‘’On Complementarity- Rationalist humanism rejuvenated ‘’ – राजीव साने

Submitted by भारती.. on 25 June, 2021 - 10:57
‘’On Complementarity- Rationalist humanism rejuvenated ‘’ – राजीव साने

‘’On Complementarity- Rationalist humanism rejuvenated ‘’ – राजीव साने

समकालीन आणि सर्वकालीन जीवनाच्या अत्यंत व्यामिश्र समग्रतेकड़े इहवादी , शास्त्रीय,तात्त्विक त्यातही तार्किक भिंगातून बघणं, त्या प्रकारची वैचारिकता सतत जोपासणं , वाढवणं ,प्रश्न विचारण्याची आणि समजून घेण्याची सवय एखाद्या धर्मप्रसारासारखी इतरांना लावायचा प्रयत्न करणे. आणि मुख्य म्हणजे यातून सिद्ध होणा-या आकलनाचा वापर व्यक्ती आणि समष्टीच्या समस्यांच्या निराकरणासाठी करणं.राजीव साने यांनी आपल्या लेखना-व्याख्याना-जीवनातून असा एक वैचारिक विकास अभ्यासक्रम आचरला आहे हे चिकित्सक मराठीजनांच्या परिचयाचं आहेच.त्यांचं नवीन इंग्लिश पुस्तक ‘’On Complementarity- Rationalist humanism rejuvenated ‘’ त्यांच्या वैचारिक प्रणालीचा प्रवाह मराठी भाषेच्या रिंगणाबाहेर अर्थात वैश्विक पटलावर घेऊन जात आहे .इसेन्स सीकर्स फाउंडेशनने प्रायोजित केलेले आणि नोशनप्रेस डॉट कॉम या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेले हे पुस्तक गेल्या वर्षी वाचकांच्या भेटीस आले आहे. विविध राजकीय-आर्थिक तत्त्वप्रणाली आणि मानवी इतिहासावर त्या प्रणालींचे झालेले परिणाम मनन करत तसेच डाव्या-गांधीवादी-समाजवादी-हिंदुत्त्ववादी या सर्वच विचारधारांच्या भांडवलशाहीवादी-विरोधी तसेच एकाधिकारशाहीवादी-समतावादी अशा निकषांशी विविध जोडण्या तपासत साने उजव्या समंजसपणापर्यंत आलेले आहेत,ही वैचारिक व्यवस्था त्यांनी अमराठी वाचकांसमोर ठेवली आहे. मराठी वाचकांनी हा कंटेंट जरी त्यांच्या विविध सदरांमधून, स्फुट लेख, ब्लॉग आणि पुस्तके यांतून वाचला असला तरी त्याची समग्र अशी बांधीव मांडणी त्यांना या इंग्रजी पुस्तकातून वाचायला मिळेल. तत्त्वज्ञानाचे अभ्यासक तसेच सानेंच्या लेखनाचे चाहते वाचक यांना हे पुस्तक याच कारणासाठी वाचनीय वाटेल.याशिवाय एका समकालीन मराठी विचारवंताने वैश्विक तत्त्वज्ञानसंचितामध्ये स्वयंप्रज्ञेने टाकलेली भर म्हणूनही या पुस्तकाची गौरवाने नोंद घ्यावीशी वाटते.

तत्त्वज्ञान मूलत: माणसाच्या अस्तित्वाचं प्रयोजन शोधतं. एकूण सृष्टीच्या व्यवस्थेत त्याचं स्थान आरेखित करतं आणि परस्परसंबंध – माणसाचे माणसाशी तसेच माणसाचे सृष्टीशी – कसे असावेत याचं दिशादर्शन करतं .आजवर अनेक विद्वान आणि कृतीशील विचारवंतांनी पूर्वसूरींच्या अभ्यासाबरोबरच आपल्या जगण्याची प्रयोगशाळा करून आपापले सैद्धांतिक आकलन सिद्ध केले. साने यांनीही हाच रस्ता चोखाळला आहे.

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि आता एकविसाव्या शतकाची एकविशी उलटत असताना तत्त्वज्ञानक्षेत्रात एक प्रकारचा झाकोळ दाटलेला आहे. दोन महायुद्धं, दहशतवाद,महासत्तांमधील शीतयुद्धं,आर्थिक मंदीसारखी संकटं, विज्ञान-तंत्रज्ञानविकासातून उभे राहिलेले नवनवे सामाजिक सांस्कृतिक प्रश्न आणि आता करोनासारख्या जागतिक महामारीची भर,अशा मोठमोठ्या प्रश्नांचे ब्रह्मराक्षस आ वासून समोर उभे असताना सामान्य माणसाचा तात्त्विक कणाही मोड़ण्याचं कामही जर चक्क तत्त्वदर्शनातूनच होत असेल तर जगण्याचा आधार म्हणून काय शिल्लक राहील ?

साने अशी निराश आणि नकारात्म , अस्तित्वाला अनाथ करून भवअरण्यात सोडून देणारी दर्शने मुद्देसूदपणे निरास्त करतात आणि एका अदम्य अशा आशावादाचा पुरस्कार करतात. माणसांच्या परस्परपूरकतेवर त्यांचा भर आणि विश्वास आहे. हिंसा,गळेकापू स्पर्धा, मत्सर आदि नकारात्म भावनांचं सुयोग्य ‘रीतीं’चा अवलंब करून नियोजन आणि त्यातून शक्य तितकं निर्मूलन यावर आधारित अशी मांडणी ते सर्व कोनातून उभारत नेतात.विचारांचं एक सुडौल आणि सुन्दर स्थापत्य ते उभं करतात जे जगण्यात रसपूर्णता आणि अर्थवत्ता निर्माण करू इच्छितं.

या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणाचा परामर्श घेणे सर्वार्थाने मला कठीण आहे कारण त्यात मूळ संपृक्त अशा सिद्धांतांचं फारच सुलभ सपाटीकरण होऊ शकतं तरीही थोडासा प्रयत्न करत आहे.

पहिले प्रकरण ‘’Proper Human Pursuits’’ अर्थात जीवनाची यथायोग्य श्रेये किंवा जुन्या मांडणीतील पुरुषार्थ,जे साने नव्या परिप्रेक्ष्यात मांडतात. रसपूर्णता, उद्योगशीलता, (व्यक्ती)स्वातंत्र्य-रक्षण/नियमन, न्याय, औदार्य, हृद्-संवाद ,शांती आणि शेवटी आनंदसाधना अशा आठ श्रेयांचा ते आग्रह धरतात.या श्रेयांचा जीवनात विकास करताना उद्भवणारे संघर्ष ,अंतर्विरोध यांचाही अभ्यास अनुषंगाने येतो. विशेषत: शेवटच्या श्रेयाच्या आध्यात्मिक संदर्भापेक्षा वेगळं असं इहवादी स्पष्टीकरण ते देतात.या श्रेयांची वाढ परस्परपूरकतेने केली जाऊ शकते असं ते प्रतिपादन करतात.

यानंतर दुसरे प्रकरण नवनीतिशास्त्राची चर्चा करते.. दुःख न देणे ही अहिंसा, सुख देणे म्हणजे समृद्धीचा पाठपुरावा आणि कर्तव्यदक्षांची परवड होऊ न देणे म्हणजे न्याय ही मुख्य नीतीतत्त्वे .ही समाजात प्रत्यक्षात येण्यासाठी व्यवस्थेतच अंतर्भूत केलेल्या सुधारणा (रीती ) असतील तर परस्पर अयोग्य गोष्टी कशा टाळता येतील हे साने सोदाहरण दाखवून देतात.

तिस-या प्रकरणात न्यायाची यथार्थता विश्लेषित केली आहे. यात व्यक्तीगत सुभाग्य, दुर्भाग्य , व्यक्तीचे गुणविशेष या घटकांचा सर्वंकष विचार करून मग अन्यायाची संकल्पना तपासून घेतली तरच संघर्षाला न्याय्य अर्थ प्राप्त होतो हा विचार तपशिलाने मांडला आहे.यात अतार्किक अशा नकारात्म भावना छाटून टाकून अन्यायाची चिकित्सा व प्रतिकार कसा करता येईल याचा संतुलित विचार केला आहे.

चौथ्या प्रकरणात लोकशाहीत सत्ता आणि बहुजनवाद आणि मग अनुनय यातून निर्माण होणारी परिस्थिती जिच्यात अनेकदा बेजबाबदारांना लाभ आणि जबाबदारी घेणा-यांना मात्र त्रास होतो यावर सानेंनी भाष्य केले आहे. डाव्या विचारसरणीत बहुजनांच्या हक्कांचा जेवढा विचार होतो तेवढा कर्तव्यांचा होत नाही. यातून समूहांची अप्रगल्भता वाढीस लागते .हे एक सामाजिक दुष्टचक्र कसे आहे आणि त्यावर उत्तरदायित्ववाद जोपासून कशी उपाययोजना करता येतील हे सुचवले आहे.राजकीय तत्त्वज्ञानक्षेत्रात उत्तरदायित्ववाद ही संकल्पना आपण पहिल्याप्रथम मांडतो आहोत असे साने म्हणतात.अस्मितेच्या राजकारणाचाही यात उहापोह आहे.हे उत्तरदायीत्व स्वत:शी, स्वत:बरोबर निरनिराळ्या प्रकट अप्रकट करारांनी बांधल्या जाणा-या इतरांशी आणि मग सर्वांशी अशा तीन स्तरांवर निभावायचे आहे.यातून एका नव-सर्वोदयाचा विकास होईल असे सानेंना वाटते.

पाचवे प्रकरण मूल्यशास्त्रचर्चेत रॅशनॅलिटी व रीझन यांचा निकोप आणि जबाबदारीने वापर करण्याविषयी आवाहन करते.सोशल माध्यमांवर चाललेल्या एकांगी चर्चा शेवटी दुराग्रही किंवा पूर्वग्रहदूषित ठरून वाचिक तसेच प्रत्यक्ष हिंसकतेच्या दिशेने जात असताना रॅशनॅलिटी व रीझन म्हणजेच बुद्धीप्रामाण्याचा खरा अर्थ आणि मर्यादाही समजून व्यापक विवेकाचा सौम्य स्वर जपणे , प्रतिपक्षाचा आदर करणे सर्वच स्तरातील लोक विसरत चाललेले आहेत. अशा वातावरणात सानेंच्याच शब्दात ‘’ सिद्ध करण्याची जबाबदारी, सिद्धता सदोष नसण्याची जबाबदारी, खोडून निघालेले म्हणणे मागे घेण्याची तयारी, नव्या शक्यतांसाठीचा खुलेपणा हे सर्व ‘जबाबदारपणा’चाच चर्चाविश्वातील अविष्कार आहेत. तसेच इतरांच्या स्वातंत्र्याच आदर हेच मूलतत्त्व अहिंसेमागेही आहे.’’

इथून पुढे सहा ते अकरा या प्रकरणांमध्ये साने समकालीन विचारविश्वातील अनेक प्रचलित सैद्धान्तिक व्यूहांचे साधार खंडन करतात. ‘ऐसी अक्षरे’ दिवाळी अंकात (२०१५) प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘’संप्राप्ते नैच्छकलहे ‘’ या लेखाची आठवण अनेक चोखंदळ वाचकांना असेलच. तेच विचार या प्रकरणांमध्ये विस्ताराने आले आहेत. सहाव्या प्रकरणात तोच धागा पुढे नेत साने जड़वाद विरुद्ध जाणीव संवेदनांचे जग अशी जी कृत्रिम विभागणी ज्ञानशाखांमध्ये झाली आहे,त्या अनुषंगाने अनेक जुन्यानव्या सिद्धान्तांचा मूलगामी उहापोह करत पुढे जातात तेव्हा अनभ्यस्त वाचकाचा नक़ळत एक धावता अभ्यास होऊन जातो हा आणखी एक फायदा.सत्य आणि आभास हे संवेद्य म्हणून सापेक्ष आहेत याकारणाने विशेषत:: चिद्वादाची सत्ता नाकारणे हे सातत्याने तत्त्वज्ञानअभ्यासात घडत आहे.

मानवी मन,त्याचे जाणीव-नेणीव, बुद्धी,स्मरणशक्ती,साक्षीभाव आदि अनेक विशेष, समूहमनात व्यक्तीमनातील संचिताची होणारी साठवण हे सर्व आज Arificial Intelligence च्या काळात नाकारले किंवा दुय्यम समजले जात आहे. एकीकडे मज्जातंतूविज्ञान वेगाने विकसित होत असताना हा असा पवित्रा अनिष्ट आहे.वैचारिक आदानप्रदानात यथार्थ संवादिता जोपासून नवनव्या सिद्धांतांची सांगड घालून मगच पुढे गेले नाही तर सर्वनिर्मूलवादी निराधार करून सोडणा-या अशा आधुनिकोत्तर प्रणालींच्या आहारी तत्त्वचर्चा जातील याची खोलात जाऊन साने चिकित्सा करतात.मनोवृत्तींच्या वर्गीकरणात भारतीय संकल्पनांचा या अभ्यासात यथायोग्य अंतर्भाव आहे.

सातवे प्रकरण ‘’ आपण निवड करणारे असतो हे सत्य नाकारून काहीच साधत नाही. बाह्याला कसे हाताळायचे एवढ्यातच अडकून पडलेल्या बुद्धीने जेव्हा मानवी इतिहास ही सुध्दा बाहेरून घडविण्याची यांत्रिक गोष्ट असे पहायला सुरुवात केली तेव्हा फारच मोठा घोटाळा झाला व हा घोटाळा म्हणजे मार्क्सवाद!’’ या विधानापर्यंत येते.

मार्क्सवादावरील साने यांचे चिंतन प्रदीर्घ आठव्या प्रकरणात येते.मार्क्सचा काळ आणि त्याच्या आकलनातील मूळ विसंगती, त्रुटी , रशियन क्रांतीनंतर इतिहासाने शिकवलेले धड़े आणि चीनमध्ये कम्युनिस्ट विचाराने घेतलेली सम्पूर्ण वेगळी वळणे यातून हाती आलेले निष्कर्ष आणि मार्क्सवादाचे मार्क्सनंतरचे नवे पंडित याचाही अभ्यासपूर्ण आढावा पुढे येतो.

नववे प्रकरण समतेच्या नावाखाली पसरलेल्या अंधश्रध्दा आणि अनिष्टता यावर आहे. तथाकथित सामाजिक समतेवर जसा त्यांचा विश्वास नाही तसाच अंतिम परिपूर्ण सत्यावरही नाही हे सानेंच्या लेखनातून अनेकदा स्पष्ट झाले आहेच. समता या शब्दाचे व्यावहारिक अनेकार्थ आहेत.इथे समतेच्या चक्क एकतीस अर्थांची यादी आणि त्यातून निर्माण होणारे घोळ , तार्किक विसंगती यांची ससंदर्भ चर्चा आहे.‘’खरे तर समतेऐवजी दारिद्र्य निवारणाला अग्रक्रम दिला पाहिजे. विषमता असतानाच एकूण उत्पन्न वाढल्याने जे देश दारिद्र्य-लोकसंख्या दुष्टचक्रातून बाहेर पडले त्या देशात नंतर श्रमिकांची सौदाशक्ती वाढत जाऊन आर्थिक विषमता कमी झाली असाच सर्वत्र अनुभव आहे.’’ हा या निरीक्षणांचा लेखकाच्या शब्दात निष्कर्ष आहे.

दहावे प्रकरण तथाकथित जहालमतवादाचा समाचार घेते .जहाल आणि म्हणून स्वत:ला क्रांतीकारी म्हणून घोषित करणारे वास्तवाच्या पटावर कोणत्या मार्गाने जातात याचे शास्त्रशुद्ध विश्लेषण करतात. जी काही दुरिते आपण मानतो ती आधी मानवाच्या मनातच दृढ़मूल असल्याने बाह्य जगात बूर्ज्वा आणि प्रतिक्रांतीकारी विचारांच्या लोकांचे उच्चाटन हा कार्यक्रम फसवा ठरतो. जहालांना व्यापक जनादेशही नसल्याने हे युद्ध शेवटी विचार आणि विवेक यांनाच शत्रु ठरवण्यापर्यंत जाते. अशा प्रकारचे जहाल मतवाद वैचारिक जगात सर्वनिर्मूलवाद माजवतात.

अकराव्या प्रकरणात याच पार्श्वभूमीवर गेल्या शतकात आधुनिकोत्तर या लेबलाखाली जी बेजबाबदार वैचारिक धूळधाण नीत्शेपासून सुरू झाली तिचा जोरदार प्रतिवाद साने करतात.’’ नीतिशास्त्र हा दुर्बलांनी सबलांविरुध्द केलेला कट आहे. सापेक्षतावाद म्हणजे काहीही योग्य असू शकते निकष देताच येत नाही, उत्कटतेने जगताना हिंसा, क्रौर्य काहीही अवलम्बले तरी चालते’’ -असे विचार नीत्शेने प्रसारित केले ज्यात एक प्रकारची भड़क आकर्षकता होती.डार्विनच्या सिद्धान्ताचे सोयीने अर्थ लावले गेले.ख्रिस्ताच्या करुणेने निर्बल लोकांना अभय दिले नाहीतर हे जग बलवंतांचेच आणि सत्ताधारी लोकांचेच होते असा सन्देश देणारा नीत्शे वैचारिक क्षेत्रातील फासिस्ट मनोवृत्तीचे प्रतीक आहे.

अस्तित्ववाद हा महायुद्धोत्तर संभ्रमकालात जन्मला,जोपासला गेला. हायडेग्गरची बीइंगची चर्चा आणि त्या प्रभावाखाली सार्त्रने केलेली दिशाहीन अस्तित्ववादी मांडणी यांचे फोलपण साने तर्कशुद्धतेने करतात . देरिदाचा विरचनावाद- ज्यात भाषेद्वारे चिन्हव्यवस्थेचीच सत्ता मानवी व्यवहारात चालते असे प्रस्थापित करून अर्थपूर्णतेलाच फाटा देण्याचा प्रकार केला आहे , ल्योतारने सर्वच वैचारिक वादातील प्रामाण्यसाधने त्या त्या कालाच्या, परिस्थितीच्या एका महाकथनाचा – narrativeचा भाग असतात असे प्रतिपादन केले व वादांचा आत्माच काढून घेतला तर फूको वैचारिक चर्चेतील discourse म्हणजे संवादाची परिभाषा कशी अस्तित्वात आली, तिच्यात कोणत्या सत्तासमूहांचे हितसंबंध आहेत आदि व्युत्पत्तीशास्त्रीय आणि ऐतिहासिक भागावर लक्ष केन्द्रित करून चर्चाविषयापासून वेगळ्या दिशेला आपले प्रतिपादन नेतो,आणि त्याद्वारे सार्विक मानवी असे काही नसतेच असा निष्कर्ष काढतो..एकूण पायांखालची जमीनच काढून अधान्तरात वावरणारे असे एक वैचारिक विश्व क्रमश: अस्तित्वात आले. या सर्व वरवर व्युत्त्पन्न दिसणा-या सिद्धांतांमधून एक प्रकारचे वैचारिक अराजक वास्तवात अपयशी ठरलेल्या जहाल मंडळींनी विद्यापिठीय क्षेत्रात माजवले आहे याचा साने निषेध करतात.स्त्रीवादातील अतिरेकांचा यात समावेश होतो. एकूण बुद्धीप्रामाण्यापासून बुद्धीभेदापर्यंतच्या या प्रवासातील धोके ते दाखवून देतात. तसेच कट्टर-पर्यावरणवादी ‘’मानवेतर निसर्ग बरोबर असून मानवच चुका करत आहे व म्हणून आदिम रचनेकडे परतीचा प्रवास केला पाहिजे आणि प्रगतीला विरोध केला पाहिजे’’ या मतप्रवाहाचे खंडन करून आधुनिकतावादच पुढे नेला पाहिजे हे साने नोंदवतात..

बाराव्या प्रकरणापासून साने वैचारिक विश्वाला स्वत:चे योगदान देतात. डायलेक्टिक्स म्हणजे विरोध विकासवाद यावर अगदी प्लेटोच्या कालापासून अनेक तत्त्वज्ञांनी विभिन्न आशयाचे विचारमंथन केले आहे.हेगेल्सने ते तंत्र पारलौकिक अर्थाने वापरून ‘स्व’च्या चेतना-जाणीवेचे विकसन बीइंग-नथिंग-बिकमिंग च्या पसरत जाणा-या तरंगांमधून विवेचिले होते. डायलेक्टिकल थिंकिंगमधील पारलौकिक भाग वगळून एंगल्स व माओ यांनी वेगवेगळ्या अर्थाने डायलेक्टिक्स हा शब्द वापरला. या सर्वाचे विस्ताराने अर्थ परिशिष्टात देऊन साने विरोधविकास ही एक विभिन्न विचारांची तसेच वास्तवातील जोड्यांची एकमेकाना सामावून घेऊन संतुलन साधण्याची परिस्थिती मानतात. त्यांच्या शब्दात ‘’ जेव्हा कोणत्याही दोन गोष्टी एकमेकीच्या जोडीनेच येतात, त्यांच्यात एकमेकीशी विरोध वा स्पर्धा देखील असते पण त्याच वेळी त्या जर योग्य प्रमाणात राहिल्या तर एकमेकीना पूरकच ठरतात अशा जोडीला लेखक डायलेक्टिकल-पेअर म्हणतो.’’ असे स्पष्टीकरण ते देतात. यात सखोल पांडित्यपूर्ण विवेचन ,तसेच अनेक अनेक सामान्य व्यवहारातील उदाहरणे येतात.यातूनच एक सार्वत्रिक हितवाद जोपासला जाणे शक्य आहे अशी त्यांची धारणा आहे. हा एक प्रकारचा इहवादी आस्तिक्यभाव आहे.

तेरावे प्रकरण मूल्यशास्त्र आणि नैतिकतेतील मूल्यमापनप्रक्रियेची चिकित्सा करते. ‘’समता’ या संकल्पनेप्रमाणे मूल्य याही संकल्पनेचे अनेक व्यावहारिक आणि विविध ज्ञानशाखांमध्ये प्रचलित असलेले भिन्न संदर्भ आहेत.मूल्याची सापेक्षता अनेक उदाहरणे देत साने स्पष्ट करतात. प्रत्येक व्यक्ती काही कारणास्तव एखाद्या गोष्टीला तिच्या एखाद्या वैशिष्ट्यासाठी एखाद्या परिस्थितीत मूल्य प्रदान करते हे समजून घेऊन त्यावर मूल्यशास्त्राची उभारणी व्हायला हवी असे साने म्हणतात . मूल्य आणि निकष ( norms ) या वेगवेगळ्या आणि परस्परांवर प्रभाव टाकणा-या संकल्पना आहेत. वैचारिक वाद-विरोधातही विरोधकाच्या अंतर्गत निकषांवर सकारात्मक चर्चा करून त्याला आपल्या प्रमेयाच्या अधिक जवळ आणता येईल व त्या त्या पातळीवर एक निरोगी मतैक्य किंवा ‘’मतसामीप्य’’ घडवता येईल असे साने म्हणतात . जेव्हा मूल्याधार विविध आणि विरोधी स्वरूपाचे असतात अशा परिस्थितीत इष्टतम असे निर्णय घेता येतील याची व्यावहारिक , गणिती आणि अभियांत्रिकीमधील उदाहरणे ते देतात.

चौदाव्या प्रकरणात व्यक्ती किंवा समाजाच्या जीवनात अनेकदा दोन चांगल्या मूल्यांपैकी एकाची निवड करण्याची परिस्थिती किंवा एका अर्थी ‘धर्म’संकट येते त्याचा विचार आहे. इथे मुद्दा इष्टतम हित साधण्याचाच आहे. लेखक इथे अशा अनेक मूल्यजोड्या उदाहरणादाखल देतो. नीतीमूल्ये आणि व्यावहारिक शहाणपण यांच्या संतुलनातून त्यावर अगदी अचूक मार्ग कसा काढायचा हेही दाखवून देतो

एका संपृक्त अशा वैचारिक प्रवासाच्या शेवटी पंधराव्या प्रकरणात इहवादी आत्मविद्या या सर्वात तरल संकल्पनेची चर्चा होते. पण तिथपर्यंत पोचण्यापूर्वी साने भारताच्या प्रचलित धर्मवास्तवावर भाष्य करतात. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मनिरपेक्ष संविधान आणि सरदार पटेलांनी केलेले संस्थानांचे विलीनीकरण या पार्श्वभूमीवर स्वतंत्र भारत धर्मनिरपेक्ष प्रवासासाठी सज्ज झाला पण इथल्या व्यामिश्र आणि इतिहासकालापासून पुन्हापुन्हा रक्तरंजित वास्तवात धार्मिक ध्रुवीकरण आणि तुष्टीकरण टळले नाही ज्याची परिणती हिंदुत्ववादी ध्रुवीकरणात अटळ क्रमप्राप्त अशा प्रक्रियेने झाली हे सांगताना सर्व धर्म खरेच समान आहेत का याची आणि हिंदुधर्माच्या सर्वच वैशिष्ट्यांची साने स्पष्ट शब्दात चर्चा करतात, आज राजकीय पक्षांचा अजेंडा चांगल्या व वाईट अर्थाने कसा सारखाच आहे हे यात येतेच.कालच्या आणि आजच्या राजकीय वास्तवावर भाष्य केल्यावर साने राजकीय secularism –धर्मनिरपेक्षतेची सोळा व्यवच्छेदक लक्षणे सांगतात.

यानंतर आत्मविद्या ! इहवादात ती आनंदाने, आशापूर्णतेने आणि शान्तीभावनेने जीवनाला सामोरे जाण्याची कला आणि अभ्यासवृत्तीही आहे असे सानेंचे प्रतिपादन आहे.

त्यांच्याच शब्दात ‘आत्मविद्या म्हणजे जगत असतानाच जागृत राहून घातक गल्लीत शिरण्याचे टाळत रहाणे हे प्रथमपुरुषी उद्गारातून व मौनातून साधायचे आहे..प्राथमिक दुःख आणि स्वनिर्मित दुःख यात फरक करता येणे ही किल्ली आहे. मला दुःख होईल पण मी दुःखी होणार नाही अशी प्रतिज्ञा त्यात अभिप्रेत आहे. आगामी कर्तेपणासाठी विवेक आणि होऊन गेलेल्या भोगाविषयी समदृष्टी असे याचे सूत्र आहे. स्वतःला महत्वाकांक्षेत अडकवून फरफट करून घेणे आणि स्वतःवर प्रेम करणे यातला फरक समजाऊन घ्यायचा आहे. स्वतःचा स्वतःशी असलेला संबंध कमीत कमी दुराव्याचा ठेवणे, कार्यशक्तीला आवश्यक तेव्हढाच कर्ष घेणे व विनाकारण कर्ष न घेणे. यात अपघाताने आत्मावस्था अनुभवता येते पण ती कधीच धरून ठेवता येत नाही..’’

या टप्प्यावर परमेश्वर किंवा चिद्वस्तू याचा अनुभव I-Thou या निरपेक्ष भक्तिमय आस्तिक्यपूर्ण आणि अर्थातच आशावादी अशा संवादातून होत असतो असं अतिशय हृद्य प्रतिपादन साने करतात तेव्हा ‘’नवपार्थहृद्गत’’ मधील गीता-ईश्वराला त्यानी विचारलेले प्रश्न व काढलेले निष्कर्ष आठवतात ! गॅब्रिएल मर्सेल या फ्रेंच तत्त्वज्ञाची ही संकल्पना त्यांना पूर्ण आपलीशी वाटते कारण मराठी संतांच्या भक्तीरचनांमध्ये पूर्वीपासूनच तिचे पडसाद आपल्याला गवसलेले आहेत..

पुस्तकाला चार परिशिष्टे आहेत. लेखकाची भूमिका त्यांतून अधिक स्पष्ट होते.अगदी थोडक्यात अस्तित्व-शास्त्र, सद्वस्तु-मीमांसा व ज्ञानशास्त्र किंवा प्रमाणविद्या परिशिष्ट एकमध्ये मांडल्या आहेत. परिशिष्ट दोन हे घटक-संघात या कोटीला वाहिलेले आहे. (जग आणि जाणीव यांची द्वंद्वात्मक एकरसता समजून आपण रिडक्शनिझमच्या सापळ्यात अडकू नये म्हणून!). तिसरे परिशिष्ट हेगेल एंगल्स व माओ यांनी ‘डायलेक्टिक्स’ म्हणून काय मांडले ते सांगते. चौथे परिशिष्ट वस्तुनिष्ठ गणिताने न्याय्य किंमती कधीच काढता का येणार नाहीत हे सिद्ध करते.

या अत्यंत धावत्या आरेखनात अनेक ज्ञान-विज्ञानशाखांचे तपशील, अभ्यास, चर्चा, व्यावहारिक आणि सैद्धांतिक उदाहरणे,व्याख्या संकल्पनांचा प्रवाह आणि त्यावरील भाष्य यांचा अर्क आणणे कठीण आहे.हा वैचारिक प्रवास , त्यातून हाती आलेले निष्कर्ष यांचा मराठीतून वाचनानंद घेतला होताच.एकसंध स्वरूपात आणि इंग्लिशमध्ये तितक्याच ताकदीने हा आशय नेणे हे काम अजिबातच सोपे नव्हते, ते साध्य झाले आहे हे साने यांचे मोठे यश आहे, या लेखनातील प्रमेयांवर अधिक चर्चा, वाद्संवाद होतील,जागतिक अभ्यासकांकडून यावर चिकित्सक प्रतिक्रिया पुढे येतीलच, त्यासाठी लेखकाला शुभेच्छा !

-भारती..

Group content visibility: 
Use group defaults

ताई, लेख संपूर्ण वाचला, पण मला समजून घ्यायला बराच जड गेला Sad
लेख तुमचा आहे म्हणुनच वाचला, मूळ पुस्तक तर मला झेपेल असेही वाटत नाही.

धन्यवाद साद, सई..
सई, हेही ठीकच.. पुढेमागे अशा प्रकारचा रस निर्माण झाला तर हे मनापासून वाचावंसं वाटेलही तुला आणि तसं नाही वाटलं तरी चालेल की Happy ! पण आपल्या स्थळकाळात कुणी मराठी विचारवंत वैश्विक वैचारिक विश्वात आपली नोंद ठेवतो आहे एवढी दखल घेतलीस तरी पुष्कळ आहे .