मरगळ सारी सरून गेली

Submitted by निशिकांत on 11 January, 2022 - 07:47

वचन दिलेले पूर्ण कराया क्षणेक आली, निघून गेली
तिच्या अल्पशा सहवासाने, मरगळ सारी सरून गेली

काळजातल्या कपारीतली ओल नेमकी तिने शोधली
पहिल्या नजरानजरेतच ती अंतःकरणी रुजून गेली

मला वाटते तिने म्हणावे "प्रेम तुझ्यावर मी करते" पण
लाजलाजरी नजरेमधुनी म्हणायचे ते म्हणून गेली

धूसर धूसर स्वप्न अधूरे, पाठलाग मी उगाच केला
हासत लाजत भल्या पहाटे धुक्यात होती विरून गेली

आठवणींची संगत असते, एकाकीपण विसरायाला
यासाठी तर यदाकदाचित नसेल का ती त्यजून गेली?

ती नसताना ग्रिष्म होरपळ, भोगतोस का एकांताची?
डोकाउन बघ तुझ्या अंतरी वसंत ती अंथरून गेली

गंगाजमुनी प्रेम आमुचे, खास विरोधाभास त्यातही
मनी कोरडी कपार, माझे नेत्र ओलसर करून गेली

काव्य संपले ती नसल्याने, आयुष्याच्या मावळतीला
आठवणींचे वस्त्र भरजरी माझ्यासाठी विणून गेली

तुला कसे "निशिकांत"कळावे? दु:खामध्ये चूर तुझ्या तू
दर्पणात पारा नसणार्‍या डोकाउन ती हसून गेली

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--वनहरिणी
मात्रा--८+८+८+८=३२

Group content visibility: 
Public - accessible to all site users