भाज्यांमधील अनवट राग!

Submitted by shabdamitra on 20 December, 2021 - 22:39

भाग १: भाज्यांतील लोकप्रिय राग

भाजीऽ!भाजी घ्याऽऽ! आली लई ताजी ताजी.” “ हिरवीग्गार! ताजी फ्फाऽर! कितीत्त्ताजी !” “ सस्ती झाली हो! लई सस्ती लावली वांगी! मेथी घ्या! चुका घ्या!चाकवत घ्घ्या करडीची भाजी घ्घ्याऽऽ ! अशा निरनिराळ्या शब्दांत गुंफलेल्या आरोळ्यांच्या निरनिराळ्या आवाजांनी सकाळ सुरु व्हायची. भाज्यांच्या हातगाड्या, टोपल्या,मोठ्या पाट्या भरभरून भाज्यांची वर्दळ सुरु व्हायची. पाले भाज्या खूप तजेलदार दिसत. वांगी,टमाटे, दुधी भोपळेही चमकत असत! हे दारावर येणाऱ्या भाज्यांचे झाले. भाजी बाजारात(मार्केट) मध्ये गेलो तर मग पहायलाच नको. निरनिराळ्या रंगांच्या भाज्यांची रंगपंचमीच असे. आणि त्यात रविवार असावा. तोही दसरा दिवाळीच्या थंडीतला.मग काय! तिथे असंख्य भाज्यांचे डोंगर रचले जात. सगळे ओटे, फरशा , खाली जमीनीवर भाज्या लिंबं, भाज्या हिरव्या मिरच्या काय काय आणि किती नाना तऱ्हेच्या रंगांच्या भाज्या ओसंडत असत.

त्या मोसमांत आणि एरव्ही सुद्धा भाजी बाजारात जाणे हा सहलीला जाण्याइतकाच मोठा आनंद होता. हा भाजीपाल्याचा तजेलदार रंगीत बाजार पाहून एकच पिशवी आणल्याचा पश्चात्ताप होई.

भाजीतील नेहमीचे यशस्वी कलाकार मेथी, आळु चुका , राजगिरा, करडी/ करडई, शेपू, तांदुळसा, अंबाडी, असतच. पालकाची एन्ट्री अजून व्हायची होती. चुका, चाकवत आणि चंदनबटवा ही च च्या ‘च’मत्काराची त्रिमूर्तीही विराजमान झालेली असे.

संगीतात जसे काही नेहमी न गायले जाणारे अनवट राग असतात तशाही भाज्या असायच्या.

त्यामधील पालेभाज्यातील दोन ठळक नावे म्हणजे माठ आणि घोळ! ही नावेही ज्यांनी ठेवली असतील ते खरेच मिष्किल बेरकी असले पाहिजेत! वाक्प्रचारातला ‘ घोळात घोळ’ ह्या भाजीवरून आला की भाजीचे रूप पसाऱ्यावरून भाजीला हे नाव दिले! ह्या दोन्ही भाज्या एका अर्थाने खऱ्या अपौरुषेय, स्वयंभू म्हणाव्या लागतील. घराच्या अंगणात काही पेरावे लागत नाही की वाफे आळे अशी विशेष सरबराई सुद्धा ह्यांना लागत नाही. आपोआप उगवतात,त्यांची ती वाढतात,पसरतात! माठ व तांदुळसा एकाच जाति प्रकारातला. पण माठाची पाने लहान असतात. घोळाची पाने लहान,गोलसर जाड आणि गुलाबी देठांची. गवतासारखी पसरलेली.

आणखी दोन अनवट भाज्या म्हणजे मायाळू व शुक्रवारच्या कहाणीमुळे प्रसिद्ध झालेली कनीकुरडु किंवा कनी कुरडईची. मायाळूचे वेल असतात. दोन प्रकारचे. एक नेहमीसारखा हिरव्या वेलीचा तर दुसरा गुलाबी देठांचा. पानांची पाठही फिकट, कळत न कळत अशा गुलाबी रंगाची. भाजीही करत असतील पण भज्यांसाठी प्रसिद्ध होती. तशीच कनी कुरडुचीही. आणखी असाच एक भाजीपाला होता. तो म्हणजे पाथरीचा! खरा गावरान! भाजी करतही असतील पण जास्त करून तो थेट मीठ लावून शेंगदाण्यासह खायचा. त्यामुळे भाकरीचा घास आणखीनच चविष्ट लागायचा.

आणखी दोन भाज्यांचा उल्लेख केल्याशिवाय ह्या अनवट रागांतील भाज्यांची मालिका पूर्ण होणार नाही. पठाडीच्या शेंगा आणि चौधारी ! पठाडीच्या शेंगा ह्या साधारणत: आठ-दहा इंच लांब,हिरव्या आणि मऊ असतात. चौधारी ही भाजी की सॅलाडचा प्रकार माहित नाही. कधी खाल्ली नाही. पण आकारामुळे लक्षात राहिलेली आहे. ह्याचीही सहा ते आठ इंच लांबीचे चौकोनी तुकडे/कांड असत. चारी कडांना, फिरत्या दरवाजाला असतात तसे पांढरट हिरवे, उभे काचेचे पाखे किंवा पडदे म्हणा असत. पडदे म्हटल्यावर लगेच फार काही मोठे डोळ्यासमोर आणू नका. कल्पना यावी म्हणून तसे म्हटले. अगदी अरुंद. त्यांच्या कडा अगदी फिकट कोवळ्या हिरव्या असत. त्या पालवीसारख्या वाटत. चौधारी नाव अतिशय समर्पक वाटते. पण म्हणताना मात्र आम्ही ‘चौधरीच्या’ म्हणत असू!

कडवंच्यांच्या विषयी सांगितले नाही तर काहीच सांगितले नाही !

कडवंच्या नावही वेगळे रुपही आगळे! बहुतेक सर्व भाज्याप्रमाणे ह्यासुद्धा हिरव्या रंगाच्याच. लहान; बोटाच्या एका पेराएव्हढ्या. दुधी भोपळ्याला आपण लिलिपुटच्या राजधानीत आल्यासारखे वाटेल. आकार मध्ये फुगीर व दोन्ही टोकांना निमुळता होत गेलेला. दोन लहान शंकू एकमेकाना चिकटवल्यावर जसा निमुळत्या होत जाणाऱ्या इटुकल्या मृदुंगासारखा. पृष्ठभागही रेघांचा. आत मध्ये थोड्या अगदी लहान बिया असतील नसतील इतपत. पण त्यामुळे चावताना कडवंच्या किंचित कुरकुरीत लागायच्या. तेलाच्या फोडणीत परतून तिखट मीठ आणि तळलेले किंवा भाजलेले ऱ्शेंगदाणे घालायचे. भाकरी बरोबर खायला एकदम झकास. थोडीशी कडसर चव असलेल्या ह्या कडवंच्या आपल्या वेगळेपणाने ही भाजी की चटणी असे वाटायची.तरी स्पेशल तोंडी लावणे म्हणून जेवताना मधून मधून खाण्यात गंमत यायची.

रानमेव्यातल्या बोरं पेरू आवळा ह्यातील चिंचा कुठेही सहज मिळणाऱ्या! चिंचा होण्याआधी त्याच्या कळ्या व लहान लहान फुलांचे गुच्छ आल्यावर, त्यांच्या गुलाबी पांढऱ्या बहराने झाड सुंदर दिसायचे. ती कळ्या फुले म्हणजे चिगुर. त्यांच्या बरोबरीने चिंचेची कोवळ्यांपेक्षाही कोवळी पालवी तर खायला किती मजा येते ते सांगता येत नाही. कोवळा चिगुर पालवी खाणे हा सुट्टीतला खरा उद्योग असे. रस्त्याच्या कडेला दिसला आणि हाताशी असला तर सोपेच. नसला तर फांद्या खाली ओढून तो ओरबडून मूठी भरून घ्यायचा. नुसता खाल्ला तरी झकास आणि किंचित मीठ व चवीला गुळ घालून खाल्ला तर खातच राहावा असा चिगुर असे. तर ह्या चिगुराचीही बाजारात आवक होत असे. (काही ठिकाणी चिघोळ,चिगोळही म्हणूनही ओळखत असतील) ह्या चिगुराची, तो व तीळ भाजून केलेली चटणीही खमंग लागते. आणि ती त्या मोसमात अनेक घरात होत असे.

समाजातील विषमता वेगवेगळ्या प्रकारे असते. पण ठळकपणे उच्च, मध्यम व,कनिष्ठ वर्ग ह्यातून दिसतेच. भाज्यांतही हे वर्ग आहेत. कारण आमच्या ह्या माठ,घोळ, पाथरीची पाने, तांदुळसा, आणि चिगुर ह्यांना बाजारात मोक्याच्या जागी प्रतिष्ठित भाज्यांच्या बरोबरीने जागा मिळत नसे. बाजारातील रुळलेल्या मळवाटा सोडून वाकडी वाट करून गेलो तर एखाद्या कोपऱ्यात,जमिनीवर हे विक्रेते साधी पोती, कापड पसरून त्यावर घोळाचे,पाथरीच्या पानांचे,कडवंच्या आणि चिगुराचे लहान लहान ढिगारे ठेवून बसलेले दिसत. विकणारेही ह्या भाज्यांसारखेच साधे व गरीब वाटत. आमच्यासारखे सामान्य माहितगार तिकडे वळले की त्यांचे चेहरे खुलत. ते सावरून बसत. तांदुळसा किंवा माठाची पेंडी, कडवंच्याचे, चिगुराचे एक दोन ढिगारे घेतले की ती गावाकडची मंडळी खूष होत. मग वर एक चिमुटभर चिगुर व चार कडवंच्या आपणहून पिशवीत टाकत! पठाडीच्या शेंगाही ह्यांच्या पथारीवर दिसत. पण क्वचित. पठाडीला ती नेहमी मिळणारी नसल्यामुळे जेव्हा येत तेव्हा त्यांना ओट्यांवर स्थान मिळे. तीच गोष्ट सुंदर हादग्याच्या फुलांची.

आणखी एका भाजीची ओळख करून द्यायची राहिली. ती शेंगाच्या प्रकारातली आहे. ती आजही मिळते पण आमच्याकडे पूर्वी तिचे स्वरूप निराळे व नावही निराळे होते. आज मुळ्याच्या शेंगा ह्या नावाने मिळणाऱ्या लांब शेंगा पूर्वी डिंगऱ्या ह्या नावाने ओळखल्या जात. त्यावेळी त्या अशा लांब नव्हत्या.दीड दोन पेराएव्हढ्याच पण फुगीर. भाजीत रस (पाणी) ठेवायचा. जेवायला बसेपर्यंत त्यांतील हे खमंग रसपाणी थोडेसे ह्या डिंगऱ्याच पिऊन टाकीत. भाजी खाताना रसपाण्याने जास्त टपोऱ्या झालेल्या ह्या डिंगऱ्या खाताना त्यांतील रसाची एखादे वेळी लहानशी चिळकांडी तोंडात उडाली की कृतकृत्य झाल्यासारखे वाटे. आमच्या बहिणीने ह्या डिंगऱ्यांचे रसमधुर बारसे केले होते. ती त्यांना तिखट मिठाच्या जिलब्या म्हणायची!

आज ह्या भाज्या आमच्या गावात मिळतात की नाही माहित नाही. मिळत असतील तर लोक अजूनही भाग्यवान आहेत म्हणायचे. लहान गावात मिळतही असतील. पण शहरातील मंडईत दिसत नाहीत.

मंडईत गेलात आणि ह्या अनवट भाज्यांपैकी काही मिळाल्या तर नमुन्याला का होईना जरूर घ्या. तोंडाला चव येईल !

[You can read this blog and additional blogs at: https://sadashiv.kamatkar.com/blog ]

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला लेख.

लग्नाआधी अवतीभोवती फिरत होत्या भिंगर्‍या
XXX ची वाईफ मी, लंचला करते डिंगर्‍या
(कितीही अनवट भाजी असेल तरी उखाणा लिहून मिळेल.)

डिंगरी ही पूर्वी पेरा एव्ढे तुकडे करून मग अर्धे कापून साठवणीची करत. आमच्या कडे नेहमी असे. त्याला तिखट मीठ गोडा मसाला हे ताकात भिजवून लावायचे व इतर वाळवणा बरोबर मस्त खडखडीत वाळवून घ्यायचे. तसेच भेंडीचे सांडगे. आयत्यावेळी तळले की एकदम खमंग भाजी सारखे तयार. वरण भात किंवा दही भाता बरोबर बेस्ट.

खुप सारी लहान मुले दंगा करत असतील तर आई चिगुर आवरा म्हणे.

हा ही लेख छान

लांब डिंगरीची दह्यातली कोशिंबीर छान लागते. देठ आणि टोके कापून फक्त मधला भाग चिरून घ्यावा लागतो. शेंगा थोड्याश्याच पुरे होतात.
आम्ही माठ फक्त लाल भाजीला म्हणतो. राजगिरा आणि माठ अश्या दोन लाल भाज्या असतात. तत्सम भाज्या म्हणजे चवळई, तांदुळजा आणि पोकळा. ह्यांचे पर्यायी शब्द माहीत नाहीत.
केणी आणि कुर्डू अशा दोन वेगळ्या भाज्या असतात. शिजवताना एकत्र करीत असावेत.

केणी कुर्डु ची भाजी शनिवाराच्या कहाणीत आहे. धाक टी सून शनी देव येतात त्यांना केणी कुर्डु ची भाजी व भाकरी वाढते. अंघोळ करताना लावायला टाकळा आहे. असे म्हणते त्यांचे कुष्ट्याच्या रुपातले अंग ती तेल लावुन मसाज करून देते. मग तिला शनी देव प्रसन्न होतात. व खाल्ल्येल्या जेवणाची माणके मोत्ये होतात

हो कहाणीत असते ही भाजी. पण मुळात त्या दोन रानभाज्या आहेत कुठेही उगवणाऱ्या. टाकळाही असाच कुठेही, अगदी उकिरड्यावर सुद्धा वाढतो. धाकटी सून घरात जे असेल त्याचे साधेसुधे जेवण प्रेमाने रांधून आणि जमेल तशी सेवा करून शनिदेवाला प्रसन्न करून घेते असा अर्थ असावा.

भारी आहे हा लेख. माठ, मायाळू, डिंगर्या आणि घोळ सोडून इतर नावं पहिल्यांदाच ऐकली. केनीकुर्डूचं नाव कहाणीत वाचलंय म्हणा.

या अनवट भाज्यांचे फोटो बघायला आवडतील. साधारण कोणत्या गावांत मिळतात या भाज्या?