नक्षत्रांची शांती ४ - माझे तीन विवाह (पुर्वार्ध)
https://www.maayboli.com/node/80921
---------------------------------------------------------------
माझा एक मेहुणा आहे. तो फार श्रद्धाळू आहे. तसे आमच्या दोन्ही घरात एक मी सोडले तर सारेच श्रद्धाळू आहेत म्हणा. पण तो एक आहे ज्याच्याशी माझे या विषयावरून कधीतरी वाद होतात. अर्थात मी वयाचा मान ठेवतो आणि वाद टाळतोच. पण कधीतरी समोरच्याने आपली श्रद्धा वा आपले मत माझ्यावर लादायचे ठरवल्यास मग नाईलाज होतो. तर या वादाचा शेवट नेहमी त्याच्या एका वाक्याने होतो. तो म्हणतो, जेव्हा तुला अनुभव येईल तेव्हा बरोबर विश्वास ठेवशील. तेव्हा तुला माझे पटेल की मी तुझ्या भल्यासाठीच हे अमुकतमुक सांगतोय.
ईथे अनुभव म्हणजे त्याला अडचण अपेक्षित असते. अडचणीत येशील आणि सारे उपाय संपतील, पण अडचण काही सुटणार नाही तेव्हा बरोबर विश्वास ठेवशील असे काहीसे. आणि त्यावर माझे त्याला नेहमी एकच उत्तर असते, अश्या अडचणींच्या काळातच तर आपल्यातील आस्तिकत्व आणि नास्तिकत्व या दोन्हींचा खरा कस लागतो. आणि तुमच्या मनाचा खरा कल कुठे आहे हे कळतो. तेव्हा तो फक्त प्रामाणिकपणे स्विकारावा. वेळ आलीच तर मी सुद्धा स्विकारेन..
तर अशीच एक घटना त्या मधुचंद्राच्या सफरीत घडली जेव्हा माझ्या नास्तिकत्वाची परीक्षा झाली.
चलो, तो फिर से थोडा शुरू से शुरू करते है...
तर माझी रजिस्टर लग्नाची सौ. तेव्हा एका फार्मसी कॉलेजमध्ये शिकवत होती. त्यांच्याच कॉलेजची गोवा ट्रिप होती. ज्यात टिचींग स्टाफसोबत फॅमिलीसुद्धा अलाऊड होती. अर्थात पैसे भरून. फुकट नाही. पण जागोजागी स्टुडंट कन्सेशन मिळत असल्याने ट्रिप कमालीची स्वस्त पडायची. हो, अगदी कॉलेज दिवसांत ब्रह्मचारी असताना जी एकमेव गोवा ट्रिप झाली त्यापेक्षाही ही ट्रिप स्वस्त होती. ज्यात एका दिवसासाठी एखाद्या फार्मसी कंपनीला विजिट देणे अपेक्षित होते. तर उरलेले हवे तितके दिवस, हवी तितकी मौजमजा तुम्ही तिथे करू शकणार होता. याच कारणासाठी गोवा हे स्थळ निवडण्यात आले होते.
बर्र, आता मी ऑफिशिअली तिची फॅमिली झालो असलो तरी आमचे लग्न जगापासून लपवलेले होते. त्यामुळे मग साखरपुडा झाला आहे सांगून गोव्याच्या बसमध्ये प्रवेश मिळवला. ऑफिशिअली नवरा बायको असूनही जगासाठी प्रेमी युगुल बनून हिंडण्यातही एक वेगळीच मजा असते. ती त्या पिकनिकला अनुभवत होतो.
मुंबई ते गोवा बसचा प्रवास कॉलेजच्या मुलामुलींसोबत हसतखेळत, गाणी गात, पत्ते कुटत झाला. पहिल्याच दिवशी संध्याकाळी क्रूझ पार्टी आणि डिनर ठेवले होते. तिथे त्यांच्यासोबत नाचूनही झाले. थोड्याच काळात सर्वांसोबत छान खुलून रमलो. म्हटले तर त्यांच्या आणि माझ्या वयात फारसा फरकही नव्हता. सोबत रजिस्टर लग्नाची बायको नसती तर कदाचित त्यांच्यातल्याच एखाद्या कॉलेजसुंदरीच्या मागेही लागलो असतो. ती सर्व मुलेही आम्हाला जणू काही आम्ही अँजेलिना ज्योली आणि ब्रॅड पिट असल्यासारखे भाव देत होते. चिडवाचिडवी करत होते. दुसर्या दिवशीच साईट विजिट होती. तिला आम्ही सर्वांच्या परवानगीने टाटा बाय बाय करून दोघेच जीवाचा गोवा करायला बाहेर पडलो.
हातात हात घालून गोव्याच्या मार्केटमध्ये फिरणे, अतरंगी कपडे आणि सतरंगी दागिन्यांची फसवले जातोय याची पर्वा न करता, फारसे भावताव न करता खरेदी करणे, कुठून तळलेल्या माश्यांचा वास येता तिथे डोकावणे, वेगळा प्रकार आहे म्हणत थोडासा चाखून बघणे, तिथल्या छोटेखानी बारमध्ये एकेक काजू चघळत आपल्यालाही मद्यपान जमतेय का हे आजमावणे, एखाद्या वाईनला गोव्याचे सांस्कृतिक पेय घोषित करून तिचा मान राखणे, नास्तिक असूनही गोव्याला आलोय तर शास्त्र म्हणून तिथल्या चर्चमध्ये मेणबत्त्या जाळत डोके टेकवणे, संध्याकाळच्या समुद्रात लाटांशी हुतूतू खेळणे आणि मावळणार्या सुर्याच्या साक्षीने वाळूच्या पाटीवर एकमेकांचे नाव कोरणे.. एवढी मजा तर कधी विद्यार्थीदशेत क्लास बंक करतानाही आली नाही जी या चोरीच्या मामल्यात येत होती.
पण पिक्चर अभी बाकी था मेरे दोस्त...
पुढचा दिवस वॉटरस्पोर्ट्सचा होता.
गरागरा फिरले की मळमळणे आणि ऊंचावर गेले की चक्कर येणे यामुळे कधी जत्रेतल्या आकाशपाळण्यातही मी बसलो नव्हतो. बायकोलाही पाण्याची भिती ईतकी की याआधी कधी वॉटरपार्कच्या गुडघाभर पाण्यात शिरली नव्हती. त्यामुळे एकूणच आम्ही दोघे लांबूनच हा सोहळा बघणार असे वाटत होते. पण प्रत्यक्षात जेव्हा ती वेळ आली तेव्हा सर्वांसोबत आम्हालाही पाण्यात ऊतरायचा मोह आवरला नाही. सोबतीला लाईफ जॅकेट होतेच. सर्व खेळांचे एकच पॅकेज ठरवले गेले. त्यामुळे कश्यालाही नाही म्हणायचा प्रश्न नव्हता. तर सर्वप्रथम एका छोट्याश्या सुपरफास्ट मोटरबोटीतून समुद्रात सुसाट फेरी मारून झाली. ज्यात पाण्याची आणि वेगाची भिती एकत्रच निघून गेली. आणि आम्ही पुढच्या राईडसाठी तयार झालो.
बनाना राईड. एक केळ्याच्या आकारासारखी लांबसडक बोट. ज्यात बोटीच्या आत नाही तर बोटीच्या वर बसायचे होते. बाईकवर बसल्यासारखे एक पाय ईकडे तर एक पाय तिकडे टाकून. चार-पाच जण आम्ही त्या केळ्यावर एका रांगेत बसलो होतो. आम्ही दोघे सर्वात मागे होतो आणि सर्वात पुढे त्या बोटीचा नावाडी होता. पण बोटीचा वेग मात्र मोटरबोटच्या तुलनेत जास्त नव्हता. त्यामुळे तितकीशी भिती वाटत नव्हती. ऊलट उघड्यावर बसल्याची आणखी मजा येत होती. अगदी समुद्राच्या मध्यावर पोहोचलो तेव्हाही ती भिती तितकीशी जाणवली नाही. ईतक्यात पुढून त्या नावाड्याचा आवाज आला. ऐसेही राऊंड मारके रिटर्न जाना है, के गिराना है?
गिराना है? क्या गिराना है? किसको गिराना है? ... आमच्या डोक्यात त्याचा अर्थ शिरायच्या आधीच आमच्या पुढची मुले एकसुरात ओरडली.. हा हा भैय्या, गिराना है.... आणि पुढच्याच क्षणी आम्ही समुद्राच्या पोटात कोसळलो होतो. पडत्या फळाची आज्ञा घेत त्या नावाड्याने बोटीला जोरदार हिसका देत एका बाजूला झुकवले होते आणि काही कळायच्या आधीच आम्ही बोटीपासून दूर फेकले गेलो होतो. त्या पुढच्या मुलांना याची कल्पना तरी होती पण आम्ही अगदीच बेसावध होतो. भानावर आलो तेव्हा डोळ्यासमोर, वरखाली, चोहीकडे पाणीच पाणी दिसत होते. गटांगळ्या खात होतो. पाणी नाकातोंडात जात होते. पण खरे तर अजूनही ते गिराना है क्या डोक्यात शिरले नव्हते. आपली बोट कलंडली आणि आपण अपघातानेच पडलो आहोत. आता आपले नशीब बलवत्तर असेल तरच आपण यातून वाचू अन्यथा जलसमाधी असेच अजूनही वाटत होते. ईतक्या निर्दयीपणे कोणी कोणाला समुद्रात भिरकावू शकतो हे त्यावेळी माश्यासारखे समुद्राखाली तरंगत असताना पटणे अशक्यच होते.
दोनचार गटांगळ्या खात भौतिकशास्त्राच्या नियमानुसार आणि लाईफजॅकेटच्या कृपेने मी पाण्याच्या वर आलो. सर्वप्रथम नजर बायकोला शोधू लागली. ती कुठेच दिसत नव्हती. आजूबाजुला नुसता गोंधळ. प्रत्येक जण आपला जीव वाचवण्याच्या धडपडीत. सोबतची मुले माझ्या आधी सावरली होती आणि बोटीवर चढायच्या प्रयत्नात होती. पण ती कुठे होती...
थोड्याच वेळात पाण्याच्या खालून एखादे प्रेत तरंगत यावे तशी ती वर आली. पाण्यावर शवासन करावे तशी आडवी, जराही हालचाल नाही. आणि त्याहून भितीदायक ते पांढरेफटक पडलेले निष्प्राण भासणारे डोळे. त्याही अवस्थेत माझ्यातील त्राण गेले. कसाबसा मी त्या नावाड्याला ओरडलो, तिला पहिले त्या बोटीवर घ्यायला सांगितले.
जीव होता अजून शिल्लक. आणि त्या नावाड्याला याची कल्पना होती. त्यासाठी ते रोजचेच असावे. सवयीनेच त्याने आधी तिला आणि मग मला वर बोटीवर घेतले. आणि बोट वळवली.
परतीच्या प्रवासात सगळी मजा हरवली होती. नजरेसमोर तेच होते. पाण्यावर तरंगणारी ती आणि तिचे ते निष्प्राण डोळे. किनारा जवळ येताच पुन्हा एकदा त्याने बेसावधपणे हिसका देत पाण्यात पाडले. उभे राहिल्यास कंबरेपर्यंत पाणी होते हे न कळल्याने पुन्हा मी मुर्खासारखे जीवाच्या आकांताने ओरडू लागलो.
आम्हा दोघांसाठी त्या दिवशीचे वॉटरस्पोर्ट संपले होते. पॅरासेलिंग करायला म्हणून मोठ्या बोटीतून पुन्हा एकदा समुद्राच्या पोटात गेलो. पण हिंमत न दाखवता आल्याने सुकेच परत आलो. रूमवर परतताना दोघांच्याही डोक्यात एकच विचार घोळत होता. मृत्युयोग मृत्युयोग म्हणतात तो हाच का???
क्रमश:
- ऋन्मेष:
आम्ही जेव्हा सुरवात करतो, एक
आम्ही जेव्हा सुरवात करतो, एक तारीख तिथूनच सुरू होते
असे म्हणावे.
तसं ऋ म्हणेल
तसं ऋ म्हणेल.
हर्पेन पॅकेज काढत असतील
सस्मित,
सस्मित,
ऋ चं पॅकेज ? आमाला पावर नाय
मी म्हणतो 'न कर्त्याचा वार शनिवार'
न कर्त्याचा वार शनिवार हेच
न कर्त्याचा वार शनिवार हेच लिहायला मी ईथे आलेलो.
शनिवारी केस नखं कापू नयेत असेही तारे काही जण तोडतात. तर काही जण शनिवार मारुतीचा आणि मारूती ब्रह्मचारी म्हणून शनिवारचे लग्नही करत नाहीत.
असो, कुठलेही काम अश्या वेळ काळ मुहुर्ताच्या अंधश्रद्धा न जोपासता आपल्या सोयीने आणि सवडीने करावीत या जनजागृतीसाठीच तर ही लेखमाला आहे.
ऋ चं नाही ओ. आमचं एक
ऋ चं नाही ओ. आमचं एक तारखेवाल्यांचं.
Pages