाले जुने!! मुलगी नको,लेकाला शाळेत सोडायला जाणे कमीपणाचे,दुसऱ्याच्या मुली ठेवायच्या,त्यांना वरवरचे प्रेम हे सूत्र!आपण चितारले सहज ओघवत्या भाषेतआम्ही दंग वाचनात!!
७) अगदी चित्रच समोर उभे केले. मी तर दुय्यम दर्जाची वागणूक लहानपणी चांगलीच अनुभवली आहे... आई वडील सुशिक्षित असुनही अनेक गैरसमजातून मनावर ओरखडे ओढले गेले. मोठ्याने हासणे, मांडी घालून जेवायला बसणे, भावाची बरोबरी करणे खूप चूक सांगितले जायचे. जसे भावांचे वाढदिवस साजरे होत आम्हा बहिणींचे होत नसत. आज अजूनही माझ्या निवृत्त आईला मी चूक असो नसो परंतु भावाशी मतभेद झाले तर नेहमी मीच पडती बाजू घेतली पाहिजे असे वाटते. मुलगी म्हणून सून म्हणून कायम दुय्यम दर्जा गृहिणी म्हणून प्रमाणाबाहेर गृहीत धरणे आजही चालू आहे. थोड्याफार फरकाने घरोघरच्या याच कहाण्या आहेत. मी मात्र मला नाही मिळाले ते ते मुलींना देण्याचे ठरवत लढत आहे कधी घरातल्यांशी कधी स्वतःशी.. परंतु बदलास मी स्वतःपासून सुरूवात करते आहे. आपला विश्वास प्रेम आशीर्वाद कदाचित बळ देत असेल.. प्रेरणा देत असेल. खूप सुंदर लेख..! लढा कुणाशी.. अच्युत गोडबोले लिखित कथा वाचलेली आठवली. जन्मदात्री आईच मुलगा आणि मुलगी यांना प्रेम देताना भेद करते... यावर भाष्य करणारी कथा होती.
८) अजुनही बऱ्याच ठिकाणी मुलींमुलांत भेदभाव केला जातो. ते काही शहर खेडे, मराठवाडा कोकण अशा सीमा नसतात परदेशात ले काय समजत नाही पण भारतात मात्र बऱ्याच ठिकाणी असा भेदभाव केला जातो आणि मुलींनी पण ते मूकपणे स्वीकारलेले दिसते.
९) अगदी खरे आहे मुलींना दुय्यम वागणूक मिळतेच..मी एका प्रोजेक्टवर काम करत होते तेव्हा प्रसूती झालेल्या महिलेला जुळी मुले झाली, एक मुलगा आणि एक मुलगी तर ती महिला फक्त मुलाला अंगावर दूध पाजायची आणि मुलीला पावडर चे दूध. यासाठी अर्थातच तिच्या घरातील वयस्कर मंडळी जबाबदार आहे. मी माझ्या परीने समजावून सांगितले पण त्यांच्या मानसिकतेत किती बदल झाला काय माहिती .खूप सारे अनुभव आलेत असे.
१0) अतिशय सुंदर बालपणी च्या आठवणी सर!हिवाळ्यात माझे वडिल.. सुका मेवा आणायचे भरपूर.. काजू बदाम अंजीर मनुके आपल्या कडे मिळते ती गोडांब्या.. दोन तिन महिने असायचा हा मेवा. रोज सकाळी.... दुध घ्यायच्या आधी, हा मेवा सर्वात वाटल्या जायचा हो, परंतू समान नव्हे! तर भावांच्या वाट्या भरलेल्या ते लहान असूनही!? आणि आम्ही दोघी बहिणी च्या वाटीत 2/काजू दोन बदाम आणि चार मनुके बास. याच्या वर नाही मिळाला कधीच. मात्र दुध भरपूर.. मिळायचे. तेही गायीचे! मस्त... खरवस हा प्रकार नेहमीच असायचा....मुलींना दुय्यम वागणूक होतीच तेंव्हा मुले लाडकी असायची हे मात्र खरे आहे. परंतू मी माझ्या वडिलांना विचारले असता, त्यांचे उत्तर असे होते की, मुली या आधीच हुशार असतातच!! मॅच्युरिटी लवकर येते मुलींना.. म्हणजे समज येणे, लवकर मोठे होणे, या अर्थाने असायचे तेंव्हा ते...परंतू माझ्या वडिलांनी कधीच मुलींना दुय्यम वागणूक दिली नाही. आज जेही काही धीट पणा किंवा खंबीर पणा माझ्यात आहे तो फक्त माझ्या वडिलांन मुळेच!!!
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
या सर्व प्रतिसादांची खासियत अशी की:-
१) मी अगदी साधे प्रतिसाद, आवडले, सुंदर, हृदयस्पर्शी, खरय, अंगठे दाखवणारे वगळले आहेत.
२) हे प्रतिसाद व्हट्सअॅप आणि फेसबुकवर आलेले आहेत.
३) ज्यात रसिकांनी मी उहापोह केलेल्या विषयाबद्दल कांही मतप्रदर्शन केलेले आहे तेच निवडले आहेत.
४) वर दिलेल्या दहा प्रतिसादांपैकी नऊ महिला रसिकांनी दिलेले आहेत तर फक्त एक प्रतिसाद पुरुष रसिकाने दिलेला आहे.
५) प्रतिसाद देण्यार्यांची नावे मी त्यांना आवडेल की नाही या शंकेमुळे लिहिलेली नाहीत.
६) जसे प्रतिसाद आले तसेच येथे कट पेस्ट केले आहेत. त्यात कोणताही बदल केलेला नाही.
फक्त अनुक्रम नंबर एक समोर दिलेला प्रतिसादच असा आहे जिथे लहानपणी त्यांच्या घरी मुलगी आणि मुलगा यामधे कसलाही भेदभाव केला जात नसल्याची नोंद आहे. बाकी सगळ्याची कथा थोड्याफार फरकाने भेदभाव होत असल्याचीच आहे.
माझी आईवर अपार श्रध्दा आहे. आई म्हणजे एक विचित्र रसायन असते जे आपल्या मुलांसाठी सर्वस्व पणाला लावते. हे मी अनुभवलेले आणि पाहिलेले पण आहे. पण अनुक्रमांक नऊ समोरील प्रतिसाद वाचून माझ्या विश्वासाला तडाच गेला. प्रत्यक्षदर्शी महिलेने लिहिले आहे की एका महिलेने जुळ्यांना जन्म दिला ज्यात एक मुलगा आणि एक मुलगी होते. ही सुशिक्षित आई मुलाला अंगावर पाजायची आणि मुलीला जन्मापासून बाटलीने पावडरचे दूध पाजायची. सुन्न झालो अक्षरशः. शेवटी मनाची समजूत घातली की आईचे चांगुलपण सिध्द करायला असा एखादा अपवाद असावाच लागतो.
सगळ्यात शेवटचा एकमेव प्रतिसाद असा आहे ज्यात स्पष्ट नमूद केलय की बाबा कधीही मुलामुलीत भेदभाव करत नव्हते. झालाच तर तो आईकडूनच होत असे.
सख्ख्या आईकडून आणि समाजाकडून जर असा भेदभाव होत असेल तर किती अवघड ! स्त्रीला जीवन जगणे म्हणजेच एक धाडसाची बाब होऊन बसते. मी तर म्हणेन की जन्म घेणे सुध्दा एका अर्थाने धाडसच आहे.ती आयुष्यात पावलोपावली धाडस करते म्हणून तर सारे कांही अलबेल आहे या जगात. हाच विचार सांगणारी एक माझी जुनी कविता आज प्रकर्षाने आठवली जी मी खाली देतोय रसिक मायबापासाठी.
उमलायाचे धाडस केले
नको नकोशी जरी जगाला जन्मायाचे धाडस केले
मुग्ध कळीने काट्यामध्ये उमलायाचे धाडस केले
खाचा खळगे खूप जीवनी पायवाटही अरूंद होती
तोल सावरत ध्येय दिशेने चालायाचे धाडस केले
जरी विषारी नजरा होत्या सभोवताली सहकार्यांच्या
सन्मानाने जगण्यासाठी कमवायाचे धाडस केले
पतंग आले तिला विझवण्या गटागटाने,पण ज्योतीने
निश्चय करुनी प्रकाश देण्या तेवायाचे धाडस केले
पीठ कोणत्या चक्कीचे ती खात असावी कधी न कळले
अन्यायांना पदराखाली झाकायाचे धाडस केले
उपभोगाचे साधन केले तिला तरीही देवापुढती
सात जन्म त्या पतीस जुलुमी मागायाचे धाडस केले
तोंड दाबुनी मार खातसे बुक्क्यांचा ती उठता बसता
असह्य होता चार आसवे गाळायाचे धाडस केले
स्त्री जन्माची उंच लक्तरे टांगत टांगत, कूस उजवता
तिने जिजाऊ नाव मुलीचे ठेवायाचे धाडस केले
"निशिकांता" चल काळे फासुन शेजार्यांना प्रश्न करू, का
गाप्प राहिले? तिने स्वतःला जाळायाचे धाडस केले
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--वनहरिणी
मात्रा--८+८+८+८=३२