आपण सर्व जण कसे आहात? सर्व जण ठीक असाल अशी आशा करतो. नुकतंच स्नेहालय संस्थेच्या कामाबद्दलचं 'अंधाराशी दोन हात' हे पुस्तक वाचण्यात आलं. हे पुस्तक अक्षरश: आपल्याला हादरवून सोडतं. थरकाप उडतो हे पुस्तक वाचताना. भारतामध्येही नाझी किंवा तालिबानी मानसिकतेचे लोक इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत हे कळून अनेक धक्के बसतात. ते पुस्तक वाचल्यानंतरची प्रतिक्रिया ह्या लेखामधून व्यक्त करत आहे.
आपल्यापैकी बरेचसे जण खूप प्रोटेक्टेड जगात राहतो, त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींची कल्पना नसते. किंबहुना अनेकदा जाणूनबुजून आपण ह्या गोष्टी नजरेआड करत असतो. परंतु हे पुस्तक वाचताना ख-या आणि बीभत्स जगाचं दर्शन घडतं. आपल्याच जगामध्ये आणि आपल्या जवळपास कुठे तरी ही नाझींसारखी छळछावणी आहे हे कळतं तेव्हा थरकाप उडतो. ह्या अमानुषतेच्या जगामध्ये सगळं काही वेगळं आहे. इथे अगदी चिमुरड्या देहावर बलात्कार होतात, कोवळी बालके पाय कापून उकिरड्यावर फेकली जातात, दहा- बारा वर्षांपासून मुलींना सक्तीने देह विक्री व्यवसायात ढकललं जातं, त्या तयार होत नाहीत तेव्हा नाक बंद करून तोंड उघडून दारू पाजली जाते आणि नशेमध्ये ठेवून धंद्याला बसवलं जातं आणि सत्तर वर्षाच्या स्त्रीलासुद्धा कपभर चहाच्या मोबदल्यात शरीर विकावं लागतं. आहे पेशंस हे जाणून घेण्याचा? इथे जे चालतं ते अतिशय बीभत्स. कित्येकदा ह्या मुलींना त्यांचे जवळचे लोकच आणून विकतात. किंवा जवळचे लोक अत्याचार करतात. त्यामधून त्यांनी खूप प्रयत्न करून त्या सुटल्या तरी परत विश्वासघाताने तिथे आणून ठेवल्या जातात. जेव्हा स्नेहालयसारखी माणुसकी असलेली संस्था पीडित मुलींना- बाळांना- मुलांना संरक्षण देते तेव्हा सर्व धनदांडगे, राजकीय नेते आणि प्रचलित कायद्याची व्यवस्था माणुसकीच्या ऐवजी अमानुषतेची बाजू घेते.
स्नेहालय ह्या आज अनेक राज्यांमध्ये पसरलेल्या मोठ्या कामाची सुरुवात तेव्हा होते जेव्हा गिरीशजी कुलकर्णी शाळेत जाताना त्यांना रेड लाईट एरियामधल्या त्यांच्याच वयाच्या मुली रस्त्यावर हातवारे करताना दिसतात. कधी त्यांना रस्त्यावर कोठेवाली मारहाण करताना दिसतात तर कधी.... इथून गिरीशजी व त्यांचे सोबती ह्यांचा प्रवास सुरू होतो. देह विक्रय करणा-या स्त्रियांचा विश्वास मोठ्या प्रयत्नाने मिळवून मुलांना काही वेळ संभाळण्यापासून त्यांची सुरुवात होते. संवेदनशीलतेने आणि माणूस म्हणून ह्या विषयाकडे बघत गेल्यावर त्यांना जे जे शक्य होत गेलं ते ते करत गेले. १९८९ पासून आज २०२२ पर्यंत ३३ वर्षांच्या अवधीमध्ये सातत्याने त्यांनी काम केलं आणि अनेक प्रकारे पीडितांना मदत केली. अल्पवयीन मुलींची सुटका, देह विक्रय करणा-यांच्या मुलांना- मुलींना संरक्षण, पुनर्वसन, शिक्षण, संपूर्ण सिस्टीमचा विरोध पत्करून गुन्हेगार धनदांडग्यांच्या विरोधात लढलेले व जिंकलेले खटले, एड्ससारख्या रोगावर पीडितांना दिलेला उपचार व मानसिक आधार, समाज प्रबोधन, पीडित व्यक्तींचं संघटन, पोलिस- शासकीय यंत्रणा ह्यांच्यासोबत अथक प्रयत्न करून त्यांचं प्रबोधन अशा अनेक दिशांनी त्यांनी काम करून ही दुर्दशा दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या कामाला जाणून घेताना नतमस्तक झालो. इतका मोठा नरक किंवा छळ छावणीचं थैमान असताना सगळाच अंधार नाही आहे, "अंधाराशी दोन हात" करणारे प्रकाशाचे अनेक कवडसेही आहेत, हा धीरही मिळत जातो.
पण हे खरं की, "ते" जग आपल्या कल्पनेहून खूप मोठं आहे. आणि आपल्या अगदी जवळ आहे. तालिबान हे अफघनिस्तानातच आहेत किंवा नाझी लोक तर इतिहासातच झाले, असं आपण म्हणूच शकत नाही, इतकी ही भयावह परिस्थिती आपल्या जवळ आहे. आणि वस्तुस्थिती ही आहे की, जेव्हा एखादा नराधम बलात्कार करतो, तेव्हा ९९% वेळेस तो कोणी मनोरुग्ण- वेडा- सैतान किंवा नरराक्षस नसतो. असतो तो आपल्या सारखाच माणूस. अन्यथा तो अगदी आपल्यासारखाच असतो. आणि तरीही तो असं कृत्य करतो. त्यामुळे सुजाण समाजाला व नागरिकांना खरं तर प्रश्न हा एखाद्या सैतानाबद्दल किंवा नरराक्षसाबद्दल पडायलाच नको. माझ्यासारखाच कोणी तरी एखादा हे करत असेल तर मी तरी किती सुरक्षित आहे, असा पडायला हवा. कारण असा व्यक्तीही अन्यथा तर नॉर्मल असतो. त्यामुळे हा विषय खरं तर प्रत्येकाने आत्ममंथन करण्याचा आहे. आणि समाजामध्ये इतका मोठा नरक पसरलेला आहे, ह्याची जवाबदारीसुद्धा समाजाचा घटक म्हणून प्रत्येक व्यक्तीची आहेच. आणि म्हणूनच प्रत्येकाने ह्यासाठी बरंच काही केलंही पाहिजे.
ह्या बाबतीत काही विचार मनात येतात. एक तर कोणताही रोग किंवा ताण हा अचानक होत नाही. तो हळु हळु वाढत जातो. आणि रोगाच्या शेवटच्या टप्प्यावर उपचार करण्यापेक्षा सुरुवातीच्या टप्प्यावर किंवा रोग येण्याच्या आधी केलेला उपचार जास्त चांगला असतो. ज्यांना खरंखुरं प्रेम (स्नेहालयचा अर्थही प्रेमाचा सागरच ना!), जिव्हाळा, प्रेमाचा स्पर्श, अनकंडीशनल एक्सेप्टन्स अशा ख-या चांगल्या गोष्टी मिळत नाहीत, ते हळु हळु त्या बाबतीत कुपोषित होत जातात. आणि समाज रचना- समाजामधील आधीचे ताण व असमानता ह्यामुळे असं खरं प्रेम व जिव्हाळा मिळण्याच्या संधी हळु हळु आटत जातात. आणि त्यातूनच मग निसर्गत: जे मिळायला पाहिजे होतं ते न मिळाल्यामुळे अतिशय भ्रष्ट स्वरूपामध्ये ओरबाडून घेण्याची वृत्ती तयार होते. ज्याला कधी मनाची व भावनांची गहराई मिळालीच नाही तो शरीरामध्येच अडकून पडतो. आदिवासी गावांसारख्या ज्या व्यवस्थांमध्ये लहानपणापासून मुलं- मुली एकत्र वाढतात, जिथे भावनिक नाती फुललेली असतात, तिथे असे ताण जवळ जवळ निर्माण होतच नाहीत.
ह्या बाबतीत मी काय करू शकतो? असा विचार केला तर अनेक गोष्टी दिसतात. एक तर आपण प्रत्येकाने थोडंसं डोळस व्हायला पाहिजे. मी ज्या ज्या लोकांसोबत राहतो, ज्यांना भेटतो, ज्यांच्यासोबत काम करतो, त्या सगळ्यांसोबत माझ्या वागण्यामध्ये माणुसकी आहे ना? माझ्या वागण्यामध्ये जिव्हाळा व आपुलकी आहे ना? किंवा माझ्या जवळच्यांमध्ये ह्या बाबतीत कुपोषित असा कोणी आहे का? थोडासा प्रेमाचा ओलावा आणि थोडी सजगता असेल तर अशा कुपोषणाला शोधणं कठीण नाही. आणि त्याबरोबरच असे प्रकार आपल्या वर्तुळात घडत असतील तर त्याला विरोध करणंही कठीण नाही. त्यासाठी सजगता आणि संवेदनशीलता मात्र हवी. आपल्या सभोवती इतकी भयाण परिस्थिती आहे, ही वस्तुस्थितीची जाणीव मात्र हवी.
थोडं त्या गुन्हेगारांबद्दल बोलतो. भले ते गुन्हेगार कायद्याच्या किंवा समाजाच्या व्यवस्थेतून सुटत असतील. किंवा कित्येक गुन्हे दडलेले असतील. पण एका ठिकाणी हे गुन्हेगार कधीच लपून राहू शकत नाहीत आणि ते ठिकाण म्हणजे त्या व्यक्तीचं स्वत:चं मन. त्याच्या मनावर त्याने कितीही लेप लावले तरी "मी असे असे गुन्हे केले आहेत" हे त्याच्या मनावरून कधीच मिटू शकत नाही. अहंकाराच्या, सामर्थ्याच्या, दांडगाईच्या काजळीमुळे त्याला हे दिसायला वेळ लागेल, पण एक ना एक दिवस त्या व्यक्तीचं स्वत:सोबत confrontation होणारच. कारण पापाचं ओझं भयंकर असतं आणि कितीही ते नाकारलं किंवा दुर्लक्ष केलं तरी ते असतं तर तिथेच. आणि तेव्हा त्या व्यक्तीमधल्या अमानुषतेचा सामना माणुसकीशी होणार. असो.
ह्या लेखाचा हेतु केवळ त्या पुस्तकावर प्रतिक्रिया इतका होता. संस्थेचं आणि संस्थेच्या शेकडो कार्यकर्त्यांचं व हितचिंतकांचं काम खूप मोठं आहे. तीन दशकांपेक्षा अधिक काळ चाललेला हा प्रचलित व्यवस्थेसोबतचा संघर्ष! त्यांच्या कामाला पुन: एकदा वंदन! संस्थेच्या कामाचा विस्तार अनेक राज्यांमध्ये होतो आहे आणि अनेक मदतीचे हातही येत आहेत. 'वेश्या म्हणून जगले पण वेश्या म्हणून मरणार नाही,' अशी शपथ संस्थेने देह विक्री करणा-या महिलांना दिली आहे. कोरोनाच्या काळामध्ये नवी आव्हानं समोर आली. हे सर्व असतानाही संस्थेचं काम सुरू आहे. संस्थेच्या कामाची अधिक माहिती इथे मिळेलच- https://www.snehalaya.org/about. आपल्याला जमेल ती मदत आपण अशा प्रकारचं काम करणा-या संस्थांना व व्यक्तींना करू शकतो. पण आपण जिथे कुठे राहतो तिथेही आपल्याला करण्यासारखं खूप आहे. थोडीशी जागरूकता आणि थोडसं आत्ममंथन!
चुनौतियाँ का तांता लम्बा है माना
अन्धेरा है बहुत घना और पुराना
लेकीन बस रोशनी की किरण को तो है जन्माना
- निरंजन वेलणकर 09422108376 niranjanwelankar@gmail.com
फार भयानक सत्य आहे हे.
फार भयानक सत्य आहे हे.
भीषण वास्तव!
भीषण वास्तव!
>> तालिबान हे अफघनिस्तानातच आहेत किंवा नाझी लोक तर इतिहासातच झाले, असं आपण म्हणूच शकत नाही, इतकी ही भयावह परिस्थिती आपल्या जवळ आहे.
>> जिव्हाळा, प्रेमाचा स्पर्श, अनकंडीशनल एक्सेप्टन्स अशा ख-या चांगल्या गोष्टी मिळत नाहीत, ते हळु हळु त्या बाबतीत कुपोषित होत जातात. आणि समाज रचना- समाजामधील आधीचे ताण व असमानता ह्यामुळे असं खरं प्रेम व जिव्हाळा मिळण्याच्या संधी हळु हळु आटत जातात. आणि त्यातूनच मग निसर्गत: जे मिळायला पाहिजे होतं ते न मिळाल्यामुळे अतिशय भ्रष्ट स्वरूपामध्ये ओरबाडून घेण्याची वृत्ती तयार होते.
अगदी अगदी मनापसून पटणारी वाक्ये. जेंव्हा केंव्हा अशा घटनांबद्दल वाचायला ऐकायला मिळतं तेंव्हा हेच मनात येतं. आतून भंगलेली (disintegrated) हि माणसं असतात. लेखाद्वारे एका चांगल्या कार्याची माहिती व महती कळली. धन्यवाद.
बापरे
बापरे
@अतुल +१ आणि सहमत.
शिर्डीला Human Trafficking चे खूप प्रमाण आहे हे वाचून प्रचंड धक्का बसला होता. आज पुन्हा हे वाचून आपण वेगळ्या बबलमधे रहातो पण आपणही याच असुरक्षित जगाचा भाग आहोत ही जाणीव पुन्हा झाली.
लेखाद्वारे एका चांगल्या कार्याची माहिती व महती कळली. धन्यवाद.>>>+1
एक लैगिक गुन्हा उघडकीस येतो ,
एक लैगिक गुन्हा उघडकीस येतो , तेंव्हा दहा गुन्हे लपलेले असतात
एक लैगिक गुन्हेगार सापडतो तेंव्हा त्याने आधी केलेले पण न सापडलेलेही गुन्हे असतात
आई ग्ग!! त्या साईटवरती जाउन
आई ग्ग!! त्या साईटवरती जाउन आले. किती लहान लहान बालकं आहेत. म्हणजे इवली इवली लहान मुलं आहेत धस्स होतं रे देवा.
बापरे!
बापरे!
पुस्तक वाचवणार नाही असं वाटतंय..
देवा! अस जगणं कुणाच्याही वाट्या ला येऊ नये!
आपल्याला नुसतं वाटत, पण ते कामही करताहेत!
वाचनाबद्दल व
वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद.
शिर्डीला Human Trafficking चे
शिर्डीला Human Trafficking चे खूप प्रमाण आहे हे वाचून प्रचंड धक्का बसला होता.
नवीन Submitted by अस्मिता. on 22 January, 2022 - 13:58 >>>>>
हे खरंय का ??? वाचून मन विचलित झाले। आम्ही खूप आस्थेने आणि आवडीने जातो मुलाबाळांना घेऊन।
शिर्डीला Human Trafficking चे
शिर्डीला Human Trafficking चे खूप प्रमाण आहे हे वाचून प्रचंड धक्का बसला होता.
नवीन Submitted by अस्मिता. on 22 January, 2022 - 13:58 >>>>>
हे खरंय का ??? वाचून मन विचलित झाले। आम्ही खूप आस्थेने आणि आवडीने जातो मुलाबाळांना घेऊन।
छान
छान
फार भयानक आहे हे!
फार भयानक आहे हे!
असतो तो आपल्या सारखाच माणूस.
असतो तो आपल्या सारखाच माणूस. अन्यथा तो अगदी आपल्यासारखाच असतो. आणि तरीही तो असं कृत्य करतो.
>>>>>
हे अगदीच पटले.
@अजनबीhttps://www.opindia.com
@अजनबी
https://www.opindia.com/2020/11/279-people-reported-missing-shirdi-2017-...
https://www.mid-day.com/news/india-news/article/maharashtra-woman-whose-...
शिर्डीला Human Trafficking चे
शिर्डीला Human Trafficking चे खूप प्रमाण आहे हे वाचून प्रचंड धक्का बसला होता.
नवीन Submitted by अस्मिता. on 22 January, 2022 - 13:58 >>>>> देव काय झोपलाय का? अश्या ठिकाणी जाण्यावर खरतर बहिष्कार घातला पाहिजे.
Hello, I have made a small
Hello, I have made a small contribution for Snehalaya. If you wish, you can also contribute. Bank Name: HDFC Bank Branch name: Market Yard Branch Account Number : 01811000053339 Name of Account (Cheque to be made in the name of): Snehalaya
9 digit MICRnumber: 414002001 Current/ savings account: Current account RTGS/IFSC Code: HDFC0000181
Sharing its QR code also for instant payment through UPI. If you contribute, do inform them on this no. +919011020178