मनाची भूक भागली

Submitted by निशिकांत on 2 September, 2021 - 10:33

जरी सभ्यता माझ्यासाठी मृगजळ ठरली
पांघरून मुखवटा मनाची भूक भागली

स्फुल्लिंगांनो मान तुम्ही का अशी टाकली?
अन्यायाची चीड कुणाला कशी न उरली ?

चंगळवादी जगात भौतिक भूक वाढली
असून पैसा, वाट सुखाची कुठे हरवली?

तूच समजुनी तिला एकदा मिठी मारली##
लपाछपीच्या खेळाची मग ओढ लागली

राहतोस तू स्वर्गी, मृत्यूलोकी आम्ही
म्हणून देवा तुझी घोंगडी असे चांगली

रोज बातम्या ऐकत असतो जाणुन घेण्या
कुठली कुत्री कोणावरती कशी भुंकली

कैक योजना घोषित झाल्या, पूर्ती नाही
कुणा न ठावे माशी होती कुठे शिंकली

नकोच आता युक्तिवाद अन् बाचाबाची
मतभेदांना टाळायाची शपथ घेतली

"निशिकांता"च्या डायरीत बस वास सखीचा!
एक पान त्याचे! पण शाई तिथे सांडली

##ही ओळ प्रसिध्द गझलकार वैवकु यांच्या एका मिसर्‍यावरून सुचलेली आहे. हा खयाल त्यांचाच आहे.

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--अनलज्वाला
मात्रा--८+८+८=२४

Group content visibility: 
Public - accessible to all site users