कसा हरवून जो तो तोल येथे चालतो आहे?
जिथे रमलो कधी नाही तिथे रेंगाळतो आहे
अता येणे कुणी नाही, अता जाणे कुठे नाही
जुन्या उकरून जखमा मी पुन्हा रक्ताळतो आहे
मना मारून जगलो पण सुळावर मज चढवताना
निरर्थक आखरी ईच्छा जगा मी सांगतो आहे
तुला यावे कसे भेटावया तू सांग ना सखये?
तुझ्या वस्तीत जो तो का असा फुत्कारतो आहे?
म्हणे देऊळ असते बांधण्या पूजा प्रभूची पण
इथे प्रत्येक भाविक तोंड का वेंगाडतो आहे?
पुन्हा आला मते मागावया झोळीसवे नेता
कसा भोळ्या प्रजेला आज तो गोंजारतो आहे !
कबूली देत आहे मी जरी तुटल्या अता तारा
तरीही चाहुलीने अंतरी झंकारतो आहे
कधी दिसली न मार्गी पाकळ्यांची का मला पखरण?
असूदे लाख काटे चालतो ठेचाळतो आहे
कशी फाडू तिची "निशिकांत" पत्रे? श्वास गुदमरतो
मनी का आजही मजकूर तो गंधाळतो आहे?
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--वियदगंगा
लगावालॉ--( लगागागा ) X ४