स्थित्यंतर

Submitted by दत्तात्रय साळुंके on 20 January, 2022 - 00:27

पाण्याचं रेशनिंग आलं
अन् आडदांड मळं श्यानं झालं
आजारात लावलेल्या सलाईन सारखं
थेंब थेंब ठिबकचं पाणी प्यालं

पूर्वी पाटात पाणी डुचमळायचं
बांधावर गवत लोळायचं
औत सुटलकी बैल कुरणात डरकाळयचं

पाटात आता अवखळ नागमोडी पाणी नाही
नाकासमोर ते पाईपातून चालत राही
पाटाला, बांधालाही हल्ली हिरवीगार
चंगळ परवडत नाही

आता विहीरिची वाचा बसली
घशात पंपांची घरघर ठसली
मोटेची ललकारी लय पावली
दावनीला जित्राबं भार झाली

विहीरीतून भरली मोट वर येताना
गळत्या पाण्याचं इंद्रधनू व्हायचं
थारोळ्यात बदा, बदा मोती उसळायचं
पाटातल्या पाण्याचं अमृत पिऊन
मन आणि शेत दोन्ही यायचं उफाळून

मळा आणि विहीर नेहमी होती भरलेली
आता आडमाप पाणी उपसा, मागे फक्त
पाणकळ्याची रुखरुख तेवढी उरलेली

स्वप्नात येतो खळ्यातला तिवडा
काचतेय तुराटी म्हणतो काढा
यांत्रीक कापनी कापते रोजगार
खिशाला लागते कातर फार
सुगीला मळ्यात हॉलर येतो
क्षणात सारं मळतो , भरतो

मळ्याला आता यंत्रवत बहर
शेतकरी आता पॅंटीतला लेबर
आणि प्रॉडक्शन मॅनेजर

मळ्याला मान्य स्थित्यंतर
तोही आता वयस्क झालाय
लिंबा खाली बुढ्ढा बसलाय
भलरीसाठी कान आसुसलाय

लिंबाच्या सावलीला मी गातो
"बैल माझे गुणवान
कसत होतं रान छान"
थरथरतात वाफं,
थरथरतात पिकं,
विहिरीला होतो भास,
कुईकुई करतं कणा चाक

मी जसा थांबतो
तो अजून ऐकवा म्हणतो
जीव त्याचा भरत नाही
स्थित्यंतर बरं का वाईट कळत नाही
© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच...
शिवार, विहिर, मोट, जित्राब, भलरी... सारं कसं डोळ्यासमोर उभं राहिलं...

स्थित्यंतर होणारंच....कालाय तस्मै नमः

छान कविता

स्थित्यंतर (ठिबक) चं तरी आवश्यकच Happy

@ आबा...
खूप धन्यवाद...
स्थित्यंतर (ठिबक) चं तरी आवश्यकच...मी सहमतच आहे...
पण मळा अजून गोंधळलाय...त्याला स्थित्यंतर बर की वाईट कळत नाही...त्याने स्थित्यंतर मान्य केलयं... कविता भावनिक
(nostalgic) अंगाने जातेय त्याचबरोबर आधुनिकीकरणानं शेतीच्या समस्या मिटल्या असंही नाही....अर्थात हा विषय खूप मोठा आहे... Happy