दिवस - नेहमीसारखाच. सकाळची ऑफिसला जाण्याची गडबड, नाश्ता, मध्येच येणारे फोन - हे सगळं रोजच्यासारखंच. आजचाही दिवस असाच रटाळ जाईल असं वाटलं. कार पूल पार्टनरला hi, hello झालं. गाडीत बसून निघालो.
थोडं पुढं गेल्यावर मात्र गाडी आवाज करू लागली. मनात शंका - कुशंका!
"Check कर लेना गाडी मे और कुछ problem ना हो"
" छोटासा problem और बडा ना हो"
ऑफिसला जाईपर्यंत कधी आवाज जास्त, कधी कमी, असं मजल - दरमजल करत पोहोचलो.
हाश - हुश करून दुकान चालू केलं तरी मनात धाक - धुक. शेवटी आजूबाजूच्या लोकांना विचारून १-२ गॅरेजचे नंबर मिळवले आणि त्यांना फोन करून एका ठिकाणी जायचं ठरवलं.
पुन्हा गाडी आवाज करत. शेजारून जाणारे - येणारे वाकून वाकून बघतच होते. हे असे अनुभव फक्त गाडी खराब झाली असली तरच येतात. नाहीतर आमच्या गाडीकडे वाकून बघायला आम्ही सेलिब्रिटी थोडीच आहोत.
मध्ये जाऊन येतो म्हणून सांगितल्यावर बॉसच वाकडं तोंड पण बघून झालं.
असो. कोण हा माणूस सकाळी सकाळी कडमडलाय, अशा नजरेने त्या मेकॅनिकने माझ्याकडे पाहिलं.
'काय झालंय?' असं मला खुणेनेच विचारलं. माझा काही न कळलेला चेहरा पाहून, त्यांनी एक पिंक टाकून चिडलेल्या आवाजात विचारलं "काय झालंय?"
"आवाज येतोय खालुन". त्यांनी पुन्हा माझ्याकडे पाहिलं. आमचं आपलं बोट दाखवून, गाडीतून.
काही क्षणात, तो driving सीट वर आणि मी शेजारी. खडबड्या रस्त्यावर, वळणावर तो फास्ट, मी गॅसवर.
"अरे खड्डा आहे, अर्रर्र हळू", शेवटी कुठून, कुठून फिरवून, शेवटी तो गॅरेजपाशी येऊन थांबला.
एक पिंक टाकून "प्रॉब्लेम आहे". म्हणलं "अजून?"
इथं जीव अर्धा झाल्यावरही हा म्हणतो प्रॉब्लेम आहे.
"खोलावी लागेल, २ दिवस सोडून जा".
म्हणलं बघा तरी आधी. तोपर्यंत हा तिथून गेलेला पण.
५ मिनिटांनी, माझ्यासमोर २-३ गोष्टी पडल्या आणि ह्यानी गाडीचं काम सुरु केलेलं.
गाडीच्या खाली जाऊन, पुढची दोन्ही चाकं काढून शेवटी १० मिनिटांनी, पुन्हा माझ्या समोर, " लै म्होटा लफडा झालाय". "आक्शीडेन्ट कसा झाला नाय?"
शॉकर, लायनर आणि अशी एक ८-१० गोष्टींची वाणसामानाची यादी करून, "बदलावं लागेल". "२ दिवसांनी भेटल"
म्हणलं आजच द्या. त्यांनी त्याच्या मालकाला हा माणूस काम करायला सांगतोय अशा अविर्भावात माझी तक्रार केली आणि माझ्याकडे फोन दिला.
मी आपलं नाही साहेब, लांब राहतो, करा तेवढं अड्जस्ट म्हणलं. शेवटी आम्ही त्याचं सामान आणायला लांबच्या कुठल्या तरी दुकानात जवळच्या कुठल्या तरी रस्त्याने त्याच्याच गाडीवर गेलो. सामान घेऊन, पैसे देऊन, आम्ही पुन्हा कुठल्या तरी जवळच्याच रस्त्याने पुन्हा गॅरेजवर.
"शीडीवर गान लावा की". मी इकडे तिकडे कुठे शिडी सापडतीये का पाहिलं.
"मोबाईल न्हाई का?" मी आपलं हां हां लावतो की.
"कोणतं लावू?" मी.
"लावा कि 'कारभारी'.."
एक - दीड तासाच्या अथक प्रयत्नानं, गाण्यांच्या ठेक्यावर गाडी तयार. "२ वर्ष आता पुना काही होनार नाही बगा".
३,००० झाले. म्हणलं एवढे?
साहेब, ते हे बदललं, पच्याक, ते पण बदललं.
म्हणलं तंबाखूचे पण पैसे लावलेस का?
"काय साहेब तुमी पन"
बरं जाऊदे कमी द्या. तेवढेच थोडे पैसे कमी करून तिथून निघालो.
ऑफिसमध्ये बॉसच तोंड पुन्हा वाकडं. "गाडीचा पार्ट खालून तुटला होता कि वरून ते तरी कळालं का तुला?" इति बॉस.
हॅहॅहॅ, "काय सर, वरून तुटला असतं तर दिसलं नसतं का मला?"
संध्याकाळी घरी गेल्यावर, बायको "झालं का काम गाडीचं?"
आई "कितीला चुना लावला?, आपले जुने पार्टस पण आणले नसशील."
"हॅ, मी काय एवढा हे वाटलो का तुम्हाला?"
बायको "गुंडाळला असेल त्याला नक्की"
मी घरात जाऊन, खरंच कितीला गंडलो ह्याचा विचार करू लागलो.
शंतनू कुलकर्णी
पुणे
३० ऑक्टोबर २०२१
नेहेमीच्या सर्विस स्टेशनला
नेहेमीच्या सर्विस स्टेशनला गाडी दाखवावी, कमीत कमी ओळखीच्या माणसाने चुना लावायचे दुःख कमी होते आणि भविष्यात या कामाकरता जास्त पैसे घेतले होते आता कमी कर असे सांगता येते. मेंटेनन्सचा रेकॉर्ड पण असतो त्यांच्या कडे त्यामुळे नक्की काय बिघडले हे पण ते सांगू शकतात.
नरेन यांच्याशी सहमत. अनोळखी
नरेन यांच्याशी सहमत. अनोळखी मॅकेनिकला गाडी दाखवणे पुढे महागात पडू शकते. शहरात आजकाल गाडीच्या कंपनीच्या पीक अँड ड्रॉप सर्वीस असतात. तिथे on paper कोणते पार्ट्स बदलले वगैरे सर्व रेकॉर्ड मिळू शकते. तसेच पुढे गाडी विकायची झाल्यास जुने रेकॉर्ड काढून नवीन ग्राहकाला दाखवत येतात.