'मी उदास झालो' असं नका लिहू. आम्हाला थेट उदास करा. ती उदासी डायरेक्ट पोचवा आमच्यापर्यंत. तुम्ही उदास
झालात ही नुसती 'माहिती' घेऊन आम्ही काय करू त्याचं..! उदास व्हायची इच्छा आहे आमची आणि तुम्ही हसवताय..!
हे बरं नाही..
हल्ली हे असं फारच व्हायला लागलंय.. म्हणजे समजा
पुस्तकं घ्यायला गेल्यावर नेहमीच्या सवयीनं एखादं पान
उघडून अधलामधला पॅराग्राफ चाळला आणि असलं एखादं टुकार वाक्य दिसलं की अर्ध्या सेकंदात पुस्तक मिटून
जागच्या जागी जातं आणि मानसिक प्रतिक्रिया, शेरेबाजी चालू होते...शिवाय कुजकं हसू येतं ते वेगळंच...
कधीपासून सुरू झाली असेल ही भानगड?
ह्याची मूळं त्या पंढरपूरातल्या शाळेतल्या दिवसांत आहेत की काय.. ?
ते प्रतिज्ञा वगैरे म्हणायला लावायचे पुढे केलेल्या हाताला रग लागेपर्यंत.. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यातच माझे सौख्य सामावले आहे वगैरे.. तेव्हापासून??
की ते पालकांच्या, शाळेच्या, समाजाच्या आणि देशाच्या आमच्याकडून नेमक्या काय काय अपेक्षा आहेत, ह्याची यादी चान्स मिळेल तेव्हा सांगत सुटायचे.. त्यामुळे?
की ते पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला बळजबरीने
झेंडावंदनाला बोलावून देशभक्तीनं गहिवरलेली गाणी, भाषणं
ऐकायला भाग पाडायचे.. तेव्हापासून??
की ते रोज सकाळी एका निष्ठेनं, एका जिद्दीनं फळ्यावर
नवनवीन मूर्ख सुविचारांची फवारणी करत रहायचे आणि आम्हास हसण्याची नवनवीन संधी रोज उपलब्ध करून
द्यायचे... उदाहरणार्थ 'केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान
वाढवून विवेकानंद व्हा'..
तेव्हापासून??
की झाडून सगळ्या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करून त्या महापुरुषांचा फक्त भारावलेला चमकदार इतिहासच आमच्या डोक्यात जाईल याची काळजी ते घ्यायचे .. अर्थात त्यांना स्वतःलाही तेवढंच माहिती असावं... त्यामुळे त्यांनी त्या काळी आम्हा भाबड्या मुलांना मुद्दाम गंडवलं असा काही दावा नाही माझा.. पण झालं असं की पुढे पुढे इतिहास जरा आडवातिडवा वाचत गेल्यावर शाळकरी वयातल्या
इतिहासाला दारूण हादरे बसत गेले...
त्यात बरेचसे महापुरुष डोळ्यांदेखत कोसळत गेले...
आणि त्यामुळे हा जो कुजकटपणा आलेला आहे त्याचं
थोडंफार क्रेडिट त्या मास्तरांनीही घ्यायला हरकत नाही, कारण त्यांनी आम्हाला इतिहास, देश, जात, धर्म,
विचारसरणी, महापुरुष वगैरेंबद्दल वेगवेगळ्या अंगांनी
सांगितलं असतं तर पुढे थोडे कमी शॉक बसले असते,
एवढंच म्हणणं आहे..
की ते निबंध वगैरे लिहायला सांगायचे 'माझी शाळा'
'सैनिकाच्या पत्नीचे आत्मवृत्त'..'मी अमुक झालो तर..'... किंवा मग 'माझी आई' पेटंट विषय...! मग सगळे जण आईची माया, आकाशाचा कागद, समुद्राची शाई,
मायमाऊली, देवाची सावली, मातृभूमीसाठी हसत हसत बलिदान वगैरे 'अर्थ हरवलेले शब्द' वापरून मजबूत
हास्यनिर्मिती करायचे... तेव्हापासून?
{{ अर्थात माझी आई ही काही त्या श्यामच्या आई सारखी
संस्कार करायला दबा धरून बसलेली नसायची, हे एक बरं होतं तिचं..
आणि शिवाय वळण वगैरे लावायच्या नावाखाली माझ्या
बारीकसारीक खाजगी गोष्टींत लक्ष घालायची सवयही मी तिला लागू दिली नव्हती, हे माझं यश..
म्हणजे भविष्यात मला 'मोठ्ठा बिठ्ठा' करून, तिच्यावर दुनियेनं केलेल्या खऱ्या खोट्या अन्यायांचं परिमार्जन करण्याचा तिचा कटही मी इयत्ता पाचवीपासूनच शिताफीने उधळून लावत गेलो..
आणि शिवाय तिच्या देवाधर्माच्या वगैरे श्रद्धांचं सॉफ्टवेअर माझ्या डोक्यात डाऊनलोड करायच्या प्रयत्नांत एवढ्या वेळा एरर यायला लागला की शेवटी तिच्याच श्रद्धा डळमळीत व्हायचा धोका तिला जाणवून तिने माझा नाद सोडला असेल का...? विचारायला पाहिजे एकदा.. असो.}}
की भूगोलाच्या गृहपाठाच्या वहीत ''आमच्या घरी आम्ही
गुपचूप एक रेनडिअर पाळला आहे. तो रोज पाच लिटर दूध देतो. रेनडिअरच्या दुधात फॅट कमी असते. टुंड्राच्या गवताळ
प्रदेशातील त्याच्या घराच्या आठवणींमुळे तो बऱ्याचदा
व्याकुळ दिसतो. बहुदा त्यामुळेच दुधाचे फॅट कमी येत असावे'' असले काहीतरी पतंग उडवले होते.. तेव्हापासून ??
की फळ्यावर भूमितीतलं 'आंतरलिखित कोनाचं प्रमेय' सुरू होतं आणि ते समजण्याची आपली कुवत नाही हे लगेचच लक्षात आल्यानंतर फळ्याकडं पाहण्यात काही अर्थच
उरलेला नसतो..
म्हणून मग खिडकीतून बाहेर ग्राउंडवर एक कुत्रा
त्याच्या प्रेयसीशी फ्लर्ट करत असताना दिसतोय..
त्या दोघांचं नक्की काय ठरतंय हे आम्ही औत्सुक्यानं पाहत असतानाच सर खिडकीजवळ येऊन कुजबुजत म्हणतात
''पावसाचे दिवस आहेत पाटील..! हे चालायचंच.. डोन्ट इन्व्हेड देअर प्रायव्हसी!''...
मग घरी जाऊन इन्व्हेडचा अर्थ डिक्शनरीत बघितला.
प्रायव्हसीचा अर्थ मला आधीच माहित होता. एवढाही काही मंद नव्हतो मी..! पण त्यांच्या बाबतीत प्रायव्हसीचा विषयच कुठे येतो..! चांगलं मोकळ्या आकाशाखाली मुक्तपणे साग्रसंगीत चालू शकतं त्यांचं. तर मुद्दा असा की सरांचं बेसिक क्लिअर नसावं. असो.
तर ही लक्षणं तेव्हापासूनच जरा उठावदार व्हायला लागली असतील का?
की असाच एकदा मराठीचा तास.. सर सवयीप्रमाणेच विषय सोडून भलतीकडेच भरकटत जात राहिले.. दूर दूर गेले...नंतर हळूहळू किर्तनाच्या घनदाट अरण्यात शिरले.. मग ते बराच वेळ त्यांच्या एका आवडत्या किर्तनकारावर ऐसपैस
अध्यात्मिक बोलत राहिले..
मग मी त्यांचा नाद सोडून पहिल्या बेंचवर बसून ठार
आत्मविश्वासाने पेंगत राहिलो.. आणि त्यांनी गैरसमज करून घेतला की मी तल्लीन होऊन ऐकतोय..
म्हणून अखेरीस त्यांनी मला प्रेमाने विचारले की,
"सांग पाटील, हे किर्तनकार कशामुळे एवढे मोठ्ठे आहेत?"
ह्यावर काहीच न कळून मी, ''तोंडाच्या जोरावर सर..!''
असं उत्तर देऊन त्यांस वैराग्याचा तीव्र झटका दिलेला
आठवतोय.. पण त्या धक्क्यातून सावरल्यानंतर ते सगळं अध्यात्म विसरून, डोळ्यांच्या भेदक आणि ओठांच्या हिंसक हालचाली करत, माझ्या दिशेनं येताना दिसले, त्यानंतर जे काही झालं त्यात आठवण्यासारखं खास काही नाही..!
तेव्हापासून चालू झालं असावं का हे..?
छान...!!
छान...!!
आवडलं!!
आवडलं!!
बरंचसं relate झालं. जिथे नाही
बरंचसं relate झालं. जिथे नाही झालं तिथे मुद्दा पटला. चांगलं लिहिलंय - नेहमीसारखं एकदम थेट !!
@ निरु, प्रभुदेसाई @ चंद्रा
@ निरु, प्रभुदेसाई @ चंद्रा
कायच्या काय लिहिलंय हे असं वाटत होतं, म्हणून इथं पोस्ट करावं की नको ह्या विचारात होतो बराच वेळ.. शेवटी म्हटलं जाऊ द्या करून टाकू...
तुम्हाला हे आवडलं ह्याचा आनंद आहे..!
आणि तुम्ही तसं आवर्जून सांगितल्याबद्दल मी आभारी ..! _/\_
चांगलं लिहिलं आहे की...
चांगलं लिहिलं आहे की...
भालचंद्र नेमाडे मायबोलीवर असते तर असेच लिहिले असते त्यांनी!!
@ आंबट गोड,भालचंद्र नेमाडे
@ आंबट गोड,



भालचंद्र नेमाडे मायबोलीवर असते तर असेच लिहिले असते त्यांनी!!>>
बाप रे..!! लईच मोठं नाव घेतलं तुम्ही तर!! अस्सल विस्तव..!
नेमाडे गुर्जींच्या जवळपासही जाणारं थोडं फार लिहायला जमावं कधीतरी असं वाटत राहतं मला, हे खरंय..
पण गुर्जी तर भल्या भल्या लेखकांची जाहीर सालटी काढायला मागे पुढे पाहत नाहीत.. आणि त्यात समजा हे असलं काही चुकून वाचलंच त्यांनी, तर पयले मला धरून फटकवायला सुरूवात करतील, अशी खात्रीच आहे..
आवाजही ऐकू येतोय..
फाट्..फाट्..
'लिहिशील का पुन्हा असलं?' फाट् ...
'फार हौस आहे का लिहायची?' फाट्..
'कशाला हे असले रिकामे धंदे करतोयस?' फाट्..
'म्हण.. चुकलो सर...' फाट्...
मस्त लिहीले आहे!
मस्त लिहीले आहे!
भारीच !! थेट भिडलं अगदी.
भारीच !! थेट भिडलं अगदी. अस्सल.
छान लिहिलंय...!
छान लिहिलंय...!
प्रांजळ पणे लिहिलंय ते भावलं.
प्रांजळ पणे लिहिलंय ते भावलं.
पण कुजकटपणा रुजू देऊ नका रुतू तर अजीबातच नाही.
मस्त लिहिलंय.
मस्त लिहिलंय.
सर खिडकीजवळ येऊन कुजबुजत म्हणतात...>> फारच प्रेमळ शिक्षक लाभले तुम्हाला. नशीबवान आहात.
अशा प्रसंगी आमचे शिक्षक नेमबाजीचा हौस भागवुन घ्यायचे. आम्ही खिडकीबाहेर बघण्यात तल्लीन असताना सरांनी सोडलेला खडु सणसणत आमच्या गालाचा वेध घ्यायचा.
कडक लिहिले आहे
कडक लिहिले आहे
भन्नाट
भन्नाट
भारी !!!
भारी !!!
पण कुजकटपणा रुजू देऊ नका रुतू तर अजीबातच नाही. >>>> + १
जब्बरदस्त!
जब्बरदस्त!
आमच्या घरी आम्ही गुपचूप एक
आमच्या घरी आम्ही गुपचूप एक रेनडिअर पाळला आहे. तो रोज पाच लिटर दूध देतो. रेनडिअरच्या दुधात फॅट कमी असते. टुंड्राच्या गवताळ
प्रदेशातील त्याच्या घराच्या आठवणींमुळे तो बऱ्याचदा व्याकुळ दिसतो. बहुदा त्यामुळेच दुधाचे फॅट कमी येत असावे >>>
सगळाच लेख भन्नाट. लेखनशैली पण आवडली. मस्त!
छान लिहिलंय, आवडलं
छान लिहिलंय, आवडलं
भारी झालाय लेख.
भारी झालाय लेख.
फारच प्रेमळ शिक्षक लाभले तुम्हाला. नशीबवान आहात.
अशा प्रसंगी आमचे शिक्षक नेमबाजीचा हौस भागवुन घ्यायचे. आम्ही खिडकीबाहेर बघण्यात तल्लीन असताना सरांनी सोडलेला खडु सणसणत आमच्या गालाचा वेध घ्यायचा. >> आमच्या कडे पण असेच होत असे
नव्याने प्रतिसाद दिलेल्या
नव्याने प्रतिसाद दिलेल्या सर्वांचे आभार
पण कुजकटपणा रुजू देऊ नका रुतू तर अजीबातच नाही. >>
हर्पेन,
अगदी अगदी.. ह्याची काळजी घेईन..
छान लिहिलयं , आवडलं.
छान लिहिलयं , आवडलं.
छान लेख
छान लेख
छान लिहिलेय
छान लिहिलेय
छान लिहिलेय..आवडल
छान लिहिलेय..आवडल