मायबोलीवर यायला लागल्यापासून मला काय बदल जाणवले-
तांत्रिक बदल सोडले तर फारसे काही नाही. नवेनवे आयडी आले, काही जुने आयडी आता लिहीत नाहीत, काही लिहितात, काही उडाले. पण एकंदरीत वातावरणात खूप असा बदल नाही जाणवत. मी स्वतः आधी फारसे प्रतिसाद द्यायचे नाही. पहिली सात-आठ वर्षं काहीच लेखनही केलं नव्हतं. आता प्रतिसादही देते, थोडंफार लेखनही करते. हा बदल माझ्यात नक्कीच झालाय. गप्पांच्या मात्र कुठल्याच पानावर मी फारसं कधी लिहिलं नाही. प्रत्यक्ष आयुष्यातही मी ’गप्पा’ अशा खूप कमी जणांशी मारते.
इथली कुठली सोय मला एकदम आवडली-
हव्या त्याच ग्रुपचं सदस्यत्व घेता येतं, नको त्या ग्रुपमधून बाहेर पडता येतं ही सोय खूप आवडते. संपर्कातून ईमेल करता येते हीसुद्धा खूप चांगली सोय आहे.
कुठली सोय मला कित्येक दिवस माहितच नव्हती-
असं काही आठवत नाही. सुरुवाती-सुरुवातीला आयडीवर क्लिक केलं की त्या आयडीचं बाकीचं लेखनही वाचता येतं, ही सोय लक्षात आल्यावर मोठाच आनंद झाला होता. ’वाहतं पान’ हा प्रकारही आधी कळला नव्हता.
गेल्या २५ वर्षात मायबोलीनं मला काय दिलं-
वाचनाचा आनंद तर खूप दिलाच. कौतुक शिरोडकर, बेफिकीर, दाद, अर्निका, अरिष्टनेमी आणि अशा किती तरी जणांचं दर्जेदार लेखन मायबोलीवर वाचायला मिळालं. इथे चालणार्या चर्चा आणि वादविवादांमध्ये मी फारसा कधी भाग घेतला नसला, तरी ते वाचून कधी मनोरंजन, कधी प्रबोधन, कधी मतपरिवर्तन झालं.
इथल्या किती तरी पाककृती आणि पाककृतींबद्दलचे बाकीचे धागे (माझं काय चुकलं, युक्ती सुचवा वगैरे) अत्यंत उपयोगी आहेत.
मी लिहायला लागल्यावर मिळणार्या प्रतिसादांमुळे अजून लिहिण्याचा आत्मविश्वास मिळाला, प्रोत्साहन मिळालं. लेखनावर चांगले प्रतिसाद आले की ’मन में लड्डू फूटें’ प्रकारचा आनंद होतो मायबोलीच्या मुखपृष्ठावर आपला लेख बघूनही असाच आनंद होतो. पुलंवरचा लेख लिहिताना मनात धाकधूक होती, जमेल की नाही अशी. पण त्या लेखावर जेव्हा चांगले प्रतिसाद यायला लागले तेव्हा जीव भांड्यात पडला.
इथे लेख लिहिल्यामुळे (आणि ललिता-प्रीतिने ते वाचल्यामुळे) मला पासवर्ड दिवाळी अंक आणि ’अनुभव’ या अंकामध्ये लिहिण्याची संधी मिळाली. ’वायर’ च्या मराठी साईटवरही अलीकडेच पक्षीनिरीक्षणावर लिहायला मिळालं, ते इथल्या पक्षीनिरीक्षणाबद्दलच्या लेखांमुळेच. एकंदरीत शाळेत लिहिलेल्या निबंधांनंतर थेट इतक्या वर्षांनी काहीतरी लिहायची सवय/आवड लागली. याच्यामागे मायबोलीसारख्या साईटवर कुणालाही लिहिता येतं, वाचकांचे थेट प्रतिसाद आजमावता येतात, ही सोयच कारणीभूत आहे.
मभादि संयोजनात भाग घेतला, तेव्हा एक नवीनच अनुभव मिळाला, मजा आली.
तुम्ही मायबोलीला काय दिलं-
काही ’दिलं’ असं नाही म्हणता येणार.
तुमचं कुठलं लेखन गाजलं-
कंपोस्टिंगवरचा लेख बर्याच जणांना आवडला, तो वाचून काहींनी घरी कंपोस्टिंग सुरू केले. सूत्रांतर, कुंडल या कथा, पुलंवरचा लेख, दोन चंद्र, नायिका महाभारताच्या हेही लेख खूप जणांना आवडले. होस्टेलमधल्या गमतीजमतींवरच्या धाग्याला मात्र बरेच प्रतिसाद येतील असं वाटलं होतं. माझे किस्से आवडले म्हणून नाही, तर लोक आपापले किस्से लिहितील म्हणून. पण तसे नाही आले.
कुठल्या लेखांनी तुम्ही मायबोलीकरांना गांजलं-
बहुतेक असं काही नसावं.
प्राचीन, शांत आणि संतुलित >>
प्राचीन, शांत आणि संतुलित >> नेहमी नसते नक्कीच!
हर्पेन, माउमैया, बिपिनसांगळे, धन्यवाद _/\_
वंदना, आवर्जून जाऊन कथा वाचन अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद!
Pages