अलिगढ - 'खाजगीपण' , 'समलैंगिकता' या विषयांवरील भाष्य करणारा प्रभावी चित्रपट

Submitted by सामो on 18 October, 2021 - 04:19

मायबोलीवरती 'अलिगढ' सिनेमाचा रिव्ह्यु शोधला. सापडला नाही. कोणाला माहीत असेल तर द्यावा. मी हा लेख तेथे कमेंट म्हणुन टाकेन. कारण २०१५ चा सिनेमा आहे. पण मी आत्ता पाहीला.
-------------------------------------------------------------------

https://m.media-amazon.com/images/M/MV5BZDUzYTRjMDAtNDkwMi00ZWY1LWI1OWEtM2VjY2NjNzNhOTRmXkEyXkFqcGdeQXVyMTExNDQ2MTI@._V1_FMjpg_UX1000_.jpg
.
काल 'अलिगढ ' हा सिनेमा पाहीला. सत्य घटनेवरती आधारित हा सिनेमा, मनोज बाजपाईने अक्षरक्षः भूमिकेचे सोने केलेला. सिनेमाची सुरुवातच धुक्याने वेढलेल्या एका शहरातल्या रस्त्याने होते. रस्त्यांवरच्या बल्बचा डिप्रेसिंग प्रकाश. एक हातरिक्षेवाला रिक्षा चालवत येतो. मागे मनोज बाजपाई अर्थात ' प्राध्यापक सिरस' बसलेले असतात. दोघे उतरतात व सिरस यांच्या घरामध्ये जातात. मग कट-कट-कट-कट सिरस यांच्या घरात दिवा चालू होतो-बंद होतो चालू होतो - बंद होतो. आपल्याला माहीत नाही खोलीत नक्की काय चालले आहे.
आता इतक्या रात्री रस्त्यावरुन अर्वाच्य गप्पा मारणारे, २ तरुण येतात व "या दोघांचे अजुन चालूच आहे वाटतं" वगैरे बोलत सिरस यांच्या घरात घुसतात. काही तरी गलबला होतो
आणि हा गलबला काय होता हे सिनेमात हळूहळू संथपणे उलगडत जाते. एका बाजूला प्रेक्षकांना गलबल्याचे कारण कळत जाते तर दुसरीकडे सिनेमाभर प्राध्यापक सिरस यांचे संवेदनशील, कविमन, हळवे व्यक्तीमत्व उलगडत जाते. प्रेक्षक, प्राध्यापकांच्या जीवनात, अधिकाधिक गुंतत जातो व जसजसे हे पात्र कळत जाते, प्रेक्षकांच्या घशात अक्षरक्षः आवंढा दाटून फक्त, ते त्या रात्री प्राध्यापक सिरस यांच्या झालेल्या विटंबनेमुळे. 'समलैंगिकता' या विषयावरच्या अतिशय संवेदनशीलतेने हाताळल्या गेलेल्या सिनेमांपैकी हा एक सिनेमा.
हा सिनेमा जितका 'समलैंगिकता' विषयाबद्दल आहे तितकाच 'मॉरल पोलिसिंग' अर्थात संस्कृतीचा ठेका घेतलेल्या मक्तेदारांविषयी आहे. तितकाच ' 'वैयक्तिक खाजगीपण' या विषयावर भाष्य करणारा आहे. अगदी लहान गोष्ट आहे - घरामध्ये २ भाडेकरु रहात आहेत. एक बाहेर गेल्यावरती, त्याची परवानगी न घेता, दुसर्‍या भाडेकरुने त्याची खोली वापरणे असो की दुसर्‍याच्या बेडरुम मध्ये शिरुन त्या व्यक्तीचे खाजगी क्षण कॅमेर्‍यात त्या व्यक्तीच्या नकळत टिपून घेणे असो.
प्रेम, आकर्षण यांची भाषा एकच आहे, वैश्विक आहे, मग ते 'भिन्नलिंगी' असो वा 'समलैंगिक' हेसुद्धा काही प्रसंगांतून हिंट केलेले आहे. हा आणि असा रिव्ह्यु तुम्हाला कुठेही मिळेले उदा - http://www.pahawemanache.com/review/aligarh-2016-review
.
पण आता मी कसे रिलेट केले ते सांगते -प्राध्यापक शिरस हा कविमनुष्य आहे. खूप संवेदनशील आहे. त्यांचे एक कवितेचे पुस्तक छापलेले आहे - 'पायाखालची हिरवळ'. ६४ वयाचा-एकटा रहाणारा-अंतर्मुख-कवि मनाचा आहे. त्यांचा कटुपणाही लाऊडली व्यक्त होतच नाही तर एक मूक आक्रोश, त्यांच्या बोलण्या-वागण्यात दिसत रहातो. मनोज बाजपाईचा हा अभिनय निव्वळ अफाट आहे. त्याचे डोळे, चालणे-बोलणे-उठणे-बसणे हाच आक्रोश आहे. कोर्टातही विचारले गेलेले प्रश्न 'मग तुमच्या पुरुष कोण होता?' ' ६४ व्या वर्षी लैंगिक सुखाची एवढी भूक?' - हे असे प्रश्न म्हणजे मानसिक बलात्कार आहे.
मला आवडलेला आणि ताकदवान वाटलेला एकच प्रसंग निवडण्यास सांगीतला तर मला तसे करता येणार नाही पण प्रयत्न करते. - एका पार्टीमध्ये सिरस गेलेले दाखवलेले आहेत. या पार्टीत कोण्या एका गाण्यावरती एक पुरुष लाजत , मुरकत नाचताना दाखविलेला आहे. ते गाणे, सिरस एन्जॉय करतात. काय अभिनय आहे मनोज बाजपाईचा.
एका वार्ताहाराची भूमिका केलेल्या, राजकुमार रावचा अभिनयही दमदार आहे, मनोज बाजपाईसमोर उभे रहाणे कोण्या ऐर्‍या गैर्‍याचे काम नाहीच.
नसेल पाहीला तर हा सिनेमा, जरुर पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्रपट पाहिला होता तेव्हाच. आवडलाही होता.
मनोज वाजपेयी बाप माणूस आहे. _/\_ >>>> +१
ही भुमिका काय किंवा 'हंगामा है क्यूं बर्पा'तली भुमिका काय , कुठल्याही भुमिकेचे सोने करतो , अफाटच रेन्ज आहे.

रिव्ह्यु छान लिहिला आहे. त्यामुळे मूव्ही बघायची उत्सुकता वाटते आहे. कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर आहे/ कुठे पहाता येईल?

छान, आणि धन्यवाद. मागेही वाचलेले याबद्दल तेव्हाही बघायचा राहिलेला, आताही बघायचे आहे मनात. पण एकटे बघायला आवडत नाही. कंपनी मिळाली तर बघतो विचारून.. मनोज वाजपेयी आणि राजकुमार राव या जोडीला एकत्र बघणे हेच एक कारण पुरेसे आहे माझ्यासाठी

हे प्राध्यापक सिरास मराठी साहित्याचे अभ्यासक/प्राध्यापक होते. नेमाड्यांच्या टिकास्वयंवरमध्ये त्यांचा उल्लेख येतो. सिरासांनी लिहिलेल्या कुठल्यातरी लेखावरून नेमाड्यांनी न पटल्याने त्यांच्या शैलीत बोचरी टिका केली आहे.
प्रो सिरासांनी आत्महत्या केल्यावर वर्तमानपत्रात बातम्या आल्या होत्या तेव्हा हा संदर्भ आठवला होता.

बरच ऐकलं होतं ह्या सिनेमाविषयी नि यूट्यूबवर "बेस्ट सीन" बघितला - फिलाडेल्फिया मधला टॉम हँक्स निष्कारण आठवला. सापडला तर बघते हा सिनेमा.

टवणे सर हा स्पॉयलर आहे का ?>> त्यांनी पाहिलेला नसावा, व्यासंग कौतुकात होऊन गेलं Wink

फिलाडेल्फिया आणि या चित्रपटात काही साम्य नाही.

मी सिनेमा पाहिलेला नाही. प्रो सिरास यांनी आत्महत्या केली अशी बातमी वाचलेली आहे. यात स्पॉइलर आणि व्यासंग कौतुक काय हे दोन्ही समजले नाही. प्रो सिरास या व्यक्तिबद्दल मला माहिती असलेला एक संदर्भ दिला. मी ट्रिविया जंकी आहे - त्यामुळे असले संदर्भ लक्षात ठेवतो.

२०१५ चा चित्रपट. आता कसले स्पॉयलर.
ती बातमी वाचल्याचं आठवतंय. त्यांना ज्यातून जावं लागलं त्याबद्दलही ते गेल्यावर किंवा कदाचित आधीच बातमी/ लेख रूपात वाचलं होतं.

या अशा विषयांबाबत उदासीन असल्याने सिनेमा पाहिला जाणार नाही. पण तुम्ही लेख छान लिहीला आहे. त्याचे कौतुक.

सिरासांच्या केस बद्दल (२००९/१० असणार) इन्डियन एक्स्प्रेसने नेटाने बातम्या/लेख छापले होते हे आठवते. बाकी मुख्य धारेतल्या वृत्तपत्रांपेक्षा एक्स्प्रेसने फर्म स्टँड घेतला होता. आर्टिकल ३७७च्या वेळी सुद्धा एक्स्प्रेसच्या संपादकीयात असाच फर्म स्टँड होता.
या बातम्या येत असतानाच्या काळात माझा एक मित्र आउट झाला होता. त्याने खुलेपणे स्त्रीयांसारखे मेकप, हावभाव वापरायला सुरुवात केली होती (एक प्रकारे तो स्वतःला प्रामाणिकपणे दर्शवू लागला). तो ट्रान्स नव्हता व आजही नाहिये. मला ते जेन्डर डिटेल्स इतके समजत नाही. एके संध्याकाळी आम्ही काही मित्र एकत्र जमलो होतो. त्यात हा मित्र व त्याचा पार्टनरही होता. विषय प्रो सिरासांच्या बातमीचा निघाला आणि बोलता बोलता असे जाणवले की ही दूर घडलेली घटना या माझ्या मित्राच्या आयुष्यात कधीही घडू शकते. आणि आम्ही सगळेच थोडे गप्प झालो बोलता बोलता (सायलेंस). त्याच्याकडून कधी कधी कशी हॅरासमेंट होते, घरात पण सपोर्ट मिळत नाही वगैरेही समजत असे.
त्यामुळे ही घटना/बातमी अजून ठामपणे डोक्यात आहे.

त.टी.:सिनेमा पाहिलेला नाही.

>>>>>>>ही दूर घडलेली घटना या माझ्या मित्राच्या आयुष्यात कधीही घडू शकते
Sad किती भयंकर आहे हे वास्तव.

या केसबद्दलही माहिती नव्हती आणि या चित्रपटाबद्दलही. इथे वाचल्यामुळे शोधून पाहिला.
खूप वाईट वाटलं. स्वतःला केवळ बहुसंख्येत मोडतो म्हणून 'नॉर्मल' म्हणवणारी माणसं किती सहज किती क्रूर वागू शकतात याला सीमाच नसते!
मनोज बाजपाई उत्तम अभिनेता आहेच - या भूमिकेलाही त्याने न्याय दिला आहे.
प्रा. सिरसांचा 'पायांखालची हिरवळ' नावाचा काव्यसंग्रह खरंच प्रकाशित झाला होता असं विकीवर वाचलं - आता तो मिळवता येतो का बघते.
या परिचयासाठी धन्यवाद.

अवांतरः काही काळापूर्वी मी 'आपण असू लाडके' नावाची छोटी लेखमाला लैंगिक अल्पसंख्यांकांबद्दल लिहिली होती. मायबोलीकर सिम्बा यांनीही काही अतिशय माहितीपूर्ण लेखन या विषयावर केलेलं आहे, त्यांच्या पाऊलखुणांत त्यांचे दुवे सापडतील.

Pages