Submitted by निशिकांत on 12 October, 2021 - 21:44
झोपडीचे स्वप्न होते, भोगतो आहे महल
भाग्यरेषांची कुणी केली अशी अदलाबदल?
सत्यवादी मी इरादे व्यक्त केले ज्या क्षणी
राज्यकर्त्यांनी समूहातून केले बेदखल
वाहुनी येतात खळखळ वेदना माझ्याकडे
राहतो मी ज्या ठिकाणी, भाग तो आहे सखल
कष्ट करतो वेगळा, पण सातबारावर तरी
शेत नाही पाहिले त्या मालकाचा का अमल?
काल मी होतो कुठे अन् आज मी आहे कुठे?
प्रश्न पडतो जीवनाची योजिली कोणी सहल?
भोगुनी लाखो सुखांना, दु:ख जेंव्हा भेटते
वाटते सारेच जीवन का असे झाले विफल?
गोठलेले भाव जेंव्हा वाहती डोळ्यातुनी
नेमकी साकारते कलमेतुनी माझ्या गझल
क्लेशदायी एकटेपण सांजवेळी टाळण्या
जीवघेण्या आठवांना लागते द्यावी बगल
उत्तरे ना गावल्याचे शल्य का "निशिकांत"ला?
होत असते का कधी सार्याच प्रश्नांची उकल?
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा