कला मॅडम..!!

Submitted by रूपाली विशे - पाटील on 23 October, 2021 - 01:49

कला मॅडम...!!

" तडप तडप के इस दिल से आह निकलती रही...
मुझको सजा दी प्यार की...
ऐसा क्या गुन्हा किया...
तो लूट गये .. हाँ लूट गये हम ...तेरी मोहब्बत में..!!

' आपकी फर्माईश' ह्या विविध भारतीवरच्या कार्यक्रमात वाजणारं; प्रेमभंग झालेल्या सलमानच्या चित्रपटातलं गाणं ऐकत, घरासमोरच्या बाजेवर एक हात कपाळाला लावून अन् दुसऱ्या हातात दारूची बाटली घेऊन बसलेल्या दत्ताच्या घश्यात , रेडिओवर वाजणाऱ्या त्या गाण्यातल्या प्रत्येक कडव्यावर हुंदका दाटून येत होता.

__ आणि त्याच समयी दत्ताच्या घरासमोरून विजू फोटोग्राफर, काळाकुट्ट धूर सोडणाऱ्या आणि दोन्ही कानांच्या पडद्यांचा पार भुगा करणाऱ्या आवाजाची मोटरसायकल घेऊन सुसाट निघाला होता. त्याच्या मागे मोटरसायकलवर त्याला घट्ट चिटकून बसलेल्या मेनकेने ओढणी वाऱ्यावर धरली आणि अगदी नेमकं त्याचवेळी 'आपकी फर्माईश' मध्ये गाणं वाजू लागलं.

" हवा मे उडता जाये ...
मेरा लाल दुपट्टा मलमल का...
ओ ... मेरा लाल दुपट्टा मलमल का....
ओ ओ........"!!

___आणि तशी ओढणी वाऱ्यावर धरताना मुद्दामहून दत्ताला मागे वळून पाहणाऱ्या मेनकेला पाहून नशेत असलेल्या दत्ताला आपल्या भंग पावलेल्या हृदयाचे दुःख आवरता येईना.

दत्ताला नशेत पाहून घराच्या अंगणात येत दत्ताची बायको कलावती त्याच्यावर चढ्या आवाजात खेकसली ,

" रामप्रहरापासून हातात बाटली घेऊन बसायला शरम वाटत नाही का तुम्हांला...?? उठा ... आणि कामाला लागा. त्या चटक चांदणीने पुरता देवदास केलायं तुमचा...!! परत येऊ तर दे ह्या रस्त्याने, बघतेच त्या नटमोगरीला ..!" असं म्हणत मेनकेच्या नावाने बोटे मोडत कलावती आपल्या कामाला लागली.

'मेनका' दत्ताची पहिली पत्नी, दिसायला नावाप्रमाणे स्वर्गातल्या मेनकेसारखीच.... सौंदर्यवान ; पण वागण्या- बोलण्यात आणि चालण्यात अतिशय चंचल आणि उथळ...!!

नाक्यावरच्या विजू फोटोग्राफरने चंचल स्वभावाच्या मेनकेला बरोबर जाळ्यात ओढले आणि मुंबईला नेऊन सिनेमात काम मिळवून देईल असं आमिष दाखवत भुरळ घातली. विजूच्या मधाळ बोलण्याने विरघळलेल्या मेनकेने साध्या-सरळ स्वभावाच्या दत्ताला टांग दिली आणि विजूसोबत ती मुंबईला परागंदा झाली.

आठ दिवस जीवाची मुंबई करून नंतर जवळचे पैसे संपल्याने परत आलेल्या मेनकेने विजूसोबत त्याच वस्तीत संसार थाटला.

मेनकेच्या ह्या विश्वासघाताने दत्ता सैरभैर झाला. कोलमडून पडला.

त्याने दारूची बाटली जवळ केली. वस्तीत त्याचं कपड्याचं लहानसं दुकान होतं, त्यावर त्याचं पोट पाणी चांगलं चाललं होतं ; पण आता त्याचं लक्ष दुकानात काही लागेना. दारुच्या अधीन जाणाऱ्या दत्ताला पाहून शेवटी भावकीतल्या माणसांनी त्याची पटरी सोडून धावणारी आयुष्याची गाडी रुळावर येईल ह्या आशेने त्याच्या दुसऱ्या लग्नाची गाठ कलावतीशी बांधून टाकली.

सुमार रूपाची, पस्तीशी ओलांडलेली, उंच - धिप्पाड बांध्याची कलावती दत्ताला गळ्यात लोढणं अडकवल्यासारखी वाटू लागली; पण दोन वेळच्या जेवणाची सोय आणि घरातलं अजागळपण तिच्या रूपाने दूर होतेयं ह्या स्वार्थी हेतूने तो तिच्याशी जुळवून घेऊ लागला.

कलावतीच्या रूपाने दुसरी बायको आयुष्यात आली तरी, पहिली बायको असलेल्या मेनकेला दत्ता विसरू शकत नव्हता.

दुसऱ्या बाजूला कलावतीची परिस्थितीही काही वेगळी नव्हती. लग्नाचं वय उलटून गेलेलं, त्यात भर म्हणजे घरचे दारिद्रय जन्मापासून पाचवीला पुजलेलं; त्यामुळे तिने सुद्धा जास्त विचार न करता दत्ताच्या वाऱ्यावर पडलेल्या संसाराला उभारी देण्याची आणि त्याच्या आयुष्याची गाडी रुळावर आणण्याची धुरा आपल्या दणकट खांद्यावर घेतली.

रंगा - रूपाने देखणी जरी नसली तरी नावाप्रमाणे कलावती अंगभूत कलागुणांना संपन्न होती. तर अशीही कलावती दत्ताच्या संसाराची अनभिषिक्त सम्राज्ञी झाल्याबरोबर प्रथमत: तर तिने बंद पडलेल्या दत्ताच्या दुकानाचा कायापालट केला.

कलावती स्वतः शिवणकाम शिकलेली असल्याने शिलाई मशीन घेऊन ती दुकानात बसून कपडे शिवू लागली. मुळातच मेहनती स्वभावाची असल्याने हळूहळू धंद्यात तिने जम बसवला. धंद्याच्या पैश्यांचा हिशोब ती काटेकोरपणे सांभाळू लागली. पडझड झालेला दत्ताचा संसार कलावतीच्या रूपाने मार्गी लागू लागला.

__ इथे मेनका जरी विजूचा हात धरून पळून गेली असली तरी; मधूनच दत्ताला खिजवण्यासाठी मुद्दामहून दत्ताच्या नजरेसमोरून विजूच्या गळ्यात हात टाकून , त्याच्या अंगचटीला बसून मोटारसायकलवरून ती जाऊ लागली. तिला त्यात आसुरी आनंद वाटू लागलेला...!!

__ आणि तिला तसं विजूच्या पाठी बसलेलं पाहिलं की, दत्ताच्या मनात संताप आणि दुःख या दोन्ही भावनांचे चमत्कारिक मिश्रण तयार होत असे. नंतर त्या मिश्रणातून आलेल्या नैराश्यामुळे तो बाटली जवळ करून मेनकेच्या आठवणीत आणि त्या दारुच्या बाटलीत देवदासासारखा डुंबून राहू लागे.
.
कलावतीच्या नजरेतून मेनकेचे हे चवचाल चाळे बिल्कूल सुटले नव्हते. एक दिवस तरी ह्या नखरेल नटवीला चांगलाच धडा शिकवायला हवा, ह्या विचाराने तिला झपाटून टाकले. ती संधीची वाट पाहू लागली आणि एक दिवस तिच्यासमोर संधी चालून आली.

त्यादिवशी नेहमीप्रमाणे विजूची मोटरसायकल कानाचे पडदे फाडत दत्ताच्या घरासमोरुन जाऊ लागली; तशी कलावती रस्त्याच्या मधोमध उभी राहिली.

विजूने मोटारसायकल थांबविल्याबरोबर त्याला घट्ट चिटकून बसलेल्या, आपल्या केसांना तसेच नाजूक मानेला बेफिकीर हेलकावे देणाऱ्या मेनकेच्या झिंज्या खेचून तिला मोटरसायकलवरून खाली खेचून उतरवत; तिच्या मुस्काटात जोरात एक हाणत कलावती मेनकेवर कडाडली,

" ए, भटक भवाने, माझ्या संसारात विष कालवू पाहतेस होय..?? पुन्हा जर इथून जाताना दिसलीस तर ह्या झिंज्या उपटून हातात देईन..!"

दांडगट कलावतीच्या घट्ट पकडीतून सुटण्यासाठी नाजूक मेनका फडफड करत राहिली; पण कलावतीचा दणकाच असा होता की, मेनकाची धडपड निष्फळ ठरू पाहत होती. मेनकेच्या अंगात कापरं भरलं होतं.

मेनकेवरची आपली पकड ढिली करत कलावतीने आता आपला मोर्चा विजूकडे वळविला.

"काय रे ए फोटोवाल्या, गळ्यात कॅमेरा अडकवून फिरतो गावभर... तशी वेसण घाल की, तुझ्या ह्या मैनेच्या नाकात... त्या कोपऱ्यावरच्या टपरीवाल्या बाळूबरोबर रोज काय गुलूगुलू करत असते ही... माहित नाही का रे तुला ..?? डोळे फुटले का रे तुझे..?? " विजूच्या गळ्यातला कॅमेरा खेचून घेत ती अजूनच चेकाळत बोलू लागली.

" आता पुन्हा जर ह्या तुझ्या मैनेसोबत इथे दिसलास तर तंगडं तोडून हातात देईन आणि त्याचा फोटो काढून तुझ्या त्या फोटोच्या टपरीवर लावीन. काय समजतोस तू ह्या कलावतीला..??? " कलावतीने विजूला दम भरला.

कलावतीच्या धमकीने जीवाची घाबरगुंडी उडालेल्या विजूने मेनकेला घेऊन तिथून पळ काढला. दोघांनाही अक्षरशः 'पळता भुई भारी'' झाली होती.

कलावतीची भाषा 'अरे ला कारे ' करणारी असल्याने तिला वस्तीतले सगळे वचकून राहत असत. तिच्या नादाला कोणी लागत नसे. तशी पण तिची परिस्थिती ' वासरात लंगडी गाय शहाणी' अशीच होती.

गरीब, कष्टकऱ्यांची वस्ती होती ती....!! त्या दळीद्री वस्तीत चांगली कमावती, श्रीमंत कलावती होती; त्यामुळे सगळे तिला जुलमाचा रामराम करीत असत.

वस्तीतली माणसं आपल्याला टरकून आहेत हे कलावतीने चांगलेच जाणले होते. तिने त्यांच्या दुबळ्या मानसिकतेचा पक्का अभ्यास केला होता. तिने आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी तसा दरारा वस्तीत मुद्दामहून निर्माण केला.

धंद्यात आलेली बरकत आणि हातात खुळखुळणारा पैसा कलावतीला अजून मजबूत बनवत होता. तिने दुकान अजून वाढवलं. दोन शिलाई मशीन घेऊन दुकानात कामाला दोन पोरं ठेवली.

हाती येणारा पैसा कुठे गुंतवावा म्हणून अडचणीत सापडलेल्या गरजूंना दामदुप्पट व्याजदराने कर्ज देण्याचा बेकायदेशीर सावकारी धंदा तिने वस्तीत सुरू केला.

मुळातच लक्ष्मीचा वरदहस्त नसलेल्या त्या वस्तीत आणि व्यसनांच्या विळख्यात अडकलेल्या लोकांसाठी कलावती 'मसीहा' ठरू लागली; परंतु मुळात कर्जाची मुद्दलच देऊ न शकणारी ती भणंग माणसे तिचे दामदुप्पट व्याज कसे फेडणार...??

___ मग वेळेत पैसे न देणाऱ्या कर्जदाराच्या घरातून एक - एक वस्तू उचलून आणून ती आपले पैसे वसूल करू लागली. थोड्याच दिवसात पूर्ण वस्तीवर तिने आपलं वर्चस्व स्थापन केले.

__ आता दत्तासुद्धा मेनकेचा नाद सोडून कलावतीच्या ताटाखालचं मांजर...?? नव्हे... ऐतखाऊ बोका बनला होता.

तिच्या सुरात सूर मिळवित तिचा नवरा कमी आणि गुलाम जास्त बनला होता.

एके दिवशी कलावती बाजारात गेली असता, तिच्यासमोर एक आलिशान कार येऊन उभी राहिली. कारमधून केसांना नखरेल झटके देत , चेहर्‍याला रंगरंगोटी केलेली एक स्त्री उतरली.

कलावती अचंबित होऊन त्या स्त्रीकडे पाहत राहिली. गाडीतून उतरल्यावर त्या स्त्रीच्या मागे ' मॅडम ...मॅडम' करत फिरणाऱ्या ड्रायव्हरला पाहून कलावतीने मनाशी काहीतरी ठरवले.

त्या स्त्रीचा डौलदारपणा , तिची ऐट कलावतीच्या मनावर ठसली.

आपल्याला पण वस्तीवाल्यांनी असंच 'मॅडम' म्हटले पाहिजे असं तिला वाटू लागले.

' कला मॅडम, कला मॅडम' असे स्वतःशीच पुटपुटत कलावती तिथून निघाली. तिच्या चेहर्‍यावर वेगळ्याचं आनंदाची लहर पसरली.

दुसऱ्या दिवसापासून तिने वस्तीत फतवा काढला की, तिच्या दुकानात येणाऱ्यांनी तिला आजपासून कलादिदि, , कलाताई, कलावैनी, कलाभाभी, कलाआंटी असे काहीही संबोधायचे नाही.

तिला आता सगळ्यांनी म्हणायचे 'कला मॅडम'..!!

__आणि त्या दिवसापासून तिला वस्तीत सगळे ' कला मॅडम ' म्हणू लागले. कलावतीच्या दहशतीने तिच्या तोंडावर जरी तिला सगळे ' कला मॅडम' म्हणत असले तरी तिची पाठ फिरताच फिदीफिदी हसत तोंडातल्या तोंडात तिला अर्वाच्य भाषेत शिव्या घालत असत, पण अगदी स्वतःलाच ऐकू येतील अश्या स्वरात...!

यदा-कदाचित चुकून जरी एखादी शिवी तिच्या कानावर पडली असती, तर मात्र त्यांची धडगत राहिली नसती हे ती माणसं जाणून होती. अश्यावेळी तुक्या आणि नारूचा चेहरा त्यांच्या डोळ्यांसमोर येत असे आणि मग मात्र त्यांची भीतीने गाळण उडत असे.

__तर त्याच कारण असं होतं की, एक दिवस कलावतीच्या दुकानासमोरच्या भिंतीवर कुणीतरी बाईचे नग्न चित्र काढून त्याच्यासमोर ' म' आणि ' भ' च्या बाराखडीतल्या शिव्या लिहून चित्रावर कलावतीचे नाव लिहून ठेवले होते.

ते चित्र पाहून कलावतीचं मुळातच भडक असणारं टाळकं जास्तच भडकलं. ते चित्र कुणी काढलं, ते गुन्हेगार तिने हाताखालच्या पोरांना कामाला लावून शोधून काढले. ते चित्र काढणारे तिच्यावर खार खाऊन असलेले पक्के गर्दुले असलेले तुक्या आणि नारू हे दोघे होते....!

___ आता आरोपी हातात सापडल्यावर त्यांना मोकळं सोडेल ती कलावती कसली..?? तुक्या आणि नारूला तावडीत पकडून त्यांचे कपडे फाटेपर्यंत तिने त्यांना चपलेने बदडून काढले. अख्ख्या वस्तीसमोर तिच्या पायासमोर नाक घासून माफी मागायला लावूनसुद्धा हवालदार काशीरामच्या हातात पाचशेची नोट कोंबून दोघांच्या पार्श्वभागावर समस्त वस्तीकरांच्या डोळ्यांसमोर पोलिसी दंडुक्याचे चार फटके मारून घेतले ; तेव्हा तिचा जीव शांत झाला.

माझे हात कुठपर्यंत पोहचलेले आहेत, तेव्हा कुणीही माझा नाद करायचा नाही अशी अप्रत्यक्ष धमकी तिने सगळ्या वस्तीकरांना नारू आणि तुक्याच्या निमित्ताने दिली.

शेवटी काय तर ... ' बळी तो कान पिळी' ह्या म्हणीचा अर्थ सगळ्या वस्तीकरांना आता प्रत्यक्षात समजू लागला होता.

_______________ XXX___________________

" क्या रे मुन्ना, इधर क्या कर रहा है तू..??"
दुकानासमोर रिक्षा घेऊन उभ्या असलेल्या आणि दुकानात कपडे खरेदी करण्यासाठी आलेल्या मुलींकडे हावरट नजरेने पाहणाऱ्या मुन्ना रिक्षावाल्याला कलावतीने खडसावलं.

कलावतीच्या दुकानात उभ्या असणाऱ्या मुलींना आपादमस्तक न्याहाळत बसलेला मुन्ना कलावतीच्या प्रश्नाने वरमला. तोंडातल्या पानाचा तोबरा बाजूला थुंकत हसत - हसत म्हणाला,

" रिक्षा खराब हो गई थी... कला मॅडम..!"

" दाखव कुठे खराब झाली तुझी रिक्षा..??" दुकानाच्या पायऱ्या उतरत खाली येत कलावती म्हणाली.

" अरे, आप क्यों आ रही है नीचे..??. मै देख लूँगा..!" रिक्षाजवळ येणाऱ्या कलावतीला पाहून मुन्ना चाचरत म्हणाला.
.
" बीवी की याद आ रही है क्या मुन्ना...?" मशेरीने काळे - पिवळे पडलेले आपले दात विचकत कलावतीने मुन्नाला हसून विचारलं.

तिच्या ह्या प्रश्नावर आपली चोरी पकडली गेल्याने मुन्ना उगीच लाजला... म्हणजे तसे भाव त्याने जाणूनबूजून चेहर्‍यावर येऊ दिले.

" लेके आ उसे यहाँ गाँव से..!"

"लाकर कहाँ रखूँ इतनी बडी फॅमिली को..??" मुन्ना निराशजनक आवाजात कलावतीला म्हणाला.

"पर क्या है ना कला मॅडम, यहाँ अकेले रहने में बहुत दिक्कते आती है..!"

" हाँ ... हाँ..पता है मुझे कितनी दिक्कते आती है तुझे..!" डोळे मिचकावित कलावतीने असे म्हटल्यावर मुन्नाच्या चेहर्‍यावर अजूनच लाजेचे भाव उमटले म्हणजे तसे भाव त्याने उगाच ओढून - ताणून चेहर्‍यावर येऊ दिले.

" दुसरी शादी कर ले यहाँ.. कोई अच्छीसी लडकी देख के..!"

तिच्या ह्या वाक्यावर मुन्ना टुणकन उडी मारून रिक्षातून बाहेर येत म्हणाला,

" आप भी कला मॅडम, मजाक उडाती है गरीब का..!"

."तो क्या हुआ..?? एक बिवी गाँव में रहकर बच्चों - बुढोकों सँभालेगी और दुसरी तुझे यहाँ संभालेगी..!! "
कलावतीने दात काढत मुन्नाची टिंगल उडवायला सुरुवात केली.

पण तिच्या ह्या बोलण्यावर मुन्ना भलताच गंभीर झाला. शेखचिल्ली सारखा स्वप्नरंजन करू लागला.

" सच मे ऐसा हो सकता क्या..?" त्याचे डोळे भलत्याच आशेने उजळले.

" कला मॅडम ,आप कुछ करो ना..!!" कलावतीच्या दुकानात आलेल्या मुलींवरून आपली लोचट नजर फिरवत मुन्ना म्हणाला.

आपल्या बोलण्याने गंभीर झालेल्या आणि विचारात पडलेल्या मुन्नाला पाहून कलावतीचे डोळे एका विलक्षण कल्पनेने चमकले.

आपल्या बायका - पोरांना शेकडो मैल दूर गावी ठेवून इथे पोटापाण्यासाठी एकट्या राहणाऱ्या पुरुषांच्या अडी - अडचणींची, गरजांची तिला जाणीव होती. त्या पुरुषांच्या गरजांचा आपल्याला कसा फायदा उचलता येईल ह्या विचारांनी तिच्या डोक्यात मूळ धरले. मुळातच लालसा भरलेले तिचे डोळे अजूनच लालची बनले.

" हाँ, करते मी काहीतरी..!" कलावतीने मुन्नाला असं म्हटले आणि नंतर ____

__ तिच्या कावेबाज मस्तकातले विचार सुसाट सुटले आणि मनाशी काहीतरी ठरवत ती दुकानात येऊन बसली.

__तेवढ्यात समोरून नशेत तर्र झालेला भोला रस्त्याने अख्ख्या वस्तीला शिव्या देत जाऊ लागला.

लटपटत चालणाऱ्या भोलाला पाहून कलावतीने त्याला आवाज दिला.

तिचा आवाज कानावर पडताच भोलाची चढलेली नशा एका झटक्यात उतरली.

" भोला, पैसा कब देगा मेरा..??" कलावती असे दटावल्या बरोबर ,

" देता हूँ कला मॅडम...!" असं अडखळत्या जीभेने म्हणत, लटपटत्या पायांनी त्याने तिथून पळ काढला.

व्याजाने पैसे देण्याचा सावकारी धंदा करणाऱ्या कलावतीकडून भोलाने पाच हजार रुपये कर्ज काढले होते ; झोपडीवर पत्रे टाकायला आणि झोपडीची दुरुस्ती करायला....!

खरं तर त्याच्या पोरीने आणि बायकोने पै - पै जमवून पाचाचे आठ हजार फेडले होते; पण ते फक्त व्याजच होते. मुद्दल तर अजून बाकी होती आणि ती वसूल केल्याशिवाय कलावती शांत बसणार नव्हती.

जुलूमी, बेकायदेशीर सावकारी कर्ज आयुष्यभर तरी आपल्याकडून फेडले जाईल की नाही ..अशी भीती भोलाच्या बायको - पोरीला वाटत होती.

नशेबाज भोलाकडून कर्जाचे पैसे कसे वसूल करणार ...?? ह्या पडलेल्या प्रश्नावर कलावतीच्या डोक्यात भलतेच विचार भ्रमण करू लागले.

दुसऱ्या दिवशी सकाळी कलावती भोलाच्या झोपडीच्या दारात हजर झाली.

तिला पाहून भोला सटपटला. त्याची रात्रीची नशा एका झटक्यात उतरली. आता ही जुलूमी बाई आपल्या झोपडीवर कब्जा करते की काय अशी भिती त्याला वाटू लागली.

" भोला, मै क्या बोलती ...!" कलावतीचा शांत आवाज ऐकून भोलाचे गळालेले अवसान परतून आले.

" हाँ, बोलो ना कला मॅडम..!"

" तेरी बेटी पिंकी की शादी करनी है क्या..??"

" हाँ, करनी तो है पर शादी के लिए पैसा कहाँ से लाऊँ मैं...??" भोला आपलं रडगाणे गाऊ लागला.

" एक लडका है मेरी नजर में..!"

" कौन...???" भोलाचे डोळे चमकले.

"मुन्ना रिक्षावाला ..!"

" पर वो तो पहले से शादीशुदा है..!!" भोला कलावतीच्या बोलण्याने चपापला.

" तो क्या हुआ..?? अच्छा कमाता है वो..!! एक बिवी तो गाँव में है.. दुसरी बिवी यहाँ रहेगी उसके साथ.. और ऊँपर से दहेज भी नही लेगा वो.. तू उसे दामाद बनाएगा तो तुझेही पैसा देगा वो..!" भोलाचा चेहरा न्याहाळत कलावती म्हणाली.

"क्या बात करती आप..??" भोलाच्या डोळ्यांसमोर पुष्पा दारूवालीची हातभट्टी दिसू लागली. त्याचे डोळे विलक्षण लालसेने चमकले.

भोलाच्या डोळ्यात दारूच्या नशेऐवजी आज पैशाची हाव दिसू लागली.

कलावतीने दाखवलेल्या लालूचने भोलाला आकाश ठेंगणं झालं. बसल्या जागेवरून टुणकन् उडी मारत तो कलावतीला म्हणाला ,

"तो आप ये रिश्ता पक्का समझ लो..!"

कलावतीच्या गळाला मासा बरोबर लागला.

दोन दिवसांनी एका सकाळी मोठ्या आशेने मुन्ना कलावतीच्या दुकानासमोर रिक्षा घेऊन उभा राहिला.

आज दुकानात वस्तीतल्या मुली दिसत नसल्याने निराशेने तो तिथून निघू लागला , तेवढ्यात कलावतीने त्याला आवाज देऊन दुकानात बोलावून घेतले आणि भोलाची मुलगी पिंकीशी लग्न करण्याचा प्रस्ताव त्याच्यासमोर ठेवला.

कलावतीचे बोलणे ऐकून मुन्ना जणू हवेत तरंगू लागला.

" पर एक शर्त है..!" कलावतीच्या ह्या बोलण्यावर " कैसी शर्त..??" असे म्हणत त्याने आपल्या केसांतून निराशेने हात फिरवला.

"लडकी के बाप को पंधरा हजार रुपये देने पडेंगे तुझे..!"

" क्या..??? पंधरा हजार..??" मुन्नाला ४४० वोल्टचा जबरदस्त झटका कलावतीच्या बोलण्याने लागला.

" हाँ, तो क्या फोकट में उसकी कुँवारी लडकी, तेरे जैसे शादीशुदा , दो बच्चों कें बाप को देगा क्या वो...??"

" वो तो है... पर इतने पैसे..?" पुन्हा एकदा मुन्नाने निराशेने केसांवरून हात फिरवला.

" अब वो तू जाने...!! "

" सोचता हूँ..!" असं म्हणत निराश मनाने मुन्ना तिथून चालता झाला.

___ तर इथे भोलाची मुलगी पिंकी दोन पोरांचा बाप असलेल्या विवाहित मुन्नासोबत लग्नास तयार नव्हती. तिने लग्नाला विरोध करताच भोलाने तिला प्रचंड मारहाण करत तिला झोपडीत डांबून ठेवले.

शेवटी नाईलाजाने पिंकी मुन्नासोबत लग्नासाठी तयार झाली. तसं पण बापाच्या दारूच्या व्यसनाला आणि घरातल्या दरिद्री जीवनाला ती कंटाळली होतीच.

दिवसभर लोकांच्या घरी राबून त्या टिचभर झोपडीत 'भुकेला कोंडा अन् निजेला धोंडाच' होता; त्यापेक्षा ' दगडापेक्षा वीट मऊ ' असा व्यवहारी हिशोब करत थोराड मुन्नाची दुसरी जोरू बनण्यास नाईलाजाने का होईना पण ती तयार झाली.

इथे मुन्ना ' उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग ' बांधायच्या तयारीला लागला होता. आपल्या मुलुखात जाण्यासाठी म्हणून वर्षभर राबून बँकेत जमा केलेल्या तीस हजारातले त्याने पंधरा हजार रुपये काढून कलावतीच्या हाती सोपवले.

आता वर्षभर तरी त्याला गावी जाता येणार नव्हते. तिथे बायका -पोरं मुन्नाची वाट बघत बसणार होते. वर्षा - दोन वर्षातून घरी येणारा पती आणि पित्यासोबत' चार दिन की चांदनी' करायला मिळेल ह्या आशेवर असलेल्या त्या भाबड्यांच्या आयुष्यात आता ' फिर अंधेरी रात ' अजून एक - दोन वर्ष तरी राहणार होती.

__ तर एकदाचे मुन्ना आणि पिंकीचे लग्न वस्तीतल्या मंदिरात कलावतीच्या साक्षीने पार पडले. मंदिरात लोचटपणे आपल्या मागे-मागे फिरणाऱ्या भोलाच्या हातात दोन हजार रुपये कोंबत, त्याला पुष्पा दारूवालीच्या हातभट्टीकडे इशारा करून दाखवत, हसत हसत कलावती भोलाला म्हणाली,

" जा ... भोला.. जा... जी ले अपनी जिंदगी..!!"

रात्री जागून पाहिलेल्या ' दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ' ह्या चित्रपटाची नशा कलावतीच्या डोक्यातून अजून उतरली नव्हती.

दिवस भराभर उलटत होते. कलावतीचे 'उद्योग - धंदे' तेजीत चालले होते. मुन्ना पिंकीचा संसारही सुरळीत चालला होता.

__ आणि अचानक एके दुपारी रडवेल्या, घामेजलेल्या चेहऱ्याने मुन्ना कलावतीच्या दारात आला.

कलावतीला जोर-जोराने आवाज देऊ लागला. त्याचा आवाज ऐकून दुपारची झोपमोड झाल्याने वैतागलेली कलावती दारात आली.

"काय झालं रे..? कशाला बोंबलतोस..?? " ती मुन्नावर भडकली.

"अरे कला मॅडम, वो पिंकी भाग गई....!!"

" किसके साथ..??" कलावतीला पण मुन्नाच्या बोलण्याने धक्का बसला.

" पिछली गली के राजू बेकरीवाले के साथ ..!!"

" तुझे कैसे पता...???" कलावतीने ओरडून विचारले.

" अरे, ये कागज रखके भागी है चुडैल..!" हातातला कागद कलावतीच्या तोंडासमोर धरत मुन्ना डोक्याला हात लावत कलावतीच्या घराच्या पायरीवर बसला.

मै अपने मर्जी से राजू के साथ जा रही हूँ....!!
हम एक दुसरे से बहुत प्यार करते है ....!!

फक्त दोन ओळीच्या हिंदीत लिहिलेल्या मोडक्या - तोडक्या अक्षरांवरून कलावतीने नजर फिरवली आणि तिने
पिंकीच्या नावाने एक सणसणीत शिवी हासडली.

"अब क्या करू मै..??" मुन्ना हवादिल झाला.

" अब क्या करेगा..?? अपने मर्जीसे गई है वो राजू के साथ..! तुझे भी नजर रखनी चाहिए थी ना उसके ऊँपर..!"

" पाव - बटर लेने जाती थी हमेशा उसके दुकान पर, मुझे क्या पता नागिन ऐसा धोका देगी...??!" कपाळ बडवत मुन्ना म्हणू लागला.

" आप कुछ करो ना , कला मॅडम..!"

" अब मैं क्या करु ..? वो तो अपने मर्जी से गई है ना..?

पण मग मुन्नाचे रडवेलं झालेलं तोंड पाहून त्याला म्हणाली,

" रडू नको आता मुन्ना, कुछ करती हूँ मै तेरे लिए...!"

त्याच संध्याकाळी कलावती आपल्या दुकानात कामाला ठेवलेल्या दोन दांडगट सहकाऱ्यांना घेऊन राजू बेकरीवाल्याच्या दारात उभी राहून त्याच्या घराचा दरवाजा जोराने वाजू लागली.

राजूने दार उघडताच त्याला धक्का देत ती सरळ आत घुसली.

" ए पाववाल्या , बता कहाँ छुपा के रखा है पिंकी को ...??"

"बाप का माल समझ रखा है क्या तूने...?? दुसरे की बिवी को भगाता है साला....??" असं म्हणत तिने राजूच्या कानफटात वाजवली.

झालेल्या गोंधळामुळे कोपर्‍यात लपलेली पिंकी थरथरत उभी राहिली.

" हम एक दुसरे से मोहब्बत करते है ..!" गाल चोळत राजू
म्हणाला.

"चुलीत गेली तुझी मोहब्बत ... और तू कमीनी, शरम नही आती क्या अपने पती को छोड के पराये मर्द के साथ भागती है..?? " पिंकीला हाताला धरून बाहेर खेचत कलावती कडाडली.

बिचारी पिंकी खाली मान घालून थरथर कापत रडू लागली.

" मुन्ना ने इसके बाप को पैसे दिए है इससे शादी करने के चक्कर मे.. अब मुन्ना का पैसा कौन वापस करेगा..?? तेरा बाप..?? "

" कितने पैसे देने है..?? " राजू चाचरत म्हणाला.

" पंधरा हजार..!"

" इतने पैसे तो नही दे पाऊँगा मै..!" राजू खाली मान घालत म्हणाला.

" तो तुझे क्या फोकट में लडकी मिलेगी..?? मुन्ना तो बोल रहा था की, वो अभी पुलिस के पास जाएगा.. ये चुडैल उसके पैसे लेके तेरे साथ भागी है... ऐसी कंम्प्लेट करेगा वो..!!" कलावतीच्या या बोलण्यावर दोघेपण प्रचंड घाबरले.. ते तिचे पाय धरून रडू लागले.

" ऐसा मत करो.... मै दे दूँगा उसे सारे पैसे..!"

"अब आया उंट पहाड के नीचे..!" कलावती हसत हसत म्हणाली.

___ तेवढ्यात कलावतीची नजर बाजूच्या टेबलवर पडलेल्या राजूच्या स्मार्टफोनवर पडली.

तिने तो फोन हातात घेतल्याबरोबर राजू चपापला.

" नया फोन है क्या..?" मोबाइल हातात घेत निरखत कलावती म्हणाली.

आता मोबाईलची मालकीण कलावती बनल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात येताच राजू चाचरत म्हणाला,

" अरे कला मॅडम, पिछले महिने हप्ते पे लिया है..!"

स्मार्टफोन मधले सीमकार्ड काढून बाजूला ठेवत कलावती राजूला म्हणाली,

" अभी मेरे पास रखती हूँ ये फोन, पैसा लेके आओ मुन्ना को देने के लिए ... फिर लेके जा ये तेरा मोबाइल.. क्यों हिसाब बराबर हुआ ना..???

" चला रे पोरांनो..!" असं सोबतच्या पोरांना म्हणत कलावती तिथून निघाली.

___ आणि तिच्या पाठी मागे हताश नजरेने राजू आणि थरथर कापत पिंकी पाहतच राहिले.

दुसऱ्या दिवशी सकाळीच मुन्ना मोठ्या आशेने कलावतीच्या दारात उभा राहिला.

" कला मॅडम , पिंकी वापस आती क्या..??"

" मुन्ना, अब मेरी बात ध्यान से सुन... पिंकी अभी वापस नही आयेगी ...अपनी मर्जी से गई है वो , तो हम भी कुछ नही कर सकते ..!! जवान छोरी है .. तेरे जैसे दो बच्चो के बाप के साथ खुश नही रह पाई होगी वो..!"

कलावतीच्या ह्या बोलण्यावर मात्र मुन्ना उसळून म्हणाला,

" क्यों कला मॅडम... क्यों नही आयेगी वो वापस मेरे पास...?? तो फिर मेरा पैसा वापस कर दो..!" मुन्नाला कलावतीच्या बोलण्यावर भयंकर चीड आली होती. त्याचा अहंकार डिवचला गेला होता.

" मेल्या मुडद्या, स्वतःची बायको स्वतःला सांभाळता येत नाही आणि वर माझ्याकडे पैसे मागतो..??" कलावतीची जीभ आता आपल्या मातृभाषेत मुन्नावर घसरली.

__ आणि हे बोलताना तिने जळजळीत नजरेने दत्ताकडे पाहिलं. तिच्या ह्या बोलण्याने आणि नजरेने गोरामोरा झालेला दत्ता गुपचूप आत पळाला.

" इतने दिन तो तेरे पास थी ना वो... बहोत लाड - प्यार से घूमा रहा था ना तू उसे.. .?? तेरा पैसा तो वसूल हो गया ना..?? " भात्यातून बाण निघावे तसे बोचरे शब्द कलावतीच्या तोंडातून निघू लागले.

कलावतीच्या वाग्बाणांनी घायाळ झालेला मुन्ना केविलवाणा चेहरा करून तिथून निघून जाऊ लागल्यावर त्याला थांबवत चेहऱ्यावर दयेचे भाव दर्शवित ती त्याला म्हणाली,

" सुन मुन्ना, अब मैं क्या बोलती.. बिवी - बच्चें, माँ-बाप के सिवा जिंदगी अधूरी है रे..!!. क्यों तू उस बेशरम पिंकी के पिछे भागता है...?? लेके आ यहाँ अपनी फॅमिली को गाँवसे ..!"

" इतनीसी तो रूम है मेरी... लाके कहाँ रखूँ उन सबको..??"

" अरे, वो सामनेवाला जुबेर अपनी रूम बेच रहा है चालीस हजार में... वो खरीदले तू..!"

" पर इतना पैसा______?"

मुन्नाचे वाक्य अर्धवट तोडत कलावती म्हणाली,..
" तो फिर मै किस काम की..?? उठा लो मेरे पास से पैसा... और सुन तेरे से ज्यादा ब्याज भी नही लूँगी मै..! बोल, क्या बोलता है तू..??"

खरं तर जुबरने कलावतीला खोलीची किंमत पंचवीस हजार रुपये सांगितली होती. खोलीच्या व्यवहाराचे काम सुद्धा तिलाच बघायला सांगितले होते; पण झटपट पैसा कमवायच्या लालसेने , लाड्या - लबाड्यांची आडवाट धरलेली कलावती एवढ्या सहजासहजी पंचवीस हजारात खोलीचा सौदा होऊ देणार नव्हती.

कलावतीच्या गोड बोलण्याने मुन्ना पुन्हा एकदा हवेत तरंगू लागला... त्याच्या ध्यानातच येत नव्हतं की, कलावती कडून घेतलेल्या कर्जाचे व्याज त्याच्याकडून भविष्यात कधीच फिटले गेले नसते आणि जरी व्याज फिटले असते तरी मुद्दल मात्र तशीच राहणार होती... कलावतीने त्याचं घर लुटेपर्यंत..!!

मुन्ना परत एकदा कलावतीच्या गळाला लागलेला मासा ठरला.

__ तर त्या दीन- दुबळ्या माणसांच्या वस्तीत कलावतीचे साम्राज्य भविष्यात असेच वाढत जाणार होते आणि आपल्या जुलूमी राजवटीने त्या साम्राज्याची ती अनभिषिक्त सम्राज्ञी बनून राहणार होती.... जोपर्यंत तिची जुलूमी सत्ता कुणी उलथवून टाकत नाही तोपर्यंत..!!

__ पण कुणीतरी... कधीतरी कलावतीला शह देऊन, तिचं वर्चस्व संपुष्टात आणेल अशी भाबडी आशा तिच्या हातून पिळवणूक होणाऱ्या वस्तीवाल्यांना वाटत होती मात्र.. आणि कधीतरी ती वेळ नक्कीच येणार होती..!!

शेवटी काय तर मनुष्य आशेवरच जगत असतो.. हेच खरं.. __आणि गरीब वस्तीवाले त्याला अपवाद नव्हते..!!!

____________________ XXX________________

समाप्त..!

धन्यवाद...!

©रूपाली विशे - पाटील
rupalivishepatil@gmail.com
__________________________________________
( टिप - सदर कथा काल्पनिक असून कथेचा वास्तविक जीवनाशी कुणाचा काहीही संबंध नाही. कथेत साध्यर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तसेच
कथेतील प्रसंगाची गरज म्हणून काही संवादासाठी हिंदी भाषेचा वापर केला आहे.)

_________________ XXX________________

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कथेतली कला हि फर्स्ट हाल्फ मध्ये आवडली आणि सेकंड हाल्फ मध्ये तिचा राग येऊ लागला। कथा मस्तच।

कथेची संकल्पना आणि लिहण्याची हातोटी उत्तम आहे... कथा आवडली... खूप छान लिहिता तुम्ही... असेच लिहित रहा...>>>>>> स ह म त.

पार्ट - २ जरूर येऊ दे . ज्यात कलेला शह द्यायला कोणीतरी उठून उभा राहिल। पिंकीला स्कोप आहे। पिंकीचे कॅरेक्टर डेव्हलप करा। आपल्या व आपल्या बापावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी पेटून उठलेली पिंकी।

प्रथम, अजनबी... प्रतिसादासाठी धन्यवाद..!!
उशिराने प्रतिसाद देतेयं त्याबद्दल क्षमस्व..!

अजनबी, जमलं तर हि कथा पूर्ण करेन.. डोक्यात तेव्हाच पुढचा भाग शिजला होता... पण मग मध्येच लेखनाचा उत्साह मावळला.

छान आहे कथा...! मस्तच !
पार्ट - २ जरूर येऊ दे . >>> हो, कला मॅडमचं पुढे काय होतं ते जाणून घ्यायची जाम उत्सुकता आहे...

Pages