नक्षत्रांची शांती ३ - प्रेम आणि मृत्यु

Submitted by ऋन्मेऽऽष on 7 January, 2022 - 14:01

नक्षत्रांची शांती २ - बैल गेला आणि झोपा केला - https://www.maayboli.com/node/80784

........................................................

दुसर्‍या भागातील बैलवाल्या बाबाच्या अनुभवातून एक धडा शिकलो होतो. एखाद्याने बुवाबाजीच्या नादाला लागायचे ठरवले तर त्याला कोणीही अडवू शकत नाही. जर ती व्यक्ती आपले फार मोठे नुकसान करून घेत नसेल तर त्यांना अडवूही नये. कदाचित त्यांची गरज समस्येवर उत्तर मिळवणे नसून मानसिक समाधान मिळवणे हे देखील असू शकते. देवाबाबत तर हे हमखास लागू. त्या बाबाने निदान लोकांचा विश्वास संपादन करायला ईथून तिथून माहिती गोळा करत भूत भविष्य वर्तमान सांगितल्याच्या थाटात लोकांना सांगितली होती. पण देवाला ईतके सुद्धा करावे लागत नाही. त्याने दर्शन न देताही लोकं `जगात देव आहे' हा विश्वास आयुष्यभर बाळगून जगतात. कारण `देव आहे' हे समजणे लोकांची मानसिक गरज असते. आणि मग त्या देवाशी संपर्क साधायला त्यांना कोणीतरी मध्यस्थ लागतोच. एका मध्यस्थाने फसवले म्हणून ते देवावर अविश्वास दाखवत नाहीत. तर मध्यस्थ बदलतात.

जेव्हा हे जाणवले त्या दिवशीपासून मी लोकांच्या श्रद्धेला नावे ठेवणे बंद केले. तुमचे आस्तिकत्व तुमच्याकडे, माझे नास्तिकत्व माझ्याकडे. हेच धोरण मी माझ्या आईवडिलांबाबतही ठेवले. पण एकाच कुटुंबात, एकाच छताखाली राहताना हे प्रत्येकवेळी पाळणे शक्य नसते. आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर एक वेळ अशी येणार जेव्हा आपण हा संघर्ष टाळू शकणार नाही याची मला कल्पना होती, आणि दुर्दैवाने ती वेळ आयुष्यातील महत्वाच्या टप्प्यावरच आली.

चलो, थोडा शुरू से शुरू करते है...

काही फुटकळ प्रेमप्रकरणे झाली. काही प्रपोजेसची देवाणघेवाण झाली. काहींना मी हो म्हटले, तर काही वेळा समोरच्या मुलींनी नाही म्हटले. एकतर्फी प्रेमाच्या लाटा तर दर पौर्णिमा अमावस्येला उसळतच राहायच्या. हे सर्व काही पचवून जेव्हा मी कॉलेजच्या बाहेर पडलो तेव्हा एका आदर्श भारतीय नरपुंगवाला साजेसे असे वर्जिनिटीचे सर्टिफिकेट घेऊनच बाहेर पडलो. लग्नाच्या ईंटरव्यूला या सर्टिफिकेटची किंमत सर्वात मोठी असा माझा तेव्हा गोड गैरसमज होता. प्रत्यक्षात त्याहीपेक्षा मोठे असे एक सर्टिफिकेट बघितले जाते, त्याशिवाय सुखासुखी लग्न जमणे अवघडच याची मला तेव्हा कल्पना नव्हती. आणि ते सर्टिफिकेट म्हणजे.......... कर्रेक्ट, पत्रिका!

कॉलेज संपल्यावर आपले कौमार्य घालवायला उतावीळ असा मी पहिल्या जॉबला लागलो तेव्हा ऑफिसमधील आवडणार्‍या एका परप्रांतीय मुलीशी प्रेम कमी आणि भांडणच जास्त झाले. दुसर्‍या जॉबला लागलो तेव्हा बसच्या रांगेत एका मुलीच्या प्रेमात पडलो. पण ती मला रोडसाईड रोमिओ समजून एका कारवाल्याकडे लिफ्ट मागत पसार झाली. तिसर्‍या जॉबला लागलो तेव्हा जग ईतके पुढे सरकले होते की आजूबाजूच्या सर्व मुलींनी आपला जोडीदार बूक केला होता. त्यामुळे आता माझ्यावर हक्क सांगणारी मुलगी मला अशी एका जागी बसून मिळणार नाही हे मी समजून चुकलो. आणि आपले मार्केटींग सोशलसाईटवर म्हणजे तेव्हाच्या ऑर्कुटवर सुरू केले.

फ्रेंडशिपचा डे चा मुहुर्त पकडला आणि जिथे मी कामाला होतो त्या नवी मुंबई विभागातील आसपासच्या मुली शोधून धडाधड धडाधड हॅपी फ्रेंडशिप डे चा एक सौम्य मेसेज आणि मैत्रीची रिक्वेस्ट पाठवून दिली. रँण्डम रिक्वेस्ट ५० पाठवल्या तर ५ अ‍ॅक्सेप्ट होतात. हा रेशिओ ध्यानात घेत मी १०० पाठवल्या. त्यातल्या १० अ‍ॅक्सेप्ट झाल्या. पण हाय हेल्लो मध्येच एकेक करत सर्व निसटल्या. जेवलीस का, असे हक्काने विचारावे ईथवर एकही प्रकरण पोहोचले नाही. नाही म्हणायला एक शिल्लक होती. जिला मी चॅटवर रोज दहा प्रश्न विचारायचो आणि ती देखील लॉग आऊट करताना त्यातील एका प्रश्नाचे एका शब्दात उत्तर देऊन निसटायची. पण मी महिनाभर संयम बाळगला. रोज रात्री तासभर आमचा हा कौन बनेगा करोडपती कार्यक्रम चालायचा आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी माझ्या ज्ञानात एका शब्दाने भर पडायची. अखेरीस देवी प्रसन्न व्हावी तसे तिने एकदा एक अख्खे वाक्य टाईप केले.... काय रेऽऽ, किती प्रश्न विचारतोस???

या एका वाक्यापासून सुरू झालेले प्रकरण तिनेक महिन्यात ऑनलाईन मैत्रीच्या पुढे सरकत ऑफलाईन भेटींपर्यंत पोहोचले. पहिली भेट 'रब ने बना दी जोडी', दुसरी भेट 'फाईव्ह गार्डन' आणि तिसर्‍याच भेटीत तिने मला प्रपोज केले. आता त्याचे उत्तर द्यायला महिनाभर वेळ मी घेतला. छे, बदला वगैरे नाही. पण काय करणार, नाईलाजच होता. रँडम रिक्वेस्ट पाठवताना निव्वळ मुलगी आहे हे पाहिले आणि पाठवली रिक्वेस्ट असे केले होते. सुदैवाने आमचे शैक्षणिक आणि आर्थिक स्तर जुळले होते. पण या व्यतिरीक्त स्वभाव, मॅनर्स, रंगरूप, आहारपद्धती, आयुष्याची ध्येये, तत्वे, जातपात, प्रांतप्रदेश वगैरे काहीच जुळत नव्हते. यात 'माय लाईफ माय चॉईस' म्हणत ईतर सारे चालवून घेतले असते. पण जातीबाहेर लग्न करायचे म्हटले की फॅमिली इमोशनल ड्रामा करतेच. ईथेही तो झाला. डिटेल देत नाही कारण तो लेखाचा विषय नाही. पण रजिस्टर लग्नाची नोटीस देत आम्ही बंडाचे निशाण फडकावताच त्यावरून झालेला विरोधही मावळला.

राहता राहिली पत्रिका. आता लव्ह मॅरेज मध्ये कोणी पत्रिका बघते का?
पण मग तसे तर नाव गाव, धर्म जात, शिक्षण, नोकरी, काहीच बघायला नको प्रेमविवाहात. तरी घरचे होकार देताना हे सर्व बघतातच. आमच्या दोघांच्या घरून यातले बरेच काही जुळत नसूनही होकार मिळालेला. तर आता पत्रिकेत दोनचार गुण ईकडचे तिकडे झाले तर लगेच काही आभाळ कोसळत लग्न मोडणार नाही अश्या फाजील आत्मविश्वासात जुळवली पत्रिका. आणि फाटले आभाळ, सरकली जमीन, आली सुनामी, उसळल्या लाटा आणि वाहू लागला तप्त लाव्हारस आमच्या आयुष्यात. कारण पत्रिकेत आला होता मृत्युयोग!

क्रमशः

---------------------------------------------------------

नक्षत्रांची शांती ४ - माझे तीन विवाह (पुर्वार्ध)
https://www.maayboli.com/node/80921

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंगळ वेगळा.. तो बहुधा ज्याच्या त्याच्या पत्रिकेतच असतो. त्यांची लग्ने कोणाशीही जमणे अवघड असते..
हा योग दोन पत्रिका जुळवल्यावर त्यांच्यात छत्तीस गुण मिळायच्या ऐवजी छत्तीसचा आकडा दिसतो तेव्हा येतो..
आमच्या केसमध्ये मुलीच्या मृत्युची शक्यता जास्त सांगितली होती..
बाकी डिटेल पुढच्या लेखातच दोनेक दिवसात देतो.. आता झोपतो Happy

प्रांजळ लिखाण आवडलं.

"पण देवाला ईतके सुद्धा करावे लागत नाही. त्याने दर्शन न देताही लोकं `जगात देव आहे' हा विश्वास आयुष्यभर बाळगून जगतात. कारण `देव आहे' हे समजणे लोकांची मानसिक गरज असते. आणि मग त्या देवाशी संपर्क साधायला त्यांना कोणीतरी मध्यस्थ लागतोच. एका मध्यस्थाने फसवले म्हणून ते देवावर अविश्वास दाखवत नाहीत. तर मध्यस्थ बदलतात." हे अगदी डायरीत लिहून ठेवावं इतकं पटलं.

अरे वा ! लिखाणाची स्टाईल एकदम बदलून टाकली की. निदान पहिल्या अर्ध्या भागात तरी. पूर्वी संजोप राव किंवा रामदास लिहायचे तशी. छान बदल.
वाचनीय आहे.

अरे वा ! लिखाणाची स्टाईल एकदम बदलून टाकली की. निदान पहिल्या अर्ध्या भागात तरी. पूर्वी संजोप राव किंवा रामदास लिहायचे तशी. छान बदल.
वाचनीय आहे. >>>
तो आधीपासून छानच लिहितो. तुमचा अभिषेक या id ने केलेले लिखाण बघा.
बाकी पु भा प्र

कारण पत्रिकेत आला होता मृत्युयोग!>>>> अब कहानी मे मजा है। पुढील भागास उत्सुक

मनिम्याऊ, मला माहीत आहे. परीची जन्मकथा मी वाचलेली आहे. आणि दोघांच्या लेखनातील काही खास शब्द, लकबी, एकाच ठराविक प्रांतातील चालीरीती यावरून ऋन्मेष म्हणजेच अभिषेक नाईक असावा ही शंकाही दृढ होत गेली होती.

मस्तच लेख,लेखनाची शैली खूप चांगल्या प्रकारे बदललेली वाटत्येय, >>> धन्यवाद. शैली नाही, बेअरिंग बदलले या वेळी.

सर्व प्रतिसादांचे आभार. सध्या मॉर्निंग वॉल्कने वेळेची गोची केल्याने, आणि रात्री लवकर झोप येत असल्याने आधीसारखे एका रात्रीत दणादण लेख संपवून टाकता येत नाहीत. हा एवढा छोटा लेखही दोन तुकड्यात/दोन रात्रीत लिहिला. असे केल्यास एकसुत्रता राहत नाही म्हणून टाळतो. याचसाठी मग काल जे झालेय तेवढे प्रकाशित केले. उरलले लवकरच...

@ प्रकाशजी
कारण पत्रिकेत आला होता मृत्युयोग!>>>> अब कहानी मे मजा है। पुढील भागास उत्सुक
>>>>
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. काहींचा यावर विश्वास असतो, काहींचा नाही. जरी माझ्या लेखातून माझा अविश्वास डोकावत असला वा यात होणार्‍या फसवणूकींपासून सावध राहा असा सल्ला असला तरी ज्यांचा विश्वास आहे अश्यांची टिंगल उडवायचा वा त्यांना दुखवायचा हेतू नाहीये. ते तसे होतेय की नाही हे चेक करण्यासाठी आपल्यासारख्यांचा प्रतिसाद मोलाचा Happy

ऋ के तारीफोके पुल Lol
स्टोरी इथेतिथे वाचुन थोडीफार माहितीये. आज संडेला पुर्ण कर.

धन्यवाद मानव, मनमोहन..
@ सस्मित, शनिवार रविवार बिजी जाताहेत. त्यात लिहिणे शक्य नाही. त्यात सोमवार पासून घराचे काम काढलेय. त्यात काल रात्री लॅपटॉपचा चार्जर काम करणे बंद झाला. मृत्युयोगाचे लिहायचे म्हटले तरी त्यात विघ्ने सुरू Happy बघूया आता कसे जमतेय...

Pages