हवाला

Submitted by अनिंद्य on 31 January, 2022 - 06:14

A3DCA91B-AEEB-47A1-94D5-7650F8307E5E.jpegप्रसंग १ :-

स्थळ: मुंबईतल्या अत्यंत गजबजलेल्या काळबादेवी भागातील एका जीर्ण इमारतीचा दुसरा मजला. मोडकळीला आलेल्या कुरकुरणाऱ्या लाकडी जिन्याने दोघे मित्र वर चढून आले.

"जय श्रीक्रिश्ना मोटाभाई. तमारा अमुक सेठ आव्या छे. एना साथे तमने लाडवा मोकलूं छू.." समोर बसलेले झडपियाजी फोनवर कुजबुजले आणि समोरच्या टेबलावर धाड धाड पाचशे-दोन हजारांच्या नोटांची बंडले रचू लागले.

दोघा मित्रांपैकी 'अमुक सेठ' नी ते पैसे मोजून एका कळकट्ट कापडी पिशवीत भरले आणि मोजणी संपल्याबरोबर स्वतःच्या खिशातून काढून दहा दहा रुपयाच्या दोन चुरगळलेल्या नोटा झडपियाजींना दिल्या. त्यांनी नोटा तपासल्यासारखे केले आणि मग मनोभावे नमस्कार करून त्या नोटा 'श्री कछवाह गोसेवा मंडल, भादोडिया चार रास्ता, लालजीपुर, जिला कच्छ, गुजरात' असा पत्ता छापलेल्या पारदर्शक 'गोसेवा दानपेटी'त अर्पण केल्या.

328A0CE9-1E3E-4363-B6A7-A42598074886.jpeg

* *
प्रसंग २ :-

स्थळ : हंगेरी देशाची राजधानी असलेले बुडापेस्ट शहर. सदैव गजबजलेले. शहराच्या बुडा भागातील बेकसी कापू - लुथेरिन चर्चच्या जवळच्या, श्रीमंती थाटाची अनेक दुकाने असलेल्या लेनमधील एक सुंदर 'आर्ट शॉप'. मला थोडेफार डॉलर बदलून स्थानिक चलन हवे आहे आणि माझ्या गाइडच्या मते पूर्ण शहरात इथे सर्वोत्तम दर मिळेल. आम्ही दोघे दुकानात शिरतो. माझे काम चटकन होते. बाजूलाच एक भारतीय चेहरेपट्टीचा माणूस... सहज स्मित.. तो फोनवर बोलतो आहे ... "हां बीजी, भेज रहा हूँ. शाम को मिल जायेंगे आप को. होर दस्सो, लाहोर दा की हाल? सब चंगा?" तो फोन ठेवतो. मख्ख चेहऱ्याने दुकानाच्या मालकीणबाई त्याच्याकडून स्थानिक चलन घेऊन, नीट मोजून पेटीत ठेवतात. फार नसावेत पैसे. साधारण ८०० डॉलर्स. आम्ही दुकानातून एकत्रच बाहेर पडत असताना तो सांगतो - "इथे ट्रक चालवतो. दर महिन्याला घरी पैसे पाठवतो." "बँकेतून का नाही पाठवत?" असे मी विचारल्यावर सांगतो, "बँक में ज्यादा कमिशन है और दो चार दिन लगेंगे. इन आंटी के तारिके से भेजो तो दो घंटे में पैसे घरवालों को मिल जाते हैं."

3497F032-BAF6-4173-BADF-9DDAAE63D8EC.jpeg

* *
प्रसंग ३ :-

स्थळ : सिंगापूरचा लिटिल इंडिया भाग. प्रसिद्ध मुस्तफा स्टोअरच्या बाजूच्या गल्लीत अक्षरश: डझनांनी माणसे खोळंबली आहेत. बहुतेक सर्वच जण तामिळ भाषेत बोलत आहेत. सर्वांना चेन्नई, कोईम्बतूर, चिदंबरम, तिरुचिरापल्ली अशा आपापल्या गावांना पैसे पाठवायचे आहेत. प्रत्येकाची रक्कम तुटपुंजीच आहे, पण घरच्यांना ताबडतोब मिळावी अशी अपेक्षा आहे. काही मिनिटांतच तिथला कारभारी प्रत्येकाकडून पैसे घेऊन पटापटा फोन करून पलीकडे पैसे मिळाल्याची खातरजमा करतो आणि बघता बघता सगळी गर्दी निवळते. पंधरा-वीस मिनिटांचा खेळ. स्थानिक मित्र सांगतो, ह्याला ‘हवाला’ म्हणतात. दर आठवड्याला पगाराच्या दिवशी साधारण असेच दृश्य असते. मग आम्ही दोघे सिंगापूरच्या कडक सरकारी नियम-कायद्यांवर बोलत बोलत मसाला चहा पिऊन त्या भागातून बाहेर पडतो.

* * *
कर्मधर्मसंयोगाने वरील तिन्ही प्रसंगांचा साक्षीदार ठरल्यामुळे ‘हवाला’ काय भानगड आहे याबद्दलची उत्सुकता ताणली जाते. त्या अनुषंगाने विषयावर विचार – वाचन - चर्चा असा प्रवास घडतो.

अगदी थोडक्यात सांगायचे, तर पैसा ‘जागचा जागीच’ ठेवून जगात हवा तिथे पोहोचवण्याची जादू म्हणजे हवाला. जगाचे पोलीस असलेल्या इंटरपोलची हवाला व्याख्या एकदम सोप्पी आहे - ‘money transfer without money movement’. कोणताही फॉर्म नाही, कागदपत्र नाही, बँक खात्याची गरज नाही. अत्यल्प कमिशन देऊन काही तासांत जगातल्या कोठल्याही कोपऱ्यात पैसे पोहोचवले जातात. व्यवहार त्या त्या देशातील स्थानिक चलनात! झटपट आणि बिनबोभाट.

हवाला जन्माने शुद्ध हिंदुस्थानी असल्याचे मानतात. ह्याचा एक चिनी भाऊबंद आहे 'चॉप मनी' किंवा 'फ्लाय मनी' नावाचा. दोघांमध्ये ज्येष्ठ कोण, याबद्दल वाद आहे. चीनचा Fei-ch'ien, हाँगकाँगचा हुई कुआन (Hui Kuan), भारत आणि अरबस्तानातला हवाला, फिलिपिन्सचा पडाला (Padala), सीयाम-थायलंडचा फे क्वान (Phei Kwan) सगळे एकमेकांचे चुलत-मावस-आतेभाऊ. 'इन्फॉर्मल मनी एक्स्चेंज' असे इंग्लिशमधले सध्याचे गोंडस नाव.

आठव्या शतकात 'रेशीम मार्ग'वर उर्फ सिल्क रूटवर चालणाऱ्या व्यापारात 'हवाला'ची पाळेमुळे आहेत. चीनच्या हान राजवटीत रेशीम मार्ग उदयास आला आणि पुढे उत्तर भारत, इराण-इराक, सीरिया मार्गे रोमपर्यंत खुष्कीच्या मार्गाने व्यापार जोमाने होऊ लागला. देशोदेशीचे व्यापारी हजारो मैलांचा प्रवास करून आपल्या चीजवस्तू विकत आणि त्याबदल्यात अन्य वस्तू किंवा रोकड मिळवत. हा सगळा प्रदेश अनेक लहानमोठ्या राज्यकर्त्यांच्या ताब्यात होता आणि वाटेत व्यापाऱ्यांना लुटण्याचे प्रमाण भरपूर. साहजिकच जास्त रोकड जवळ बाळगण्यात जास्त जोखीम. शिवाय प्रत्येक राज्यात 'चलन' वेगवेगळे असल्यामुळे गोंधळ जास्तच. त्यामुळे भारतीय आणि अरब व्यापाऱ्यांनी 'हवाला'चा मार्ग सर्वप्रथम चोखाळला आणि रेशीम मार्गावरील सर्व मोठ्या शहरात पैसे सुरक्षितपणे पाठवण्याची एक खात्रीशीर व्यवस्था अमलात आली. आधुनिक बँकिंग प्रणाली सर्वत्र उपलब्ध आणि सर्वमान्य होण्याच्या आधी विदेशात आणि देशांतर्गत पैशांची देवाणघेवाण करणारी सुरक्षित आणि खात्रीची पद्धत म्हणून हवाला व्यापार स्थिरावला.

‘हवाला’ शब्दाचे अर्थ प्रदेशागणिक आणि भाषेगणिक बदलतात - साक्ष, कशाच्या तरी ऐवजी, मोबदल्यात, विश्वास, विश्वासू, जामीन, जामीनपात्र असे. हिंदी-मराठीत सूत्रांच्या ‘हवाल्याने’ बातमी इत्यादी आपण ऐकतोच.

रोकड पैसे, एक पैसे देणारा, एक पैसे घेणारा, दोघांचे प्रत्येकी एक याप्रमाणे किमान दोन 'हवालादार', दोघांचे कमिशन आणि परवलीचा शब्द किंवा खूण एवढ्या भांडवलावर हवाला व्यापार चालतो. हवाला पद्धतीला भारतात आणि एकूणच आशिया खंडात मोठा इतिहास आहे. व्यापारी जातिसमुदायांमध्ये शेकडो वर्षांपासून पैशांच्या देवाणघेवाणीसाठी हवाला पद्धत वापरात आहे. आपल्याकडे मुंबई-दिल्ली-कोलकाता शहरात पाच पाच पिढ्या 'हवालादार' असलेली कुटुंबं आहेत. पिढीजात हाच व्यवसाय. त्यांच्यापैकी अनेकांना दलाल, मर्चंट, सेठ, चतुरसेठ, मारफतिया, रोकडिया, झडपिया अशी आडनावे चिकटली आहेत. (ह्या आडनावाचे सर्वच लोक हवाला व्यापारात होते-आहेत असा मुळीच दावा नाही.) परिचयातील एका सिंधी कुटुंबाने नुकतीच काही जुनी कागदपत्रे एका शोधकर्तीला दिली, त्यात कुटुंबाचा हवाला व्यापार कराची, मुंबई, हैदराबाद, लाहोर, मुलतान, काबूल ते समरकंद भागात चालत असल्याचे पुरावे आहेत. पाश्चिमात्य पद्धतीचे बँकिंग सुरु होण्याआधी भारत आणि समस्त आशिया खंडात एकमेकांच्या ओळखी आणि पिढीजात व्यापारी संबंध एवढ्याच भांडवलावर तोंडी आणि पूर्णपणे विश्वासावर चालणारा कारभार. 'लिखापढी' जवळपास नाहीच.

आज आधुनिक बँकिंगचे जाळे जगभर भरपूर पसरल्यानंतरही अधिकृत बँकिंग तंत्राला जोरदार टक्कर देण्याची हवालाची शक्ती प्रचंड आहे. कारणे अनेक आहेत - कागदपत्रांची फारशी गरज नसणे, कमीत कमी कमिशन, बँकेत खाते नसणे, सरकारी कर चुकवण्याची वृत्ती, ताबडतोब मिळणारी घरपोच सेवा, ओळखपाळख असल्यामुळे वाटणारा विश्वास इत्यादी. हवाला व्यवहारातील सर्वात मोठी गोम म्हणजे घेणाऱ्या-देणाऱ्यांची ओळख उघड न होणे आणि झालेल्या आर्थिक व्यवहाराचा कोणताही मागमूस न राहणे. शिवाय 'हवालादार' होण्यासाठी कोणतीही नोंदणी किंवा परवाना लागत नाही, त्यांना कोणत्याही सरकारी निरीक्षण-परीक्षणातून जावे लागत नाही. त्यांच्यावर सरकारचा किंवा इतर कोणाचाच वचक नाही. सगळा व्यवहार फक्त सर्व संबंधितांच्या एकमेकांवर असलेल्या विश्वासावर चालतो. काळाबाजार करणारे, करबुडवे, सराईत गुन्हेगार, सट्टा लावणारे बुकीज, गुंड-खंडणीखोर, तस्कर, पैशांची अफरातफर करणारे, दहशतवादी, अंमली पदार्थाचे व्यापारी असे सर्व समाजविघातक लोक हवालाचा मार्ग वापरतील, ही साधार भीती पोलीस यंत्रणांना असते. त्यामुळे काही आफ्रिकन देश वगळता जगभर हवाला व्यापारावर बंदी आहे. बंदी कितपत परिणामकारक आहे हा वादाचा विषय आहे. अधिक भ्रष्टाचार असलेल्या आणि मागास बँकिंग व्यवस्था असलेल्या गरीब देशात हवाला व्यापार जास्त भरभराटीला आहे असे म्हणावे, तर जुनी आणि गावोगावी रुजलेली प्रभावी बँकिंग व्यवस्था असलेल्या युरोपीय देशातही हवाला जोरात आहे. कर चुकवणे ही प्रवृत्ती जगभर सारखीच असावी. जिथे करव्यवस्था कडक नसेल किंवा करांचे प्रमाण जास्त असेल, तिथे ही प्रवृत्ती हवालासारख्या कर बुडवणाऱ्या पद्धतीला पोषक होते. घरोघरी मातीच्या चुली.

हवाला पद्धतीने देवाणघेवाण करायला भारतात अर्थातच बंदी आहे. तो मोठा गुन्हा आहे. विदेशी मुद्रा नियमन कायद्यानुसार हवालात पाठवलेल्या रकमेच्या तिप्पट रकमेच्या दंडाची तरतूद आहे. पाठवलेल्या रकमेबद्दल तपासयंत्रणांना खात्री नसेल किंवा रक्कम खूप कमी असेल तर किमान दोन लाख रुपये दंड आहे. दंडाची रक्कम न भरल्यास हवाला वापरणाऱ्या दोन्ही पक्षांकडून सर्वदेशीय चलनी नोटा आणि स्थावर संपत्ती जप्त करणे किंवा कैदेची जबरी शिक्षा आहे. असे असूनही आपल्या देशात हवालाचा धंदा जोरात असल्याचे बोलले जाते.

शितावरून भाताची परीक्षा करायची म्हटल्यास भारत दर वर्षी येणाऱ्या साधारण १ लाख कोटी परकीय चलनापैकी फक्त ३० हजार कोटी हे अधिकृत बँकिंग प्रणालीमार्फत येतात. उरलेला मोठा भाग हवालामार्फत येतो. देशांतर्गत रुपयातून होणारी हवाला देवाणघेवाण यात धरलेली नाही, अन्यथा आकडे आणखी फुगतील. अर्थात हे फक्त यंत्रणांचे अंदाज आहेत, अधिकृत आकडे उपलब्ध नसतात. खरी आकडेवारी यापेक्षा बरीच जास्त असण्याची शक्यता आहे.

भारतात येणारा हवालाचा सर्वात जास्त पैसा खाडीच्या देशातून येतो असे म्हणतात. तिथे मोठ्या संख्येत असलेल्या भारतीय कामगारांमध्ये आणि नोकरदारांमध्ये भारतात घरी पैसे पाठवण्यासाठी हवाला पद्धत अनेक दशकांपासून वापरात आहे आणि ती अजूनही लोकप्रिय आहे. मुख्य कारण अल्पशिक्षित लोक आणि सुटसुटीत स्वस्त व्यवहार. हवाला व्यापाराचे एक टोक खाडी देशातून होणाऱ्या सोन्याच्या तस्करीशी जोडले गेले आहे. वेळोवेळी त्याचे पुरावे दिसून येतात. मागच्या वर्षी कोरोना लाटेतसुद्धा तिरुवनंतपुरम विमानतळावर एका राजदूताच्या सामानात फार मोठ्या प्रमाणावर सोने आढळल्याने बरीच चौकशी झाली. त्यात पकडलेल्या हवाला व्यापाऱ्यांचे भारतासह सुमारे वीस देशांत असलेले नेटवर्क उघड झाले. अर्थात असे छापे आणि त्यातून होणारी जप्ती वगैरे हिमनगाचे एक टोक आहे, हे तपासयंत्रणा जाणतात.

मागील वर्षी संयुक्त राष्ट्रसंघाने केलेल्या अभ्यासानुसार दर वर्षी जगभरात अवैधमार्गे फिरणारा पैसा अंदाजे २ ट्रिलियन (२००० अब्ज) अमेरिकन डॉलर्स असावा. ही रक्कम जगाच्या एकूण GDPच्या ५% आहे, यावरून विषयव्याप्ती लक्षात येते. विषयतज्ज्ञ डॉ. रोनाल्ड पोल यांनी केलेल्या एका जागतिक पाहणीच्या निष्कर्षानुसार दर वर्षी जगभरातल्या सगळ्या तपास यंत्रणा मिळून एकूण हवाला व्यापाराच्या जेमतेम ०.१ % रक्कम जप्त करतात. उर्वरित अब्जावधी रुपयांची रक्कम त्यांच्या हाती लागत नाही. ही रक्कम देशोदेशीच्या दहशतवादी संघटनांच्या आणि अंमली पदार्थाच्या तस्करांच्या कामी येत असावी. सर्व देश पैशांचा अवैध प्रवास रोखण्याचा परोपरीने प्रयत्न करतात. त्यांना मिळणारे यश मात्र मर्यादित आहे.

हवाला व्यापार पूर्ण बंद करता येत नाही, हे लक्षात आल्यामुळे अनेक देशांनी सध्या 'दुश्मन से दोस्ती' असे धोरण अवलंबिले आहे. विशेषतः युद्धग्रस्त, राजकीय-आर्थिकदृष्ट्या अस्थिर देशांमध्ये पैसा देशाबाहेर नेण्यासाठी किंवा चलनबदलासाठी स्थानिक यंत्रणा स्वतः हवाला व्यापारांना नोंदणीपत्र वगैरे देऊन थोडेफार नियंत्रण आणू पाहत आहेत. त्याबदल्यात हवालादारांकडून ग्राहकांची नोंदणी, व्यवहाराचे तपशील मिळवून पैसे गुन्हेगारांच्या हाती जाऊ नयेत म्हणून प्रयत्न करायचे त्यांचे धोरण आहे. हे करत असताना देशातील अधिकृत बँकिंग व्यवस्थेला लागलेले भ्रष्टाचाराचे, आळसाचे, भोंगळ कारभाराचे डाग धुण्याचा प्रयत्न अनेक देश करत आहेत. कारभार ग्राहकाभिमुख नसेल, देवाणघेवाणीवर कर जास्त आणि करप्रणाली किचकट असेल, बँकेचे व्यवहार क्लिष्ट असतील तोवर हवालासारखे पर्याय ग्राहक वापरणार, हे सगळ्याच देशांना कळलेले आहे.

बरे, हवाला कितीही बदनाम असला, तरी राजरोसपणे बँकेतून पाठवलेल्या पैशात काही गडबड होत नाही असे नाही. चाणाक्ष व्यापारी आणि हवालादार कधी कधी सोने किंवा तत्सम वस्तूंच्या तस्करीसाठी योग्य त्या देशात पैसे उसने देतात आणि भारतात विक्रीनंतर मिळणाऱ्या नफ्यात हिस्सा मिळवतात. आयात-निर्यातीच्या व्यापारात अधिक बिल दाखवून कमी माल पाठवणे आणि वरचे पैसे हे हवाला व्यवहार पूर्ण कार्यासाठी वापरणे हे तत्त्व वापरले जाते. अनेकदा 'हँडलूम किंवा हस्तकलेच्या वस्तू' म्हणून लाकडी ठोकळे किंवा रंगीबेरंगी चिंध्या भरलेले पेटारे विदेशात पाठवले जातात. त्यापोटी कोट्यवधी रुपये राजरोसपणे बँकेतून निर्यातदाराला मिळतात आणि ते हवाला व्यापारात वापरले जातात. जगभरातील सरकारी यंत्रणा हे थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांचे यश मर्यादित आहे. चोर नेहमी पोलिसांच्या एक पाऊल पुढे असतात.

प्रत्येक व्यवहारात किमान दोन हवालादार असतात, प्रत्यक्षात मात्र ही अनेक हवालादारांची एक मोठी साखळी असू शकते. त्यांचे हवालाव्यतिरिक्त आपसात अन्य आर्थिक व्यवहार असतात. हेच व्यवहार हवालाची पूर्तता करण्यासाठी वापरण्यात येतात, अर्थात अवैध मार्गानी. त्यामुळे प्रत्येकाकडे येणारा पैसा अनेक देश फिरून येतो. त्याला त्यांच्या भाषेत 'लेयरिंग' म्हणतात. त्यामुळे व्यवहाराचा माग काढणे अधिक कठीण होते. हे सर्व परस्पर विश्वासावर चालत असल्याने आपसात ताबडतोब सेटलमेंटचा आग्रह नसतो. म्हणजे कोणी हवालादार ब्यागेत नोटा भरून दुसऱ्या देशांत पूर्ती करायला जात नाही. थोडक्यात सांगायचे तर ताळमेळ घालण्यासाठी सर्वात जास्त वापरण्यात येणारे सूत्र म्हणजे अन्य वस्तूंची आयात-निर्यात, वेगवेगळ्या देशात करण्यात येणारी खरी-खोटी गुंतवणूक, अवैध सावकारी, मौल्यवान वस्तूंची तस्करी इत्यादी. हे गणित २+२ = ४ असे साधे सोपे नाही. साहजिकपणे हवाला व्यवहार बेकायदेशीर आणि गुन्हेगारी कृत्य म्हणून गणले जातात. गंदा है पर धंदा है Happy

नवीन तंत्रज्ञान वापरण्यातही चोर पोलिसांना वरचढ ठरत आहेत. प्रभावी संपर्कमाध्यमे वापरून 'घंटों का काम मिंटों में' हे तर आहेच, शिवाय मोठ्या व्यवहारासाठी सर्रास ओळख चोरण्याचा (Identity Theft) मार्ग वापरला जात असल्याचे तपास यंत्रणांच्या लक्षात येत आहे. हवालाच्या जगात क्रिप्टो करन्सीने प्रवेश केल्याची वदंता आहे. जगभरातील सरकारे आणि हवाला यंत्रणा यामध्ये उंदीर-मांजराचा खेळ अखंड चालूच आहे.

* * *

रोकड, पैसे देणारा, पैसे घेणारा, दोघांचे 'हवालादार' आणि परवलीचा शब्द.. आता वरच्या प्रसंगांमधले दुवे चाणाक्ष वाचकांनी ओळखले असतीलच. अमुक सेठ जे 'लाडू' खाणार आहेत, तो पैशाचा आकडा आहे आणि दहा रुपयांच्या चुरगळलेल्या नोटांचे नंबर हा परवलीचा शब्द आहे, वन टाइम पासवर्ड. 'बीजी' आणि 'लाहोर दा की हाल' हे त्या लाहोरच्या आजींसाठी आणि आपल्या तामिळ मित्रांनी तर थेट फोन करून पैसे मिळाल्याची तत्काळ पावती घेतली आहे.

समाप्त!

टीप : लेखातील तपशील आणि आकडेवारी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आणि विविध देशातील प्रथितयश आणि विश्वसनीय संस्थळांच्या 'हवाल्याने'!

(इतरत्र पूर्वप्रकाशित)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच !

चोर नेहमी पोलिसांच्या एक पाऊल पुढे असतात.>>+१११
म्हटलेच आहे ना,

चोर हा कलाकार असतो

मस्त लेख!
आत्ता लक्षात आलं हे हवाला प्रकरण.

पूर्वी हुंड्या असत. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे हवे असल्यास स्वतःच्या गावातल्या पेढीवर पैसे भरून तिथून दुसऱ्या गावाच्या पेढीच्या नावे चिठ्ठी लिहून घ्यायची की अमुक व्यक्तीला अमुक पैसे अमुक तारखेच्या आत ही चिठ्ठी दाखवल्यास on डिमांड दिले जावेत. मूळ पेढीचा हवाला हीच व्यवहाराची खातरजमा. ही हुंडी म्हणजे सध्याच्या डिमांड ड्राफ्टचे मूळ म्हणता येईल. ह्यात अनेक प्रकार असत. डेबिट हुंडी देखील असे. म्हणजे पैसे न भरताच मूळ पेढीच्या शब्दावर पैसे दिले जात.
एकेकाळी मुलतानी हुंडी फार विश्वसनीय मानली जात असे. तिथले लाला लोक हे संस्थानिकांनासुद्धा पैसे पुरवणारे लोक असत. वरील लेखात लिहिल्याप्रमाणे मध्य आशिया, इराण, अफगाणिस्तान, नैऋत्य चीन म्हणजे थेट कास्पियन समुद्र ते पामीर पठार आणि पंचनद्यांचा प्रदेश इतक्या विस्तृत प्रदेशात हा व्यापार चाले.
लेख अतिशय आवडला हे वेगळे सांगायला नकोच.

खूप सोपी आणी रोचक माहिती, धन्यवाद अनिंद्य.

पूर्वी हवाला हा शब्द फारच बदनाम झाला होता. रॅकेट होते म्हणे.

तुमची लेखनशैली ओघवती आहे. शुभेच्छा!>>>>> +११११

हिरा, तुम्हाला पण धन्यवाद. तुमचे वाचन पण अफाट आहे. माहिती पण छान देता.

@ हीरा,

अधिकच्या माहितीबद्दल आभार.

डेबिट हुंडी - हो, हे खास करुन चारधाम यात्रा किंवा काशी-प्रयाग यात्रेसाठी वापरत असे ऐकले आहे. नगरसेठ अशा यात्रा स्पॉन्सर करुन पुण्य कमवीत Happy

@ मुलतानी हुंडी... ..

होय. लेखात उल्लेख असलेल्या सिंधी कुटुंबाचे मूळ गाव मुलतान आहे. त्यांनी सांगितल्या प्रमाणे - मुलतानी मिट्टी (माती, जी सौंदर्यप्रसाधन म्हणून वापरतात), मुलतानी पीर (साधू) और मुलतानी शाहजी (श्रीमंत / सावकार) इन का दुनिया में सानी नहीं Happy मुलतानी हुंडी वटवायला दोन पिढ्यांचा उशीर जरी झाला तरी ते सावकार पैसे देतात, एक रुपया सुद्धा बुडवत नाहीत अशी त्यांची ख्याती !

आज 'बंटी और बबली २' बघितला( कोणास ठाऊक कसा). त्यात हवाला शब्द पहिल्यांदा ऐकला. ती फक्त सिनेमातली आयडिया असेल असं वाटलं पण खरंच असा काही प्रकार असतो हे माहिती नव्हतं. छान माहिती आहे.

मला आठवतं की वख्त चित्रपटात बलराज साहनीची कवेट्ट्यामध्ये पेढी होती असे दाखवले आहे. त्या पेढीच्या नामफलकावर लाला अमुक तमुक अशी अक्षरे होती. नाव आता आठवत नाही पण पाटीवरचा लाला शब्द लक्षात राहिला आहे.

@ हीरा,
लाला केदारनाथ होतं ते !
'वक्त' माझ्या लक्षात राहतो 'ऐ मेरी जोहरा जबीं' मुळे Happy प्रौढांच्या खट्याळ प्रणयाचे सुंदर वर्णन-चित्रण Happy

@ मी चिन्मयी,
आभार.
'बंटी और बबली २' बोअर झाला, अजिबात कन्विन्सिंग वाटत नाही आणि कुठेच हसू येत नाही.

दिवाळीपूर्व उपक्रम
विविध जुन्या दिवाळी अंकांत प्रसिद्ध झालेले माबोकरांचे निवडक साहित्य