नक्षत्रांची शांती ३ - प्रेम आणि मृत्यु
https://www.maayboli.com/node/80854
-----------------------------------------------------------
मृत्युयोग!
म्हणजे नेहमीच मृत्यु होईल असे नसते. काही वेळेस मृत्यु होत नाही पण संसारात विघ्ने येऊ शकतात. तुमच्या पत्रिकेत मात्र जीवाला धोका दर्शवतोय. मुलीच्या जीवाला जास्त धोका आहे. मुलाच्या जीवाला तुलनेत कमी धोका आहे.. पण धोका आहे. आणि तो दोघांच्याही जीवाला आहे.
मी, माझे आईवडील आणि एक पंडीत. असे चौघे आमच्या घरात बसलो होतो. आणि तो पंडित हे वरचे सांगत होता. त्याआधी माझ्या आईवडिलांनी आमच्या नेहमीच्या भटजींना पत्रिका दाखवली होती. त्यांनीही हेच सांगितले होते. त्यामुळे मग आता आमच्या बिल्डींगमधील एका पंडितजींना मला समजवून सांगायला पाचारण केले होते. ते आमच्या घराजवळील अंजीरवाडीच्या प्रसिद्ध गणपती मंदीरात पुजारी होते. त्यांनी समजावून सांगितल्यास मला या परीस्थितीचे गांभीर्य समजेल आणि मी लग्नास माघार घेईल असे घरच्यांना वाटत होते. तशीच घरच्यांची ईच्छा देखील होती.
बर्र, हे सगळे झूठ म्हणावे तर आमच्याच घराण्यात माझ्या मागच्या पिढीत हे सारे काही घडून गेले होते. माझ्या मोठ्या काकांच्या आणि काकींच्या पत्रिकेतही मृत्युयोग आढळला होता. पण काकांना काकी पाहताक्षणीच पसंत पडल्या होत्या. त्यामुळे त्यांनी पत्रिकेतील या योगाला न जुमानता आपला लग्नाचा हट्ट कायम ठेवला होता. पुढे त्यांचे लग्न झाले. दोन मुली झाल्या. त्या तीन-चार वर्षांच्या असतानाच काका स्कूटर अपघातात गेले. पुढे काही वर्षांनी काकीही दुर्दैवी अश्या अपघातातच गेल्या. त्यानंतर आमच्या घरात कोणी पत्रिकेला हलक्यात घेतले नव्हते. तशी वेळही आली नव्हती म्हणा जी आज आली होती. आणि हे सारे संभाषण जे घडत होते ते त्याच काकांच्या तसबिरीखाली बसून घडत होते. त्या पंधरा मिनिटात पंधरा वेळा वडिलांनी काकांच्या फोटोला बघून डोळ्यात पाणी आणले होते. मला काय बोलावे हे एका शब्दाने सुचत नव्हते. मनात विचारांचे वादळ ऊठले होते. पण मी फक्त आणि फक्त ऐकून घ्यायचे काम करत होतो.
"देखो, रिश्ते तो आगे और भी बनेंगे. लडकियां आगे और भी मिलेगी. लेकिन ये रिश्ता छोड दो. अपने मातापिता के बारे मे सोचो. तुम ईकलौते हो. तुम्हारे अलावा उनका और कौन है ..." असे समारोपाचे शब्द बोलून ते पंडितजी उठले.
मी अजूनही तसाच शॉक लागल्यासारखे बसून होतो. कारण मनात येणाऱ्या विचारांत सुस्पष्टता नव्हती. एकीकडे सहा महिन्यांचे प्रेम पण तरीही आयुष्यभराची साथ देणारा जोडीदार होता, तर दुसरीकडे आयुष्यभर ज्यांनी साथ दिली आणि ज्यांना आपण आता उर्वरीत आयुष्यात साथ द्यायची आहे असे आईवडील होते. विवेकबुद्धी शाबूत ठेवून विचार करता ज्या गोष्टींवर आपण आजवर विश्वास नाही ठेवला त्या कारणास्तव आपल्यावर प्रेम करणार्या मुलीला नकार देणे पटत नव्हते. पण त्याचवेळी ज्यांचा अश्या गोष्टींवर विश्वास आहे त्यांना त्यांच्या मुलाचे आयुष्य डावावर लावायला तरी कसे सांगावे?
काही न बोलता उठलो. कपडे केले. घरातून बाहेर पडलो. आईवडिलांनीही कुठे जातोस म्हणून एका शब्दाने विचारले नाही. प्रेयसीला फोन लावला. तिला एका बागेत बोलावले. जे घडले ते जसेच्या तसे सांगितले. ती देखील काहीच बोलली नाही. अजून तासभर तसेच शून्यात तंद्री लाऊन आम्ही बसून होतो. तो तास एका युगासारखा होता. मौन असह्य होऊ लागले तसे ऊठलो आणि आपापल्या घरी निघालो. मी विचार केला आज तिलाही घरी जाऊन विचार करू दे, उद्या बोलूया. पण तिथेच चुकलो!
मी वाशीहून तासाभराचा प्रवास करून माझ्या घरी पोहोचलो. पण ती मात्र दहा मिनिटांवर असलेल्या आपल्या घरी पोहोचली नाही. आणखी तासाभराने तिच्या घरून तिच्या बहिणीचा फोन आला. ताई घरी पोहोचली नाहीये.
तिला घराबाहेर पडून आता तीन-चार तासांपेक्षा जास्त वेळ झाला होता. घड्याळातली वेळ सांगायची तर रात्रीचे अकरा वाजत आले होते. मी घरी असे असे घडले सांगून तिला शोधायला बाहेर पडलो. अर्थात पुन्हा वाशीची ट्रेन पकडली. पण अर्ध्यावर असतानाच तिच्या बहिणीचा पुन्हा फोन आला. ताई सापडलीय. तुम्ही येऊ नका. मी पुन्हा घरी आलो. या मधल्या काळात ती एका मंदिरात रडत बसली होती.
हे सर्व सांगायचे कारण ईतकेच की या काळात मुलीने आपल्या जीवाचे काही बरेवाईट तर केले नसेल म्हणून माझ्या आणि माझ्या घरच्यांच्या मनात जे उलट सुलट विचार आलेले त्याने एक निर्णय पक्का झाला. या मृत्युयोगावर आता काहीतरी उपाय शोधून हे लग्न होऊ द्यायचे.
तर ऊपाय फार सिंपल होता. एका पिंपळाच्या झाडाशी विवाह करायचा होता. नेमके पिंपळाच्याच झाडाशी की दुसरे कुठले झाड होते हे आता आठवत नाही. माझा यावर विश्वास नसल्याने जास्त डिटेल घेतले नव्हते. तुम्ही जिथे डोके टेकवायला सांगाल तिथे टेकवेन अशीच भुमिका होती. याऊपर हातात एक मंतरलेल्या खड्याची अंगठी देखील घालायची होती. तिथे मात्र घरच्यांनी सांगितले की पोरगा आयुष्यभर अशी अंगठी घालणार नाही. त्याचा यावर विश्वास नाही. त्यामुळे मग दोन चार दिवस घातली तरी चालेल असा मध्यममार्ग निघाला. त्या दोनचार दिवसाच्या अंगठीचे दहा हजार आणि पिंपळविवाहाचे पंचवीस हजार असा पस्तीस हजाराचा खर्च माझ्याच खिश्यातून जाणार होता. ती घरून परवानगी मिळवायची किंमत समजून मी तयार झालो.
पस्तीस हजार हा आकडा लक्षात राहायचे कारण म्हणजे माझा तेव्हा पगार पस्तीस हजारच होता. बाईचे वय आणि पुरुषाचा पगार विचारू नये असे म्हणतात. पण स्त्री-पुरुष समानतेचा जमाना असल्याने मी माझा पगार सांगायला तयार आहे पण वय तेवढे कोणी विचारू नका
थोडक्यात एक पुर्ण पगार अक्कलखाती जमा होत होता. जणू पगाराच्या दिवशीच पाकिट मारले जावे असे फिलींग आले होते
असो, तर त्या पिंपळ विवाहाचा देखील एक मुहुर्त काढला गेला. पण त्या विवाहानंतर पुढचे पाचसहा महिने शुभविवाहाचा मुहुर्तच नव्हता. आमच्यासाठीच असे नाही तर जगभरातील मुहुर्त बघून लग्न करणार्या हिंदूंसाठी पंचांगात लग्नाचा मुहुर्तच नव्हता. जगभरातली लग्ने या काळात अडकणार होती. पण यामुळे मुलगी आणि तिच्या घरचे टेंशनमध्ये आले. या काळात माझ्या घरच्यांचा विचार पुन्हा बदलला तर.....
त्यामुळे मी असा प्रस्ताव मांडला की पिंपळविवाहाच्या आधी आम्हा दोघांचे रजिस्टर लग्न उरकून घ्यावे. तसेही घरच्यांना घाबरवायला आम्ही रजिस्टर लग्नाची नोटीस दिली होतीच.
मग पुन्हा केस भटजीबुवांच्या कोर्टात गेली. त्यांनी पिंपळ विवाहाच्या आधी रजिस्टर लग्नाला परवानगी दिली. कारण शास्त्राच्यामते रजिस्टर लग्नाला काही अर्थ नसतो. देवाब्राह्मणांच्या साक्षीने कराल तेच खरे लग्न. त्या आधी पिंपळविवाह होणे गरजेचे, पण पिंपळविवाहाच्या आधी रजिस्टर लग्न करायला काही हरकत नाही असा निष्कर्श निघाला.
त्यानुसार मग ठरल्या तारखेला आमचे रजिस्टर लग्न झाले. अर्थात लपूनछपून झाले. तिच्या वडिलांना आणि भावाला हे माहीतही नव्हते. वडिलांना तरी पुढेमागे सांगण्यात आले, पण भावाला आजही ठाऊक नाही. तिच्या दोन बहिणी आणि आई, याच तिघी लग्नाला हजर होत्या. माझ्या घरूनही आशीर्वाद द्यायला कोणी आले नाही. आलिंगन द्यायला आणि स्वाक्षरी करायला मोजून तीन मित्र आले होते. असे टोटल सहाजणांची वरात घेऊन आमचा लग्न सोहळा एका तलावाकाठी खुफिया पद्धतीने कागदोपत्री संपन्न झाला.
अरे हो, लगे हात आम्ही गोव्यालाही फिरून आलो. अर्थात हे देखील आमच्या दोन्ही घरात आजवर ठाऊक नाही. न जाणे शास्त्रानुसार पिंपळविवाहाच्या आधी मधुचंद्राची परवानगी नाकारली गेली असती तर.... रिस्क नव्हती घ्यायची बाबा कारण त्यानंतर पुढचे तब्बल सव्वाआठ महिने आम्हाला वेगवेगळे आणि आपापल्या घरी राहायचे होते.
या रजिस्टर लग्नाच्या मधुचंद्रात एक अशी विलक्षण घटना घडली की त्या नाजूक क्षणी आमचा मृत्युयोगावर विश्वास बसला असता तरी आज त्याचे आश्चर्य वाटले नसते...
चला ती विलक्षण घटना पुढच्या भागात बघूया
क्रमश:
- ऋन्मेष:
---------------------------------------------------------
नक्षत्रांची शांती ५ - मृत्यु योग आला होता पण....
https://www.maayboli.com/node/80958
अत्यंत सुंदर ललित लेख.
अत्यंत सुंदर ललित लेख.
लेख आवडला. ललित्यपूर्ण.
लेख आवडला. ललित्यपूर्ण. उत्कंठावर्धक.
साहित्यिक टाईप. शैलीत मूळची झाक प्रगट होते आहे. (त्यामुळे) छान वाटले वाचताना.
छान!
छान!
अरे लिहि की एकटाकी.
अरे लिहि की एकटाकी.
क्रमशः कशाला?
सरांचा जणू चरित्रपट बघतोय असं
सरांचा जणू चरित्रपट बघतोय असं झालं
आणि पुढच्या भागात बघू म्हणल्यावर तर जणू अजूनही बरसात आहे चीच आठवण झाली
अत्यंत उत्कंठावर्धक
सर लवकर पुढचा भाग येऊ द्या
लिही ही झटझट! छान लिहितो आहेस
लिही की झटझट! छान लिहितो आहेस.
मस्त लिहिले आहे. दर भागात
मस्त लिहिले आहे. दर भागात पुढे काय होणार ह्या उत्कंठेवर आणून संपवताय. मुरलेले लेखक झालात आता.
पुढे लिहा लवकर
वाचायला मज्जा येतेय. छान
वाचायला मज्जा येतेय. छान लिहिता.
धन्यवाद सर्वांचे, आशुचँप
धन्यवाद सर्वांचे, आशुचँप तुमचेही.
लिहिता लिहिता भाग वाढले. कल्पना नव्हती. याचा अर्थ मूळ कथानकात पाणी नाही टाकले. उलट प्रेमप्रकरणातील बरेच काही लिहावेसे वाटणारे टाळून विषयावरच राहतोय. तरी लिहिता लिहिता आठवणी जाग्या होताहेत त्या एकमेकांना जोडतोय. जमेल तसे लिहितो लवकर.
आता बहुधा या प्रकरणाचा उत्तरार्ध होईल आणि मग अंतिम भाग नक्षत्रांची शांती राहील
हे लिहुन कथा रजिस्टर करुन ठेव
हे लिहुन कथा रजिस्टर करुन ठेव.
एक मस्त सिनेमा निघेल.
धन्यवाद ब्लॅक कॅट.. पुढे मागे
धन्यवाद ब्लॅक कॅट.. पुढे मागे विचार तोच आहे
हा भागही खूप छान झाला !
हा भागही खूप छान झाला ! उत्सुकता वाढलीये लवकर टाक .....
छान लिहीलं आहेस, फक्त क्रमशः
छान लिहीलं आहेस, फक्त क्रमशः चा जाम वैताग येतो. पण तू पूर्ण करशीलच अशी खात्री आहे म्हणून क्रमशः असूनही वाचलं.
प्रेमकथा ते लग्नकथा एकदम रोचक
प्रेमकथा ते लग्नकथा एकदम रोचक कहाणी आहे..!
छान लिहितायं.. लेखनाची शैली मस्त आहे...!
शिर्षकातले ''माझे तीन विवाह' वाचून उत्सुकता एकदम वाढली.
हो, पण झाली देखील आहेत तीन
हो, पण झाली देखील आहेत तीन लग्ने .. निव्वळ शीर्षक कॅची करायला टाकले नाहीये
पण तू पूर्ण करशीलच अशी खात्री आहे म्हणून क्रमशः असूनही वाचलं. >>> हो अर्थात. जे घडलेय ते लिहायचे आहे. काल्पनिक कथा नाही जे गॅप पडला, मूड गेला, सुचायचे बंद झाले म्हणून सोडली असे काही व्हावे..
आणि ते नक्षत्राची शांती अखेरच्या भागात असल्याने तिथवर पोहोचावे लागणारच
भटजींचे कोर्ट म्हणजे एकदम
भटजींचे कोर्ट म्हणजे एकदम आरटीपीसीआर टेस्ट वाटू लागली आहे. टेस्टचा रिझल्ट येण्याआधीच लग्न पण झाले. उद्या रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर ?
बाकी लेख मस्त लिहीला आहे.
(सध्या भक्ती स्थगित केली आहे ).
धन्यवाद शांत माणूस
धन्यवाद शांत माणूस
मस्तच!!!
मस्तच!!!
<<असे टोटल सहाजणांची वरात
<<असे टोटल सहाजणांची वरात घेऊन आमचा लग्न सोहळा एका तलावाकाठी खुफिया पद्धतीने कागदोपत्री संपन्न झाला.>>>
हे कसे काय? रजिस्ट्रार ऑफिसमध्ये करावे लागते ना लग्न? तेच तलावाकाठी आहे का? की रजिस्ट्रार ऑफिस मधुन माणसे आली तिथे?
रजिस्ट्रार जनतेचा सेवक असतो.
रजिस्ट्रार जनतेचा सेवक असतो. त्याचे कामच आहे जिकडे लग्न फुटेल तिकडे धावण्याचे.
तेच तलावाकाठी आहे का?
तेच तलावाकाठी आहे का?
>>>>
हो, ठाण्याच्या रजिस्ट्रार ऑफिसला गेलेलो. तिथे तलावाकाठी नंतर जोड्याने एक फोटो काढला.
उत्कंठा लागली, पुढे काय झाले?
उत्कंठा लागली, पुढे काय झाले?
मस्त लेख पुढे काय याची
मस्त लेख पुढे काय याची उत्सुकता लागली आहे.
मस्त लिहिलय ...
मस्त लिहिलय ...
भटजी कुंभविवाह असा सुद्धा
भटजी कुंभविवाह असा सुद्धा प्रकार सांगतात करायला, नाही केले तर लग्न जमणार नाही असे सांगून.
सगळा पैसा उकळवायचा मामला ह्या भटांचा. इतकी फसवणूक करतात. आमच्या ओळखीत मुलीचे लग्न जमावे म्हणून एका काकूंनी दागिने विकले सतराशे साठ भटांचे उपाय, पुजा करायला. काय काय करत त्या , मिळेल त्या भटाचे उपाय एकून.
स्मशान पुजा, कावळ्याला दारु व मटण दर शनिवारी. नवग्रह शांती, कालसर्पपुजा, नाशिकला जावून पितृदोष पुजा, काय नी काय. शेवटी मुलगी कंटाळली पैसा खर्चून.
कारण काय तर घराण्यात दोष का कसलातरी दोष सांगितलेला त्या काकूना. ह्या पुजा सर्व थांबल्या, तेव्हाच तिचे लग्न झाले एका मद्रासी मुलाशी. उशीरा म्हणजे ३८ वर्षी. पण चांगला संसार झाला. नंतर तिच सगळ्यांचे प्रबोधन करी की, भटांपासून लांब रहा.
शोधून पहा, कुंभविवाह प्रकार. विनोदी आहे. मडक्याशी लग्न
जेव्हा मुलीचे लग्न जमत नाही
जेव्हा मुलीचे लग्न जमत नाही म्हणून अश्या पूजा केल्या जातात तेव्हा उलट या प्रकाराला प्रसिद्धी मिळून मुलगी आणखी बदनाम होत असेल की हिचे लग्न जमत नाहीये म्हणजे काहीतरी खोट असेल आणि चांगली स्थळे कश्याला विषाची परीक्षा म्हणून दूर राहत असतील..
तिथे तलावाकाठी नंतर जोड्याने
तिथे तलावाकाठी नंतर जोड्याने एक फोटो काढला.
फोटो शक्यतो कॅमेराने काढतात.
जोड्याने????????? ( ही कु शंका मी ते मागच्या मायबोली ची लक्तरे " माझी बोली, आई बोल वगैरे वरुन काढली)
लग्न होत नाही म्हणून मुलगी
लग्न होत नाही म्हणून मुलगी बदनाम? काहीही..
“ह्या असल्या विचारांचा समाज आहे म्हणून पुजा करतात लोकं” असे आहे ते.
लग्न होत नाही म्हणून मुलगी
लग्न होत नाही म्हणून मुलगी बदनाम?
>>>>
मुलगी वा मुलगी.. जे पूजा करत असतील ते.. असे पूजा केल्याने त्यांचे लग्न जमत नाही याला प्रसिद्धी मिळून लोकांच्या मनात संशय उत्पन्न होत असेल की काहीतरी खोट असेल वगैरे म्हणून..
जसे तुम्ही एखाद्या अनोळखी जागी वडापाव खायला गेलात आणि तिथे दोन वडापावच्या गाड्या दिसल्या.. एकावर गर्दी आहे आणि एकावर शुकशुकाट.. तर तुम्ही शुकाशुकाट आहे तिथल्या वडापावची चव चाखायची रिस्क न घेता गर्दीवाल्या गाडीवरच जाणार.
लग्न होत नाही म्हणून मुलगी
लग्न होत नाही म्हणून मुलगी बदनाम? काहीही.. >>> झंपूकाका, तुम्हाला काय म्हणायचे ते समजले नाही.