श्वास मोकळा

Submitted by निशिकांत on 9 September, 2021 - 09:48

श्वास मोकळा तुझ्यासवे मी उडता उडता
आयुष्याची मरगळ जाते बघता बघता

तू असताना बारा महिने श्रावण रिमझिम
मोहरते मी मनी उमलते भिजता भिजता

तू येण्याची चाहुल येता, सुस्त दिवसही
पटकन सरतो दर्पणापुढे सजता सजता

मनात माझ्या तूच नांदसी, तू नसताना
अंतरात मी म्हणून बघते उठता बसता

आनंदाचा डोह जाहले जीवन माझे
गुदमर नाही मस्त वाटते बुडता बुडता

हट्ट कशाला जन्मकुंडल्या जुळवायाचा?
जुळून गेले नाते अपुले जुळता जुळता

चकोरास हा प्रश्न छळे, का कधी न त्याची
वाट पहावी चंद्रानेही ढळता ढळता?

शाश्वत असते दु:ख जीवनी प्रत्येकाच्या
नको भांडवल उगाच त्याचे जगता जगता

"निशिकांता" चल ध्येय एवढे ऊंच आहे की
हात असूदे हाती माझ्या चढता चढता

निशिकांत देशपांडे, पुण.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--अनलज्वाला
मात्रा--८+८+८=२४

Group content visibility: 
Public - accessible to all site users