यारों--मित्रांनो---( वीक एंड लिखाण. )
माझा परवाच वाढदिवस झाला. माझ्या मनात त्याबद्दल कांही या सदराखली लिखाण करायचा विचार होता. पण त्याच आठवड्यात विजयादश्मी हा सण पण होता. एक रचना या सणाचे औचित्त्य साधून लिहावी असा विचार पण आला. माझ्या वाढदिवसासाठी लिखाण करायचे म्हणून टाळले आणि दसर्यावर "रावणास का पोसत असतो" या नावाचे या सदराखाली लिखाण प्रकाशित केले. आज आधी राहिलेले काम पूर्ण करायची उर्मी आली; म्हणून हा प्रपंच.
यातच परवाच सॉक्रेटीस बद्दल माझ्या कांही वाचनात आले आणि माझे विचार चक्र सुरू झाले. सॉक्रेटिसला एका निर्मणुष्य बेटावर ठेवले होते. सारखा मनात विचार डोकावत होता की तो तिथे कसा रहात असेल. कसे असेल त्याचे जीवन आणि मानसिक स्थिती पण. जसे जसे विचार मंथन होऊ लागले तसा तसा मी यात गुरफटत गेलो.
मनुष्य हा सोशल अॅनिमल आहे असे म्हंटले जाते. हे तंतोतंत खरे आहे. एखादे लहान मूल जर जन्मताच बहिरे असेल तर त्याला इतरांचे बोलणे ऐकू येत नाही. म्हणजे बोलण्याच्या बाबतीत हे मूल निर्मनुष्य बेटावरच असते. त्याला कुणाचेही बोलणे ऐकू न आल्याबे असे बहिरे जन्मलेले मूल परिमाणतः मुके पण होते. निर्मनुष्यता हा सर्वांना एक मोठा शाप आहे. हे वेगवेगळ्या प्रकारे घडत असते. सध्याच्या चंगळवादी आणि आत्मकेंद्रित जीवन शैलीत कांही प्रमाणात ही निर्मनुष्यता आली आहे ज्याचे परिणाम दिसावयास सुरू झाले आहेत.
मी माझ्या जीवनाकडे त्रयस्थ नजरेतून बघू लागलो आणि ध्यानात आले की मी कित्त्येक लोकांमुळे, वातावरणामुळे, प्राण्यामुळे घडलो. मीच माझ्या कांही कवितांमधे मीच माझा शिल्पकार आहे असे लिहिलेले आहे. म्हणायला, लिहायला आणि अपील व्हायला हे छान आहे पण हे शक्य आहे का? असाही विचार मनात आला. हजारो गोष्टींनी आज आपण आहोत तसे बनण्यासाठी हातभार लावलेला असतो . प्रथम माझ्या डोक्यात विचार आला तो माता पित्यांचा. त्यांच्यापासून तर जीवनाचा आरंभ झाला. असे वाटत असताना मनात विचार आला तो मित्रांचा. मित्र हा आपण लहानपणी खेळायला शिकतो तेंव्हा आयुष्यात येतो आणि अंत क्षणापर्यंत सोबत असतो. आई, वडील वयपरत्वे सोडून जातात पण मित्र साथ देतच असतो. एका मैत्री दिनाला मागे मी एक कविता लिहिली होती, तयाचा कांही ओळी येथे देत आहे.
गूज मनीचे सांगायाला मित्र असावा
मनास हलके करावयाला मित्र असावा
मंदिरातल्या मूर्तींना मी कधी न पुजले
"ब्रह्म सत्त्य अन् मिथ्या जग" हे मना न पटले
देव नको, मदतीस यायला मित्र असावा
मनास हलके करावयाला मित्र असावा
या ओळी आठवायचे अजून एक कारण म्हणजे १० ऑकटोबरला वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छांच्या रुपाने माझ्यावर धो धो श्रावण बरसला. या शुभचिंतकात नव्वद टक्के मित्र परिवारच होता. फेसबुक, व्हाट्सॅप, टेलिफोन्स सर्व माध्यमातून ही स्नेह बरसात चालूच होती. पुन्हा एकदा मी भावविभोर झालो. मित्रांच्या जीवनातील महत्वाचे अकलन झाले. माझे मित्रांच्या प्रती ऋण व्यक्त करण्या साठी एक रचना सुचायला लागली. ही रचना पण धो धो प्रवाहा प्रमाणे आली. ही कविता एकटाकी आणि आतून आलेली आहे. सर्व मित्रजनांना सलाम करत रचना पेश करतोय आपल्या सेवेत.
सुसह्य वाटत आहे
जगता जगता उपकाराचे ओझे पेलत आहे
यारों तुमच्यामुळेच जीवन सुसह्य वाटत आहे
मेत्र-मैत्रिणी हीच संपदा कमावली मी लिलया
काटेरी आयुष्य बहरले, तुमची सारी किमया
इंद्रधनूचे रंग सातही मजेत उधळत आहे
यारों तुमच्यामुळेच जीवन सुसह्य वाटत आहे
आशिर्वचने जशी बरसली धोधो होउन श्रावण
चिंबचिंबलो, क्षणात झाला ग्रिष्म किती मनभावन
मरगळ गेली, कात टाकली असेच भासत आहे
यारों तुमच्यामुळेच जीवन सुसह्य वाटत आहे
कविता लिहितो, गझला लिहितो बाळबोध वळणांच्या
चुचकारुन प्रोत्साहित करता, जणू खास ढंगांच्या
तुम्हीच धक्का दिला चालण्या पुढती, जाणत आहे
यारों तुमच्यामुळेच जीवन सुसह्य वाटत आहे
पहिल्या, शेवटच्या श्वासातिल अंतर जीवन असते
भेटत गेले वळणांवरती दोस्त चालता रस्ते
स्वर्ग नको, दे असे मित्र, देवाला विनवत आहे
यारों तुमच्यामुळेच जीवन सुसह्य वाटत आहे
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३