Submitted by निशिकांत on 31 August, 2021 - 10:35
जीवघेण्या वेदनांचा अंत नाही
आपुल्यांनाही जराशी खंत नाही
रामही वैतागला असता जगी या
कैक रावण भोवती, हनुमंत नाही
शोधली वंदन कराया माणसे पण
व्यर्थ! दिसला एक प्रतिभावंत नाही
सहप्रवासी स्पर्श करता तिज कळाले
बैसला भगव्यात तोही संत नाही
गंध, रूपाचे फुलाच्या काय सांगू?
काल ताजे आज शोभीवंत नाही
जे करावे ते भरावे न्याय इथला
माफ करणारा जगी भगवंत नाही
घाम गाळुन भाकरी अन् शांत निद्रा
कोण म्हणतो? हा खरा श्रीमंत नाही
आरसाही का असा पदभ्रष्ट झाला?
दावले प्रतिबिंब तंतोतंत नाही
होरपळ "निशिकांत" आहे खूप बाकी
भोगले जे दु:ख ते अत्त्यंत नाही
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--मंजुघोषा
लगावली--गालगागा X ३
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा