मडमिणीच्या पाककृती: ऑटोलेंघीचे दही-वांगे.

Submitted by Barcelona on 28 December, 2021 - 12:41

फौदा टीव्ही शो पाहिला म्हणून म्हणा किंवा इस्राएलचे लसीकरण फार बारकाईने वाचायचे म्हणून म्हणा ‘योटम ऑटोलेंघी’चे नाव मला यूट्यूबने सुचवले. बरेच दिवस दुर्लक्ष केल्यावर एक दिवस किचन.कॉम वर फोटो पाहिला नि माझी विकेट गेली. I gave in!

खरं तर वांग्याचं भरीत-पोळी चविष्ट पण.. नाही, अंगात मडमिण संचारली होती जणू. ‘आटा मी वांगे भाजटे’ ऍक्सेंट नि अ‍ॅटीट्यूड सहित ऑटोलेंघीचे दही-वांग केलं. भिजवणे, मळणे अशा हात बरबटणाऱ्या स्टेप्स नाहीत. सुरी नि चमचा पुरे.

घटक

2 मोठी वांगी
1/3 कप ऑलिव्ह ऑइल (प्रमाण बदलू नये, तेलाचा प्रकारही बदलू नये)
1 1/2 चमचे लेमन थाईम. (उपलब्ध नसल्यास पर्याय टीपेत आहे)
समुद्री मीठ (उर्फ दाणेदार विना-आयोडीन मीठ)
काळी मिरी
1 डाळिंब
1 टीस्पून झटार (उपलब्ध नसल्यास पर्याय टीपेत आहे)

सॉससाठी:
9 टे. चमचे ताक
१/२ कप ग्रीक दही
1 1/2 टे. चमचे ऑलिव्ह ऑइल, तसेच सजावटीसाठी गरजेनुसार अधिक
1 लहान लसूण पाकळी, ठेचून
चिमूटभर मीठ

कृती:
१. ओव्हन 400°F/ २०४ सेल्सिय्स वर गरम करा. वांगी लांबीमध्ये कापून घ्या, हिरव्या देठातून सरळ कापून घ्या. नंतर देठ खाऊ नका (“प्रॉपर” काय ते सांगितल्याशिवाय मडमिण गप बसत नाही). आता भाजताना सोयीचं म्हणून देठ राहू दे. प्रत्येक वांग्याच्या पांढऱ्या भागावर चौकटीच्या आकारात सुरीने खाचा पाडून घ्या.

२. बेकिंग शीटवर वांग्याचे अर्धे भाग, कट-साइड वर ठेवा. त्या खाचात तेल सोडा व बाकी पांढऱ्या भागास ही तेल ब्रशने/स्पॅच्युलाने लावा. तेलात कंजुषी नको. लेमन थाईम आणि थोडे मीठ आणि मिरपूड शिंपडा. 35 ते 40 मिनिटे भाजून घ्या. मऊ, आणि छान तपकिरी झाले पाहिजे. ओव्हनमधून काढा आणि पूर्णपणे थंड होऊ द्या.

३. डाळिंब सोला. सुरी, चमचा वापरा. https://youtu.be/WF7Yg3jXW1o?t=78
डाळिंबाला धोपटून पण दाणे काढता येतात. ऑटोलेंघी तशी पद्धत वापरतो.
https://youtu.be/0rNgoed_pX8
दोन्ही जमत नसेल नि हात बरबटेल वाटल्यास आऊटसोर्स करा. (मडमिण कोपेल असे काही करू नका).

४. आता सॉस चे घटक एकत्र करा. वांग्यावर ओता. डाळिंब, झटार, ऑलिव्ह ऑइल घाला नि …. ‘ए मला काय माहित तुझा कॅमेरा ऑन होता’ म्हणून कुणाच्याही, कुठल्याही झूम मिटींग मध्ये नेऊन बिनदिक्कत वाढा… बनता है बॉस!!

तळटीपा:
झटार नसल्यास, लेमन थाईम नसल्यास कुठलेही इटालियन सिझनिंग चालते. थोडा लिंबू रस ही वापरा. आवडत असल्यास थोडे तिखटही (पाप्रिका इ) टाकू शकता.

ओव्हन नसल्यास जसा केक कुकर मध्ये भाजता/वाळूवर भाजता तसे वांगे भाजता येईल. तापमान ४०० वर जात नाही म्हणून जरा जास्त वेळ ठेवावे लागेल. चेक करा कारण भरीताइतके पचपचीत होऊ द्यायचे नाही.

सोबत कुसकुस, बकव्हीट, किंवा साधा उपमा अशी कुठलीही जोड चालते. इथे फोटोत बकव्हीट उर्फ कुट्टू आहे.

स्रोत:
https://www.thekitchn.com/plenty-cookbook-club-eggplant-with-buttermilk-...

Eggplant.jpeg (ही आमची स्नेहा उल्लाल दही वांगे. मुख्यचित्र ऑटोलेंघीचे दही-वांग आहे.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तूच मला दिली होतीस पण मी केली नाही अजून>> मीच करत नाही ती कधी..सासू बनवते तेव्हाच खायला मिळतं..फार खटाटोप आहेत लब्बाड वांग्यासाठी

लबाड वांगे न तळता करता येईल का
अप्पेपात्रात घालून वगैरे >> मी तळलेलेच खाल्लेत..वांग आणि अप्पेपात्र ये कॅाम्बिनेशन कुछ हजम नही हो रहा.. पण तुम्ही ट्राय मारा

लबाड वांगे थोडक्यात

वांगे पूर्ण शिजवा
त्याचे देठ व्यवस्थित काढून ठेवा
वांगे , शिजलेला बटाटा व मसाला मळा
त्याचे पुन्हा वांग्यासारखे गोळे बनवा
त्याला ते देठ परत बसवा
मग बेसन बॅटरमध्ये घोळवा
मग तळा

Pages