तमाम वाहन उद्योगात खळबळ उडाली होती.
पुन्नाबाबू कंदंमपाट्टी कन्नमपटी वेड्डवेरय्या या नावाने सर्वांची झोप उडवली होती.
इलेक्ट्रीक वाहनउद्योगावर सरकारने निर्बंध आणले आणि फुटकळ कंपन्या बाराच्या भावात वाहून गेल्या. कुणीही उठावं आणि इलेक्ट्रीक व्हेईकल बनवावे यामुळे वाहनांच्या किंमती स्वस्ताकडून स्वस्त होत चालल्या. मोठा फाफटपसारा असलेल्या कंपन्यांना या किंमतीत वाहने देणे परवडेना. त्यांचे पारंपारीक विपणन कोसळून पडले होते. डिस्ट्रीब्युटर / डीलर / सब डीलर या प्रत्येक टप्प्यातले कमिशन , सर्विस सेंटर्सचा खर्च , तीन फ्री सर्विसिंगचे चार्जेस यामुळे किंमती चढ्या राहत.
घरगुती इलेक्ट्रीक वाहनांच्या कंपन्यांनी ऑनलाईन विक्रीतून कमिशनला फाटा मारला. अॅफर्मेटिव्ह मार्केटिंग वाल्यांना थोडे दिले तरी ते खूष राहत. हल्ली वाहनाच्या लुक पेक्षा कमी किंमतीत जास्तीत जास्त फायदा कसा मिळेल हे ग्राहक पाहत होता.
संघटीत वाहन उद्योगाने काँगो आणि लगतच्या आफ्रिकन देशातल्या कोबाल्टच्या खाणीवर वर्चस्व मिळवून देशी घरगुती उद्योगांची बॅटरीवाचून कोंडी करण्याचा प्रयत्न केला. पण हे प्रयत्न निष्फळ ठरले होते.
थर्ड वर्ल्ड युनियनच्या एकत्रित प्रयत्नाने जपानच्या सहकार्याने स्ट्रक्चरल बॅटरीज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन नावाची संस्था उभारली होती. जपानने चीनला बॅटरी उद्योगातून कायमचे हटवण्यासाठी आणि मूठभर वर्चस्ववादी महाकाय भारतीय कंपन्यांना शह देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा विकास केला होता. या बॅटरीज सेकंदात चार्ज होऊ शकत. त्यात कॅथोड म्हणून कार्बन फायबर होता. तर लिथियम आयर्न फॉस्फेटचा वापर केला गेला होता. यामुळे कोबाल्टच्या खाणींवर अवलंबून राहण्याची गरज संपली.
स्ट्क्चरल बॅटरीजला भारतातला थोडा कोळसा पुरेसा होता. कार्बन फायबर कॅथोड बनवण्याचं टेक्नीक पुन्नाबाबू कन्नमपटींकडे होतं. पुन्नाबाबूंना खूप महत्व आलं होतं. पुन्नाबाबू स्ट्रक्चरल बॅटरीज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनला सहकार्य करण्यास तयार झाले. लवकरच खाडी देशातल्या ओपेक प्रमाणे एसबीएमए जगाचं अर्थकारण पलटणार होती. झालेही तसेच. लिथिअम आयन च्या मर्यादा एव्हांना स्पष्ट होत चालल्या होत्या. कांगो इथल्या आदिवासींच्या शोषणाबद्दल जगातल्या मानवी संघटनांनी संयुक्त राष्ट्रसंघ, अमेरिका, भारत, ब्रिटन, फ्रान्स , जपान अशा देशात मोठ मोठी आंदोलने उभारली होती.
स्ट्रक्चरल बॅटरीज फायबर टेक्नॉलॉजीमुळे या बॅटरीज कमी आकाराकडे संक्रमित होत चालल्या होत्या. त्या अधिकाधिक पातळ आणि अधिकच ताकदवान बनू लागल्या. त्या वाहनांच्या छतामधे किंवा तळामधे पातळ पसरट पत्र्यासारख्या पांघरता येत होत्या. यामुळे वाहनांचा आकार सुद्धा अगदीच कमी होत चालला. फक्त केबिनचा आकार कमी करता येत नव्हता.
पुन्नाबाबू केवळ कॅथोड फायबर उत्पादन करून थांबले नव्हते. त्यांचे पीसीसीडब्ल्यू सेंटर ऑफ एनोव्हेशन अॅण्ड एक्सलन्स वाहनाच्या रचनेवर काम करत होते. या संस्थेने ओपन कार्स पुन्हा बाजारात आणून अजून किंमती कमी केल्या. यामुळे लिथिअम आयन बॅटरी कार्सवाले भविष्यात येणा-या या संकटामुळे चिंतेत पडले होते.
स्ट्रक्चरल बॅटरीवाले आता स्ट्रक्चरल कार्स या नावाने कार्स बाजारात आणत होते. बॅटरीचं उत्पादन तेच करत होते. गेल्या वर्षीपेक्षा परिस्थिती अगदीच उलट झाली होती. बघता बघता स्ट्रक्चरल कार्स पहिली पसंती बनत चालली.
इकडे लिथिअम आयनच्या बॅटरी चा महाप्रचंड कचरा हे संकट उभे राहीले होते. हा धोका जरी आधीच लक्षात आलेला होता तरीही त्या त्या देशाचे आर्थिक हितसंबंध, राजकीय आणि व्यापारी लागेबांधे यामुळे कुणी त्यावर बोलत नव्हते.
आताशा या कंपन्यांची राजकीय ताकद कमी होत चालली होती.
अनेक प्रकारच्या आंदोलनजीवींनी मग या कच-याच्या विरोधात आंदोलने सुरू केली. शिवाय या वाहनांसाठी ग्रामीण भागातली वीज तोडण्यात येत होती. हे सुद्धा आता जगासमोर येऊ लागले होते. मोठ्या आकाराच्या कमी क्षमतेच्या बॅट-यांना लागणा-या वीजेच्या उत्पादनासाठी कोळसा संपत आला होता.
पुन्नाबाबूंच्या आजोबांनी त्यांच्या हयातीत जंगलांची लागवड केली होती. एकट्याच्या बळावर त्यांनी स्वतः पाणी देऊन एक लाख एकरावर जंगल वसवलं होतं. जिथे पूर्वी दलदल होती तिथे जंगल वसल्याने जमिनीची धूप थांबली. नद्यांनी वाहून आणलेला गाळ झाडांनी घट्ट धरल्याने एक बेट तयार झाले. पुन्नाबाबूंच्या आजोबांचे म्हणजे कन्नमाण्णांचे नाव देशभरात झाले. त्यांच्या नावाने संस्था उभ्या राहिल्या. अनेक लोक त्यात सामील झाले.
जंगलांचे पुनर्वसन सुरू झाले. उघडेबोडके डोंगर हिरवेगार होऊ लागले. एक झाड स्वतःपासून अनेक झाडे बनवते. त्याच प्रमाणे कन्नमाण्ना या झाडाने अशा माणसांचे जंगल बनत चालले होते.
पुन्नाबाबूंमधे कुठेतरी हा डीएनए वळवळत होता.
पैसा, प्रसिद्धी , सत्ता पायाशी लोळत होते. जगाची सत्ता त्यांच्याकडे होती. पुन्नाबाबूंना आपल्याकडे ओढण्यासाठी महाकाय माजी वाहन उद्योग टपून बसले होते. पण त्यांचे कनवाळू हृदय आफ्रिकेतल्या आदिवासींवर जगाने केलेल्या अन्यायाचा मोबदला म्हणून त्यांच्यासोबत होते. एके काळी कोंगोतल्या आदिवासींना वेठबिगार म्हणून राबवून घेतले जात होते. तेच आता मोठ मोठे शेठ बनले होते. दुबई सारखी शहरे वसवत होते. झांबियातले हवेतल तरंगते शॉपिंग सेंटर तर अद्ययावत म्हणून जगप्रसिद्ध झाले होते. त्यातही स्ट्रकचल बॅटरीजचा वापर केला गेला होता. मोठ मोठ्या एक्झॉस्ट फॅन्सच्या सहाय्याने ही इमारत हवेत तरंगत होती. याची रचना पुन्नाबाबूंचीच होती.
पण पुन्नाबाबू कुठेतरी अस्वस्थ होते.
रस्त्यावरून धावणा-या वाहनांमुळे रस्ते वाढत चालले होते. वाहतूक कोंडी होत होती. हायड्रोजन फ्युएल सेल अजूनही व्यवहार्य म्हणून कमर्शिअल होत नव्हतं. शंभर टक्के क्लीन असे तंत्रज्ञान पर्याय सापडत नव्हते. फक्त तंत्रज्ञानाच्या हव्यासाने त्यांचा डीएनए शांत बसत नव्हता.
एक दिवस पुन्नाबाबू गायब झाले.
संपूर्ण वाहन उद्योगात खळबळ उडाली.
जगभरात २४ बाय ७ हाच विषय चालू होता. चीनवर संशय व्यक्त केला गेला. कुणी कुणी अमेरिकन वाहन उद्योगावर संशय घेत होते. तर भारतातल्या वाहन उद्योगावरही संशय घेतला जात होता. कुणीतरी त्यांचे अपहरण केले अशाही वदंता होत्या. एकूणच अफवांना पेव फुटले होते.
सोशल मीडीयात उलट सुलट चर्चा सुरू होत्या.
ञुन्मेषने मायबोलीवर " पुन्नास्वामींचे अपहरण कि मृत्यू ? " असा लगोलग थ्रेड टाकला होता. त्यात बाबूचे स्वामी केल्याबद्दल अनेकांनी त्याची कान उघाडणी केली. तर संबंध नसताना आर्यन खानचा पॅरा का टाकला म्हणून शांत माणसाने टर उडवायला सुरूवात केली होती. बासुचँपने एका गंभीर विषयाला उथळ वळण लागल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. हे आखाती देशातल्या मुसलमान अतिरेक्यांचे काम आहे असा हिंदुत्ववादी आयड्यांनी सूर आळवला होता. त्यावर अनाजी पंतू , जानवे असा हल्ला चढवला गेला. थोड्याच वेळात धाग्यावर गांधीजी आले, नेहरू आले. टिळक , सावरकर यांनीही हजेरी लावली आणि मग धागा नेहमीच्या पाशवी हातात गेल्यावर इतरांनी नाद सोडला.
अशातच एक दिवस युट्यूबवर आकाशात उडणारी माणसं दिसू लागली. अगदी स्पायडरमॅन सिनेमातल्या ग्रीन गॉब्लेन सारखेच दिसत होते ते दृश्य. पुन्हा यावर चर्चा सुरू झाल्या. अवकाश मानवाच्या शंकेने पुन्हा उचल खाल्ली. पृथ्वीवर हल्ला असे रिपोर्ट्स वाहीन्यांवर दिसू लागले.
या सर्व गोंधळाला पूर्णविराम देत पुन्नाबाबू पत्रकार परीषदेत सामोरे आले.
त्या परीषदेत त्यांनी मग आपल्या गायब होण्यापासून ते प्रकट होण्यापर्यंतचा सर्व प्रवास सांगितला.
तंत्रज्ञानाने तिस-या जगताला पुढच्या रांगेत आणून बसवले. मानव सगळीकडे समृद्ध होत गेला. पण पर्यावरणाचे काय ?
वाहने अत्याधुनिक होत गेली. पर्यावरणपूरक होत गेली. तरीही त्यांना वेगळे उर्जास्त्रोत लागत होते. एकातून दुसरे संकट उभे राहत होते. आजोबांना मरतेवेळी पुन्नाबाबूंनी शब्द दिला होता. प्रदूषणाला कारणीभूत पारंपारिक तंत्रज्ञान मोडीत काढून नवे काही तरी ते शोधत होते. पण त्याच्या फायद्या तोट्याचे विश्लेषण करताना पुन्हा जैसे थे परिस्थिती दिसत होती. जगाचा नाश वेगाने होत होता. पण पैशाच्या निर्मितीपायी अंध होत चाललेल्या नव्या आर्थिक सत्तांधांना सांगणे महामुश्किल होते. स्पर्धेमुळे नीरक्षीरविवेक नष्ट झाला होता. वाहने शहरात खपतात. त्यामुळे शहरांची भली मोठी वाढ होत होती. शहरात वाहने खपत होती. जस जसे शहर मोठे होईल तस तसे स्वतःचे वाहन मस्ट होत चालले होते. एव्हढ्या सर्व वाहनांसाठी एकमजली, दुमजली, तीनमजली असे अनेक मजली रस्ते बांधूनही कोंडी फुटत नव्हती. कारण शहरांची लांबी फुगतच चालली होती.
शहरांच्या गरजा पुरवताना ग्रामीण आणि गरीब भागांना नैसर्गिक आणि मानवनिर्मित स्त्रोतांपासून वंचित ठेवले जात होते. खेड्यात वीज तोडून बॅटरी चार्जिंग स्टेशन्सला पुरवली जात होती. पाणी शहरातच अडवले जात होते. तिस-या जगातून भाजीपाला स्वस्तात आणला जात होता.
पुन्नाबाबूंनी तिस-या जगात आर्थिक क्रांती केल्याने चक्र फक्त उलटे झाले. बाकी फरक पडला नाही.
आपल्या आयुष्याच्या मर्यादा ओळखून पुन्नाबाबूंनी पीसीसीडब्ल्यू सेंटर ऑफ एनोव्हेशन अॅण्ड एक्सलन्स निर्मिती केली होती.
ते जितके जमिनीवर होते त्याच्या कैकपटीने जमिनीच्या खाली होते. त्यात ऑक्सिजनचा पुरवठा करणारे व्हॉल्व्हज होते. सोलर इल्युमिनेशन सेंटर्स होते. नैसर्गिक वायुविजनासाठी मोठे मिनार होते.
पुन्नाबाबू अक्षरशः भूमीगत झाले होते.
आणि सोळा महीनांनंतर त्यांनी बनवला इकोबोर्ड.
निसर्गाची हानी न करणा-या एका पॉलीमरची निर्मिती त्यांनी केली होती. यात लाकडाप्रमाणे काम करता येत होते. स्क्रू बसवता येत होते. खिळे ठोकता येत होते. करवतीने आकार कापता येत होते. याला त्यांनी इकोबोर्ड असे नाव दिले होते.
ते इमारतीच्या बांधकामासाठी वापरता येणार होते. तसेच त्यापासून दर्जाचे वाळवी न लागणारे, न कुजणारे फर्निचर बनवता येत होते.
पुन्नाबाबू इथेच थांबले नाहीत.
त्यांनी इकोबोर्डपासूनच एक बोर्ड बनवला. त्यात छोट्या आकाराचे पण शक्तीशाली एक्झॉस्ट फॅन्स लावले. त्यांची टोकं हवी तशी वळवता येत होती. बोर्डमधेच त्यांनी स्ट्रकचल बॅटरीचा नॅनोअवतार फिट केला होता. या बॅटरीज एका छोट्याशा सोलर सेलनेही चार्ज होत होत्या तसेच त्यांना वीजेवर सुद्धा चार्ज करता येत होते. वजन नॅनोग्रॅम्समधे असल्याने बॅटरीजचे दोन सेट्स होते. एक चार्ज होत असताना दुसरा डिस्चार्ज होत होता. फॅन्सच्या रोटर्सपासून पुन्हा वीजनिर्मिती होत होती. त्यामुळे तशा त्या कायमच चार्ज असणार होत्या.
या वाहनाचे नाव त्यांनी इकोबोर्ड दिले होते. इकोबोर्डला एक हँडल असून त्याला धरून चालक उभा राहू शकत होता. चालू केल्यावर इकोबोर्ड एफ १६ विमानाप्रमाणे जागच्या जागी हवेत उडू शकत होता. त्यानंतर फॅन्सचे कोन बदलून हवा मागे टाकत बोर्ड पुढे जात असे. तासाला तीनशे किमी पर्यंत सुद्धा जाता येत होते. पण त्यामुळे चालकाला हवेचा सामना करावा लागेल यासाठी पुढच्या बाजूला टोकदार नाक दिले होते.
हवेत उडणा-या वाहनांमुळे अगदी पन्नास किमी अंतरावरूनही ऑफीसला जायला पाच वीस मिनिटे पुरेशी होती. त्यापेक्षा कमी अंतराला पाचच मिनिटे लागणार होती. याच अंतराला सध्या दीड ते तीन तास लागत होते. कधी कधी संध्याकाळी निघालेला माणूस सकाळी पोहोचत होता.
यामुळे क्रांतीच होणार होती.
आता कुठूनही आरामात जाता येत असल्याने विशिष्ट भागात घराच्या डिमांडला अर्थ राहत नव्हता. त्यामुळे कृत्रिमरित्या फुगलेल्या घरांच्या डिमांडस कमी होणार होत्या. दुस-या शहरातूनही दोन तासात ऑफीसला पोहोचता येत होते. औद्योगीकीकरणाच्या ठिकाणीच रहायला हवे ही गरज संपली होती. आणि किंमत मात्र अगदी कमी ठेवली होती. सायकलच्या दरात इकोबोर्ड.
इकोबोर्डने अशाच पद्धतीच्या रिक्षा, कार्स, व्हॅन बाजारात आणल्या होत्या.
पत्रकार परीषदेतही खळबळ उडाली. तशीच ती जगभरात उडाली.
हेच कारण होते जगभरातल्या वाहन उद्योगात खळबळ उडण्याचे. आता कोणत्याही तंत्रज्ञानावर आधारीत रस्ता अडवणारे वाहन कालबाह्य होणार होते.
नवीन पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा जन्म झाला होता.
आणि ही क्रांती जन्माला घालून पुन्नाबाबू आपल्या एअर बबल प्रोजेक्टच्या टीमकडे वळले होते. हवेतून उडत जाणारे फुग्यासारखे वाहन. पुढच्या क्रांतीला ते जन्म देत होते.
आणि त्याच वेळी एका व्यवस्थापन समितीला ते लेक्चर देत होते.
सध्याच्या मानवी जीवनाला पर्यावरणाकडे अचानक वळवता येणे अवघड आहे. सध्या त्यांना नवनवे पर्यावरणपूरक तंत्रज्ञान कसे देता येईल हे बघतच हळू हळू माणसाला त्याच्या नैसर्गिक जीवनशैलीकडे कसे वळवायचे याचा प्लान ते समजावून सांगत होते.
पुन्नाबाबू आता थकले होते.
पुढच्या क्रांतीसाठी नवीन टीम तयार होत होती.
पण शेवटच्या श्वासापर्यंत पुन्नाबाबू काम करत होते. त्यांच्यातला आजोबांचा डी एन ए वळवळत होता.
तो स्वस्थ बसू देत नव्हता.
मानवजातीने केलेली निसर्गाची हानी भरून काढण्यासाठी दिलेला शब्द ते पाळत आले होते आणि तोच शब्द त्यांनी नव्या पिढीकडून घेतला होता.
बाहेर इकोबोर्डने धुमाकूळ घालायला सुरूवात केली होती.
(समाप्त)
(तांत्रिक चुका झाल्या असतील तर मोठ्या मनाने क्षमा करावी ).
हे कल्पना रंजन खूप रोचक आहे
हे कल्पना रंजन खूप रोचक आहे.परत एकदा नीट वाचते.
सोशल मीडीयात उलट सुलट चर्चा
सोशल मीडीयात उलट सुलट चर्चा सुरू होत्या.
ञुन्मेषने मायबोलीवर " पुन्नास्वामींचे अपहरण कि मृत्यू ? " असा लगोलग थ्रेड टाकला होता. त्यात बाबूचे स्वामी केल्याबद्दल अनेकांनी त्याची कान उघाडणी केली. तर संबंध नसताना आर्यन खानचा पॅरा का टाकला म्हणून शांत माणसाने टर उडवायला सुरूवात केली होती. बासुचँपने एका गंभीर विषयाला उथळ वळण लागल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. हे आखाती देशातल्या मुसलमान अतिरेक्यांचे काम आहे असा हिंदुत्ववादी आयड्यांनी सूर आळवला होता. त्यावर अनाजी पंतू , जानवे असा हल्ला चढवला गेला. थोड्याच वेळात धाग्यावर गांधीजी आले, नेहरू आले. टिळक , सावरकर यांनीही हजेरी लावली आणि मग धागा नेहमीच्या पाशवी हातात गेल्यावर इतरांनी नाद सोडला.>>>>> मायबोली नेहमीच दळण
लेख छान आहे खरेच असा इकोबोर्ड यावा या जन्मात तरी.
मी अनु, सियोना धन्यवाद.
मी अनु, सियोना धन्यवाद.
इसर्व मायबोलीकरांचे उदंड प्रतिसादाबद्दल (पुलेन) मनःपूर्वक आभार.
अशातच एक दिवस युट्यूबवर
अशातच एक दिवस युट्यूबवर आकाशात उडणारी माणसं दिसू लागली----पणं आकाशात माणसे उडु लागली तर पर्यावरणाची हाणी टाळता कशी येईल? कदाचित पक्ष्यांचे सुद्धा वांदेच होतील. मग ते इको बोर्ड सुद्धा पर्यावरणाला हानिकारक ठरतील. मला वाटतंय, काहीतरी वेगळं सुचवायला हवं
सर , माझे आकलन आणि वाचन कमी
सर , माझे आकलन आणि वाचन कमी असल्याने समजुतीप्रमाणे लिहीले आहे. आपण आपल्या ज्ञानाचा मज पामरास उपयोग करून देत आहात. पण ते ग्रहण करण्याची कुवत मजकडे आहे का हेच ठाऊक नाही. तरी आपण सामान्यांना समजेल असे सांगावे ही नम्र विनंती.
आपला आभारी.
फार फार मस्त कल्पनाविलास आहे.
फार फार मस्त कल्पनाविलास आहे. रोचक विषय. रात्री आणि सकाळी अशा 2 भागात वाचली, तरीही वाचायला मजा आली. आज वेळ मिळाल्यावर पुन्हा एक सलग वाचेन.
माझ्याही डोक्यात पक्षांबद्दल आलंच.
तुम्ही, पुन्नाबाबू
तुम्ही, पुन्नाबाबू कंदंमपाट्टी कन्नमपटी वेड्डवेरय्या यांची भेट घेऊन आधीच असं सूचित करा कि पर्यावरणवादी तुमच्या संशोधनाला आक्षेप घेणार आहेत तरीही तुम्ही लवकरच हवेत उडणारी संसाधने बनवण्या ऐवजी मनुष्यालाच कुठल्यातरी लहरींमध्ये परावर्तित करून संप्रेरित करता येईल का असे संशोधन करायच्या मागे लागा जेणेकरून पुढील काळात मोबाइलला चा किंवा घड्याळाचा बटन प्रेस केला कि मनुष्य खच्य्याककण अश्या लहरींमार्फत स्वतःच संप्रेरित होईल आणि पर्यावरणाला सध्या जेवढा धोका आहे तेवढाच राहील तो वाढणार नाही. आणि रस्त्यावरील हवेतील वाहतूक पूर्णपणे बंद झाल्यास प्रदुषण आणि इतर समस्या कायमच्या सुटतील.
शां मा, ह्या धाग्यावरील माझा
शां मा, ह्या धाग्यावरील माझा अभिप्राय गायब कसा काय झाला?
देवभुबाबा, आपल्याइतके ज्ञान
देवभुबाबा, आपल्याइतके ज्ञान मज ठायी नाही. मला असे वाटते कि आपल्याच सिद्धहस्त लेखणीतून ही कहाणी उतरलेली योग्य राहील. आमचं आपलं अंथरूण पाहून पाय पसरणं असतं.
शांत माणुस का उगाच असा
शांत माणुस का उगाच असा केवलवाना आव आणताय. बुद्धिचातुर्य म्हणूनच एवढी चांगली कथा लिहिलीत. माझी कंमेन्ट चुकली असेल तर क्षमस्व. मी दिलेत करतो माझ्या कंमेन्ट्स
आवडली कथा
आवडली कथा
धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना.
पुलेन शुभेच्छांसाठीही मनःपूर्वक आभार.
छान कथा.
छान कथा.
धन्यवाद
धन्यवाद
काहिच्या काही लिहितो का बे
काहिच्या काही लिहितो का बे
चान्गली क्वालिटिचि घेत जावी
सर, कोणता ब्रॅण्ड?
सर, कोणता ब्रॅण्ड?
तुले नहि परवडणार तु जांभळाचि
तुले नहि परवडणार तु जांभळाचि घे
सर, तुम्ही म्हणता तसे
सर, तुम्ही म्हणता तसे
जांभळाची तब्येतीला गुणकारी
जांभळाची तब्येतीला गुणकारी
बघितलं सरांचा आपल्यावर किती प्रेम आहे ते
इलेक्टरीकल व्हेईकल चा विषय
इलेक्टरीकल व्हेईकल चा विषय असल्यामुळे सुरवातीच्या 10 / 15 ओळी मी सिरियसली वाचत होतो , पण कशीच कुठेही तार जुळेना
सरांचा वेगळाच स्वॅग आहे.
सरांचा वेगळाच स्वॅग आहे. इन्सेपशनमध्ये ज्याप्रमाणे स्वप्नात स्वप्न त्यात स्वप्न तसेच सर डूआयडीचा डूआयडी काढू शकतात हे पाहून सुडोमि