मांसाहाराचे संस्कार !

Submitted by ऋन्मेऽऽष on 31 May, 2021 - 04:49

विषय तसा जुनाच आहे, अँगल मात्र नवा आहे.
एक किस्सा घडला गेल्या आठवड्यात, तो अनुभव चार लोकांशी शेअर करावासा वाटतोय.

मी स्वतः अट्टल मांसाहारी आहे. म्हणजे मांस बघून अगदी तुटून पडतो असे नाही. बेतानेच खातो. पण चांगलेचुंगले मिळाले तर रोज खाऊ शकतो. मांसाहाराबाबत सणवार पाळत नसल्याने वर्षाचे ३६५ दिवस खाऊ शकतो. लीपवर्ष असेल तर ३६६ दिवस खाऊ शकतो.

आपल्याकडे असे कुठल्याही दिवशी मांसमटण खाणारे लोकं तसे कमीच आढळतात. कारण का माहीत नाही पण आपण सणवाराच्या दिवशी, एखाद्या देवाच्या वारी, वा मंदीर, देवघर अश्या पवित्र स्थळी मांसाहाराला अपवित्र ठरवत वर्ज्य केले आहे. काही जण असे ठराविक वार पाळतात तर काही जण मांसाहाराला संपुर्णपणेच टाळतात.

अर्थात देवधर्माबाबत ज्याचे त्याचे विचार, सर्वांच्याच विचाराचा आदर करायला हवा.

जोपर्यंंत मी माझ्या घरात काय खातोय यात दुसरा कोणी हस्तक्षेप करत नाही तोपर्यंत तो आपल्या घरात काय खातोय वा काय खात नाही याच्याशी माझेही काही घेणेदेणे नाही.

तसेच जोपर्यंत मी माझे अन्न खात असताना कोणी माझ्या तोंडावर त्या अन्नाला नावे ठेवत नसेल तर त्याचे त्या अन्नाबद्दल काय विचार आहेत याच्याशी मला काही घेणेदेणे नाही.

हेच कोणी हिणवल्यासारखे बोलून दाखवले तर ते खटकते.
पण ते बोलणारे जर एखादी सात वर्षांची मुलगी असेल तर मात्र हसावे की रडावे कळत नाही Happy

तर झाले असे, लेकीची एक मैत्रीण घरी आली होती. सोसायटीतलीच, तिच्याच वयाची. या वयाच्या जवळपास पंचवीस-तीस मित्रमैत्रीणी आहेत लेकीला. आलटून पालटून एका दोघांना पकडून घरात खेळायला घेऊन येतच राहते. नवीन मुलांशी गप्पा मारताना तितकाच आमचाही टाईमपास होतो. त्यांचा अभ्यास कम खेळ चालू होता. मी सुद्धा वर्क फ्रॉम होम करता करता त्यांच्यात सहभागी होत होतो. असे कोणी मित्रमैत्रीण आले की आधी आम्ही लेकीसोबत त्यांनाही बिस्कीट, चॉकलेट वगैरे देतो. आणि मग भाजी-चपाती, पुरी, पराठा असे काहीतरी जेवणाचे खाणार असेल तर ते ही विचारतो, जेणेकरून आपली पोरगीही चार घास जास्त खाईल. तर त्या दिवशी आमच्याकडे मासे होते Happy

जगातले सर्वात तीन सुंदर वास सांगायचे झाल्यास पहिला आईच्या पदराचा, दुसरा पहिल्या पावसानंतर ओल्या मातीचा, आणि तिसरा नव्याकोर्‍या पुस्तकांचा....
पण हेच जर खाद्यपदार्थांबाबत म्हणायचे झाले तर माझ्याबाबत तरी फिशफ्राय, फिशफ्राय आणि फक्त फिशफ्राय !!

म्हणजे मी पोटभर तुडुंब जेवलेलो का असेना, तव्यावर चरचर असा आवाज करत त्या तळलेल्या मच्छीचा वास नाकात शिरला तर पोटात खड्डा पडायलाच हवा.
म्हणजे ते पिक्चरमध्ये एखाद्या कॉमेडी सीनमध्ये तुम्ही पाहिले असेल की हिरो कुठूनतरी बाहेरून पार्टी करून येतो, पण हे बायकोला सांगायला विसरलेला असतो. तिने ईकडे स्वयंपाकाचा घाट घातला असतो. आणि मग तिचा ओरडा खायला लागू नये म्हणून तो भरल्या पोटी पुन्हा जेवतो.
विनोदाचा भाग सोडला तर हे तितकेसे सोपे नाही. पण मी मात्र प्रत्यक्षात असे कित्येकदा आवडीने केले आहे की बाहेरून चुकून खाऊन आलो आणि घरी आल्यावर कळले की आज जेवणात मस्त हलवा-सुरमई-रावस-पापलेट विथ कोलंबीचे सार आहे तर झोपायचा टाईम पुढे ढकलतो आणि पुन्हा दाबून जेवतो. अगदी आईने सांगावे लागते की जपून, आता पुरे, आणि शेवटी बायकोने हाताचा आधार देऊन ऊठवावे लागते ईतके तुडुंब जेवलेलो असतो.

हे सारे सांगायचा हेतू ईतकाच की मत्स्याहाराशी एक वेगळेच भावनिक नाते जुळले आहे. त्यात तो घरचा, आईचा हातचा असणे म्हणजे जगातले सर्वात मोठे सुख आहे. एरव्ही भाजी चपाती बाबत आनंदीआनंद असलेली माझी पोरेही या तळलेल्या माश्यांच्या वासाने टुण्णकन उडी मारून हातात ताटली घेऊन जेवणासाठी रांग लावतात. स्पेशली पोरगा. आणि या बाबतीत तो पक्का तुझ्यावर गेला आहे हे ऐकणेही एक दुसरे सुख असते.

तर बॅक टू किस्सा,
लेकीची मैत्रीण घरी आली. जेवणाची वेळ झाली. मासे तळायला तव्यावर आले. त्या वासाने घरात चैतन्याचे वातावरण पसरले. मुलं डोलायला लागली. तसे त्या मैत्रीणीलाही विचारले, काय ग्ग, फिश खातेस का तू? देऊ का थोडे चपातीसोबत...

तसे ती उडालीच. हा फिशचा वास आहे. सॉरी सॉरी काकी मला या वासानेच ऊलट्या होतात. मला कसेतरीच होतेय. मी जाते आता. नंतर खेळायला येते. आणि चक्क बघणार्‍यालाही कसेतरीच वाटावे अश्या पद्धतीने ती याक्क याक्क करत निघून गेली Happy

म्हणजे थोड्यावेळापूर्वी जेव्हा घरभर माश्यांचा घमघमाट सुटलेला तेव्हा तिच्या हे गावीही नव्हते, ज्याक्षणी तिला हे सांगण्यात आले तसे लगेच सायकोलॉजी आपले काम करून गेली आणि तिला मळमळू लागले, किंबहुना हा वास फिशचा आहे तर आता आपल्याला मळमळले पाहिजे असे अंतर्मनाने तिला सांगितले. कदाचित हे घरूनच तिच्या डोक्यात ठसवले गेले असावे की मासे हे याक्क असतात. त्याच्या वासानेही आपल्याला मळमळायला होते. म्हणून आपण ते खात नाही.
आपण शाकाहारी आहोत, मांसाहार करत नाही तर आपल्या मुलांनीही तो करू नये. घरी तर आपण करून देणारच नाहीत, तर बाहेरही त्यांनी करू नये म्हणून कदाचित हे मनात ठसवले गेले असावे.

अर्थात यातही काही गैर नव्हते. आपल्या मुलांनी आपल्यासारखे शाकाहारी व्हावे असे वाटणे आणि तसे प्रयत्न करणे हे स्वाभाविकच आहे.
पण आता माझ्यासमोर प्रश्न होता की ती मुलगी अशी रिअ‍ॅक्ट करून गेल्यावर मी माझ्या मुलांना तिचे वागणे कसे एक्स्प्लेन करू? कारण मलाही माझ्या मुलांवर मांसाहाराचे संस्कार करायचे होते. तिची एखादी मैत्रीण शुद्ध शाकाहारी आहे आणि मांसाहाराला याक्क करते या प्रभावाखाली उद्या तिने मांसाहाराचा त्याग केला तर ते मलाही नको होते.

ती गेल्यावर मी माझ्या मुलीकडे हलकेच पाहिले, ती कूल होती. तिने कानाजवळ गोलाकार बोट फिरवत मला ईशार्‍यानेच विचारले, ही वेडी आहे का?

मी तिला म्हटले, ईट्स ओके. काही लोकांना नाही आवडत मांसाहार. त्याचा वासही सहन होत नाही. उत्तम उदाहरण म्हणजे लेकीचेच आजोळ. माझ्या बायकोच्या घरचे सारेच शाकाहारी. लग्नाआधी बायको सुद्धा शाकाहारीच होती. पण त्यांनीच बायकोला सांगितले की लग्नानंतर तुला आवडले आणि जमले तर मांसाहार करायला सुरुवात कर. तिने केली आणि आता एक्स्पर्ट झाली. मुलांबाबतही ते आवर्जून सांगतात की आम्ही तर त्यांना आमच्याघरी देऊ शकत नाही, पण तुम्ही जरूर द्या. त्यामुळे लेकीला त्यांचेच उदाहरण देऊन समजावले की या जगात काही लोकं शाकाहारी असतात तर काही मांसाहारी. ज्याची त्याची आवड. यात कोणी चूक वा बरोबर नसते. कोणी योग्य वा अयोग्य नसते. जसे आपल्यातच एका घरातले सारे नॉनवेज खातात आणि एका घरातले वेजच खातात. पण दोन्हीकडची माणसे चांगलीच आहेत ना. तर यात भेद करण्यासारखे काही नसते. कोणाला पिंक कलर आवडतो, तर कोणाला ब्ल्यू कलर आवडतो, ईतके सिंपल आहे हे.

आता हे मुलीच्या मनावर कितपत ठसले याची कल्पना नाही. पण दुसर्‍या दिवशी विचार करून मुलगी मला म्हणाली, पप्पा नॉनवेज खाणारे फार लकी असतात.
मी विचारले, का?
तर म्हणाली, जे वेज खातात ते फक्त वेजच खातात, आणि जे नॉनवेज खातात ते वेज आणि नॉनवेज दोन्ही खाऊ शकतात Happy

म्हटले वाह, मांसाहाराचे संस्कार करायला यापेक्षा छान कारण असू नये Happy

- ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते सारखं सारखं वर आलेले याक याक वाचुन दोन गोष्टी आठवल्या.
१. याक प्राणी ज्याच्या अंगावर जाड केसांचा थर असतो. काहीही करा त्याच्या त्वचेला काही फरक पडत नाही. (गेंड्याचीच कातडी म्हणा नां :)) )
२. ते एक गाणं आठवत...यकबयक कोई साथी मिल जाता है यकबयक.

मला
याकुन्देन्दुतु षार हार धवला
आठवलं.

या प्रकारच्या चर्चा माबोवर आधी झडून गेल्या आहेत.

शाकाहार भारी की मांसाहार वगैरे.

तथाकथित शाकाहार्‍यांना एकच विनंती आहे.

१. सर्व प्रकारचे प्राणिज पदार्थ खाणे बंद करा. दूध, दही, पनीर, मध, तूप, अन तत्सम का-ही-ही. अन एन्जॉय करा. फडतूस डिंग्या ऐकून पकलो आहे मी. व्हेगन बना. "व्हेजिटेरियन" नको. अन इन्डियन व्हेजिटेरियन असाल, तर लोकांना शाकाहार दैवी आहार वगैरे भंकस सांगू नका. अरे टोणग्या, त्या गायीच्या बाळाच्या तोंडचे हिसकवून तू ढोसतो आहेस, त्या गायी/म्हशी/बकरी/उंटीणीला येनकेनप्रकारेण पर्पेच्युअली प्रेग्नंट रहायला भाग पाडतो आहेस, भाकड झाली की हाकलून देतो आहेस, या विक्रूतीला सीमा नाही कुठेच. त्यापेक्शा कापून खा. सुटेल बिचारी.

२. तुमचे लाईफस्टाईल चॉइसेस इतरांवर लादणे बंद करा. म्हणजेच, मी 'व्हेजिटेरियन' आहे, व्किंवा मी मांस खातो, म्हणून मी लय भारी हा मूर्खपणा बंद करा. हे एक्झॅक्टली, मी मुसल्मान आहे म्हणून तुम्ही सर्वांनी ख्रिश्चन्/ज्यू/हिंदू/शिण्टो/बौद्ध/जैन्/दगड्/धोंडे असणे बंद करा असे म्हणण्यासारखे आहे. किंवा मी गे आहे, म्हणून तुम्ही स्ट्रेट असूच्च नये, असेही म्हणण्यासारखे आहे. तुला काय खायचं, तो तुझा चॉईस आहे. तो जोपर्यंत मला ओंगळवाणा वाटेल असे प्रदर्शन करीत तू खात नाहीस तोवर मला त्यात हस्तक्षेप करायचा/आक्शेप घ्यायचा संबंध नाही. मग तू गोमय खा, की शेण खा. तुझा चॉइस. पण मला मी काय खायचं ते सांगू नकोस.

३. 'संस्कार' = ब्रेन वॉशिंग. अमुक गोष्ट चांगली, दुसरी वाईट, हे अजाणत्या वयात मनावर बिंबवणे याला संस्कार म्हणतात. तुम्ही जन्मल्या दिवसा पासून बाळाला 'व्हेजिटेरियन' जेवण द्यायचे ठरवले, तर आईचे 'प्राणिज दूध' वर्ज्य ठरते.
आपल्या पोरांचे ब्रेन वॉशिंग काय करायचे तो आपला चॉईस आहे, काय वाट्टेल ते करा, पण तेच मी ही करायला हवे हे सांगू नका. तुम्ही काय करता ते नक्कीच सांगु शकता. पण मी तेच करायला हवे, असे म्हणणे तद्दन मूर्खपणाचे आहे.

४. उगा पब्लिकशी माईंड फ* करू नका. <- हे स्पेशली रुण्म्यासाठी.

ज्जे बात.
मध, पोळ्यातले मेण, मृगजिन, व्याघ्रजिन, हस्तिदंत, तथाकथित कस्तुरी, रेशीम, लोकरी कपडे, धाबळी, कांबळे, पादत्राणे, बॅग.....
हया ऐवजी सिंथेटिक वस्तू, wax, प्लॅस्टिक, पॉली एस्टर, नायलॉन,रेक्झिन वगैरे वगैरे..

ज्याचा त्याचा प्रश्न आहे .
१) कपडे कोणते वापरणे ज्याचा त्याचा प्रश्न.
२) अन्न कोणते ग्रहण करणे ज्याचा त्याचा प्रश्न.
३), सार्वजनिक ठिकाणी कसे वर्तन असावे ज्याचा त्याचा प्रश्न.
४), दारू पिणे ज्याचा त्याचा प्रश्न.
५), ड्रग्स घेणे ज्याचा त्याचा प्रश्न .
हे सर्व ज्याच्या त्याच्या मर्जी वर सोडून प्रश्न मिटेल का?
हे पाच प्रकार जरी ज्याचा त्याचा प्रश्न असा मानले तरी त्याचा परिणाम बाकी लोकांवर होतो च तो टाळता येत नाही.
मग reaction पण येते आणि अँक्शन reaction च खेळ चालू होतो.
१) अन्न ज्याचा त्याचा प्रश्न
जनावर,कोंबड्या कापणे हा प्रकार खूप लोकांना aawdat नाही पण तर सर्रास भर बाजारात चालू असते.
सुक्या मासळीचा च वास घरापर्यंत च मर्यादित राहत नाही तो सर्वांचा प्रश्न होतो.
दूध देणाऱ्या गाई,म्हैस ,कोंबड्या जिथे पाळल्या जातात त्या परिसरात राहणाऱ्या लोकांना मलमुत्र चा वास सहन करावा लागतो प्रश्न ज्याचा राहत नाही तर त्याचा पण होतो.
कपडे कोणते वापरावे ज्याचा त्याचा प्रश्न.
कोणी नागडे फिरले तर प्रश्न ज्याचा राहत नाही त्याचा पण होतो
कारण नागडे पण दुसऱ्या वर सुद्धा परिणाम करते.
दारू ,ड्रग विषयी पण तोच प्रकार घडतो.
अनेक लोक एकत्र एकाच ,शहरात,गावात ,देशात राहतात.
प्रत्येकाचा हक्क जपण्यासाठी काही नियम असावेच लागतात.
ज्याचा त्याचा प्रश्न म्हणून हात वर करता येत नाहीत.

मी काय खावे, हे सांगायचा अधिकार तुम्हाला किंवा तुमच्या तीर्थरूपांना नाही. तिथे रस्त्यावर नागडे फिरण्याचा संबंध नाही, अन फिरायचे असेल तर माझी ना नाही.

"तुमच्या चॉइसचे ओंगळवाणे प्रदर्शन करू नका, अन तुमचा चॉइस दुसर्‍यांवर लादू नका."

"खूप लोकांना आवडत नाही" हे जस्टिफिकेशन नाही.

तुम्ही कुणा प्राण्याच्या मादीचे दूध कुजवून दही/पनीर करून खाता हे मला आवडत नाही. त्या अबोध बालकांच्या तोंडचे दूध तोडता, अन स्वतः तिचे स्तन ओढून दूध काढून पिता हे मला ओंगळवाणे वाटते. याबद्दल काय म्हणणे आहे?

चीझ,बटर ओंगळवाणे वाटत असेल तर दही,पनीर पण ओंगळवाणे च वाटले पाहिजे.
प्राण्याच्या मादीच्या दूध पासून च चीज,बटर बनते ते चालत असेल तर बाकी मत व्यक्त करण्याचा नैतिक अधिकार राहत नाही.
भारतात दोन्ही प्रकारच्या लोकात तीव्र द्वेष आहे त्या मुळे ते एकमेकांचा आदर करतील ही भाभडी आशा आहे.
समाजात बहुसंख्य लोकांस काय वाटतं तेच चालत .
Justification नसेल तरी.
जैन लोकांच्या सोसायटी मध्ये मांसाहारी लोकांस घर दिले जात नाही आणि राज्य घटना,कायदा त्यांचे काहीच करू शकत नाही.
आणि मांसाहारी व्यक्ती ला त्या सोसायटी मध्ये राहण्याचा घर विकत घेण्याचा हक्क पण मिळवून देवू शकतं नाही.
Practically तरी बहुसंख्य लोकांस जे आवडते तेच योग्य असते असा न्याय आहे

मला लिहायचे होते त्या औद्योगिकीकरण, केंद्रीकरण, विकेंद्रीकरण, शहरीकरण, स्वनिर्भरता, ग्रामनिर्भरता अशा मुद्द्यांची कोंकरे बिचारी ह्या रणधुमाळीत कोपऱ्यात घाबरून बसली आहेत.

आ. रा. रा.
तुम्ही म्हणता ती एकदम स्टँडर्ड अवस्था झाली समाजाची.
ज्या समाजात कोण काय खाते ह्याच्या शी देणे घेणे नसते.
जसे माणसाचा bp ८०/१२० ha स्टँडर्ड असतो .तो उत्तम समजला जातो.
पण असे उत्तम bp असणारी लोक शंबर टक्के नसतात उलट खूप कमी प्रमाणात असतात.
स्टँडर्ड समाजाला हवं असणारे गुण समाजातील बहु संख्य लोकात नसतात.
खूप काहीच लोकात ते गुण असतात.
मग ह्या अशा समाजाला ज्याच्या त्याच्या मर्जी वर सोडून चालेल का,?
काही कॉमन नियम बनवून त्यांच्या वर नियंत्रण ठेवणे आवश्यक च असते.

जिज्ञासा, तुम्ही प्रत्येक धाग्यावर पर्यावरणाचं पिल्लू सोडत असता. तुमची कळकळ स्तुत्य आहे पण तुमचे पर्याय पटत नाहीत.

de-industrialize, decentralize आणि less automize करायचं म्हणजे नक्की कायकाय करायचं? यंत्रांनी शेती करणं बंद करायचं, फर्टिलायझर्स वापरणं सोडायचं, आणि लोकली प्रोड्युस्ड अन्नच खायचं, असं आहे का? तुमच्या घरी येणारं दूध वारणाकाठच्या म्हशीने दिलं असतं. हे दूध संकलित होऊन, प्रकिया होऊन, पाश्चराईझ होऊन, शेकडो किमीचा प्रवास करून दोन दिवसांनी तुमच्या दारात पिशवीबंद होऊन अगदी रास्त दरात येऊन पडतं. हे इंडस्ट्रियलायझेशन शिवाय कसं शक्य होणार सांगा? ते दूध जोगेश्वरीमध्ये पहाटे म्हस पिळून भय्याने सायकल मारत तुमच्या घरी आणून द्यावं अशी अपेक्षा आहे का? आणि हो, ती म्हैस फ्री-रेंज पण हवी तुम्हा पर्यावरणवाद्यांना. म्हणजे अक्ख्या मुंबईला पुरतील एवढ्या म्हशींसाठी जवळपास रॅंचेस असायला हवेत नाही का? दुधाच्या इंडस्ट्रियलायझेशनमुळे तुम्हाला बारा महिने रास्त दरात दूध मिळतं आणि वारणेच्या म्हशीचंही दूध वाया जात नाही. ते डॉ. वर्गिस कुरियन वगैरे येडे होते का?

मी यातला कोणी तज्ञ नाही पण मला एवढं माहित आहे की पारंपारिक पद्धतीने शेती करणार्‍या आफ्रिकेत भूकबळी जात आहेत आणि इंडस्ट्रियलाईझ्ड पद्धतीने शेती करणार्‍या देशांत अन्नधान्य दुथडी वाहत आहे. भारतात हरित क्रांती अशा गोंडस नावाखाली इंडस्ट्रियलायझेशन येण्यापूर्वी भारत कटोरा घेऊन फिरत असे आणि प्रगत देश गुरांना घालायच्या लायकीचं पीएल४८० वगैरे धान्य भारताला घालत असत. तुम्हाला माहित नसेल तर तुमच्या आईवडिलांना विचारा.

तुम्ही बर्‍याच ठिकाणी स्वतःला काँट्रॅडिक्ट करताय असं मला वाटतं किंवा मला तुमचं म्हणणं समजत नसावं. कारण Submitted by जिज्ञासा on 4 June, 2021 - 00:31 इथे तुम्ही जो मुद्दा मांडताय
>>>तुमच्यामते पन्नास वर्षांपूर्वी जी लोकसंख्या होती ती तेवढीच आहे का? जर लोकसंख्या वाढली तर त्याच बरोबरीने गुरांची संख्या देखील वाढली असणारच ना? ती वाढलेली गुरं आधी उपलब्ध असलेल्या जमिनीवरच चरताहेत का? नाही, त्यांच्यासाठी आपण जास्तीची जमीन चराऊ कुरणे म्हणून तयार केली? ही जास्तीची जमीन आकाशातून पडली नाही. या जमिनीवर आधी जंगलं होती, इतर प्राणी रहात होते ती तोडली, इतर प्राणी नष्ट केले आणि मग तिथे गुरांना चारायला गवत लावलं. यात पर्यावरणाचा ऱ्हास झाला नाही असं म्हणायचं का?<<<
एकॲक्टली तोच मी मांडला होता, तेव्हा तुम्ही साडेसात अब्ज लोकांना पोसण्याइतकी जमीन, पाणी, आपल्याकडे सहज उपलब्ध आहे आणि निसर्गावर कोणताही अन्याय करता आपण सगळे सुखाने राहू असं म्हणत होतात. तुम्ही मांसाचे फार्मिंग करा नाहीतर धान्याचे, वन्यजमिनीचा र्‍हास तर होणारच आहे. ॲनिमल फार्मिंग करायला तुमच्या मते कदाचित जास्त पाणी लागत असेल, तर मांसाहारच बंद करायचा?

गुरांना खायला प्यायला वावरायला भरपूर जमीन लागते. मी तरी अजून टोलेजंग इमारतींमध्ये गुरांना माणसांप्रमाणे फ्लॅटमध्ये राहताना पाहिलेले नाही.>>> माझाही आधी असाच गोड गैरसमज होता. आपण पितो ते दूध दिवसा हिरव्यागार कुरणात चरणार्‍या, रात्री आकाशातले तारे मोजत झोपी जाणार्‍या गायीकडून येतं असं मला वाटायचं. प्रत्यक्षात आजची बहुतांश गुरं टोलेजंग इमारतींमध्ये नाही पण इनडोअर industrialized गोठ्यामध्ये राहतात आणि समोर आलेलं अन्न खातात. फ्री-रेंज गुरांचे प्रमाण तुलनेने नगण्य आहे.

मी 'मांसाहार केला तर दहापट अन्न कमी खावे लागेल' असा दावा केला असं आपल्याला का वाटलं? प्रत्येक प्रकारच्या फूड सोर्समधून वेगवेगळे घटक वेगवेगळ्या प्रमाणात मिळतात. मांसातनं मिळणारी प्रथिनं भातात मिळत नाहीत. भाज्यांतनं मिळणारे पोषक घटक मांसात मिळत नाहीत. म्हणूनच फूड पिरॅमिडमध्ये प्रत्येक घटकाला स्थान दिलं आहे. दुसरं म्हणजे मांसामध्ये केमिकल्सचे दहापट मॅग्निफिकेशन होते हे मला पटत नाही. पेस्टिसाईडस सर्वात जास्त वापरली जातात ती मानवाच्या आहारातल्या भाज्या, फळांवर. गुरांच्या चार्‍यावर मोठ्या प्रमाणात पेस्टिसाईड मारली जात नसावीत. कुठलीही गाय 'हे गवताचं पातं जरा किडलेलं वाटतंय' म्हणून खायचं टाळणार नाही. गुरांच्या शरीरातून मानवी शरीरात जाणार्‍या उदा. rBST इत्यादी केमिकल्सचा कुठलाही तोटा मानवाच्या आरोग्याला होत असल्याचं अद्याप सिद्ध झालेलं नाही. या थापा जनरली SJW प्राणीप्रेमी, पर्यावरणवादी वगैरे पसरवत असतात.

जगाची लोकसंख्या वाढत जाऊन ११ की १२ अब्जांवर स्थिर होणार असं कुठेतरी वाचलं होतं. पारंपारिक शेतीचे मार्ग एवढ्या लोकसंख्येचं पोट भरायला पुरतील असं वाटत नाही. जीवनातल्या प्रत्येक क्षेत्राचं आधुनिकीकरण झालं आहे मग शेतीने काय घोडं मारलंय. मी अन्नाचे वेगवेगळे सोर्सेस एक्सप्लोअर करावेत म्हणालो ते तुम्हाला हास्यास्पद वाटलं. म्हणजे हजारो वर्षं चालत आलेली आणि हेवी मांसाहारावर आधारलेली आदिवासी, इंडियन्स, एस्किमो (हे बायदवे १००% मांसाहारी होते) यांची जीवनशैली हास्यास्पद! प्रत्यक्षात मांसापलिकडेही जाऊन किटकांचा आहारात समावेश करण्याचे प्रयत्न चालले आहेत. किटकांमध्ये तुफान प्रोटीन्स असतात. रातकिडे, सिकाडाज यांचं पीठ कमर्शियली बनू लागलं आहे, गुगलून पहा.

१९४

मोरोबा, उत्तम प्रतिसाद दिला आहे तुम्ही. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. फक्त आज आहे जागतिक पर्यावरण दिन! त्यामुळे आज काही खूप छान छान कार्यक्रम/सेमिनार आहेत त्यात वेळ जाणार आहे. त्यामुळे आज कदाचित प्रतिसाद देता येणार नाही मला. तुमचा प्रतिसाद वाचला आहे याची केवळ पोच देत आहे.

निसर्ग, विकास इत्यादि.
निसर्ग अतिशय विशाल आणि सूक्ष्म आहे. त्याच्या केंद्रस्थानी मानव नाही. किंबहुना निसर्गाला केंद्रस्थानच नाही. ह्या निसर्गात सतत काहीतरी घडत असते. उलथापालथ होत असते. पण मानव ती जाणू शकत नाही. मानवाला दृश्य असा वर्णपट (spectrum) मर्यादित आहे किंवा श्रवणीय ध्वनिलहरी मर्यादित आहेत, मानवाच्या ग्रहण आणि आकलनक्षमतेहून कितीतरी प्रकाश आणि ध्वनिलहरी ह्या विश्वात विहरतात. म्हणजे त्या 'असतात.' हे अनेक प्रकारचे अस्तित्व मानवाच्या आकलनाबाहेरचे आहे. गीतेमध्ये भगवान म्हणतात की ही माझी परा प्रकृती आहे. परा म्हणजे पलीकडची, ह्या लोकाहून पलीकडच्या लोकातली, अलौकिक,(लोक धातु -क अर्धा -म्हणजे पाहाणे संस्कृतात) जी आम्ही पाहू शकत नाही ती. लोक म्हणजे हे जगसुद्धा.
आईनस्टाईन म्हणाले आहेत की जो जो विश्वाचे गूढ उकलले असे वाटू लागते तो तो नवनवीन गूढे दिसू लागतात. आणि मी ह्या वैश्विक शक्तीपुढे नतमस्तक होतो. (हे सारांशरूपाने)
मानवाने सृष्टिरक्षणाचा आव आणू नये आणि बडेजाव मिरवू नये. एकदोन पिढ्यांपुरते पाहावे. मानवाखेरीज कोणताही प्राणी पुढच्या पिढ्यांसाठी तरतूद करून ठेवीत नाही. मुंग्या फक्त एका पावसाळ्यापुरतीच साखर साठवतात. सात पिढ्यांची बेगमी करून ठेवीत नाहीत. मधमाश्यांचेही तसेच. एक पोळे करून ठेवायचे. बिन फुलांच्या हंगामात ते वापरायचे आणि पुन्हा नवे पोळे करायचे. पृथ्वीचा विनाश कोट्यवधी वर्षांनंतर होणार आहे. आणि तो हळू हळू अतिमंद गतीने आताही होतोच आहे. आताची उत्तरे आणखी शंभर वर्षांनीसुद्धा लागू पडणार नाहीत. मग त्यापलीकडच्या भविष्याचा विचार कशाला?! मानवाची दूरदृष्टी किती दूर पोचू शकते?
म्हणजे चिंतन करू नये असे अजिबात नाही, पण आपण आत्ता सुचवत असलेले उपाय ज्या काही पुढील पिढ्या किंवा पुढील काळासाठी सुचवत आहोत, त्या काळापर्यंत ते उपयोगी आणि वापरयोग्य रहातील का ह्याचाही विचार करावा. ह्यामुळे आपल्या भूमिकेतला आग्रह आणि अट्टाहास कमी होईल.
पुन्हा गीता आलीच. काम करीत राहावं पण त्याचं फळ आम्ही सांगतो तेच आणि तसंच असणार आहे असा समज बाळगू नये. आणि तसं ते असायला हवं ही अपेक्षासुद्धा नको. भविष्यवेत्त्याचा अभिनिवेश तर नकोच नको. कोण जाणे भविष्यात आपली श्वसनसंस्था अशी बनेल की CO2 उत्सर्जित होण्याऐवजी पृथक्करण होऊन त्यातून O2
मिळेल! किंवा असं एखादं सयंत्र बनेलही की जे हवेतला कर्बवायु शोषून घेऊन त्यातून ऑक्सीजन सुटा करील. अर्थात हेही सयंत्र (plant) किंवा इंजिन इतर सर्व सयंत्रांप्रमाणे आणि सध्याच्या thermodynamics प्रमाणे फ्रॅक्शनल कार्यक्षमता असलेलेच असेल. कधीच एक one, १ असणार नाही. म्हणजे लावलेली संपूर्ण ऊर्जा त्यातून निघालेल्या कार्यात परिवर्तित होऊ शकत नाही,(carnot )त्याच कार्यासाठी वापरली जाऊ शकत नाही.

शिवाय, आम्ही इच्छिलेले बदल घडवून आणण्यासाठी आम्ही लावलेल्या ऊर्जेवर मानवाखेरीज इतर अनेक फॅक्टर्स म्हणजे forces आमच्या बाजूने किंवा विरोधात काम करीत असतात आणि ते परिणामाची दिशा ठरवतात. म्हणजे पुन्हा; काम करीत राहाणं एवढंच आमचं jurisdiction आहे. त्याचे फळस्वरूप परिणाम काय असायला हवेत हे ठरवणं आमच्या अधिकारक्षेत्रात नाही. विशाल आणि सूक्ष्म अशा निसर्गातली एलिमेंटस मिळून ते ठरवतात.
दोनशे तीनशे, हजार दोन हजार वर्षांनंतर जन्माला येणाऱ्या मानवपुत्रांच्या समस्या आताच ठामपणे ओळखून त्यांवर आपला आताचा ज्ञानसाठा आणि आताच्या फूट पट्ट्या यांच्या आधारे उत्तरे शोधून ठेवणे ह्याला दूरदृष्टी म्हणता येईल काय?
आणि आम्हाला कोणाच्या हवाली काय करायचे आहे? आम्ही पृथ्वीचे, सृष्टीचक्राचे मालक आहोत का ती कुणाच्या हवाली करायला? सात पिढ्यांपूर्वी होती तश्शीच पृथ्वी आम्हांला मिळाली आहे काय?गेल्या पिढीतील बांधलेले घर आजच्या गरजेनुसार बदलवले नाही तर निवासयोग्य राहात नाही. सगळी व्यवस्था बदलावी लागते. मग शाश्वत काय आहे?
नागरीकरण, विकेंद्रीकरण यावरही लिहिण्यासारखे खूप आहे .पण ते पुन्हा कधीतरी, संधी मिळाली तर.
काही मुद्द्यांची, विधानांची पुनरावृत्ती झाली आहे, पण एकच विषय अनेक बाजूंनी पुन्हा पुन्हा चर्चिला जात असेल तर असे होणे अपरिहार्य आहे.

गीतेत सर्व विषयातील ज्ञान आहे हे नक्की काहीच टक्के लोकांना पोट शुळ उठतो ती वेगळी गोष्ट आहे पण जगातील लोक गीतेचे भव्य पण मान्य करण्यात कोणताच कमीपणा समजत नाहीत.
दुर्लक्ष करून पुढे जाणे हाच उत्तम मार्ग.
हिरा
उत्तम पोस्ट.

गीतेला लाडावण्यासारखे ह्या प्रतिसादात काही नाही. उलट तीच आपल्याला वेड लावते. आणि कुणी कसा अर्थ लावावा हे ज्याच्या त्याच्या मर्जीवर, कुवतीवर आहे.
माझी गीतेकडे बघायची दृष्टी धार्मिक नसून आध्यात्मिक आहे. philosophical असेही मी म्हणणार नाही कारण गीता ही एकच एक तत्त्वज्ञान सांगते असेही नाही. तो अनेक तत्वज्ञानांतील तथ्यांचा समुच्चय आहे.

>>>> मला लिहायचे होते त्या औद्योगिकीकरण, केंद्रीकरण, विकेंद्रीकरण, शहरीकरण, स्वनिर्भरता, ग्रामनिर्भरता अशा मुद्द्यांची कोंकरे बिचारी ह्या रणधुमाळीत कोपऱ्यात घाबरून बसली आहेत.<<<

+१

जिज्ञासा, मी तुम्हाला असे उद्देशून नाही म्हटले की तुम्ही विगन व्हा असे म्हणालात.

———————————
बाकी,
एकंदरीत, पर्यावरणाचा विषय आला की, एखादा चमू असे शेपूट पकडतो जसे की, शाकाहार चांगला की मासांहार... मग चढाओढ असते की, कसे ह्यानेच नुकसान होते, त्याने नाही.
माझे म्हणणे अश्या चमूबद्दल आहे.
पर्यावरणाचा मुद्दा फक्त शाकाहार विरुद्ध मासांहार इतकाच का? आणि इतपतच का? किंवा फक्त त्याच गाडीवर येवून घसरतो.
सगळ्याच विषयातील उत्पादन क्षेत्राने ज्या पद्ध्ती अवलंबल्या आहेत, त्याच्यावर कोणीच बोलत नाही.
म्हणून, हिरा ह्यांचा मुद्दा पटला.
असो. बरेच लिहिण्यासारखे आहेत. पण हा धागाच व चर्चाच योग्य रितीने जात असेल तर ठिक..

मोरोबा, बर्‍याच अंशी हेच म्हणायच आहे. सगळच पटलं नाही. हॉर्मोन वगैरे बाबतीत नंतर लिहिन.

——
झुरळांची शेती पण पहाच उत्सुकी मंडळींनी.

मोरोबा गुरांच्या वाटे शरीरात अँटिबायोटिक्स देखील जातात. आणि एस्किमो १००% मांसाहारी नाहीत. उन्हाळ्यात त्यांच्या आहारात बऱ्यापैकी वनस्पतीजन्य पदार्थ असतात. बाकी प्रतिसादाशी सहमत.

बाकी म्हशींचे बहुमजली गोठे महाराष्ट्रात देखील आहे.
https://www.youtube.com/watch?v=zPSAg4tMy2k

हवामान वर बदल करणारे घटक शोधून काढून. त्या वर शक्य होईल तेवढे नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
प्रदूषण हा मात्र अतिशय गंभीर मुद्धा आहे.वायू प्रदूषण, जल प्रदूषण ,हे थांबलेच पाहिजे नाही तर पुढची पिढी जावू ध्या आहे ती पिढीच असंख्य रोगांनी ग्रस्त होईल..
कीटक नाशक,किंवा पिकांची वाढ लगेच होण्यासाठी दिले जातात ते हार्मोन्स,दूध जास्त देण्यासाठी दिले जातात ते हार्मोन्स हे बंद च केले पाहिजेत .
नाहीतर मानवी शरीर सर्व रोगांचे घर असेल.
मॉडर्न medical science मध्ये पण रोग निवारण करण्याची ताकत नाही.
कॅन्सर,एडस्, heart attack आणि असे अनंत रोग मॉडर्न medical सायन्स पण बरे करू शकतं नाही.
Covid नी जगाची कशी धूळधाण उडवली हे ताजे उदाहरण आहे.

शहरीकरण आणि शेतीवर अवलंबून असलेली लोकसंख्या कमी करणे हा आपल्या देशाचा एक सगळ्यात मोठा अजेन्डा आहे. भांडवलवाद आणि लोकशाही हे ज्या मार्गाने जात आहेत त्यात पर्यावरणवाद हा आडवा येतो. त्यातून आहे रे वाले आणि नाही रे वाले वेगवेगळ्या बाजूला आहेत. देश चालवायचा तर अमेरिकन ड्रीम पाहिजे.सगळ्यांना अच्छे दिन पाहिजे. त्याला भांडवलवाद पाहिजे. मग त्यातून सध्याची समाज व्यवस्था तयार झाली. इमर्जन्स ज्याला म्हणतात त्या पद्धतीने. त्यात पर्यावरणवाद कसा बसवणार हा एक अति कठीण प्रकारचा प्रश्न आहे.

दुष्परिणाम तीव्र स्वरूपात दिसायला लागले की सर्व देश बरोबर सुधारणार.
वादळ येण्याचे प्रमाण आणि त्याची तीव्रता वाढत चालली आहे.स्वतः अमेरिकेला च चांगला फटका बसला आहे त्याचा.
दोन वर्ष सरळ दुष्काळ पडला की पावूस पडलाच नाही की सर्व भांडवलवादी स्वप्नातून जमिनी वर येतील.
तो दिवस पण लांब नाही.

पर्यावरणाचा मुद्दा फक्त शाकाहार विरुद्ध मासांहार इतकाच का? आणि इतपतच का? किंवा फक्त त्याच गाडीवर येवून घसरतो.
आहो त्यांनी "प्रभातरोडच रुंदीकरण" हा विषय पण पर्यावरणाचा करून ठेवला होता.

हवेतून ऑक्सिजन निर्माण करू.
ऑक्सिजन निर्माण करणारी यंत्र तयार करू
लोक मेली ऑक्सिजन ऑक्सिजन करून चार पाच किलो ऑक्सिजन पुरवता आला नाही फक्त काही हजार लोकांना.
अब्जावधी लोकांना काय पुरवणार.
समुद्राच्या पाण्या पासून गोड पिण्याचे पाणी निर्माण करू.
हवेतून पाणी निर्माण करू.
जुलै लागला की टँकर वर तुटून padave लागत आहे

कृत्रिम पावूस पाडू
सर्व रोगावर औषध शोधू.माणसाची प्रतेक पेशी वर नियंत्रण मिळवू .
हे सर्व करू काही काळजी करू नका बिन्धास्त निसर्गाची नासाडी करा असा संदेश काही जन देत असतात.
पण अब्जावधी लोकांच्या गरजा निसर्ग सहज भागवत आहे तसे कृत्रिम पने त्या निर्माण करून अब्जावधी लोकांच्या गरजा भागतील का त्या पण फुकट.
निसर्ग आता पर्यंत अन्न पाणी,हवा ,योग्य तापमान माणसाला फुकटच पुरवत आहे.
त्या सर्व गोष्टी ची किंमत देणे माणसाला परवडणार नाही.
त्या पेक्षा निसर्ग,पर्यावरण ,वातावरण वाचवणे हा मार्ग सोपा आहे.

Pages