मक्तू SSSSSSब !!...(The Destiny … ) भाग -२

Submitted by Sujata Siddha on 20 January, 2022 - 03:22

मक्तू SSSSSSब !!...(The Destiny … ) भाग -२

मानस ने ती चिट्ठी वाचलीच नाही , म्हणजे त्याला ती मिळाली , पण पहिल्या दोन-चार ओळी वाचूनच ‘ झालं हिचं रडगाणं सुरू , या बायका ना , अजून येऊन महिना पण झाला नाही आणि तक्रारीला सुरुवात … ‘ अशा अर्थाचं स्वगत करून टाकून दिली , आणि मी जखमी हरीणी सारखी तळमळत राहिले मूक पणे !...
त्याच्याच दुसऱ्या दिवशीची गोष्ट ,घरात खूप भांडण झालं ‘जाऊबाईंचं आणि दिरांच’ अर्थातच कमावण्यावरून , रागारागात वहिनी तशाच ऑफिसला गेल्या, डबा न घेताच,यावरून आठवलं , माझ्या दिरांची ना एक खासियत होती , ते उच्च शिक्षित असल्यामुळे काहीही करायचे नाहीत , नोकरी तर नाहीच पण बाकीही घरात काहीच करायचे नाहीत .फक्त स्वतःच आवरायचे , छान टिपटॉप कपडे घालायचे आणि बाहेर जायचे , फक्त ब्रेकफास्ट , चहा , जेवण या वेळेला आणि हो दुपारी झोपायला घरी यायचेच यायचे . तशीच आमच्या सासूबाईंची पण खासियत होती , दोन्ही मुलांची ठेप व्यवस्थित ठेवायची त्यांना सवय होती , सगळं त्यांना काळजीपूर्वक मिळालं पाहिजे दुपारच्या झोपेसकट; त्या स्वतः:ही दुपारी झोपायच्याच आणि संध्याकाळी बाहेर जायच्याच , त्यात कधीही खंड पडला नाही , घरातल्या पुरुषांना सगळं व्यवस्थितच मिळालं पाहिजे याकडे त्यांचा कटाक्ष असायचा , सुनांच काय त्यांनी काही खाल्लं , नाही खाल्लं आपल्याला काय , त्यांचं त्या बघतील .तर त्या दिवशी वाहिनी संध्याकाळी घरी आल्यानंतर मी त्यांना विचारलं , ‘वाहिनी डबा का नाही नेला आज ?अन्नावर कशाला राग काढायचा ? “ माझ्या या वाक्यासरशी त्यांना एकदम रडू कोसळलं , मला कळेच ना काय झालं , थोड्या वेळाने शांत झाल्यावर त्या म्हणाल्या , “लग्न होऊन आज सहा वर्ष झाली , या घरात पहिल्यांदाच कोणीतरी मला काळजीने जेवणाबद्दल विचारलं , कितीतरी वेळा मी दिवसचे दिवस उपाशी राहिले आहे , पण कोणीही विचारलं नाही , की तू आज जेवलीस का ? उल्का या घरात प्रेमच नाही मिळालं गं कधी मला “ हे ऐकून मलाही मग खूप वाईट वाटलं . तुम्ही हे सगळं माहेरी का सांगत नाही? मी त्यांना विचारलं त्यावर त्या म्हणाल्या माझं माहेर खानदानी आहे , गावाकडचं . तिथे असलं काही सांगून मला माझा मान कमी करायचा नाही , माहेरी मला मानाने जायला आवडतं , नाव बद्दू (हा त्यांचा गावाकडचा शब्द ) होईल ना असं काही सांगितलं तर ! मी मात्र त्या दिवसानंतर ठरवलं की यांची खूप काळजी घ्यायची , प्रेम द्यायचं ,पण सगळ्या गोष्टी आपण ठरवतो तशा होत असत्या तर काय विचारायचं ? वाहिनीना समजून घ्यायला जावं तर त्या जास्तीत जास्त वेळ चिडलेल्या अवस्थेतच असायच्या ,मनात येईल तसं तऱ्हेवाईक वागायच्या ,कधी कधी मूड मध्ये असल्या की चांगलंही वागायच्या , त्यांचे हे मूड स्विन्गझ होऊ नयेत , त्यांना कोणी विचारत नाही याचं त्यांना वाईट वाटू नये म्हणून त्या न जेवता गेल्या की मी त्यांना गरम जेवणाचा डबा घेऊन त्यांच्या ऑफिसला जायची , बऱ्याचदा दुपारच्या वेळेत सासूबाई माझ्याकडून भिंती पुसून घे , फरशी घासून घे (आमच्या घराची फरशी शहाबादी होती ), महिनाभराचे तांदूळ निवडून घे , स्टीलचे धान्याचे डबे घासून घे , ई कामे करून घ्यायच्या , अशातच मला दिवस गेले , तरी देखील भर दुपारी जिना चढून वहिनींच्या ऑफिसला डबा नेऊन देण्याचं अधून मधून काम चालूच होतं ,त्यात मानस ला डॉक्टरांनी सांगितलेलं की यांना जड उचलू देऊ नका आणि खाली वाकू देऊ नका , त्यामुळे तो कटाक्षाने हे सगळं पाळायचा , त्यावर सासू बाईंनी अशी युक्ती काढली की मानस सात वाजता घरी यायचा त्याच्या आत त्या माझ्याकडून सगळी कामं करून घायच्या आणि तो आला की सांगायच्या आत्ताच मी डबे घासले , आत्ताच मी हे केलं आणि ते केलं , फरशी पुसताना मला वाकता येत नसे त्यावर त्या म्हणायच्या “पायांनी पुसून घ्यावी. “ त्यांच्या या वागण्याला मला विरोध करता यायचा नाही आणि मी आतल्या आत धुमसत रहायची , ईकडे ‘माऊ ‘ला वडिलांच्या प्रेमाची कमतरता जाणवू नये म्हणून मानस खूप जपायचा (कारण तिथेही आमच्या उच्चशिक्षित दिरांचा आनंदच होता ,माऊ ला त्यांनी कधीही साधं जवळ देखील घेतलं नाही ) तिला खेळणी ,कपडे सगळं तोच आणायचा , मी पण त्याच्या बरोबरीने ‘माऊ’ चं सर्व करतच होते . पण घरातले वाद थांबले नाहीत , मला असं वाटे की नसेना का नवरा कमावता पण आम्ही दोघे करतोच आहोत की या दोघींचं , त्याची निदान जाणीव ठेवून वहिनींनी आमच्याशी तरी नीट वागावं ,जो काय राग असेल तो नवऱ्यावर काढावा ,पण तसं घडत नसे , त्यामुळे हळू हळू मी वहिनींना विरोध करायला लागले ,त्यांची बडबड सुरू झाली की सगळ्यांना त्या खूप तळतळून शिव्या शाप द्यायला सुरुवात करीत ,अशा वेळेस सासूबाई भामट्यासारख्या गप्प बसत पण मला ते सहन होत नसे , त्यामुळे आमची दिवसेंदिवस खूपच कटकट व्हायला लागली , मानस प्प्रत्येक वादात त्यांचीच बाजू घायचा , सुनीता ताई -दीर , सुनीता ताई -सासूबाई , सुनीता ताई -मी , मानस -मी सर्वांची एकमेकांशी , सतत काहीतरी किरकोळ कारणाने होणारी मोठी भांडणं , ईतकी की मला तिसरा महिना लागला असताना या भांडणांनी माझा गर्भपात होता होता वाचला, वेळेत ऍडमिट झाले म्हणून बरं , या अशा संत्रस्त वातावरणातच मला एक मुलगी झाली ,’ निशी ‘! एवढी गोड होती दिसायला , पांढरी शुभ्र सशासारखी , गुबगुबतीत आणि चेहेऱ्यावर कमालीचा गोडवा होता तिच्या, ती आल्यापासून माझ्या आयुष्यात थोडा आनंद आला . घरच्या परिस्थितीत फरक नाहीच पडला पण निदान मला माझ्या त्रासांचा थोडा विसर पडायला लागला . मानस दाखवत नसला तरी सतत वाहिनी आणि माऊ च्या काळजीत असयाचा ,त्यामुळे वेगळं राहण्याचं धाडस मी करू शकत नव्हतेच , अशीच सहा वर्ष गेली , ‘निशी ‘आता चार वर्षांची झाली होती .
एवढं बोलून झाल्यावर ‘उल्का ताई’ ने एक दीर्घ पॉज घेतला. त्यावरून मला कळलं की आता तिच्या आयुष्यतला कदाचित महत्वाचा टप्पा येणार असावा , “ मेखला, आपण आता थांबू , उद्या जरा लवकर बसू “ … मी हो म्हणून मान डोलावली , आराम खुर्चीत बसलेल्या ‘उल्का ताई’ ने मान मागे टाकली आणि वर गरगर फिरणाऱ्या पंख्याकडे ती एकटक बघत राहिली .मी उठले लॅपटॉप बंद करून तिच्या ईथल्या टेबलवर ठेवून दिला . “ उल्का ताई एक विचारू ?. “ मी असं म्हणताच तिने “हं .. “ असा उदगार काढून शांत पणे डोळे मिटून घेतले . “with due respect , मे आय आस्क यु समथींग ?”
“मला माहितीये तू काय विचारणार आहेस मेखला “ पंख्यावरची नजर न हटवता ती म्हणाली . प्रश्नार्थक चेहेऱ्याने मी तिच्याकडे बघायला लागले ,”तुला अपेक्षित नव्हतं ना माझं बॅक ग्राउंड असं असेल ? “
“नाही ,तुझ्या बॅक ग्राउंड बद्दल मला काही म्हणायचं नाही , २० वर्षांपूर्वीचं घरोघरी दिसणारं टिपिकल चित्र आहे ते ,I am interested in your drastic alteration ..एखाद्या माणसांत एवढा अमेझिंग चेंज कसा होऊ शकतो ? I mean basic personality trait बदलणं is highly impossible “
यावर उल्का ताईने एक मंद स्मित केलं , “ उद्या परत येणार आहेस ? “
“शक्यतो प्रयत्न करते यायचा , कारण मला खूप उत्सुकता आहे , पुढे काय झालं याची “ मी स्वतः:भोवती एक गिरकी घेत म्हणाले , त्याबरोबर एखाद्या निर्झरा सारखी उल्काताई खळखळून हसली , i swear मी मुलगा असते ना तर पप्पी घेतली असती , एवढी गोड दिसते ती हसताना .
घरी आले तोवर ‘शौर्य’ ने सगळा स्वयंपाक रेडी करून टेबल वर प्लेट्स लावून ठेवल्या होत्या , माझीच वाट बघत होता , एखाद्या कामसू गृहिणी सारखं सगळं छान आवरलं होतं . मला खुद्कन हसू आलं . ‘शौर्य’ अमराठी आहे, मी ‘ मेखला सरदेसाई ‘आणि तो ‘शौर्य बनिक ‘ आम्ही ‘लिव्ह इन’ मध्ये राहतो , हो मीअगदी सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबातलीच मुलगी आहे, आणि माझ्या घरी माझ्या आई बाबांना अर्थातच हे आवडलेलं नाहीये , ‘but who cares? ‘ त्यांच्या आवडीनिवडी आणि रीती भाती मी माझ्या वर का लादू ? शेवटी आयुष्य मला काढायचं आहे, आणि त्यांनीच तर मला पूर्ण फ्रिडम देऊन लाडाने वाढवलं आहे , common ...याचा अर्थ असा नव्हे की माझं माझ्या आई बाबांवर प्रेम नाही , पण मी लग्न करावं ही त्यांची ईच्छा मला मान्य नाही ,माझं स्वतः:वरही तितकंच प्रेम आहे ,मला कुठचंही बंधन नको आहे ,माझी मला एक स्वतंत्र आयडेंटिटी आहे , लग्न करून मला माझं फ्रिडम घालवायचं नाहीये , केवळ या एकाच कारणामुळे माझ्या आई बाबांमध्ये आणि माझ्यात अबोला आहे , ते माझ्या घरी येत नाहीत आणि मी त्यांच्याकडे जात नाही , पण मला खात्री आहे एक ना एक दिवस ते मला समजून घेतील . मी वाट पाहीन त्या दिवसाची . लग्न संस्थेबद्दलची माझी नाराजी आणि त्यात आज उल्का ताईची स्टोरी ऐकली आणि माझा निर्णय योग्यच आहे ही खात्री पटली , उल्काताई ! एक प्रसन्न आणि देखणं व्यक्तिमत्व , बेंगलोरला एका रिट्रीट ला गेले असताना ,’’कॉस्मिक एनर्जी , क्वांटम फिजिक्स & लाईफ फोर्स ‘ वरचं तिचं लेक्चर ऐकलं आणि तिच्या प्रेमातच पडले , प्रचंड अभ्यास होता तिचा यावर , अगदी चालता बोलता एन्साय्क्लोपीडिया , आणि व्यक्तिमत्व तर इतकं सुंदर की कोणीही पाहताक्षणीच तिचं होऊन जावं ,मी माझ्या पी.एच . डी . साठी तिला गाईड व्हायची रिक्वेस्ट केली आणि तिने ती लगेच मान्य केली , तिच्या त्या क्लासिक बंगल्याच्या मागच्या साईड ला असलेली , पर्णकुटी सुंदर आणि कलात्मक रित्या सजवलेली ,बांबू आणि कामठ्याची , हिरव्यागार वेलींनी बहरलेली आणि जाई च्या फुलांनी सुगंधित झालेली रूम ही आमची गप्पा मारायची जागा .एका प्रचंड वडा च्या झाडाभोवती ती रूम बांधलेली होती , त्यामुळे आत सतत आल्हाद दायक हवा असायची , ए.सी. ची शरीर जड करणारी कृत्रिम हवा नव्हती तिथे . आम्हा सिलेक्टेड स्टुडन्ट्सच्या ग्रुप मध्ये एनर्जी सायन्स, स्पिरिच्युअल सायन्स ,क्वांटम फिज़िक्स ,पॅरासायकॉलॉजी ,वेदिक सायन्स अँड टेक्नॉलॉजी ‘ ई . विषयांवर गप्पा मारणे हा तिचा आवडता छंद आणि त्या गप्पांसाठी आमच्या उड्या पडायच्या. तिच्या सहवासात ईतका आनंद असायचा की आम्ही सगळे स्टुडन्ट्स जर कुठला मुव्ही किंवा पब मध्ये जायचंही प्लॅन करत असू आणि ती आज आम्हाला वेळ देऊ शकते असा तिचा मेसेज किंवा कॉल आला तर आम्ही एकमेकांना न विचारताच तिची ऑफर ग्रॅब करायचो , काहीतरी अमेझिंग असं होतं तिच्याकडे जे आमच्यासारख्या तरूणांनां देखील खेचत असे ,अशी उल्काताई पूर्वी टिपिकल संसारात अडकून पडलेली रडकी बाई असेल , असं चुकूनही वाटलं नव्हतं मला . जर ती आधी अशी असेल तर मग ,एवढं जबरी मेटामॉर्फोसिस ?कसं काय ? पुढे काय घडलं असेल ? woooo , must be interesting !.. रात्री’ शौर्य’ च्या कुशीत शिरले तेव्हा हळुवारपणे केसांतून हात फिरवत त्यानं म्हटलं , “ मेखला ,क्या हुआ ? ऐसी गुमसुम क्यू हो ?“ त्याचे शब्द ऐकले आणि इतका राग आला मला , मी त्याला बाजूला ढकलत म्हटलं . ,“ हेच आवडत नाही मला तुझं , आज ईतके महिने झाले आपण एकत्र राहतोय , अजून मराठी बोलता येत नाही तुला “ मी ढकलल्यामुळे बहुतेक बेड चा कोपरा त्याला लागला असावा , “ अरे यार मेखला ये क्या बात हुई ?कोई ऐसे करता है क्या ? it's hurting !.. …” दुखावलेला खांदा चोळत , कुरकुरत त्याने पुढे म्हटलं , “ मराठी नही आती तो क्या हुआ , क्या फरक पडता है ? तुम्हे तो आती है ना हिंदी ? बेंगॉली भी तो आती है , हम बात तो कर सकते है ना ? “
“तेच म्हणते मी , मीच मोल्ड व्हायचं तुझ्यासाठी , तुला नाही का माझ्या साठी मराठी शिकावंसं वाटत माकडा ? माझ्या या सात्विक संतापावर तो जोरजोरात हसायला लागला . आणि मग जवळ घेत त्याने मला म्हटल , “हो माकडा , मी शिकते मराठी “ त्याच्या शिकते वर मी खूप हसले आणि आम्ही दोघेही हसत बसलो , आणि to my surprise त्याने नुसतंच म्हटल नाही तर खरोखर सुरूवात केली , दोनच दिवसात त्याने मला, “मेखला तु मला खूप खूप आवडतेस “ हे वाक्य अस्स्खलित मराठीत म्हणून दाखवलं तेव्हा त्याला कुठे ठेवू आणि कुठे नको असं मला झालं , काय माहिती त्या रात्री त्याच्या मिठीत शिरताना मला वाटून गेलं की हेच ‘उल्का ताई ‘मिस करत असेल का तिंच्या तरुणपणाच्या काळात ? खरं आहे , आपल्यावर कुणीतरी इतकं जीव टाकतंय की आपल्या ईच्छा या स्वतः:च्या ईच्छा समजून पूर्ण करण्यासाठी धडपडतंय , आपल्या भावना समजून घेतंय या सारखं सुख नाही . मला स्वतः:ला पैसे , संपत्ती , बंगला , दागदागिने या गोष्टींचा सोस नाही , माझ्या पालकांना मी कायम तत्व आणि मूल्य यांना ईतर कशाही पेक्षा प्राधान्य देताना पाहिलंय , सहाजिकच मी पण तशाच विचारसरणीचा पार्टनर शोधणार ,(लिव्ह ईन मध्ये रहात असले तरी मला माझी स्वतः:ची काही तत्व आणि मूल्य आहेत ,आणि ती मी जीवापाड जपते ) मग उल्का ताई ने का नसेल शोधला ? ती आत्ता ज्या पोझिशनवर आहे ,आणि ज्या वैचारिक प्लेन वर वावरते त्यावरून तरी असं मला वाटलं , खैर ,पुढचे काही दिवस माझ्या
जॉबच्या ठिकाणी वाढलेल्या जबाबदाऱ्यामुळे मला उल्का ताई कडे जाता आलं नाही.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान चालू आहे
दोन्ही भाग आताच वाचले

दोन पॅराग्राफमध्ये एका लाईनची स्पेस मिसिंग आहे. पहिल्या भागातही असेच आहे. बहुधा तुमच्या नोटपॅडहून कॉपीपेस्ट करताना गायब होत असेल.

छान..