
आम्ही नवीनच घर बांधलं होतं. घराला तारेचं कंपाऊंड. घराभोवती इकडून-तिकडून जमवलेली अन जिवापाड प्रेम करून वाढवलेली विविध फुलांची रोपटी. कॉलनीतील एखाद्या बंगल्याच्या आवारात एखाद्या कोपर्यात इतरांना काढता येणार नाहीत पण फक्त बघता मात्र येतील अशा पद्धतीने पॅशन फ्रुटचा वेल लावलेला असे. त्यावर फुलं अन पॅशन फ्रूटं लटकलेली असायची. त्याकाळी सुशिक्षित अडाणी जे की त्यांच्या कडे हा वेल नव्हता ते या फ्रुटांस 'फॅशन फ्रुट' म्हणायचे तर सुशिक्षित शिकलेले ज्यांच्या घरी तो वेल आहे किंवा होता असे त्या फ्रुटाचा वेल मिळवु पहाणार्या अडाण्यांना 'पॅ-श-न-फ्रु-ट' असं म्हणायला लावायचे. बघणार्याला या फ्रूटांबद्दल ऐकुन माहिती असायचं पण ती फ्रुटं मागायची कशी हाच मोठा प्रश्न असे. बंगलीतलं पब्लिक हे असं मागितलं तर कोणालाही पॅशन फ्रूटं देतील की नाही कोणास ठाऊक असं प्रत्येकालाच वाटायचं. कारण हे असं अनोळखी घरात जाऊन फ्रुटं मागणं जसा आपल्या स्टेटसचा प्रश्न आहे तसा तो त्यांच्याही स्टेटसचा प्रश्न असेल असं तेव्हा वाटायचं... आम्ही पॅशन फ्रूटाचं सरबत पितो अन तुम्ही लिंबाचं असा सरळ सरळ सामना . मग कधीतरी कोणाकडुन ती फ्रूटं घरी पोचायची अन कालांतराने त्या बंगलीतला वेलही नाहीसा व्हायचा.. तो का व कसा हे वेल लावल्यावरच कळालं . जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे असं म्हणतात ते काही उगाच नव्हे...!
.
जेव्हा पहिल्यांदा पॅशन फ्रूट आमच्या घरी पोचलं ते माझ्या चुलत आत्याच्या सुनेच्या माहेरातल्या मैत्रीणीच्या वडिलांच्या ऑफिसच्या मित्राकडून. कसे का होईना अप्रुप असलेल्या पॅशन फ्रूटचं एकदाचं घरी आगमन झालं तेव्हा मला फार आनंद झाला. वरून पिवळं-हिरवट रंगाचं, चमकदार-तुकतुकीत सालीचं ते फ्रूट बघितल्यावर मन अगदी शहारून गेलं. आजवर लिंबाचं सरबत पिणार्या आमच्या घरात आता पॅशन फ्रुटाचं सरबत मिळणार म्हणुन इतका आनंद झाला की त्याकाळी घराघरात असलेल्या लँडलाईन फोनवरून ही बातमी मी माझ्या मित्र अन चुलत-मावस भावंडांना सांगितली. शेवटी सरबताच्या ओढीने मी आईच्या मागे भुणभुण लावत ते पॅशन फ्रूट तिच्याकडून चाकुने कर्रर्रर्रर्रर्रर्र्कन कापुन घेतलं.. त्याचे दोन भाग झाले अन त्याकडे बघत "हे क्काय...???" असा प्रश्न पडला. फ्रूटाच्या आतला चमचा-दोन-चमचा पिवळट नारिंगी रंगाचा गिळगिळीत गर अन त्यात गुरफटलेल्या बिया बघितल्यावर आता याचं सरबत कसं करायचं असा प्रश्न आम्हा दोघांनाही पडला. फ्रुटात गच्च रस भरला असावा असं आधी वाटल्याने आता तो एवढास्सा गर बघुन घोर निराशा झाली. आईने तो चमचा-दोन-चमचा असलेला गर गाळणीतून नीट गाळुन घेतला. बिया वेगळ्या काढल्या अन गरात पाणी+साखर टाकुन सरबत केलं. एवढासा गर असलेल्या या फळाचं सरबत ३-४ लिंबांना थोबाडीत मारेल इतकं आंबट होतं. मग अजुन पाणी+साखर घालून ते कसंबसं संपवलं. चव बरी होती. फ्रुटांना बघितल्यावर फंटा, मिरिंडाची चव असेल असं वाटलं होतं पण ती तशी आजिबातच नव्हती.... घ्यायला गेलो गणपती अन मिळाला मारुती तसा प्रकार झाला.
सरबत करताना बिया बाजुला ठेवलेल्या होत्याच. आता आपल्याही घरामागच्या कंपाऊंडच्या तारेवर पॅशन फ्रुटं लटकलेला वेल दिसेल या कल्पनेने हुरळून जाऊन मी त्या बिया कंपाऊंड शेजारीच छोटा खड्डा काढुन पेरल्या. ७-८ दिवसात जमीनीतून वेलाचे पोपटी-हिरवे धुमारे बाहेर निघाले. ते इतके चपळ होते की थोड्याच दिवसात सळसळत त्यांनी अख्खी कंपाऊंड तार व्यापून टाकली. कंपाऊंड गर्द हिरव्या वेलीने पूर्ण झाकून गेलं. वेलीची ही प्रगति पहाण्याचं वेडंच लागलं. यथावकाश वेलीला कळ्या लागल्या म्हणेपर्यंत कृष्णकमळाची आठवण यावी अशी लव्हेंडर रंगाची फुलंही आली. फुलांचं निरिक्षण करेपर्यंत वेल पॅशन फ्रूटांनी लगडला देखील..! त्याकाळी मोबाईल फोन अन व्हॉट्सप-फेसबुक नव्हतं नाहीतर सेल्फी काढुन जगभर कौतुक केलं असतं. पण शेजार्या-पाजार्यांना अन मित्रांना ती लगडलेली फ्रुटं दाखवून का होईना वेलाचं कौतुक करून घेतलं. पुढे येऊ घातलेलं आक्रित त्यावेळी जसं आम्हाला कळलं नाही तसंच आमच्या शेजार्यांना अन मित्रांनाही..!
पॅशन फ्रूटं पटापट मोठी होऊ लागली. गर्द हिरव्या रंगाची फ्रूटं दिवसागणिक रंग बदलू लागली अन आधी गर्द हिरव्या रंगाची असलेली फ्रुटं नंतर पिवळसर पोपटी मग पिवळी मग पिवळट नारिंगी होऊ लागली. मी पटापटा पिकलेली फ्रूटं तोडून आईकडे सरबतासाठी हट्ट करू लागलो. २-३ वेळा आईने माझा हट्ट पुरवण्यासाठी सरबत करून दिलं खरं परंतु रोज इतकं आंबट आणि पित्तकारक सरबत पिणं केवळ अशक्य आहे याची जाणिव झाली.आल्या-गेल्या पाहुण्या-स्नेह्यांना सरबतं पाजून झाली. शेजार्यांनाही खास सरबतासाठी बोलावणं धाडुन निरोप देताना ५-६ टप्पोरी-पिवळट-नारिंगी पॅशन फ्रुटं देऊन त्यांच्याकडुन सुहास्य वदनाने कौतुक करून घेतले.
पहिल्या फटक्यात आलेली फ्रुटं अशाप्रकारे आम्हाला कौतुकात भिजवून गेली परंतु कंपाऊंडवरचा वेल काही केल्या फळे धारण करण्याचं थांबवेना. रोजच्या रोज असंख्य कळ्या-फुले-फ्रूटांनी वेल उतू जाऊ लागला. शिवाय रोजच्या रोज ८-१० फ्रूटं तरी पिकायचीच. झेंडु फुटल्यासारखं पीक येऊ लागलं अन आमची पाचावर धारण बसली. मग आम्ही ती ओळखीच्या माणसांना आग्रहाने देऊ लागलो. मी तर मित्रांना बोलावून त्यांना ती फ्रूटं न्या म्हणु लागलो. तरीही फ्रुटांचा रेटा काही केल्या शमेना. मग आमचे शेजारी, मित्रांचे शेजारी, शेजार्यांचे शेजारी असे करत रोजचा ताजा माल खपवू लागलो. शेवटी २-३ वेळा सरबत पिऊन आमच्यासारखे आमच्या फ्रुटांचे वाटेकरीही कंटाळले. आम्ही त्यांना "घ्या हो - घ्या हो" म्हणुन फ्रुटं देऊ केली की ते हात जोडून "नको हो - नको हो" करू लागले. आधी सुहास्य वदनाने कोड कौतुक करणारे आमचे शेजारी आता ओळखच दाखवेनासे झाले.. हाका मारल्या तरीही 'ओ' देईनासे झाले. पॅशन फ्रुटांची अशी दहशत बसल्यावर आपणाला अनोळखी लोकांकडून आपुलकीने फ्रुटं कशी काय बरे मिळाली असतील यामागचं गमक कळालं..!!
शेवटी जे व्हायचं होतं तेच झालं. फ्रुटांचं कौतुक संपलं अन त्याची जागा वैतागाने घेतली. वेलीवरून पॅशन फ्रुटं काढली जात होती तोवर पित्त प्रकोप हा शारिरीक त्रास सोडला तर इतर काही सामजिक त्रास नव्हता. पण आता फ्रुटांचं कौतुक सरल्याने फ्रुटं वेलीवरच पिकू लागली अन शेवटी गळून खाली टपकू लागली. टपकलेल्या पिकल्या फ्रुटांना भोकं पडून त्यातून आळ्या बाहेर पडू लागल्या. रोज १५-२० फळं खाली पडल्यामुळे कंपाऊंडपाशी आंबूस वास पसरू लागला.. चिलटं अन माशा घोंगावू लागल्या अन त्यामुळे आमच्यासहीत शेजारी-पाजारीही भयंकर त्रस्त होऊ लागले. त्याकाळी ओला-सुका कचरा न्यायला घंटागाडी येत नसे. पिकलेल्या फ्रुटांची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न आ वासून समोर उभा राहिला. अक्षरशः तोंड दाबून बुक्क्यांचा मार काय असतो याचा अनुभव मिळू लागला. आज मार खाल्ला निदान पुढच्या आठवड्यातील मार तरी चुकवला जावा या हेतूने मग वेलीवरची फुले तोडुन देवपुजेत, फुलदाणीत वापरू लागलो एवढंच काय निर्दयीपणे अगदी वेलीवरच्या कळ्या देखील खुडु लागलो. परंतु जिथं आभाळच फाटलं तिथं ठिगळ तरी कुठं लावणार..!
पॅशन फ्रुटांचा सोस संपला. यातुन कोणीतरी वाचवा असं म्हणण्याची वेळ आली. शेवटी घरच्यांच्या संमतीने वेलच छाटून टाकला. वाटलं आता सुटका झाली. पण कसलं काय अन फाटक्यात पाय..! छाटलेल्या वेलाच्या दणकट खोडातून पुन्हा एकदा जोमाने धुमारे फुटू लागले अन कंपाऊंड काबिज करण्याच्या ध्येयाने सळसळू लागले. ते कमी की काय म्हणुन पिकून खाली पडलेल्या फ्रुटांमधून जमिनीत पडलेल्या बियांनी रुजुन कंपाऊंडवर आक्रमण केले. ही काय आफत आली म्हणुन शक्य तितक्या गतिने नवीन रोपट्यांना मुळापासुन उपटायचा सपाटा सुरु केला. एका बाजुला आधीच्या वेलाचे धुमारे अन दुसर्या बाजुला नवीन उगवणार्या वेलींचा खांडवा अशा दोन्ही आघाड्यांवर डोळ्यात तेल घालून निपटारा सुरु केला. शेवटी आकाशपाताळ एक करून कसेबसे आमचे कंपाऊंड पॅशन फ्रूटाच्या वेलींपासून मुक्त झाले अन आमच्यासहित आमच्या शेजार्यांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला.
आमच्याकडे वानवळा म्हणुन आलेल्या पॅशन फ्रुटांनी आमचं जसं धाबं दणाणवलं तसं आम्ही वानवळा म्हणुन दिलेल्या पॅशन फ्रुटांनी कुणा-कुणाचं धाबं दणाणवलं असेल हा विचार करून अजूनही मनात अपराधीपणाची भावना येते...!
अगदी माझाच अनुभव लिहिला आहे
अगदी माझाच अनुभव लिहिला आहे तुम्ही.
प्रत्येक वाक्य न् वाक्य पटले.
एका फळासाठी वाटीभर साखर लागते इतके ते आंबट असते. ज्यांना फळे दिली त्यांची किलोभर साखरेची पण अपेक्षा असायची.
शेवटी वेल काढून टाकले. ..
सुरेख लेखन. पॅशन फ्रूटचं सरबत
सुरेख लेखन. पॅशन फ्रूटचं सरबत हे जगातल्या सर्वात सुंदर पेयांमधलं एक आहे. आमच्या घराजवळही पॅशन फ्रुटचा वेल होता. आम्ही सर्व लहान भावंडं कधी त्याला फळ येतं याची वाट पाहायचो. पॅशन फ्रूटच्या शेजारी रामफळाचा झाड होतं. रामफळाचं शिक्रण ही असेच सर्वांगसुंदर पेयं. रामफळ आणि आंबे साधारण एकाच वेळी पिकतात. आमच्या घरी रामफळाचं फॅन फॉलोविंग आंब्यापेक्षा जास्त आहे.
छान लिहिलीए
छान लिहिलीए
(No subject)
छान लिहिलंय!
छान लिहिलंय!
(No subject)
(No subject)
जरा घाईच केलीत वेल तोडण्याची
जरा घाईच केलीत वेल तोडण्याची , काही दिवस थांबला असतात तर माबो वरील आपल्या प्रेमळ चाहत्यांना मनसोक्त सरबत पाजून थंड करता आले असते किंवा 'फेकू'न मारता आले असते. लेख खूपच आवडला, आपल्या अशाच लेखनाच्या प्रतीक्षेत.
छान लिहले आहे.
छान लिहले आहे.
ह ह पु वा अनुभव लेख लिहिलाय.
ह ह पु वा अनुभव लेख लिहिलाय.
मजेशीर च एकदम.
मी मागच्या वेळी नर्सरीत हा वेल बघितला होता. छान फुलं ,फळं धरलेली. त्यात विकणारीने 4 लिंबाच्या बरोबरीने एक फळात सी व्हिटॅमिन वगैरे माहिती दिलेली तेव्हाच घ्यायचं पक्कं केलेलं. पण गाडीवर जागा नव्हती आणखीन रोपं घ्यायला. माझं लिंबाचं झाड सुकून गेलंय तिथं लावायचा विचार केलाय फुला फळा रंगाच्या मोहात पडून .
छान
छान

ही फळं बाजारात मिळत नाहीत का?
ही फळं बाजारात मिळत नाहीत का? फळवाल्यांकडे कोणत्या नावाने असतात? कधी दिसली नाहीत.
मजेशीर.
मजेशीर.
मी फक्त नाव ऐकलंय.अजून चव नाही घेतली.(आता घेईन असं वाटत नाही.)
सर्वांचे मनापासुन धन्यवाद.
सर्वांचे मनापासुन धन्यवाद.
वर्णिता, बाजारात ही फळे मिळत नाहीत म्हणुनच फळांच्या ऐकीव माहितीवर आप्रुप वाटतं. तुम्ही नक्की लावा हा वेल.. कदाचित तुमचा अनुभव वेगळा असु शकेल.. अजुन एक लेख वाचायला मिळेल.
मी-अनु, चव घ्या हो. एवढं काही वाईट नसतं. फक्त साखर थोडी जास्त टाका म्हणजे झालं.
व्हॅनिला ice cream त्यावर
व्हॅनिला ice cream त्यावर विविध प्रकारची फळ बारीक चिरून ( सफरचंद, केळ, द्राक्ष, बेरीज, आंबा) आणि त्यावर passion फ्रुटचा बीयांसह थोडा रस असं एक dessert आमच्याकडे उन्हाळ्यात खूप चालतं. त्या बिया मस्त लागतात. तेव्हढ्यासाठी आम्ही हे फ्रुट विकत घेतो.... प्रसंगी इतर फळांच्या तुलनेत जास्त पैसे देऊन
छान लिहिलयं!
(No subject)
दुष्ट शत्रूच्या शेतात 2 पॅशन
दुष्ट शत्रूच्या शेतात 2 पॅशन लिंबू मंतरुन टाकायचे,
मंतरुन टाकायला वापरायला हरकत नाही
एकुण पॅ श न फ्रु ट नावास
एकुण पॅ श न फ्रु ट नावास जागते असे दिसते. मिळेपर्यंत पॅशनची आग भडकत राहते, मिळाले की फुस्स्स्स....
छान लिहिलेय.
पुनश्च धन्यवाद
पुनश्च धन्यवाद
मस्त लिहिले आहे. जणू काही
खूप छान लिहिलंय,हहपुवा झाली :
खूप छान लिहिलंय,हहपुवा झाली :)D
छान लिहिल आहे. काही
छान लिहिल आहे. काही झाडांबद्दल होत अस. काढून टाकावी लागतात इतकी पसरतात. मी पॅशनफ्रुटचा लावलेला वेल पाणी साठल्याने गेला. त्यामुळे मला अजून अनुभव आला नाही. पण बर झाल कळल अस होत. आता आणून लावला तरी त्याचा पसारा होणार नाही याची काळजी घेता येईल.
सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.
@जागुकाकी : खरंय. आपले चांगले-वाईट अनुभव इतरांना मार्गदर्शक ठरू शकतात. नाहीतरी तुकोबांनी म्हटलेलंच आहे -
|| एकमेकां सहाय्य करु | अवघे धरू सुपंथ ||
भारी लिहिलंय. फळं दिसायला
भारी लिहिलंय. फळं दिसायला जबरी आहेत.
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
कृष्णकमळ म्हणजे हेच का?
कृष्णकमळ म्हणजे हेच का?
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
व्यत्यय : नाही कृष्णकमळ निळ्या-जांभळ्या रंगाचं असतं (लाल भडाक पण हल्ली हल्लीच पाहिलंय). त्याच्या वेलाची पाने पण नाजुक हिरवी असतात. त्या हिरव्या रंगाच्या पानांत निळ्या-जांभळ्या रंगाची कृष्णकमळे फार सुंदर दिसतात. परंतु, पॅशन फ्रूटाच्याच फॅमिलीतील असावे अशी दाट शंका. जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा.
Passiflora, known also as the
Passiflora, known also as the passion flowers or passion vines, is a genus of about 550 species of flowering plants, the type genus of the family Passifloraceae.
In India, blue passionflowers are called Krishna kamala (कृष्णकमळ) in Karnataka and Maharashtra,
विकिपीडिया वरून साभार
https://en.m.wikipedia.org/wiki/Passiflora
लई भारी DJ.......
लई भारी DJ.......
Pages