इतिहासाला पुसून थोडे, जगावयाचा विचार आहे
पुराण पोथ्या नकोत, नवखे लिहावयाचा विचार आहे
जुनीच मोनालिसा टांगली, तेच रूप अन् हास्य तेच ते
सौंदर्याची नवीन व्याख्या, करावयाचा विचार आहे
मिळावयाला अवघड जे जे, हवे हवेसे तेच मनाला
आकाशाला कवेत माझ्या, धरावयाचा विचार आहे
देव कशाला? छनी हतोडा, धरून हाती आत्मबलाने
कोरुन भाळी नशीब अपुले, लिहावयचा विचार आहे
नाव राखण्या, मनास मुरडुन, धोपट मार्गी चालत आलो
प्रवास थोडा, पाय घसरण्या,करावयाचा विचार आहे
पुरे जाहले लब्धप्रतिष्ठित, रटाळ जगणे फिके फिकेसे
रंगबिरंगी गरिबीसंगे, जुडावयाचा विचार आहे
प्राणप्रतिष्ठा कशास करता, कुण्या मंदिरी उगाच माझी?
असेन जेथे, तिथे स्वंयंभू, बनावयाचा विचार आहे
उपेक्षिताचे जीवन जगलो, आस अधूरी मिरवायाची
खांद्यावरती चारजणांच्या, फिरावयाचा विचार आहे
असली नकली नाती जपली, कुणी न उरले सायंकाळी
धागे तोडुन "निशिकांता"चा, उडावयाचा विचार आहे
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--हिरण्यकेशी
लगावली--लगालगागा X ४
छान.
छान.