एखाद्या रेल्वे जंक्शनवरचा प्लॅटफॉर्म. अनेक लोक तिथे येऊन पुढच्या प्रवासाला मार्गस्थ होत असतात. धावत पळत प्लॅटफॉर्मवर येतात आणि ट्रेनमध्ये बसतात आणि पुढे जातात. परंतु ही गोष्ट केवळ रेल्वे स्टेशनावरच घडत नाही. आयुष्यामध्ये असे असंख्य जंक्शन्स आणि असंख्य प्लॅटफॉर्म्स असतात. प्लॅटफॉर्म हे एक माध्यम आहे ज्यामधून पुढच्या दिशेने आणि पुढच्या मार्गाने जाता येतं. कधी शाळा हा प्लॅटफॉर्म असतो आणि विद्या ही ट्रेन असते. कधी दु:ख हे प्लॅटफॉर्म असतं आणि तिथे मिळणारं शहाणपण आपल्याला पुढे घेऊन जातं.
असाच एक प्लॅटफॉर्म म्हणजे जीवन आहे. ज्ञानी लोकांनी जीवन ही एक युनिव्हर्सिटी आहे असं म्हंटलंय. इथे माणूस शिकत शिकत पुढे जातो. त्याला एका प्लॅटफॉर्मवरून दुसरा असे अनेक प्लॅटफॉर्म आणि अनेक ट्रेन्स मिळत जातात. असं पुढे जाताना एक दिवस साधकाला म्हणजे शिष्याला गुरूकडे नेणारा प्लॅटफॉर्म मिळतो. ही गोष्ट त्या प्लॅटफॉर्मची गोष्ट आहे. जेव्हा पहिले पहिले गुरूचा आवाज साधकाला येतो तेव्हा वाटतं की तो भ्रम आहे. पण हळु हळु गुरू आवाज देत राहतो. आणि मग अदृश्य प्रकारांमध्ये गुरू शिष्याला भेटत राहतो, सोबत करत राहतो. अहंकाराने आणि अज्ञानाने भरलेलं शिष्याचं मडकं गुरू एका एका ओंजळीने रितं करत जातो. आणि ते करताना हिंदकळण्याचा आवाजही येऊ देत नाही, न जाणो शिष्य नाराज होईल. एक न जाणवणारा सत्संग सुरू होतो. एक सूक्ष्म शस्त्र- क्रिया सुरू होते. आणि जेव्हा गुरू शिष्याला स्वत:कडे बोलवतो, तेव्हा शिष्याला ओ द्यावीच लागते. शिष्याला गुरूकडे जाताना असंख्य बंधनं आडवी येतात. त्याचा पूर्ण भूतकाळ अडवतो. पण जेव्हा गुरू शिष्याला आवाज देतात तेव्हा त्याला यावंच लागतं. शिष्याच्या इच्छा- आकांक्षा गळून केवळ गुरूप्रती समर्पणाची इच्छा राहते. शिष्याची अशी भावदशा झालेली असते-
मेरा है क्या, सब कुछ तेरा
जाँ तेरी, साँसें तेरी
तुने आवाज़ दी देख मै आ गई
प्यार से है बड़ी क्या कसम
किंवा
अब यहाँ से कहाँ जाएँ हम
तेरी बाँहों में मर जाएँ हम
मेरी आँखों में आँसू तेरे आ गए
मुस्कुराने लगे सारे ग़म
गुरूच्या केवळ साद देण्यामुळे शिष्याच्या आयुष्याचा गेश्टाल्ट बदलतो. हे अश्रू त्याची दु:ख हलकी करतात. आनंदाचा एक झरा प्रवाहित होतो. आणि मग शिष्याची धावपळ सुरू होते गुरू ज्या मार्गाने गतिमान आहे तिकडे जाण्याची. गुरू म्हणजे जणू "राज"- असा राजा माणूस ज्याला जीवनाचा "राज़" उलगडला आहे. आणि शिष्य म्हणजे सिमरन नावाची युवती जिला सुमिरन (म्हणजे आत्म स्मरण) झालं आहे. जिला स्वत:ची अबोध आठवण झाली आहे आणि गुरूसाठी जिच्या मनात प्रचंड प्रेम आहे, ओढ आहे. जेव्हा असा शिष्य गुरूकडे धाव घेतो, तेव्हा सगळे पूर्वीचे संस्कार आणि अख्खा भूतकाळ शिष्याची वाट रोखतो. परंतु गुरूला बघताना आणि स्वत:चं अंधुकसं स्मरण होत असताना शिष्याला ही "परदेसी" झालेल्या त्याच्या "स्वरूपाची" जाणीवही होतच असते-
घर आजा परदेसी तेरा देस बुलाए रे
कल परसों में बीते बरसो
आज ही आजा गाता हँसता तेरा रस्ता देखे रस्ता
अरे छुक छुक गाड़ी की सीटी आवाज़ लगाए रे
गुरू अशी साद घालत असताना शिष्याला जाणीव होते की, त्याने गुरूकडे जाण्यासाठी असंख्य वेळा टाळाटाळ केली आहे. आज ध्यान करतो, उद्या साधना करतो असं म्हणत वर्षं गेले आहेत. जन्म गेले आहेत. अनेक वेळेस प्लॅटफॉर्म मिळूनही त्याची ट्रेन मिस झालेली आहे. गुरू अनेक वेळेस हाक मारत होता, पण दर वेळी कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असल्याने त्याने ओ दिली नव्हती. आतून ही खंत असते आणि समोर आवाज देणारा गुरू असतो. निदान ह्यावेळी तरी ट्रेन चुकू नये म्हणून शिष्य तळमळतो.
परंतु प्लॅटफॉर्मवर गुरूकडे जाण्यापासून शिष्याला त्याचा भूतकाळ अडवतो. संपूर्ण भूतकाळ, अहंकाराचे अनेक सुंदर चेहरे, ममतेचे पाश आणि मोह त्याला अडवतात. वस्तुत: हे शिष्याच्या अंतर्मनातलेच भाव असतात. त्यांना गुरू दिसत नसतो. त्यांना गुरू ओळखीचा वाटत नाही. त्यांना वाटत असतं की, शिष्य गुरूकडे जातोय म्हणजे दिशाहिन होतोय. त्यांना जे जग माहिती आहे, त्यांना ज्या मिती ज्ञात आहेत त्यानुसार शिष्य म्हणजे त्यांचा लाडका मुलगा किंवा मुलगी हे कोणतेही भविष्य नसलेल्या दिशेकडे जात आहेत. शिष्याची अडचण ही असते की, तो त्यांना समजावून देऊ शकत नाही. त्याच्यासमोर वेगळीच भिती असते.
आता हळु हळु गुरूच्या ट्रेनने गती घेतलेली असते. गुरू गतिमान आहे. गुरूचा जमिनीशी असलेला संबंध क्षीण झाला आहे. गुरू शिष्यापर्यंत येऊ शकत नाही. शिष्यालाच गुरूकडे धाव घ्यावी लागेल. गुरूची करूणा इतकी मोठी आहे की, तो ट्रेन सुरू झाली तरी दरवाज्यात उभा राहून शिष्याला बोलावतो आहे. शिष्याच्या स्वागतासाठी तत्पर आहे. शिष्य येण्याची त्याला अपेक्षा आहे. गुरूचं आश्वासक स्मित आणि त्याने दिलेली हाक ऐकून शिष्य एका क्षणी पेटून उठतो. आणि शिष्याची तगमग अखेरीस शिष्याच्या भूतकाळावर मात करते. शिष्याचा भूतकाळ हार मान्य करतो आणि एका क्षणी घोषणा करतो, "जा सिमरन जा, जी ले अपनी ज़िन्दगी!" भूतकाळ नवीन जीवनापुढे माघार घेतो.
त्या क्षणी शिष्याची खरी धाव सुरू होते. गुरू ज्या ट्रेनमध्ये आहे ती ट्रेन आता वेग घेणार आहे. शिष्याची क्षमता, शिष्याची पोहोच मर्यादित आहे. त्याच्या मनामध्ये एकीकडे भूतकाळापासून पुढे आल्याचा आनंद आहे, गुरूसोबत भेट होणार ह्याची उत्कंठा आहे आणि भितीसुद्धा आहे. शिष्य सर्व शक्ती लावून धावतोय. पण त्याच्या मनात भिती आहे की, दर वेळी, दर जन्मात जे झालं ते आताही तर होणार नाही? हिंमत करतोय पण ती पूर्ण पडेल का अशी त्याला शंका आहे. गुरूची करूणा अपार असली तरी तो काही आता शिष्यापर्यंत येऊ शकत नाही. तो गतिमान आहे आणि त्याचे पाय आता जमिनीला स्पर्श करू शकत नाहीत. आता शिष्यालाच जोर लावावा लागेल. जमिनीचा आणि अहंकाराचा आधार सोडण्याची हिंमत करावी लागेल. शिष्य जोर लावून पळतो आणि गुरू ट्रेनच्या दरवाज्यावर येतो. दरवाजाच्या खालच्या पायरीपर्यंत येतो. एक हात शिष्याच्या दिशेने करतो. गुरूला ह्यापलीकडे काही करणं शक्य नाही. शेवटची जोखीम आणि उडी शिष्यालाच घ्यावी लागेल. आणि त्या निर्वाणीच्या क्षणी शिष्याकडून ती उडी घेतली जाते. गुरूची ओढ त्याला खेचून घेते. ज्याला सत्याचा स्वाद मिळाला आहे त्याला सत्य ओढून पुढे घेतं. आणि गुरू व शिष्याचं मिलन होतं. गुरूच्या मैफ़िलीमध्ये शिष्य शरीक होतो. आणि जेव्हा शिष्याच्या भूतकाळाला त्याला जे मिळालं आहे त्याची जाणीव होते तेव्हा भूतकाळाला होणारी वेदना आणि खंत मिटून जाते. शिष्य गुरूच्या सत्संगाचा भागीदार होतो. समुद्राकडे जाणा-या नदीमध्ये स्वत:ला झोकून देतो.
(ध्यानाबद्दलचे माझे इतर लेख इथे उपलब्ध: www.niranjan-vichar.blogspot.com niranjanwelankar@gmail.com निरंजन वेलणकर 09422108376)