२०२१ चा 'शाब्दिक' आढावा. अर्थात 'वर्ड ऑफ द इयर-२०२१'

Submitted by अमितव on 18 December, 2021 - 10:28

दरवर्षी ऑक्सफर्ड प्रेस, मिरियम वेबस्टर इ. शब्दकोशांची जबाबदारी घेतलेल्या संस्था त्या त्या वर्षातील सगळ्यात जास्त वापरला गेलेला शब्द, दर महिन्यांप्रमाणे या शब्दांत होत गेलेले बदल, जगातील विविध देशांतील स्थानिक प्रश्नांमुळे या शब्द जंजाळात होत गेलेले स्थानिक आणि त्यामुळे कदाचित घडलेले (शब्दांतील) वैश्विक बदल, वापरात आलेले नवे शब्द/ जोडशब्द, नवसंजीवनी मिळालेले जुनेच शब्द, नव्या शब्दांच्या रचनेत आंतरजाल -सोशल मिडिआच्या प्रभावामुळे घडत जाणारे बदल अशी भरगच्च आणि मनोरंजक माहिती वर्षाअखेरीस प्रसिद्ध करतात. सीबीसी/ लोकल रेडिओवर याला बर्‍यापैकी प्रसिद्धी मिळत असल्याने गेली काही वर्षे डिसेंबर आला की वर्षांत गाजलेली पुस्तके, गाणी, चित्रपट, बातम्या इ. बरोबरच हे नवे शब्द काय असतील याची उत्सुक्ता वाटू लागते. नुसते दरमहिन्यात वापरात असलेले हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच शब्द जरी डोळ्याखालून गेले तरी खूप सार्‍या भल्याबुर्‍या आठवणींची मनाच्या खोल कप्प्यात दडुन राहिलेली कुपी अचानक उघडते आणि भावभावनांचा कल्लोळ होतो. हा लेख लिहिताना गेल्यावर्षीच्या (२०२० च्या - २०२१ नाही) शब्दांवरुन सहज परत एकदा नजर टाकली आणि बुश-फायर, इंपीचमेंट, अ‍ॅक्विटल, बीएलएम, कॅन्सल कल्चर, मेल-इन, सुपरस्पेडर, नेट झिरो.. इ. शब्द दिसले. एकेका शब्दाचा मनावर काय परिणाम झालेला असतो आणि नुसत्या एका शब्दातुन आपलं मन आठवणींच्या ढिगार्‍यातुन काय वेचुन काढेल याचा प्रत्यय घेतला की ते दरवर्षी करण्याची नशाच चढते.

नोट: यावर्षीचा ऑक्सफर्ड लंग्वेज रिपोर्ट इथुन डाऊनलोड करता येईल. त्यातील जाणवलेल्या काही रंजक गोष्टी नमुद करतो. माहितीसाठी ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेसचे आभार. मुख्यत्त्वे इंग्रजी भाषेतील शब्दांबद्द्ल लेख असल्याने अनेक शब्दांचे भाषांतर मुद्दामच टाळले आहे.

करोना संसर्गाचा उद्रेक, त्या अनुशंगाने आलेले प्रवासावरील निर्बंध, घरुन काम, सामुहिक चाचपडत केलेली वाटचाल, माणसाच्या आणि समुहाच्या अंगीभुत कौशल्याने मुरड घालत का होईना तात्पुरती बसवलेली घडी, अमेरिकेतील निवडणूक यात २०२० संपले.

तुमचा आत्तापर्यंत लशीला एक डोस झाला असेल, दोन डोस झाले असतील, बूस्टरही झाला असेल किंवा अजिबात काही झाले नसतील तरी हे सगळं वर्ष vax अर्थात व्हॅक्सिनेशन या एकाच शब्दाभोवती फिरत गेलं यात शंका नाही. दैनंदिन संभाषणांत व्हॅक्स शब्द आला नाही असा एक दिवसही आठवणार नाही इतका तो शब्द पाचवीला पुजला होता, आणि अर्थातच ऑक्सफर्डचा २०२१ च्या शब्दाचा मान Vax (व्हॅक्स) शब्दालाच मिळाला आहे.

२०२१ मध्ये बोलीभाषेत व्हॅक्स अर्थात व्हॅक्सिन, व्हॅक्सिनेशन असा नाम आणि व्हॅक्सिनेट असा क्रियापद अर्थी वापर करण्याचं प्रमाणं प्रचंड प्रमाणात वाढलं. अर्थात इंग्रजीत १७९०च्या दशकांत व्हॅक्सिन आणि त्यानंतर काही वर्षांतच विरुद्धअर्थी अँटी-व्हॅशिनिस्ट शब्दांचा वापर प्रथम झालेला दिसतो. व्हॅक्स संबंधी शब्दांचा उगम झाल्याचे वेळापत्रक ऑक्सफर्ड देते ते मजेशीर आहे.

vaccine-words.png

१७९० - १८०० मध्ये एडवर्ड जेन्नरने देवीवर (smallpox) प्रथम लस शोधुन काढली तेव्हा व्हॅक्सिन म्हणजे गायीच्या फोडातुन केलेली लस किंवा देवीची लस याला समानार्थी शब्द म्हणूनच प्रचलित होता. vacca म्हणजे लॅटन मध्ये गाय. गायीपासून निर्मिलेली म्हणून त्याचं नाव vaccine पडलं. नाम आणि क्रियापद अर्थी व्हॅक्सिन आणि व्हॅक्सिनेशन शब्दांचा इंग्रजी आणि फ्रेंच मध्ये वापर cowpox/ smallpox पासून संरक्षण म्हणून टोचायची लस असाच तेव्हा केला जात असे. त्यानंतर काही दशकांनी फ्रेंच शास्त्रज्ञ लुई पाश्चरने इतर रोंगांवर तयार केलेल्या लशींच्या संशोधनानंतर व्हॅक्सिन/ व्हॅक्सिनेशन जास्त बृहद् अर्थाने कुठल्याही रोगांवर प्रतिबंध म्हणून त्याच रोगाच्या पेशी टोचुन दिलेली लस असा प्रचलित झाला. गम्मतीचा बाब म्हणजे व्हॅक्सिन शब्दाचा वापर सुरू झाल्यावर काहीच दशकांच्या कालावधीत विरुद्धार्थी अँटी व्हॅशिनिस्ट्स, अँटी व्हॅक्सिनेटर्स, अँटी व्हॅक्स, अँटी व्हॅक्सिनेशन इ. शब्दांचा उगम झाला. साक्षात एडवर्ड जेन्नर १८१२ साली लिहिलेल्या पत्रात लिहितो, "The Anti-Vacks are assailing me..with all the force they can muster in the newspapers.’" व्हॅक्सचं त्याने वापरलेलं स्पेलिंग मात्र आज प्रचलित नाही. Happy पण त्यानंतर २१ व्या शतकापर्यंत अँटिव्हॅक्स शब्द फारसा आढळत नाही, आणि आढळू लागल्यावर त्याचं स्पेलिंगही vax होतं.
त्याच बरोबर आणखी एक गमतीची गोष्ट म्हणजे vaccine चं vax हे रुप विसाव्या शतकात सुरुवतीला फार्माकंपन्यांनी केलेल्या लशींचे ट्रेडमार्क (आपलं कोव्हॅक्स सारखं Happy ) नाव म्हणून दिसू लागतं आणि मग सर्वसामान्य वापरायचा व्हॅक्सिनला प्रतिशब्द म्हणून vax असं ही दिसू लागतं.

आता या vax वरुन प्रचलित झालेल्या काही शब्दांची यादी बघितली तर ती पण मजेदार आहे. अर्थात यातील अनेक शब्द भविष्यात जास्त वापर न झाल्याने कदचित शब्दकोशात स्थान पटकवणार नाहीत. पण एक आजच्या काळाचा शाब्दिक (lexical) पुरावा (snapshot) म्हणून त्यांच्याकडे बघितलं तरी आपल्या मनाला पुनर्प्रत्ययाचा आनंद/ आस्वाद.... किमान मनात कडू-गोड आठवणींचं मोहोळ तरी नक्कीच उठेल.

  • vaxxie: व्हॅक्सी: व्हॅक्सिन देत असताना (किंवा अगदी लगेच नंतर) काढलेला सेल्फी.
  • halfcinated: हाफसिनेटेड: हाफ व्हॅक्सिनेटेड. दोन पैकी एकच डोस घेतलेला
  • vaxinista: व्हॅक्सइन्स्टा: हा शब्द सुरूवातीला लस घेणारे, त्याला प्रवृत्त करणारे, लस देणारे अशांसाठी वापरात आला आणि नंतर जी व्यक्ती व्हॅक्सिनेशन स्टेटस सांगून त्याबरोबर गरजेचं नसलेलं विलगीकरण, प्रवासावरचे नसलेले निर्बंध दिखाऊपणे सगळ्यांना सांगून जाहिरात करते असा थोडा नकारार्थी अंगाने वापरला जाऊ लागला.
  • vax(i)cations: व्हॅक्सिकेशन: व्हॅक्सिन घेतल्यावरची व्हेकेशन. व्हॅक्सिन घेतलेल्यांना पायघड्या घालणार्‍या ठिकाणांची यादी/ तिकडे घालवलेली सुट्टी.
  • Vax-a-thon: व्हॅक्स-ए-थॉन: फिलाडेल्फिआ मध्ये मास व्हॅक्सिनेशन इव्हेंट झालेला तेव्हा पहिल्यांदा वापरला गेला. त्यानंतर कॅनडात अनेक ठिकाणच्या सामुहिक लशीकरणाच्या वेळी हा शब्द वापरला.
  • vaccination telethon: न्यूझिलंड मध्ये सेलिब्रिटी आणि जेसिंडा आर्डेन यांच्या उपस्थितीत झालेली व्हॅक्सथॉन.
  • strollout: स्ट्रोल-आऊट: ऑस्ट्रेलिआ मध्ये व्हॅक्सिन रोल आऊट अत्यंत 'स्लो' होता. त्यांचं निराशाजनक रुप म्हणून हा शब्द वापरलेला
  • Fauci ouchie: फाउची आउची: व्हॅक्सिन देताना दंडाला दुखतं, म्हणून सोमीवर लोकांनी व्हॅक्सिनलाच यमक जुळवत फाउची-आउची म्हणायला सुरुवात केली. फाउची अर्थात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार 'अँथनी फाउची' मधुन उचलेलं. Happy
  • Covid arm: कोव्हिड आर्म : लस दिल्यावर येणार्‍या सुजेमुळे दुखरा दंड. हा शब्द जगभर वापरला गेला. फाउची आउची अर्थात अमेरिकेपुरता सीमित होता.
  • vaxxident: व्हॅक्सिडेंट: कोव्हिड लसिकरणाचा साईड इफेक्ट म्हणून झालेला अपघात/ अ‍ॅक्सिडेंट. हा शब्द अँटी व्हॅक्सर्स अमेरिकेतील वेबसाईट्सनी वापरला.
  • Anti-faxxer and Spreadneck: (after anti-vaxxer and redneck): हे अर्थात विरुद्ध पार्टीच्या लोकांना अपमानास्पदपणे हिणवण्याला वापरले गेले. जो फॅक्ट्स अ‍ॅक्सेप्ट करत नाही, सोशल डिस्टंसिंग पाळत नाही, मास्क घालत नाही इ.
  • vaxdar: एका व्हॅक्सिनेशन झालेल्या व्यक्तीला दुसरी व्हॅक्सिनेशन झालेल्या व्यक्तीची ओळख अंतर्ज्ञानाने (इन्ट्युशन) पटणे. हा शब्द Gaydar वरुन आला. ज्याचा अर्थ एक समलिंगी दुसर्‍या समलिंगी व्यक्तीला इन्ट्युशन/ बारीक हालचालींवरुन ओळखतो.
  • वरचे दोन शब्द बघितले तर लक्षात येईल की व्हॅक वरुन आलेले शब्द एकी आणि दुही दोन्ही प्रकारे वापरात आले. Happy

  • Jabs, jags, and shots: जॅब/जॅग/शॉट्स: ब्रिटीश ... न्हवे युनायटेड किंगडम मधले लोक जॅब जास्त वापरतात, स्कॉटलंड मध्ये जॅग वापरला जातो, आणि अमेरिकेत शॉट्स. त्यावरुन डबल जॅब्ड, डबल जॅग्ड इ. शब्द आलेच.

व्हॅक्सिन शब्द संदर्भ 'व्हॅक्सिन कँडिडेट' ते 'व्हॅक्सिन बूस्टर' पर्यंत ऑक्टोबर २०२० पासून सप्टेंबर २०२१ पर्यंत असा बदलत गेला.
vaccine-word-use_0.png

मराठीत असा प्रपंच कोणी करत असेल तर कल्पना नाही. माझं मराठीचं वाचन आणि श्रवण फारच कमी होतं आणि जे होतं ते अगदीच डबक्यातील असल्याने कुठले नवे शब्द प्रचलित झाले असतील याची मला फारशी कल्पना नाही. आपण थोडे परंपराधिष्ठ आणि शुद्धतेचा टिळा भाळी ल्यालेले असल्याने नव्या शब्दांचे स्वागतही कितपत उत्साहाने करू हा प्रश्नच आहे.

तुमच्या वापरात, वाचण्यात, ऐकण्यात गेल्यावर्षांत काही नवे शब्द (इंग्रजी, मराठी किंवा कुठल्याही भाषेतले..), जुन्या शब्दांचा अर्थ बदलुन त्याचा वापर वाढला असेल तरी जरुर लिहा. शब्द व्हॅक्सवरुन आलेलेच हवेत असंही काही नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लेख आहे! इतका प्रवाहीपणा असणं ही इंग्रजी भाषेची मोठी ताकद आहे असं लेख वाचताना जाणवलं! इतक्यातच दुसर्‍या एका धाग्यावर ओघवान शब्द व्याकरणदृष्ट्या योग्य की अयोग्य अशी चर्चा सुरू होती. त्याचवेळी इंग्रजी भाषेत मात्र दरवर्षी नवनवीन relevant शब्दांची भर पडतेय हे अजूनच विशेष वाटलं.

Pages