चांगले जे कालचे, बेकार झाले
आजचे म्हणतिल उद्या भंगार झाले
अल्पसंतुष्टीमुळे गरिबीतसुध्दा
केवढे अमुचे सुखी संसार झाले!
ठेच लागुनही पुढे मी चालताना
मागचे विद्वान अपरंपार झाले
आजही आहे टिकोनी ती बिचारी!
शांततेवर केवढे व्यभिचार झाले
ओळखू शकलो न कोल्हे माणसातिल
सभ्य सारे वाटल्याने यार झाले
धर्मअंधांचे जिथे वर्चस्व होते
अंधश्रध्देतून आत्याचार झाले
उच्चभ्रू वस्तीत लक्ष्मी नांदल्याने
आत्मकेंद्रित जीवनाचे सार झाले
वागणारे चांगले ना नोंद त्यांची
गावगुंडांचे सदा सत्कार झाले
आम जनतेचा तसा संबंध नसतो
पक्ष कुठला? कोणते सरकार झाले
पद्मश्री ज्यांना मिळाली, ते बघोनी
चांगल्या गरिबाघरी सणवार झाले**
शायरी 'निशिकांत"ला स्फुरली उशिरा
प्राक्तनाचे पण किती उपकार झाले!
वृत्त--मंजुघोषा
लगावली--गालगागा X ३
**परवाच राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म वितरण सोहळा झाला. त्यात कर्नाटकाच्या श्रीमती. तुलसी गौडा नावाच्या आदिवासी महिलेस पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. असे बरेच पुरस्कारार्थी होते यंदा. या वर्षी प्रथमच या पुरस्काराने एका अर्थाने उच्चभ्रू लोकांची मक्तेदारी कांही अंशाने संपवली. हे बघून सुचलेला प्रासंगिक शेर.
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३