सायकल यात्रा - पूणे ते कुरवपूर आणि मंत्रालयम १०३५ किलोमीटर ची यात्रा
दरवर्षी १७ जानेवारी पासून विजापूर ते मंत्रालयम् पर्यंत पदयात्रा म्हणजे दिंडी किंवा वारी जाते. दोन वर्षांपूर्वी मी पण सहभागी झालो होतो. या वर्षी पण जायच ठरवलं. तयारी म्हणून रोज ऑफिसला पायी जायला सुरूवात केली. पण ३० डिसेंबर ला सर्दी, खोकला, ताप आला. घरी झोपून होतो. मनात विचार आला सायकल वर यात्रा केली तर.... आई ची परवानगी मिळाली आणि ठरवलं १००० किलोमीटर ची सायकल यात्रा करायची. व्यवस्थितपणे यात्रेचे टप्पे ठरवले. दिवसाचे अंतर ठरवले. मध्येच बारगळलं तर सायकल बसने घरी परत आणायची हे पण ठरवलं.
गुरूनानक जयंतीला नवीन सायकल घेतलेली. आता बाकिच्या आवश्यक वस्तू गोळा करायला सुरूवात केली. हायड्रेशन बॅग, कॅरियर ला लावायचे पॅनिअर रॅक चे बॅग, हॉर्न, ॲरोबार, आवश्यक औषधे, प्रथमोपचाराचे साहित्य, आणि बरच काही. डॅकेथलॉन मधून काही साहित्य मिळाले. ॲमेझॉन वरून काही. अतुल जी सुबंध यांनी कॅरिअरची बॅग आणून दिली. जुळवाजुळव पूर्ण झाली. मोठी राईड मारून बराच काळ लोटला होता. थोडी धाकधुक होती. १४ तारखेला घरातून निघायचं ठरवलं होतं.
१२ जानेवारीला कोव्हिडची टेस्ट करून घेतली. त्याच दिवशी पदयात्रा रद्द करणार अशा आशयाचा निरोप आला. दोन दिवस त्यांच्या बरोबर मुक्कामाची सोय होणार होती. घालमेल सुरू झाली. आई ने करोनाचा वाढता प्रादुर्भाव बघून सायकल यात्रा रद्द करण्यास सांगितलं. रात्री परत एकदा विनवणी केल्यावर जा म्हणाली. ठरलं तर जायचं म्हणजे जायचच...
यात्रा:
दिवस पहिला १४ जानेवारी :
१४ जानेवारीला सुरूवात केली. इंदापूर चा पहिला मुक्काम होता. १६५ किलोमीटर पहिल्या दिवशी करायचे होते. पहिली विश्रांती ३५ किलोमीटर अंतरावर घेतली. चहा घेऊन परत सुरूवात. रस्त्यावर अनेक सायकलस्वार भेटले गप्पा मारत पाटस गाठलं. येथे ऑफिस चे सहकारी भूषण येणार होते. गप्पा चहापान उरकून पुढचा प्रवास सुरू झाला.
चढ आणि उलटा वारा सोबत होता. इंदापूर सायकलींग क्लबचे सदस्य रमेश जी (आबा) शिंदे भेटले. त्यांनी इंदापूर येथे राहण्याची सोय होईल असे सांगितले. नियोजनाप्रमाणे हायवे वरील लॉज वर मुक्काम करायचा होता.
इंदापूर गाठताच परत त्यांचा फोन आला. त्यांनी निवासाची सोय करून दिली. थोडी विश्रांती घेतली. संध्याकाळी आबा घरून पुरणपोळी घेऊन आले. सोबत गफुर भाई, गुरूजी पण आले. सायकलींग या बरोबरच इतिहास, रूढी, परंपरा, समाज, या विषयांवर चर्चा झाल्या. पण पुढे अनपेक्षित प्रकार घडला.
फेटा, शाल, पुष्पगुच्छ, मेडल, सर्टिफिकेट देऊन माझा सत्कार करण्यात आला.
सकाळी लवकर भेटण्याचे ठरवून सगळे आपापल्या घराकडे वळले आणि निद्रादेवीच्या कुशीत मी पण शिरलो.
दुसरा दिवस : १५ जानेवारी
सकाळी सहा वाजताच सायकल वर किट चढवून तयारी केली. गुरूजींना फोन केला. गुरूजी घरून चहा घेऊन आले होते. दोन कप चहा घेईपर्यंत बाकिचे सदस्य आले. आज सोलापूर गाठायचं होतं. शनि शिराळा येथे परत हार घालून सत्कार केला गेला. अलविदा म्हणत पुढे मार्गस्त झालो.
मोहोळ ओलांडून पुढे आल्यावर डावे पेडल लूज झाल्याचे जाणवू लागले. सर्व्हिसिंग करताना दाखवलेला प्रॉब्लेम डोकं वर काढत होतं.
कसंबसं सोलापूर गाठलं. दुकानात नेऊन सायकल दाखवली आणि आत्याचं घर गाठलं. आंघोळ, जेवण उरकलं. सोलापूर ऑफिसचे सहकारी पाटील सरांच्या घरी धावती भेट दिली. अल्पोपहार, चहा आणि मस्त गप्पा झाल्या.
एक स्पॅनर घेऊन आत्याकडे परतलो. त्यांच्या कॉलनी मधील रहिवाशांना कौतुक वाटलं. अभिनंदन, शुभेच्छा, अनुभव यांची देवाणघेवाण झाली.
तिसरा दिवस : १६ जानेवारी
सकाळी सोलापूर सोडलं. विसेक किलोमीटर अंतरावर पेडल परत लूज पडू लागलं. स्पॅनर ने टाईट करायचं आणि पुढं जायचं प्रकार सुरू झाला. सायकल दुकानात नेऊन दाखवली तर हायब्रीड सायकल ला हात लावायला कोणी तयार होईना.
पुढे पुढे तर दर ४ - ५ किलोमीटर वर पेडल लूज पडू लागले होते.
रडतखडत विजापूर गाठले तर विकेंड लॉकडाऊन. मामा कडे मुक्काम होता. मामे भावाबरोबर बाजारात जाऊन दुकाने पहिली. अर्थातच ती बंद होती.
सकाळी सायकल रिपेअर झाली तर पुढची यात्रा अन्यथा घरी परत जायचं असं ठरवलं.
चौथा दिवस : १७ जानेवारी
सकाळी बाजार पेठ गाठली. दुकाने बंद होती. उघडे पर्यंत साडे दहा वाजून गेलेले. त्यात योग्य तसे स्पेअर मिळेना. शेवटी तडजोड केली. लोकल स्पेअर बसवले. घरी परत येईपर्यंत एक वाजला.
दीड वाजता यलगुरूच्या दिशेने सायकल दामटली. हायड्रेशन बॅग भरली होती. ६० किलोमीटरचा पल्ला गाठेपर्यंत २ लिटर पाणी रिचवले गेले. हनुमानाचे दर्शन घेतले. नारळ फोडला चहा पिऊन मुद्देबिहाळचा प्रवास सुरू झाला. अंधार पडायच्या आत मुद्देबिहाळ गाठायचं होतं. पण कच्चा रस्ता आणि त्यात सायकल पंक्चर झाली. नशीब बलवत्तर होते. पंक्चरचं दुकान शेजारीच होतं. पण कारागीराने सायकलला हात लावायला साफ मनाई दिली. किट मधून हत्यारे काढली. एव्हाना गावातील मुले आणि म्हतारे गोळा झालेले.
पंक्चर काढली. त्या लोकांना नवलच होतं की, कोणी एकटाच हजार किलोमीटरचा प्रवास सायकलवर करतोय.
अंधार पडायला लागलेला. टॉर्च सापडेना. तशीच सायकल दामटली. रस्त्यावर पदयात्रेचे वारकरी दिसत होते. मुद्देबिहाळच्या डोंगर माथ्यावर मामेभाऊ बसला होता. त्यांच्यासोबत पाण्याची विश्रांती (हायड्रेशन ब्रेक) घेऊन मुद्देबिहाळ गाठलं.
राघवेंद्र स्वामी मठात पोहचलो. मठाचे मॅनेजर आणि कर्मचारी सायकल कडे बघत होते. परत गप्पा आणि कौतुक. उपवास होता. जेवण करणार नव्हतो. रात्री मठाधिकारी केळी, चिक्कू, सफरचंद घेऊन आले.
पाचवा दिवस : १८ जानेवारी
नियोजित वेळेत प्रवास सुरू झाला. साधारण १८ किलोमीटर अंतरावरील अमरेश्वर मंदिरात जेवण होते. नलतवाड हे विजयनगर साम्राज्याच्या शेवटच्या लढाईची रणभूमी. येथेच साम्राज्याचा पाडाव झालेला.
पायी येणाऱ्या यात्रेकरूंची वाट बघत आन्हिकं उरकून घेतली. पोहे खाल्ले.तोपर्यंत सगळे आले. पूजा आणि प्रसाद (जेवण) उरकलं.
नारायणपूर च्या बसवसागर धरणासमोरून मुद्गलचा किल्ला बघायला निघालो. मुद्गलचा किल्ला सुंदर आहे पण इतर किल्ल्यांच्या सारखाच बकाल झालाय. आत शंभर एक घरे झालियेत. पुढच्या मुक्कामाकडे प्रवास सुरू केला.
चितापूरला उत्तरादी मठाच्या सत्य पराक्रम तीर्थांचे वृंदावन (संजीवन समाधी) आहे. तेथे मुक्काम होता. माझ्या पोहोचण्याच्या नंतर पदयात्रेचे सामान आणणारी गाडी आली. रात्रीचे भजन आणि जेवण उरकलं.
सहावा दिवस : १९ जानेवारी
आज लिंगसुगूर गावात जेवणाची सोय होती.लिंगसुगुर गावाजवळ सोन्याची खाण आहे. पण आज ते बघायचं नव्हतं. अमरेश्वर मंदिराला जायचं होतं.
तेथिल शंभू महादेवाच्या पिंडीवर जटा उगवतात. दरवर्षी काढाव्या लागतात असं स्थानिक लोकांकडून कळलं होतं.
सकाळी अमरेश्वराचे दर्शन घेतले परत लिंगसुगुर गाठलं. जेवण उरकून मान्वी गावाकडे प्रयाण केलं. इथून पदयात्रेकरी आणि माझी वाट वेगळी झाली.
मान्वीच्या रस्त्यावर गावकऱ्यांनी फळ दिली. मान्वी गाठलं. जगन्नाथ दासांच्या समाधी मंदिरात मुक्काम करण्याचा मानस होता पण तेथील गुरूजींनी नकार दिला. राघवेंद्र स्वामींचे मठ गाठले. जेवण आणि राहण्याची सोय झाली.
सातवा दिवस : २० जानेवारी
सकाळी मान्वी सोडलं. रायचूर ची वाट धरली. रस्त्याने कल्लुरू गाव लागते. तेथील महालक्ष्मी मंदिर प्रसिद्ध आहे.
हनुमानाचे आणि महालक्ष्मीचे दर्शन घेतले. पुरी भाजीची न्याहारी केली. रायचूर चा प्रवास सुरू झाला. एव्हाना चढ आणि ऊलटा वारा यांची सवय झालेली. पण इथलं वातावरण फारच रूक्ष. वाळवंटात आल्यासारखं वाटत होतं. पाण्याचा खप वाढत होता.
रायचूर ओलांडलं आणि कूरवपूरचा रस्ता धरला. तेलंगाणा राज्यात प्रवेश केला.
कुसुमुर्ती गावातील श्री कृष्ण द्वैपायन तीर्थ स्वामींच्या वृंदावनाला जायचं होतं. माझ्या खापर पणजोबांच्या (मुंढेवाडीचे रामदास स्वामी) जीवन चरित्राप्रमाणे खापर पणजोबांचा पूर्वजन्म अवतार होते श्री कृष्ण द्वैपायन तीर्थ स्वामी.
तेथून अडीच वाजता कुरवपूरचा प्रवास सुरू केला. ४० किलोमीटर गाठायला तीन तास लागले. ORS आणि पाणी खूप लागत होते.
कुरवपूर गाठलं पण बेटावरच मंदिर बंद झालेले. भक्त निवासात रूम घेतली. आंघोळ उरकून विश्रांती घेतली. रात्रीचे जेवण मंदिर संस्थानाचे होते.
आठवा दिवस : २१ जानेवारी
सकाळी बोटीने मंदिरात जाऊन श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या समाधीचे दर्शन घेतले. गुगलचा चाळा करताना परतीची वाट वेगळी दिसत होती. नावाडी बरोबर बोलणी केली आणि सायकल बेटावर आणली. नावाड्याने आणि तेथील दुकानदारांनी खजूर दिले.
सायकल वर बेटाच्या कर्नाटक सिमेजवळ आलो आणि कळलं की गुगल वर दिसणारा पूल हा प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. परत सायकल बोटीत चढवली आणि कर्नाटकात आणली.
रायचूर चा मार्ग धरला. थकवा जाणवत होता. २७ किलोमीटर गाठायला दोन तास लागले. रायचूर ला खरंतर मुक्काम करायचा होता पण आडवाटेने आल्यामुळे लवकर पोहोचलो होतो. जेवण उरकले आणि मंत्रालयम् च्या दिशेने सायकल दामटली.
संध्याकाळी मंत्रालयम् गाठलं. मंदिराच्या ट्रस्ट ची निवास स्थाने होती पण एकट्या यात्रीला रूम देणे त्यांच्या नियमाबाहेर होते. प्रायव्हेट लॉज मध्ये उतरलो.
आंघोळ उरकून देवदर्शन केले. बाहेर खानावळीत जेवण उरकले.
नववा दिवस : २२ जानेवारी
सकाळी उठून बिच्छालेचा मार्ग धरला.
येथे पदयात्रेचे भक्त आणि नातेवाईक येणार होते.
सगळ्यांची भेट झाली. जेवण उरकून पंचमुखी, अणु मंत्रालयम फिरून मंत्रालयम रोड रेल्वे स्टेशन गाठले. येथून परतीचे रिझर्व्हेशन होते. अपेक्षेप्रमाणे स्टेशन लहान असल्याने पार्सल ऑफिस नव्हते.
स्टेशन मास्तरांना पर्यायी मार्ग विचारला. त्यांनी रायचूर मधून सायकल पार्सल करावं असं सुचवलं आणि रायचूरच्या पार्सल अधिकार्यांना फोनवरून तशी कल्पना दिली.
परत मंत्रालयम गाठलं नातेवाईकांबरोबर रात्रीचे जेवण उरकलं
दहावा दिवस : २३ जानेवारी
सकाळी रायचूरचा प्रवास सुरू केला. अपेक्षित वेळेत पोहोचलो. सायकल पार्सल चे काम पूर्ण झाले. दुपारचे जेवण उरकून आता रात्रीच्या गाडीची वाट बघत झोपही काढली.
पुण्याची गाडी वेळेवर आली.
अकरावा दिवस : २४ जानेवारी
सकाळी पुण्यात उतरलो. पार्सल ऑफिस मध्ये जाऊन चौकशी केली तर सायकल आलेली नव्हती. धाबे दणाणले. तेथील अधिकाऱ्यांनी रायचूरला फोन केला आणि सायकल तेथेच असल्याचे कळवले.
रिक्षाने घर गाठले.
बारावा दिवस : २५ जानेवारी
पुण्याच्या पार्सल ऑफिस मधून फोन आला. सायकल आली होती. सकाळी जाऊन सायकल घेऊन आलो.
यात्रा पूर्ण झाली होती.
या यात्रेत प्रत्यक्ष मदत करणारे इंदापूर चे सायकल क्लब चे सदस्य आबा, त्यांचे चुलत बंधू, गुरूजी, गफूर भाई, सोलापूर चे रिक्षा मॅकेनिक, सायकल मॅकेनिक, विजापूर रस्त्यावर भेटलेले ट्रक चालक, विजापूर चे सायकल मॅकेनिक, पद यात्रेतील नर्मदा परिक्रमा करणारे ज्ञानेश्वर, हडपसर सायकल क्लबचे सदस्य, पदयात्रेतील नातेवाईक आणि यात्री, रायचूर मधील उसाच्या रसाचे दुकानदार आणि असंख्य लोक तसेच अप्रत्यक्ष मदत करणारे अगणित लोकं यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाने यात्रा पूर्ण झाली. सगळ्यांचे खूप खूप आभार.
घरी आल्यावर किटचे वजन पाहिले तर अठरा किलो भरले. सायकल पेक्षा जास्त वजन किटचेच होते
फारच धाडसी प्रवास आहे.
फारच धाडसी प्रवास आहे. एकट्याने केल्याबद्दल तुमचे अभिनंदन!
मस्त!!! अभिनंदन व पुढील
मस्त!!! अभिनंदन व पुढील प्रवासास खूप शुभेच्छा.
(एक नकाशा व काही चित्रे दिली असती तर जास्त बरं पडलं असतं. मी दोन्ही गुगल केलं)
भारीच प्रवास, एकट्याने करणे
भारीच प्रवास, एकट्याने करणे सोप्पी गोष्ट नाही
पण इतका त्रोटक का लिहिला आहे
आणि फोटो पण टाका की
फोटो टाकता आले नाहीत मला. आणि
फोटो टाकता आले नाहीत मला. आणि दीर्घ लिहीला असता तर मोठी कथा झाली असती ना.
तरीही सुचनांबद्दल धन्यवाद. प्रयत्न करेन.
भारी लिहिलंय. कोणी सोबती
भारी लिहिलंय. कोणी सोबती नसताना एवढी लांबची राइड एकदम कौतुकास्पद. सायकलीचे फोटो आणि मॅप्सचे फोटो टाकता आले तर पहा.
पुढच्या राइडसाठी आणि लिखाणासाठी शुभेच्छा
वाह!! खरच कौतुकास्पद आहे.
वाह!! खरच कौतुकास्पद आहे.
कौतुकास्पद प्रवास आहे तुमचा.
कौतुकास्पद प्रवास आहे तुमचा.
काही चित्रं टाकली आहेत आज.
काही चित्रं टाकली आहेत आज. चित्र जोडायला आजच शिकलो