इज़हार.. (संपी : भाग - ३६)

Submitted by सांज on 7 August, 2021 - 10:50

मस्त रोमॅंटिक वातावरणात दोघेही जवळपास भिजून सिंहगडावर पोचले. चोहीकडे हिरवळ, हाताशी येतील असे वाटणारे ढग आणि एकमेकांची साथ.. मंदार आणि संपी आज ढगातच होते.

‘भारी वाटतंय ना?’ गडावरचं धुंद वातावरण पाहून मंदार संपीला म्हणाला.

‘हो.. मस्तय! मी पहिल्यांदाच आलेय इथे..’

थोडं अंतर चालून गेल्यावर, मंदार संपीकडे पाहून म्हणाला,

‘लास्ट वीक ग्रुप सोबत आलो होतो इथे.. तेव्हाच ठरवलं होतं, एकदा तुला घेऊन यायचं..’

संपी जराशी हसली.

दोघेही मक्याचं कणीस खात एका दगडावर टेकले. पाऊस ओसरला होता. हलकंसं उन्हही मधून मधून डोकावत होतं.

‘मग अभ्यास काय म्हणतोय?’ मंदारने विचारलं.

‘चालूये..’ कणीस खात संपी म्हणाली.

‘नक्की ना.. नाहीतर बसशील पुन्हा dan brown नाईतर कोण ती तुझी सध्याची फेव्हरीट.. हं, गौरी देशपांडे.. घेऊन!’

कणीस बाजूला ठेवत संपी म्हणाली,

‘हाहा.. नाही, करतेय मी अभ्यास. उरलेल्या वेळात वाचते अधून-मधून. वेळ मिळाला तर. पण, bdw तुला काय एवढं वावडं आहे रे त्यांचं?’

‘मला? हाहा नाही तसं काही नाही..’

‘मग कसंय?’

‘वेल, फॉर यॉर काइंड इन्फॉर्मेशन, माझ्या कॉलेजमधल्या मुली माझं एटेन्शन मिळावं म्हणून काय-काय करतात. आणि तू बसतेस त्या पुस्तकांमध्ये डोकं खुपसून..’

‘मग देत जा की त्यांनाच एटेन्शन..’

‘हो का? देऊ का खरंच?’

‘दे की.. मला काय विचारतोयस’

‘संपदा, तू कधी सीरियस होणारेस गं?’

‘सीरियस म्हणजे?’

‘म्हणजे सीरियस.. अबाऊट एव्रिथिंग.. अबाऊट लाइफ..’

‘सी मंदार, आय’म सीरियस अबाऊट माय लाइफ. आता मला तीनच गोष्टी दिसतायत.. इंजीनीरिंग आणि त्यानंतर चांगल्या ठिकाणी प्लेसमेंट.. अँड आय’म वर्किंग फॉर दॅट नाऊ..’

‘या दोनच झाल्या.. तिसरी कुठली?’

‘त्या समोरच्या स्टॉलवरची पिठलं-भाकरी.. जाम भूक लागलीये. या तुझ्या स्वीट कॉर्नने काहीच झालं नाही.. हाहा..’

‘ओह गॉड.. संपदा, यू आर impossible!!’

‘आय नो..’ म्हणत संपी पिठलं-भाकरी घ्यायला गेली सुद्धा.

दोघांसाठी दोन प्लेट्स घेऊन ती परत आली.

स्वत:ची प्लेट हातात घेत मंदार म्हणाला,

‘अँड व्हॉट अबाऊट अस?’

‘अम्म?’ संपीचा घास तोंडातच अडकला, ‘व्हॉट... अबाऊट अस?’

‘मी तुला विचारतोय!’

‘मी काय सांगू.. तूच म्हणाला होतास की मी तुला आवडते..’

‘हो..’

‘आवडते म्हणजे नक्की काय..’

‘आवडतेस म्हणजे आवडतेस.. खूप आवडतेस. तुझ्यासोबत असलं की छान वाटतं.. तू कायम सोबत असावस असं वाटतं.. तुझं ते श्री आणि मयूर सोबत बोलणं सोडलं तर बाकी सगळंच आवडतं..’

‘हाहा.. पण मी बोलणं सोडणार नाहीचे त्यांच्यासोबत..’

‘यस.. आय नो दॅट अनफॉर्चुनेटली! आणि मी पण नाहीच सोडणार मैत्रेयीसोबत बोलणं..’

संपीने चमकून त्याच्याकडे पाहिलं,

‘नको सोडूस.. मला काही फरक नाही पडत.’

‘असं का?? बर...’ हसू दाबत तो म्हणाला.

‘हसू नकोस तू.. खरंच मला काही फरक पडत नाही.’

‘हाहा.. असुदे. तिचं साधं नाव जारी घेतलं तरी चेहर्‍यावर बारा वाजलेले असतात आपल्या..’

‘....’

दोघेही जरावेळ शांत झाले. हातातलं पिठलं-भाकरी पण संपलं होतं. संपीने sack मधून पाण्याची बाटली काढली. हात धुवून पाणी प्यायली. आणि बाटली मंदारला दिली.

दिवस कलला होता. गार वारा सुटलेला.

सुरुवात कोणी करायची या प्रश्नापाशी अडलेले दोघे काहीवेळ नुसतेच अवघडुन बसून राहिले.

काही वेळाने न राहवून मग संपीच म्हणाली,

‘ओके. बास आता. उठ आणि छान प्रपोज कर मला..’

‘काय?’ तो दचकून म्हणाला.

‘हो.. बस गुढग्यावर.. आणि विचार..’

‘काहीही.. आर यू सीरियस?’

‘हो.. damn serious.. माझी फॅंटसी आहे, जो असं गुढग्यावर बसून विचारेल त्यालाच मी हो म्हणेन..’

‘काय?? संपदा.. तू अ श क्य आहेस!’ मंदार हसत म्हणाला.

‘माहितीये मला.. उठ..’

मंदारने क्षणभर विचार केला आणि मग तो खरंच उठला. शेजारच्या कुठल्याशा वेलीवर उगवलेलं कुठलंसं फूल हातात घेतलं आणि संपीसमोर गुढग्यावर बसत, तिच्या डोळ्यांत पाहत म्हणाला,

‘संपदा, तू ठार वेडी आहेस हे मला माहितीये. But still I’m in love with your madness.. in love with ‘YOU’..’

नाही म्हटलं तरी आजूबाजूच्या चार चेहर्‍यांनी वळून बघितलंच.

संपी अवाक झाली होती. तो खरंच असं काही करेल, तिला वाटलं नव्हतं.

ती जागची उठली.

आणि ते फूल हातात घेत म्हणाली,

‘हम्म.. बरा बोलतोस तसा कधी-कधी..’

उभा राहत मंदार म्हणाला,

‘बास? मला गुडघ्यावर बसायला लावलंस. तू एकदा नुसतं तरी म्हण.. उत्तर दे.. you do or not?’

संपीने एकदा हातातल्या फुलाकडे पाहिलं, एकदा त्याच्याकडे आणि मग काहीच न म्हणता मान वळवून गालातल्या गालात हसली फक्त..

‘ओह माय गॉड.. लाजलीस तू चक्क?? बघू इकडे..’

चेहरा सावरत मग संपी त्याला म्हणाली,

‘गप्प बस.. चल आता उशीर झालाय.. अभ्यास आहे मला.’

आणि चालता चालता तिने हळूच तिचा हात त्याच्या हातात गुंफला..

मंदारने सुखावून तिच्याकडे पाहिलं. तिने त्या एका स्पर्शातून त्याला काय-काय सांगून टाकलं होतं..!

स्वल्पविराम.

(या कथा-मालिकेत आता वेळ आली आहे आणखी एका स्वल्प-विरामाची. कथेचा दूसरा टप्पा ३६व्या भागापाशी संपतो. आता इथून पुढची कथा पुन्हा काही दिवसांचा अवधी घेऊन पोस्ट करायला सुरुवात करेन.)

सांज
www.chaafa.com

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.
सांज, स्वल्पविराम घेण्यामागे काय प्रयोजन असतं?

सायो, थॅंक्स!
प्रयोजन असं खास नाही, थोडं थांबून पुढचं लिहलं की लिखाणात फ्रेशनेस येतो असा अनुभव आहे.
नाहीतर कथा उगाच रटाळ होण्याचा धोकाही असतो.. हे माझं वैयक्तिक मत!

सांज, खूप छान खुलवताय तुम्ही ही गोष्ट. मी सर्व पात्रांमध्ये गुंतत चालले आहे.
हा स्वल्पविराम पुढील कथेसाठी लाभदायक ठरू दे.

वा, कसलं सही proposal होतं! Cute1 Happy
तुमचा स्वल्पविराम लवकर संपू दे , आम्हाला उत्सुकता आहे पुढे काय होतंय ते वाचण्याची Happy

म्हणजे माबो second series संपून तिसरा series. Great. हो बरोबर आहे, थोड थांबून freshness येईल. उत्कृष्ट लिखाण..... पुढील series च्या प्रतीक्षेत

मस्त चाललीय कथा!
पावसात सिंहगडाची मजा काही औरच! nostalgia!

- मंदार Wink

खुप दिवसांपासुन वाचायची होती आज सगळे भाग एकदम वाचुन काढले, तुमची लेखन शैली मस्त आहे , पुभा लवकर टाका असं म्हण्णार नाही ☺ तुमच्या कलेने घ्या, फक्त ह्या कथेतलं magic तेवढ़ जावून देऊ नका

मस्त, आवडला प्रपोज
ते सिंहगडावर जातात तिथे स्वप्निल-मुक्ता, मुंबई-पुणे-मुंबई आठवले

पुढच्या भागाच्या / सीजनच्या प्रतीक्षेत Happy