"या देशात अग्निशामक किंवा एंब्युलंस पेक्षा डिलिव्हरी बॉय अधिक जलदगत्या येतात" असे एक उपहासात्मक अवतरण काही वर्षांपूर्वी व्हायरल झाले होते.
स्विगी झोमॅटो सारख्या सेवा सध्या फार लोकप्रिय झाल्या आहेत. आपल्यापैकी अनेकांनी त्यांचा लाभ घेतला आहे. पण त्यामध्ये काम करणारे बहुतांश तरुण हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आलेले असतात व जीवनाशी त्यांचा झगडा फार तीव्र असतो. अनेक होतकरू तरुण शाळा/कॉलेज/व्यवसाय सांभाळून उरलेल्या वेळेत हे काम करतात व आपल्या कुटुंबाच्या मिळकतीस हातभार लावतात.
"या मुलांना ऑर्डर पोहोचवायला उशीर झाला तर या कंपन्या त्यांच्या आधीच तुटपुंज्या असलेल्या पगारातून रक्कम कापतात आणि तीच रक्कम उशीर झाल्याबद्दल डिस्काऊंट म्हणून आपल्या ग्राहकांना देतात, त्यामुळे डिलिव्हरी बॉय ला उशीर झाला तर त्याचा नकारात्मक अभिप्राय कंपनीला देऊ नका" असा एक मेसेज मध्यंतरी फिरत होता. या सर्व कारणांमुळे या डिलिव्हरी बॉईज विषयी माझ्या मनात नेहमीच सॉफ्ट कॉर्नर राहिला आहे. जी शक्य ती मदत व सहकार्य मी त्यांना करत असतो व म्हणून शिक्षा म्हणून त्यांच्या विषयी नकारात्मक अभिप्राय मी कधीच आजवर कंपनीला कळवलेला नाही.
पण कालचा दिवस या सगळ्याला अपवाद होता ज्याला मदत केली त्याच डिलिव्हरी बॉय ने माझी फसवणूक केली. फसवणूक किती रुपयांची केली यापेक्षा, माझी काहीही चुकी नसताना व मी त्याला सर्वतोपरी मदत/सहकार्य करूनही त्याने मला अतिशय वाईट पद्धतीने फसवले याचे तीव्र शल्य मला बराच काळ वाटत राहिले. हा अनुभव मी इथे पोस्ट करत आहे ते केवळ व्यक्त व्हायचे म्हणून तसेच शेअर केल्याने शल्य कमी होईल म्हणून तसेच "असेही घडू शकते" हे इतरांना कळावे अशा बहुविध कारणांसाठी इथे मांडत आहे. हि घटना घडल्यानंतर यासंदर्भात स्विगी कंपनीला इमेल लिहून जे घडले ते तपशिलात मी कळवले. ती इमेल त्यातले व्यक्तिगत तपशील खोडून व मराठीकरण करून इथे चिकटवत आहे. ती वाचल्यावर काय व कसे घडले याचा उलगडा आपणास होईलच.
-------
नमस्कार,
एक ग्राहक म्हणून मी अनेक वर्षांपासून स्विगीसोबत आहे आणि आजपर्यंत स्विगीकडून खूप छान सेवेचा लाभ घेतला आहे. पण काल रात्री एका स्विगी डिलिव्हरी बॉय सोबत मला आलेला एक अतिशय अप्रिय अनुभव शेअर करण्यासाठी मी अत्यंत विषण्ण मनाने आपणास हा ईमेल लिहित आहे.
तपशील खालीलप्रमाणे आहेत:
स्विगी ऑर्डर #12**********
डिलिव्हरी बॉयचे नाव: अ** भि** (हे नाव सं** भि** असेही असू शकते)
स्विगी नंबर ज्यावरून त्याने मला कॉल केले: +91**********
त्याचा वैयक्तिक संपर्क क्रमांक: +919*********
काल मी ही ऑर्डर दिली आणि डिलिव्हरी होण्याची वाट पाहत होतो. मग या डिलिव्हरी बॉयने मला कॉल केला (वर नमूद केलेल्या स्विगी फोन नंबरवरून). माझा पत्ता लवकर सापडू शकत नाही अशी त्याची तक्रार होती. वास्तविक मी माझा स्विगी मध्ये पत्ता अगदी स्पष्टपणे दिला आहे आणि त्यात माझ्या पत्त्याचे नकाशावरचे स्थानसुद्धा अचूकपणे नमूद केले आहे. याच पत्त्यावर मला यापूर्वी विनातक्रार ऑर्डर मिळाल्या आहेत. त्यामुळे त्याच्या तक्रारीचे मला थोडे आश्चर्यच वाटले. पण तरीही सद्भावनेने मी त्याला तो आता कुठे आहे विचारून पुढील दिशा सांगण्याचा प्रयत्न केला. पण काही वेळाने मला त्याच कारणासाठी त्याने पुन्हा फोन केला. दिशा सांगूनही तो मला सतत फोन करत राहिला. दिशा विचारण्यासाठी त्याने मला तब्बल ५ ते ६ वेळा फोन केला असेल. मी त्याला मार्गदर्शन करण्याचा माझ्या परीने सर्वतोपरी प्रयत्न केला. पण त्याचे समाधान झाले नाही आणि तो माझ्याशी उद्धटपणे बोलू लागला.
अखेर तो आला, खूप निराश दिसत होता. त्याने ऑर्डर माझ्याकडे सोपवली आणि माझा पत्ता शोधण्याच्या नादात त्याच्या इतर ऑर्डर चुकल्या असे तो सांगू लागला. आणि त्यासाठी तो मला दोष देऊ लागला. मी त्याला सांगितले की ही काही माझी चूक नव्हती. उलट मी त्याला दिशा शोधण्यात मदत केली आहे हे मी त्याच्या निदर्शनास आणून दिले. पण त्याला ते त्याला पटलेले दिसले नाही.
मग तो म्हणाला की त्याच्या नुकसानीसाठी मला त्याला पैसे द्यावे लागतील (त्याच्या इतर ऑर्डर हुकल्यामुळे). ते ऐकून मला धक्काच बसला. मी त्याला विचारले की मी त्यासाठी भुर्दंड का भरू? माझी काय चूक? मग त्याने विनंती केली कि मी थोडे सहकार्य केले तर त्याला स्विगीकडून नुकसानभरपाई मिळू शकेल. थोडेसे गोंधळून मी विचारले की हे कसे शक्य आहे? मग त्याने सांगितले कि त्याच्याकडे काही कूपन कोड आहेत. जर ते त्याने माझ्या Swiggy अॅपमध्ये एंटर केले, तर Swiggy मला रुपये 400/- परत करेल, जे मी त्याला देऊ शकेन. त्याने विनवणीच केली आणि मला पटवून दिले की यात माझे काही नुकसान नाही. फक्त त्याचा कुपन कोड नंबर माझ्या फोनद्वारे स्विगीला पाठवणे आवश्यक आहे इतकेच. मला माझा फोन त्याच्याकडे सोपवायला अडचणीचे वाटले. पण तो म्हणाला की तो फक्त स्विगी अॅप वापरेल, ते सुद्धा माझ्यासमोर. माझ्या फोनमध्ये सुरक्षेची सगळी तजवीज केली आहे. कोणतेही व्यवहार इतक्या सहजासहजी एका क्लिकवर होत नाहीत. गुप्त पिनकोड इत्यादी वगैरे द्यायला लागतो. त्यामुळे त्याचा कूपन कोड टाकण्यासाठी त्याला माझ्यासमोर स्विगी अॅप वापरू देणे मला ठीक वाटले. जर त्याला पैसे मिळत असतील आणि दिरंगाईची भरपाई मिळत असेल तर काय हरकत आहे असा विचार मी केला. मग त्याने माझा फोन घेतला, काही झटपट नोंदी केल्या आणि मला फोनवर एसएमएस आल्याचे दाखवले:
प्रिय स्विगी ग्राहक, NNN रुपयांच्या परताव्यासाठी तुमचा परतावा संदर्भ क्रमांक 13************* आहे. http://swig.gy/refunds
मग त्याने मला त्या परताव्याच्या रकमेचे पैसे त्याला देण्यास सांगितले. मला थोडे आश्चर्य वाटले की स्विगी मला इतकी रक्कम कशी परत करू शकते? आजवर कधीच असे झाले नव्हते. मी ऑर्डरसाठी भरलेल्या एकूण रकमेपैकी ते जवळपास निम्मे पैसे होते. पण नंतर मला वाटले की, स्विगीचा एम्प्लॉयी असल्याने त्याच्याकडे काही कूपन कोड इत्यादी असतील जे त्याने वापरले असतील. मी आधीच माझ्या ऑफिसच्या कामाच्या विचारात मग्न होतो आणि रात्र झाली होती आणि मला जेवायला उशीर होत होता, आणि हे पैसे मला स्विगीकडून मिळाले आहेत हे लक्षात घेता, जर त्याला मदत होत असेल तर ते त्याला देण्यास माझे कोणतेही नुकसान नाही. हा सगळा सारासार विचार करून Google pay वापरून मी त्याला रु. NNN/- ट्रान्सफर केले. (मी या पेमेंटची पावती या इमेलसोबत जोडत आहे. तुम्ही पावतीमध्ये पेमेंट संदर्भ 'swiggy' सुद्धा पाहू शकता).
पैसे मिळाल्यावर तो पटकन निघून गेला. आणि मग खरा धोका माझ्या लक्षात आला. मी प्राप्त झालेली ऑर्डर तपासली, तेव्हा त्यातील बरेच आयटम गहाळ झाले होते! मग मी घाईघाईने Swiggy मध्ये तपासले आणि लक्षात आले की त्याने माझ्या वतीने ऑर्डरमधून आयटम्स गहाळ झाल्याची खोटी तक्रार नोंदवली होती आणि अशा प्रकारे परतावा घेतला होता. आता त्याने काय फसवणूक केली आहे याची मला स्पष्ट कल्पना आली. त्याने मला पूर्ण ऑर्डर दिली नाही ते नाहीच शिवाय मला मिळालेल्या रकमेचा परतावा त्याने मला त्याला देण्यास सांगितले होते. मी पट्कन स्विगी एप मध्ये जाऊन त्याने सुरु केलेल्या खोट्या तक्रारीच्या धाग्याला पटकन उत्तर दिले की हि तक्रार खोटी आहे व ती मी नव्हे तर स्विगीच्याच डिलिव्हरी बॉयने माझ्या फोन वरून दाखल केली आहे. त्यावर स्विगीकडून प्रतिसादसुद्धा आला कि याची दखल घेतली आहे व यावर निश्चितपणे योग्य ती कारवाई केली जाईल.
त्यातल्या त्यात बरी गोष्ट अशी कि, मी त्याला Google pay वापरून पैसे दिले होते. त्यामुळे मला त्याचे नाव नंबर इत्यादी तपशील उपलब्ध झाले. GPay मध्ये, मला त्या व्यक्तीचे नाव अ** भि** असल्याचे आढळले, परंतु पेमेंटच्या पावतीवर मात्र त्याचे नाव सं** भि** असे दिसते. मी पटकन त्याला त्या नंबरवर कॉल केला आणि ऑर्डरमधून गहाळ झालेल्या पदार्थांबाबत विचारले. ज्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन "काहीही गहाळ वगैरे नाही. सगळे तुम्हाला दिलेले आहे" वगैरे म्हणू लागला. मी त्याला माझे पैसे परत करण्यास सांगितले, अन्यथा मी त्याच्या विरोधात स्विगीकडे तक्रार करेन असेही बोललो. पण त्याने फारसे लक्ष दिले नाही आणि हवी असेल तर तक्रार करा असे म्हणाला. हे सर्व अत्यंत धक्कादायक वर्तन होते. यामुळे मी अत्यंत व्यथित झालो. डिलिव्हरी बॉइज कठीण संघर्ष काळातून जात असतात असे अनेकदा वाचण्यात व ऐकण्यात आले आहे. त्यामुळे मी त्याला मदत करण्याचीच भूमिका घेतली. पण त्याने गैरफायदा घेऊन उलट माझीच फसवणूक केली. अत्यंत उद्विग्न करणारा असा हा अनुभव आहे. माझा विश्वासघात झाल्याची भावना मला झाली आहे. माफ करा, पण यापुढे स्विगी वरून जेवण कधीही ऑर्डर करू नये असे मला वाटू लागले आहे.
मला असाही संशय आहे की ऑर्डर केलेल्यापैकी काही अन्नपदार्थ या माणसाने वाटेतच खाल्ले असावेत आणि वेळ निभावून नेण्यासाठी माझा पत्ता सापडत नसल्यासारखे नाटक केले असेल. या कटू अनुभवाबद्दल मी आपणास लिहिण्याचा विचार केला, जेणेकरून तुम्ही या व्यक्तीवर आवश्यक ती कठोर कारवाई करावी. त्यामुळे भविष्यात इतर ग्राहकांची फसवणूक होणार नाही.
सादर,
अतुल
सेल: +91**********
गॅस उभं असतानाच भरतात ना?
गॅस उभं असतानाच भरतात ना? बसुन भरायची अॅक्सेसिबल सोय ही हल्ली आहे का?
उभ म्हणजे पॅसेंजर घेण्या
उभ म्हणजे पॅसेंजर घेण्या पूर्वी.
वाईट अनुभव, पण बरे केलेत इथे
वाईट अनुभव, पण बरे केलेत इथे दिलेत , कुणाला तरी उपयोग होईल. (कुणाला फोन देणे म्हणजे पाकीट देण्यासारखे आहे, आजकाल काय नसतं फोनमध्ये)
मुलांना दार उघडायला देऊ नये शक्यतो, काही बाबतीत कुणावरच विश्वास टाकू नये.
>>मला पण असे अनुभव आले आहेत
>>मला पण असे अनुभव आले आहेत.गाडीत बसून दरवाजा लावत नाही तो पर्यंत sahab 'गॅस भरणा पडेगा' म्हणजे तिथे पंपावर अर्धा तास जाणार.
>>उभे असताना ही लोक गॅस,पेट्रोल का भरत नसतील.
मलाही हा अनुभव आला आहे. जर ट्रीप काही तासाची असेल तर ड्रायवर पेट्रोल भरायला कॅश मागतो व नंतर बिलात अॅडज्स्ट करुन घेऊ असे म्हणतो आपणही तयार होतो पण ट्रीप संपते तेव्हा बर्याच वेळेला पेट्रोल भरायला कॅश दिली आहे ह्याचा विसर पडतो व पूर्ण रक्कम दिली जाते. मी एकदा असा अनुभव घेतला आहे. पण पेट्रोल साठी फक्त ५०० च दिले होते म्हणुन मोठे नुकसान झाले नाही.
पण ट्रीप सुरु झाल्या झाल्या ग्राहका कडुनच पेट्रोलसाठी पैसे घेणे हा प्रकार जवळ जवळ प्रत्येक ट्रीप मध्ये अनुभवला आहे. एकदा तर विमानाने जायचे होते आणि ड्रायवरने गाडी पेट्रोलपंपावर नेली. अगदी कट्टाकट्टी मार्जिन ठेवुन चाललो होतो पण विमानतळावर पोहोचता पोहोचता प्रचंड धाकधुक होत होती.
अरे देवा, वाईट अनुभव.
अरे देवा, वाईट अनुभव.
स्वीगीवाल्यांनी रिप्लाय केला
स्वीगीवाल्यांनी रिप्लाय केला का?
स्वीगीवाल्यांनी रिप्लाय केला
स्वीगीवाल्यांनी रिप्लाय केला का?>>> सब जानना चाहते है
सर्व प्रतिसादकर्त्यांना
सर्व प्रतिसादकर्त्यांना धन्यवाद. माफ करा. कार्यबाहुल्यामुळे इकडे लिहायला वेळ मिळाला नाही. विविध प्रतिसादांमुळे या घटनेचे इतरही कंगोरे असू शकतात हे लक्षात आले.
इतकी वर्षे हि सेवा वापरतोय पण कधीही विपरीत अनुभव नाही. आजवरचे डिलिव्हरी बॉइज विनम्र होते, सहकार्य करणारे होते. त्यामुळे "सगळे डिलिव्हरी बॉय चांगले असतात" असे जनरलायझेशन नकळतपणे माझ्या मनाने केले असावे. तसेच हि एक घटना घडली म्हणून सगळेच तसे असेतील असा निष्कर्ष सुद्धा तितकाच चुकीचा हे सुद्धा मान्य. पण जसे पोहताना अचानक बुडून जीव गुदमरला कि नंतर कुठल्याच पाण्यात उतरायचे धाडस होते नाही, तसे मला आता पुन्हा या किंवा अशा सेवेचा पुन्हा वापर करण्याची इच्छाच होत नाही. कालावधी जावा लागेल.
कितीही रेप्युटेशन चांगले असले तरी सावधगिरी बाळगायला हवी हे कितीही खरे असले तरी एखाद्या क्षणी, जेंव्हा इतर गोष्टी प्रायोरिटीवर आलेल्या असतात, नकळतपणे तुलनेने कमी महत्वाच्या इतर गोष्टींबद्दल आपण बेसावध होतो. तेंव्हा ध्यानीमनी नसताना अशी घटना पट्कन घडून जाते, ज्याची आपण अपेक्षा सुद्धा केलेली नसते. अपघाताच असतो तो एक प्रकारचा.
त्यातल्या त्यात एक गोष्ट मी बरी केली ती म्हणजे त्याला मी गुगल पे केले. त्यामुळे पैसे दिल्याचा पुरावा आणि त्याचे नाव नंबर हे सगळे तपशील मला मिळाले. त्याआधारे मी स्विगीला निदान लिहू तरी शकलो. जर कॅश दिली असती तर त्याला मी पैसे दिलेत ह्याला माझ्याकडे काहीही पुरावा राहिला नसता.
यानिमित्ताने अजून काही गोष्टी स्पष्ट झाल्या (वरील प्रतिसादांतून):
१. हि मुले थेट स्विगीची कर्मचारी नसतात: हे खरे आहे. त्यांना हायर करणारी बहुधा थर्ड पार्टी एजन्सी असावी. कारण स्विगीचे नाव घेताच हा मुलगा मी स्विगी कडून नाही असे सांगून कोणत्यातरी एका कंपनीचे नाव त्याने घेतले जे मी कधीच ऐकले नव्हते. कदाचित तो अशा एजन्सीज बाबत बोलत असावा.
२. लोकेशन वरून रस्ता शोधणे: स्विगी मध्ये मी माझ्या पत्त्याचे अगदी व्यवस्थित लोकेशन दिले आहे. त्यावरून नकाशा पाहत आल्यास चुकण्याची सुतराम शक्यता नाही. पण या मुलांना नेव्हिगेशन वापरून त्या ठिकाणी कसे जायचे याचे ट्रेनिंग दिले जात असेल का हे शंकास्पद आहे.
३. पार्श्वभूमी तपासणी: काही मुलांची पार्श्वभूमी गुन्हेगारी असू शकते या मुद्द्याशी सहमत. उडदामाजी काळेगोरे. तशी तपासणी या कंपन्यांकडून केली जात असेल का हे सुद्धा आता शंकास्पद वाटू लागले आहे.
४. प्रशिक्षण: मला वाटत होते या बॉईजना ग्राहकांशी कसे वर्तन असावे याचे प्रशिक्षण दिले जात असेल. पण आता माझा त्यावरचा विश्वास उडाला आहे. पत्ता लवकर सापडत नाही म्हटल्यावर त्याने माझ्याशी उद्धट बोलायला सुरवात केली होती. डिलिव्हरी द्यायला आल्यानंतरची त्याची देहबोलीसुद्धा नीट नव्हती. या गोष्टी खूप काही सांगून जातात.
@विक्षिप्त_मुलगा: आपण सुचवलेला उपाय खरोखरच स्तुत्य आहे. अशा काही उपापयोजना व्हायला हव्यात. ड्रोन वापरुन थेट हॉटेल ते ग्राहक डिलिव्हरी देण्याचा पण त्यांनी (स्विगीने) प्रयोग केला आहे अशी बातमी वाचली होती.
स्विगीला हि मी जी इमेल लिहिली आहे तिचा मला त्यांच्या ग्राहक सेवा केंद्राकडून रिप्लाय आला. "तुमच्या तक्रारीवर आम्ही तत्काळ कारवाई करत आहोत व संबंधित सर्व विभागांना याबाबत तत्परतेने कळवले आहे". मला माहित आहे हे सगळे छापील प्रतिसाद असतात. स्विगी हि प्रतिथयश कंपनी आहे. आणि जितके माझे यातले ज्ञान आहे त्यानुसार अशा कंपन्यांच्या ग्राहक तक्रारी हाताळण्याच्या अंतर्गत प्रोसेसेस फार शिस्तबद्ध आखलेल्या असतात. त्या मुलावर कारवाई केली असली तरी तसे स्पष्टपणे कोणतीही कंपनी सांगणार नाही. पण या तक्रारीची खरेच गंभीर दाखल त्यांनी घेतली असावी हि अपेक्षा.
मुंबई मध्ये wefast म्हणून
मुंबई मध्ये wefast म्हणून सेवा आहे.
कोणता ही व्यक्ती त्याचा सभासद बनू शकतो.
त्यांची आयडिया अशी आहे.आपल्या कडे वाहन आहे आणि तुमचा ऑफिस रूट किंवा कोणत्या ही तुमच्या स्वतःच्या रूट वर स्वतःच्या कामासाठी जात आहात तर त्यांना कळवयचे त्या रूट वर कोणाचे काही समान deliver करायचे असेल तर तुम्ही ती सेवा वापरू शकतं चार्ज अंतरावर च अवलंबून asava.
इथे varrification चा संबंध च नाही.
स्वतःच्या कामासाठी च जात आहात त्या मुळे वेगळा खर्च नाही उलट 100 ते 200 रुपये मिळणार.पेट्रोल खर्च निघतो.
झोमॅटोचा डिलिव्हरी पार्टनर
झोमॅटोचा डिलिव्हरी पार्टनर पार्सल घेऊन आला. बिल आधीच ऑनलाईन भरले होते. पार्सल हातात दिल्यावर आभार मानल्यावर अतिशय घाईघाईत म्हणाला, 'एक फेव्हर कराल का? मला झोमॅटोला २०० रुपये त्वरीत द्यायचे आहेत आणि माझ्या GPay खात्यावर पैसे नाहीत. तुम्ही मला माझ्या GPay वर २०० रु. पाठवा. मी तुम्हाला २०० रु. ची कॅश लगेच देतो.'
मला हे न झेपल्यामुळे मी नम्रपणे नकार दिला.
त्यांची आयडिया अशी आहे.आपल्या
त्यांची आयडिया अशी आहे.आपल्या कडे वाहन आहे आणि तुमचा ऑफिस रूट किंवा कोणत्या ही तुमच्या स्वतःच्या रूट वर स्वतःच्या कामासाठी जात आहात तर त्यांना कळवयचे त्या रूट वर कोणाचे काही समान deliver करायचे असेल तर तुम्ही ती सेवा वापरू शकतं चार्ज अंतरावर च अवलंबून asava.
>> या भानगडीत पार्सल मध्ये ड्रग्ज, डेड बॉडीज, शस्त्र, बेकायदेशीर सामग्री वगैरे असेल तर काय?
Pages