पहिल्या भागाची लिंक: द इनव्हिझिबल आयडियॉलॉजी: जॉर्ज मॉनबियों - भाग १
या भागात आपण उपभोक्तावाद आणि नवउदारमतवाद या दोन संकल्पनांविषयी जॉर्जने मांडलेले विचार समजून घेऊ.
उपभोक्तावाद (consumerism): भांडवलवाद यशस्वी होण्यामागे ही अपवर्ड मोबिलिटीची संकल्पना समाजात रुजवण्यासाठी मोठा हात हा उपभोक्तावादाचा आहे. आता आपल्यासाठी ही संकल्पना इतकी ओळखीची आहे की आपल्याला असं सतत वाटत राहतं की आपल्याला या वस्तूंची आणि सेवांची गरज आहे. जर माझ्याकडे एखादी वस्तू असेल तर काय? अशा वेळी मग बाजारात त्या वस्तूची वा सेवेची नवीन आवृत्ती येते जी अधिक चांगली असते. मग मला असं वाटतं की माझ्याकडे ही नवीन आवृत्ती असली पाहिजे. अशा प्रकारे गरजेच्याच वस्तू किंवा सेवा नाहीत तर सर्वच वस्तू आणि सेवा ग्राहकाला पेश केल्या जात असतात. आज एखाद्या तरुण मुलाला किंवा मुलीला विचारले तर नवीन मोबाईल, गेम, किंवा कोणतेतरी इतर गॅजेट, किंवा एखादे ड्रीम डेस्टिनेशन असतेच प्रत्येकाचे. असमाधानी, अतृप्त असणे किंवा सतत नवनवीन वस्तू/सेवा यांची आकांक्षा असणे ही माणसाची सहजप्रवृत्ती आहे, आपण नेहमी हे असेच होतो असे आपण समजू लागलो आहोत. पण हे तितकेसे खरे नाही. जॉर्ज त्याच्या भाषणात त्याच्या सासरेबुवांच्या लहानपणीची गोष्ट सांगतो. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जेव्हा ब्रिटनवर हल्ला होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा त्यांना आणि त्यांच्या भावाला काही महिने नॉर्थ वेल्समध्ये एका खेड्यात पाठवलं गेलं. तिथे ते एका अत्यंत श्रद्धाळू ख्रिश्चन बाईच्या घरी राहिले होते. ती बाई अत्यंत गरीब होती. घरात गरजेच्या पण मोजक्याच वस्तू होत्या. भौतिक सुखाची साधने तर जवळपास नव्हतीच. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिला याहून अधिक भौतिक संपन्नतेची गरज भासत नव्हती. “तुला काय हवे आहे?” यावर तिचे उत्तर “माझ्याकडे सगळे आहे.” असे होते. पण याचा अर्थ तिला कोणत्याच इच्छा-आकांक्षा नव्हत्या का? तर असे नाही. ती एक श्रद्धाळू ख्रिश्चन होती त्यामुळे ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीनुसार समाजाची, गोरगरिबांची सेवा करणे ही तिची मुख्य आकांक्षा होती. म्हणजे साधारण सत्तर ऐंशी वर्षांपूर्वीपर्यंत भौतिक गरजांची अनियंत्रित हाव हे एकूण जगातच समाजाचे मान्यताप्राप्त वैशिष्ट्य नव्हते. त्या खेड्यातल्या बाईंच्या सर्व आकांक्षा अध्यात्मिक किंवा सामाजिक होत्या आणि आपण जर सर्व मानवी संस्कृती आणि धर्मांमध्ये पाहिले तर त्यामध्ये तुम्हाला भौतिक गरजांच्या मागे न धावता भगवंताची भक्ती करावी किंवा समाजाची सेवा करावी, दान करावे अशा अर्थाची शिकवण दिसेल. आध्यात्मिक इच्छाआकांक्षा आणि सामाजिक इच्छा-आकांक्षा यावर बहुतेक समाजांची बांधणी झालेली आहे. हे उदाहरण देण्याचा हेतू ‘पहा पूर्वी सगळे कसे छान होते’ हे सांगणे नाही. सतत कुठल्यातरी कृत्रिम गरजा निर्माण करून त्या पूर्ण करण्यासाठी धावत राहणे ही सहज मानवी प्रवृत्ती नाही हे यातून दाखवून द्यायचे आहे. ही आधुनिक युगातल्या उपभोक्तावादाची करामत आहे. कारण उपभोक्तावाद सांगतो की to want more stuff is human nature because more stuff will make you happier. पूर्वीच्या माणसांकडे अधिक वस्तू, सुखसोयी नव्हत्या म्हणून ती माणसे दुःखी होती असे नाही. आपल्या मूलभूत गरजा भागवण्याइतकी संसाधने असतील तर त्याहून अधिक गोष्टी मिळाल्यावर माणूस अधिकाधिक सुखी होतो असे नाही. After a point, happiness is not directly proportional to the amount of stuff you own.
जेव्हा तुम्ही तुमच्या मूलभूत गरजा आणि थोड्या ऐच्छिक गरजा पूर्ण करता तेव्हा ‘आता हे आहे हे पुरेसे आहे’ असे तुम्ही म्हणू नये म्हणून एक मोठी यंत्रणा सतत झटत असते. कारण भांडवलवादात अपेक्षित असलेली सततची वाढ त्याशिवाय शक्य होणार नाही. आणि गेल्या सत्तर-ऐंशी वर्षात हा बदल घडला आहे की सर्वांनाच आपली प्रगती व्हावी म्हणजे केवळ माझ्या भौतिक सुखात वाढ व्हावी असे वाटते. “तुम्हाला कोण व्हायचे आहे?” या प्रश्नाचे उत्तर काहीही असले तरी मुळात मला अधिक श्रीमंत व्हायचे आहे (पक्षी: अधिक पैसे मिळवायचे आहेत) हे आहे. आणि श्रीमंत का व्हायचे आहे तर मला अधिक भौतिक सुखाचा आनंद घेता यावा म्हणून. अशा महत्त्वाकांक्षा नसलेला माणूस हा सध्याच्या समाजात अयशस्वी किंवा निरुपयोगी ठरवला जातो. आज तुम्हाला सर्व आर्थिक गटात हे पिअर प्रेशर आढळेल - नवीन रेस्टॉरंट घडलंय, नेटफ्लिक्सवर नवीन सिरीज आली आहे ते नवा व्हिडिओ गेम, नवीन गाडी, एखाद्या नव्या ठिकाणी ट्रिप किंवा हास्यास्पद स्वरूपाची वाटणारी यंत्रे किंवा उत्पादने जसे manicure करणारा रोबोट, कुत्र्यांसाठी बियर, तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही अशा अनावश्यक गोष्टींचा मारा करणारी यंत्रणा उभी आहे आणि आपण त्याला रोज बळी पडतो आहोत. हाती पैसा असेल तर बेझोजसारखा माणूस आपला बालहट्ट पुरवण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा चुराडा करून अंतराळात जाऊन येतो आणि त्याच्यापासून प्रेरणा घेत अनेक जण अशा असूरी वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बाळगणे आणि पूर्ण करणे म्हणजेच यशस्वी होणे हे ठरवून टाकतात. आजच्या समाजात आध्यात्मिक, सामाजिक, निसर्गस्नेही महत्त्वाकांक्षांना फारसे महत्त्व नाही. कारण वस्तू आणि सेवांचा उपभोग म्हणजेच आनंद अशी एक भांडवलवादासाठी सोयीस्कर व्याख्या उपभोक्तावादाने आपल्या मनात रुजवली आहे. हे सर्व विचार, या कृत्रिम गरजा आपल्यापर्यंत पोहोचवणारी यंत्रणा म्हणजे सेलेब्रिटी कल्चर. जॉर्ज म्हणतो celebrities are handmaiden of capitalism. आपला बराचसा पैसा शेल कंपन्यांद्वारे गुंतवणारे मोठे मासे हे कधीच सेलिब्रिटीज नसतात. किम कर्दाशियन किंवा सध्याचे social media influencers हे या उपभोक्तावादाला खतपाणी घालत असतात.
उपभोक्तावादाने निसर्गाची कशी हानी झाली आहे यावर वेगळे भाष्य करण्याची गरज नाही कारण आपण ते रोज अनुभवतो आहोत. या उपभोक्तावादाच्या अतिरेकातून अनेक पर्यावरणीय समस्या तर तयार होत आहेतच पण मानसिक आरोग्याचे मोठे प्रश्न देखील निर्माण होत आहेत. आपले स्वास्थ्य/सुख (wellbeing) आपल्याकडे किती वस्तू किंवा सेवा उपभोगण्याची आर्थिक क्षमता आहे यावर अवलंबून आहे आणि जर माझ्याकडे अधिक वस्तू किंवा सेवा असतील तर मी अधिक सुखी आणि समाधानी असेन या मानसिकतेमुळे अनेकांवर ताण येतो आहे. कारण एका मर्यादेपलीकडे अधिकच्या वस्तू आणि सेवा या अधिक आनंद देत नाहीत हे सत्य आहे. Extreme consumerism has done nobody any good. पण भांडवलवादी विकासाच्या मॉडेलमध्ये पुरेसे (enough) हा शब्द नाही जर तुमच्याकडे काही डिस्पोजेबल इन्कम असेल तर ते तुम्ही खर्च करावं म्हणून चाललेला हा खटाटोप आहे. कारण ते जर खर्च झालं नाही तर अर्थव्यवस्था वाढणार नाही.
नवउदारमतवाद (neoliberalism): आता नवउदारमतवादाकडे वळूया. ही संकल्पना १९३८ मध्ये प्रथम मांडली गेली. परंतु हळूहळू या कल्पनेचा उघडपणे पुरस्कार करणारे कमी झाले. पण गंमत अशी की प्रत्यक्षात मात्र ही विचारसरणी अत्यंत वेगाने पसरते आहे! हे फार महत्त्वाचे आहे कारण ही विचारसरणी घातक आहे आणि आपण तिचा नकळत पुरस्कार करतोय. नवउदारमतवाद म्हणजे थोडक्यात काय तर असे म्हणणे की समाजात काहीही बदल घडवून आणायचे असतील तर राजकीय मार्ग अवलंबण्यापेक्षा बाजारव्यवस्था (market) हा अधिक चांगला मार्ग आहे. आता या व्याख्येत बाजारव्यवस्था म्हणजे नक्की काय ते तसं मोघम आहे. पण कितीही मुक्त बाजारव्यवस्था (फ्री मार्केट इकॉनोमी) म्हटली तरी ती खरोखर मुक्त नसते. कारण तुम्ही जरी मुक्त आणि समान अशी अर्थव्यवस्था निर्माण करू पाहत असलात तरी बाजार म्हंटला की पैसा (भांडवल) येतो आणि मग ओघानेच ज्यांच्याकडे अधिक पैसा असतो त्यांना अधिक अधिकार मिळतात. प्रत्यक्षात घडत असं की मुक्त बाजारव्यवस्थेत (पक्षी: नवउदारमतवादी विचार व्यवस्थेत) राजकीय शक्तीची केंद्रे शेवटी मूठभर श्रीमंत लोकांच्या वा कंपन्यांच्या ताब्यात जातात. विल डेव्हिस यांचे एक वाक्य जॉर्ज उद्धृत करतो ते मी इथे जसेच्या तसे देत आहे - neoliberalism is a disenchantment of politics by economics (अर्थकारणाने राजकारणाचा केलेला भ्रमनिरास म्हणजे नवउदारमतवाद). नवउदारमतवादामध्ये अपेक्षा असते की बाजारव्यवस्थेत कोणाचाही विशेषतः सरकारचा कमीत कमी हस्तक्षेप असावा, फारसे कर नसावेत, कमीत कमी नियम आणि अटी असाव्यात, कामगारांच्या संघटनांना फार वाव नसावा, मोर्चे निदर्शने या गोष्टी बेकायदेशीर ठराव्यात. थोडक्यात उदारमतवादात असे अभिप्रेत आहे की कोण टिकून राहील हे बाजारव्यवस्था ठरवेल. तुमच्याकडे गुणवत्ता असेल तर तुम्ही स्पर्धेत टिकाल आणि जर तुम्ही कमकुवत असाल तर तुमची जगण्याची लायकी नाही.
ही विचारसरणी अमेरिकेत रेगन आणि ब्रिटनमध्ये थॅचर यांच्या कारकिर्दीत मोठ्या प्रमाणावर वापरली गेली. त्यानंतरची अगदी आत्तापर्यंत ही विचारसरणी पसरत राहिली आहे. आजचा बराचसा आंतरराष्ट्रीय व्यापार हा लोकशाहीच्या परिघाबाहेरचा आहे. कारण या व्यापाराचे नियम ठरविणाऱ्या संस्था या लोकशाही पद्धतीने चालत नाहीत. उदाहरणार्थ, IMF, European central bank, Trade tribunals - या स्वायत्त संस्था काय धोरण ठरवतात हे लोकनियुक्त प्रतिनिधी ठरवत नाहीत. भारतात मला वाटतं १९९१ सालानंतर जेव्हा उदारीकरण सुरु झाले तेव्हा या विचारांचा प्रसार अधिक वेगाने सुरु झाला असावा.
जागतिकीकरणाचे जसे फायदे झाले तसे काही मोठे तोटेही झाले. जागतिकीकरणाच्या नावाखाली बहुराष्ट्रीय कंपन्यांनी विकसनशील देशातील साधनसंपत्ती आणि जनता यांचे अत्यंत कायदेशीर मार्गाने शोषण सुरू केले. अशा परिस्थितीत लोकनियुक्त सरकारची आपल्या लोकांच्या आणि आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण करण्याची जी जबाबदारी आहे ती नवउदारमतवादी सरकार घेऊ इच्छित नाही. सरकार म्हणतं मिनिमम गव्हर्नन्स हाच आमचा अजेंडा (हे जॉर्जच्या भाषणातले वाक्य आहे!). याचाच दुसरा अर्थ या ग्लोबल कंपन्या विकसनशील देशातल्या लोकांचे आणि निसर्गाचे कितीही शोषण करीत असल्या तरी त्यांना थांबवण्याची अथवा वेसण घालण्याची लोकनियुक्त सरकारची इच्छा नसते. हा एकप्रकारे लोकशाहीचा पराभव आहे. एकप्रकारे लोकशाही हा नवउदारमतवादाच्या समोरचा सर्वात मोठा अडथळा आहे.
जसा नवउदारमतवाद नैसर्गिक साधनसंपत्तीसाठी धोकादायक आहे तसाच तो आपल्या मानसिक आरोग्यासाठी पण धोकादायक आहे. कारण या व्यवस्थेत तुम्हाला सतत तुमची किंमत सिद्ध करत रहावे लागते. तुमच्या बरोबर काम करणारे तुमचे सहकारी नसतात ते स्पर्धक असतात किंवा बॉस असतात. आपण जर नवउदारमतवादाकडे पाहिलं तर आपण ‘माणूस उपयोगी आहे का?’ हे ठरवणारी व्यवस्था उभारतो आहोत हे जाणवतं. सतत परीक्षण, स्पर्धा, आणि या साऱ्यासाठी निर्माण झालेले bullsh*t jobs! हे सारं मानसिकदृष्ट्या थकवणारं आहे. आपण नवउदारमतवाद किती अंगिकारला आहे हे बघायचं असेल तर आपले शाळा कॉलेजचे दिवस आणि आत्ताच्या मुलांचे शाळा कॉलेजचे दिवस यांची तुलना करून बघा. शिक्षणाचा “बाजार” जोरात सुरु आहे असं लक्षात येईल.
बाजारव्यवस्था ही जणू नैसर्गिक आहे - बळी तो कान पिळी (survival of the fittest) हा जणू हा निसर्गनियम आहे असे नवउदारमतवादात भासवले जाते. पण मानवी संस्कृती ही स्पर्धात्मक कधीच नव्हती, ना निसर्गात अशी स्पर्धा असते. निसर्गातील स्पर्धा ही परिस्थितीशी जुळवून घेण्याची (adaptation), इतर सजीवांच्या बरोबरीने नांदण्याची (coexistence) स्पर्धा असते आणि जो सर्वांबरोबर जुळवून घेतो तो यशस्वी होतो आणि टिकतो. आपण माणसेही गेली हजारो वर्षे सहकार्याने, परस्परांचे हित जपल्याने इथवर आलो आहोत. आफ्रिकन संस्कृतीमधला उबंटूचा विचार किंवा आपल्या वैदिक संस्कृती मधला “सह नाववतु” हा भोजन मंत्र किंवा गायत्री मंत्र हे सारे बहुवचनी आहेत. एकत्र समूहाने म्हणायचे मंत्र आहेत. त्यामुळे नवउदारमतवाद जे विचार रुजवत आहे ते आत्यंतिक अनैसर्गिक आणि माणसाच्या मानसिक आरोग्यासाठी धोकादायक आहेत.
आपण हे तीन मुद्दे पाहिले त्याबरोबरीने जॉर्ज नंतरच्या चर्चेत एक मुद्दा मांडतो तो मला महत्त्वाचा वाटतो. कारण यातील नैसर्गिक साधनसंपत्तीच्या मालकीचा मुद्दा सोडला तर बाकीची स्टोरी आपल्याला माहिती असते किंवा जाणवलेली असते. मग जर इतक्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत तर जगातले नेते, कंपन्यांचे अधिकारी हे ही व्यवस्था बदलण्यासाठी काही करत का नाहीत? असा प्रश्न पडणं अगदी स्वाभाविक आहे. याचं एक सोपं कारण हे स्वार्थ आणि त्यामुळे इच्छाशक्ती नसणं आहे. पण त्यातली थीम बघितली तर लक्षात येईल की आजच्या कंपन्यांच्या लीडरशिपमध्ये मनोविकारी (psychopathic) वृत्तीचे प्रमाण समाजातल्या नॉर्मल प्रमाणाच्या तुलनेत बरंच जास्ती आहे. साधारणतः समाजात मनोविकारी वृत्तीचे प्रमाण हे एक टक्का असतं तर CEO असलेल्या व्यक्तींमध्ये हेच प्रमाण ४% ते १२% इतकं आढळलं आहे. मनोविकारी माणसे कशी असतात? तर अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्त्वाची, विषयाचे उत्तम ज्ञान असलेली, कोणतीही कठीण परिस्थिती समर्थपणे हाताळून शकणारी, उत्तम संवाद साधू शकणारी, कठोर किंवा अप्रिय निर्णय घेऊ शकणारी तरीही लोकप्रिय असणारी. ही मनोविकारी व्यक्तीची वैशिष्ठ्ये वाचताना तुम्हाला वाटले असेल की पण यात वाईट काय आहे? हे तर सगळे नेतृत्वासाठी आवश्यक असेच गुण आहेत. पण या साऱ्या गुणांबरोबर कोणते अवगुण दिसून येतात आणि कोणते गुण नसतात हे देखिल पाहिले पाहिजे. यातील महत्त्वाचा अवगुण म्हणजे अहंकार (इगो) - अशा व्यक्ती आपल्या चुका सहसा पटकन मान्य करू शकत नाहीत आणि त्याहूनही महत्त्वाचा नसलेला गुण म्हणजे आस्था (empathy)! आपलं विकासाचं मॉडेलच असं आहे की आस्था जागृत असणाऱ्या व्यक्ती या सीईओ पदापर्यंत बरेचदा पोहोचूच शकत नसणार! कारण भांडवलशाही विकासाच्या मॉडेलमध्ये वर्षाकाठी वाढ दिसली नाही तर गुंतवणूकदार, ग्राहक, आणि कर्मचारी या साऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागणार. यामुळे होतं असं की आज, आत्ता, आणि आपल्यापुरतं ही वृत्ती वाढीस लागते. मग show must go on च्या नावाखाली ज्या तडजोडी कराव्या लागतात त्यात आपोआपच आस्था दूर पडते. आस्था, करुणा या गुणांच्या अभावामुळे दीर्घकालीन समता आणि न्यायासाठी आवश्यक अशी दूरदृष्टी या सीईओंमध्ये किंवा एकूणच समाजाच्या नेतृत्वामध्ये अभावानेच दिसते.
आपण नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींमध्ये आस्थेचा अभाव असतो असे म्हणतो पण शेवटी ही लोकं देखील समाजाचाच एक भाग आहेत. तेव्हा हा आस्थेचा अभाव हा संपूर्ण समाजात दिसून येतो. काही अभ्यासांत असे आढळून आले आहे की जितकी तुमची भौतिक संपन्नता जास्त तितकी तुमची आस्था असण्याची क्षमता कमी होते. खरे तर मानवी विकासात आस्था (empathy) आणि करुणा (compassion) या दोन भावनांचे मोठे स्थान आहे. या भावना माणसाला निःस्वार्थी (altruistic) बनवतात. माणसाच्या आत्तापर्यंतच्या प्रगतीमध्ये सहकार आणि निस्वार्थीपणा या दोन भावनांचा मोठा वाटा आहे. माणसाच्या मेंदूत निओकॉर्टेक्स नावाचा जो भाग आहे तो उत्क्रांतीमध्ये नव्याने विकसित झालेला भाग आहे. या भागाचे काम हे चांगल्या भावनांचे नियमन करणे आहे. जी माणसे आपला निओ कॉर्टेक्स वापरतात त्यांचा भावनिक बुद्ध्यांक चांगला असतो. पण दुर्दैवाने अशी माणसे नेतृत्व करताना दिसत नाहीत. समाजातील ९९% नॉर्मल, काही प्रमाणात निःस्वार्थी लोकांचे नेतृत्व हे मोठ्या प्रमाणात मनोविकारी वृत्तीच्या माणसांच्या हाती आहे. We are a community of altruists governed by psychopaths असं जेव्हा जॉर्ज म्हणतो तेव्हा त्यात तथ्य आहे हे जाणवतं.
ही माणसे वाईट नसतात पण त्यांच्यात मनोविकारी प्रवृत्ती बलवान असतात कारण त्यांना भांडवलवादाचे पृथ्वीच्या शाश्वत व्यवस्थेला न झेपणारे मॉडेल राबवायचे असते. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तसे दुरितांचे तिमिर जावो म्हणजे या नेत्यांमधल्या मनोविकार वृत्ती नष्ट होवोत. पण असे घडायचे असेल तर आपल्यापुढे नक्की काय पर्याय आहेत? भांडवलवादाशिवाय दुसरे विकासाचे कोणते मॉडेल आहे का जे निरंतर वाढीवर आधारित नाही आणि तिथपर्यंत पोहोचायचे कसे? कारण भांडवलवाद म्हणजे काही पाण्याचा नळ नाही जो तुम्ही एका झटक्यात बंद केलात की सर्व प्रश्न सुटतील. बदलांना देखील शाश्वत पद्धतीनेच आणावे लागेल. पुढच्या भागात आपण सध्या जगात मांडली जाणारी नवीन आर्थिक प्रारुपं, संकल्पना बघूया. त्याच बरोबर सामान्य व्यक्ती म्हणून आपण आपल्या नेहमीच्या चांगल्या सवयी व्यतिरिक्त काय करू शकतो या विषयी जॉर्जने मांडलेले विचार आपण तिसऱ्या आणि शेवटच्या भागात पाहू.
तिसऱ्या भागाची लिंक: द इनव्हिझिबल आयडियॉलॉजी: जॉर्ज मॉनबियों - भाग ३
संदर्भ: मूळ भाषणाची लिंक
द इनव्हिझिबल आयडियॉलॉजी: जॉर्ज मॉनबियों - भाग १
द इनव्हिझिबल आयडियॉलॉजी: जॉर्ज मॉनबियों - भाग २
उपायांविषयी वाचायला उत्सुक.
उपायांविषयी वाचायला उत्सुक.
धन्यवाद अमितव! पुढच्या भागात
धन्यवाद अमितव! पुढच्या भागात अगदी ढोबळमानाने उपायांची चर्चा केली आहे. पण अजून तपशीलात जाऊन थोडे स्वानुभवावर आधारित उपाय याबद्दल एका वेगळ्या लेखात लिहायचे मनात आहे (थोडेसे कागदावर पण आहे)!
स्वानुभवावर आधारित उपाय
स्वानुभवावर आधारित उपाय याबद्दल एका वेगळ्या लेखात लिहायचे मनात आहे (थोडेसे कागदावर पण आहे)! >>
ह्याची वाट बघत आहे.