निर्लेप

Submitted by फूल on 27 May, 2021 - 20:55

तीनेक वर्षांपूर्वीची गोष्ट. इथं ऑस्ट्रेलियात थंडीच्या दिवसांत एखादाच दिवस सोनेरी झगझगत्या उन्हाचा येतो. नाहीतर सगळेच ढगाळ, पावसाळी वातावरणाचे दिवस. तो दिवसही असाच कोवळ्या उन्हाचा होता. बाहेर ऊन पाहिलं की हातातली सगळी कामं तशीच टाकून मी आणि माझं दोन वर्षांचं लेकरू आम्ही बाहेर पडायचो. कधी नुसतंच चालून यायचो, कधी बागेत झोपाळे, घसरगुंड्या करत तिथं खेळत बसायचो. असलं काहीतरी इकडम् तिकडम् करायला भरपूर वेळ गाठीशी होता आमच्या. लेकरू तेव्हा नव्यानेच फ्लाईंग कीस द्यायला शिकलं होतं. त्यादिवशी आम्ही चालायला बाहेर पडलो आणि तिने नवाच खेळ सुरु केला. समोर येणाऱ्या प्रत्येकाला फ्लाईंग कीस द्यायची, मग तो माणूस असो, त्याच्याबरोबर चालायला बाहेर पडलेला कुत्रा असो, एखादा पक्षी असो किंवा अगदी एखादं इवलं रोप असो, प्रत्येकाला एक फ्लाईंग कीस... समोरून येणाऱ्यांपैकी कुणी हसून उत्तरं देत होते, एका दोघांनी हवेतल्या हवेत तिची फ्लाईंग कीस झेलून खिशात टाकली, कुण्या एका आज्जीने आपल्या लोकरीच्या पर्शीतून फ्लाईंग कीस काढून पिल्लूला परत पाठवली... अशी काय काय मज्जा करत चाललो होतो.. सगळ्यांचंच लक्ष होतं असंही नाही... कुणी आपल्याच चिंता, विवंचनेत व्यग्र असणारेही होते त्यात... पण त्यांच्यावरही फ्लाईंग कीसचा वर्षाव होतच होता... पिल्लू तिच्या जवळचा हा फ्लाईंग कीसचा अक्षय साठा आजूबाजूच्या समस्त जीवसृष्टीवर मुक्त हस्ते उधळत होती.. तिचं हसून बघणाऱ्यांकडे, दुर्लक्ष करणाऱ्यांकडे कुणाकडेच लक्ष नव्हतं... कुठल्याही प्रतिसादाची अपेक्षा नाही... येणाऱ्या प्रत्येकाला आपल्याजवळची काहीतरी गंमत नवीन गोष्ट देणे एवढंच... आपल्याला बाबा रोज ऑफिसला जाताना फ्लाईंग कीस देतो तेव्हा आपल्याला कसं छान वाटतं तसंच इतरांनाही छान वाटेल असलं काहीतरी असेल का तिच्या डोक्यात? खरंतर एवढंही असेल का त्या इवल्या टाळक्यात...? देव जाणे...! इतका निष्पाप, स्वच्छ, निर्मळ, निर्भेळ, निष्काम कर्मयोग मी तोवर कधीच बघितला नव्हता, अनुभवला नव्हता.... समोरून एक मोबिलिटी स्कूटर चालवत आज्जी येत होती.. खूप खूप जुनी मोबिलिटी स्कूटर आणि त्याहूनही जख्खं जुनी झालेली आज्जी... सुरुकुत्याच सुरकुत्या... आमची ही गम्मत तीही बघत असेल... जशी ती समोर आली तशी पिल्लूने तिलाही एक फ्लाईंग कीस दिली.. थरथरत्या हाताने तिनं पिल्लूला फ्लाईंग कीस दिली आणि माझ्याकडे बघून म्हणाली यु मेड माय डे... ऑस्ट्रेलियात असे एकेकटे राहणारे कितीतरी आज्जी-आजोबा आहेत... दिवसेंदिवस, महिनोंमहिने त्यांना कुणी भेटायला येत नाही... नव्वदीच्या पार असलेल्या त्या आजीला एक नुकतं उमलणारं रोपटं सुखवून गेलं नाही तरच नवल.. मी नुसतीच हसले तिच्याकडे बघून... आम्ही दोघींनी वळून पिल्लाकडे बघितलं... पिल्लू आपल्याच नादात फुटपाथवरल्या एका पक्ष्याला फ्लाईंग कीस देत उभं होतं... माझ्या डोळ्यांत पाणी मावलं नाही...

पिल्लू लहानगंच होतं... तिच्या कुठल्याच भावनेला, विचारांना कसलीच चाळणी बसवलेली नव्हती.. जे आत उमटायचं ते जसंच्या तसं कुठलाही संस्कार न होता बाहेर यायचं... सगळ्या कोऱ्या, करकरीत, स्वच्छ, लखलखीत भावना... ही असली श्रीमंती मोठ्यांच्यात विरळाच किंबहुना आपल्याला ती परवडायची नाही... ज्यांनी जगाचे अनेक तऱ्हांनी होणारे संस्कार बाजूला सारून आतली मूळ भावना स्वच्छ, लखलखीत ठेवली अशी माणसं म्हणजे संतच... समाजसेवेत वाहून घेतलेली अनेक संत मंडळी ही अशीच... जगरहाटीनुसार, व्यवहार म्हणून स्वार्थ ज्यांना करता येत नाही, ज्यांच्या भावनांना, विचारांना कुठलीही चाळण लागत नाही, अश्या अबाधित भावना, विचारांची माणसं लाखात एखादीच...

परवा नवरा काहीतरी फोनवर पहात बसला होता... मला ‘कम सी द मुन.. कम सी द मुन..’ असलं काहीतरी ऐकू आलं... कुतूहल वाटलं म्हणून त्याच्या फोनमध्ये डोकावलं तर एक आजोबा एक लांबुडकी नळी घेऊन अमेरिकेतल्या कुठल्यातरी रहदारीच्या फुटपाथवर रात्री थंडीत जाड कोट, कानटोपी घालून उभे आहेत आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ओरडून ओरडून सांगातायत ‘कम सी द मुन.. कम सी द मुन..’ फुटपाथवरली बरीच लोकं आपल्याच नादात, काहीजण तर म्हाताऱ्याला वेड लागलं बहुधा असा विचार करत निघून जातात... काही मोजकेच भाग्यवान त्या वेड्या म्हाताऱ्यावर विश्वास ठेवावा न ठेवावा म्हणून तिथंच घुटमळतात... आजोबा पुन्हा आवर्जून बोलावतात... हातातलं एक पत्रक त्यांना देतात आणि त्या नळीला डोळा लावा म्हणून सुचवतात... ज्यांचा डोळा त्या नळीला लागतो त्यांचा दिवस बदलतो... कदाचित आयुष्यही... लोकांच्या तोंडातून आश्चर्याचे उद्गार निघतात... प्रत्येकासाठी हा अनुभव नवा असतो... रोज दिसणारा चंद्र इतका बारकाईने कधी कुणी पाहिलेलाच नसतो, त्यावरच्या डोंगर-दऱ्या, खड्डे, पर्वतरांगा हे असलं काही कित्येकांच्या गावीच नसतं... रोजचं आयुष्य ढकलणारी तुमच्या-आमच्यासारखी झापडं लावेली मोटेला बांधलेली माणसं... ही माणसं जेव्हा तो ‘कम सी द मुन..’ म्हणणारा म्हातारा, त्याची ती नळी आणि त्यातून दिसणारा अभिसुंदर चंद्र बघतात तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया पाहण्यासारख्या आहेत. कुणी म्हणतं, मी हे कधीच अनुभवलं नव्हतं... आजोबा म्हणतात... तुम्ही आता अल्पसंख्यांकात गणले जाल... कुणी म्हणतं, हे अविश्वसनीय आहे... आजोबा म्हणतात, ‘the exterior decorator does lovely work…’ कुणाला पुन:पुन्हा बघायचं असतं... आजोबा म्हणतात अवश्य बघा... हे काहीं आईस्क्रीम नाही की जास्त खाल्ल्याने त्रास होईल... हवं तेवढ्या वेळा बघा... बघायला येणाऱ्या लोकांना आजोबांनी दिलेल्या प्रतिक्रिया बघून मी अजूनच आतून हलले.. इतकं निरामय मन मी तोवर अनुभवलंच नव्हतं... माझ्या दोन वर्षांच्या लेकरासारखंच निर्लेप माणूस... कैक ऊनपाऊस सोसूनही इतकं निर्लेप रहाणं आणि आपला मूळचा रंग जपणं जमतं काही जणांना...

त्या आजोबांचं नाव होतं जॉन डॉब्सन. डॉब्सोनिअन टेलिस्कोपचे निर्माते... ज्यांना ज्यांना तारे बघायची इच्छा आहे त्या सगळ्यांना अगदी स्वस्तात छान आकाश पहाता येईल अश्या टेलिस्कोपचं तंत्र या आजोबांनी शोधून काढलं... इतकंच नाही तर तो थोडक्या खर्चात घरच्या घरी बनवता येऊ शकतो हेही दाखवून दिलं... आज अनेक हौशी आणि नावाजलेले असे सगळ्या तर्हेचे खगोलशास्त्रज्ञ या टेलिस्कोपचा पुरेपूर वापर करतात... खोल आकाशातली तारामंडळे, आकाशगंगा, नक्षत्र समूह हे सगळं बघायला खूप खर्चिक उपकरणे वापरावी लागतात... पण त्यातही कमीत कमी खर्चात बनणाऱ्या ह्या टेलिस्कोपने अनेक जणांना आकाशाची दारं खुली करून दिली...

आपल्याला दिसलेलं, आपण अनुभवलेलं काहीसं अतर्क्य, सुंदर इतरांनीही अनुभवावं, त्यांनाही तो जसाच्या तसा अनुभव द्यावा ही खरीखुरी माणूसपणाला शोभणारी मूळ भावना... सामाजिक प्राणी हे बिरूद आपण कित्येक वर्षं वागवत आहोत... त्या बिरुदाला शोभणारी ही भावना... पण अश्या खऱ्याखुऱ्या भावना रोजच्या आयुष्यात क्वचित डोकं वर काढतात... आणि जरी वर आल्या तरी आपण त्यांना जसंच्या तसं उमलू देत नाही... त्यामुळे अशी जेव्हा नंग्या तलवारीच्या पात्यासारखी खरीखुरी मानवी भावना लखलखत दत्त म्हणून सामोरी उभी ठाकते तेव्हा मी स्तिमित होते.. मग वाटतं की या अश्याच भावनांच्या जोरावर तर हे जग सुरुये... कसलीही अपेक्षा न ठेवता फ्लाईंग कीस देत फिरणारं माझं लेकरू, कसलीही अपेक्षा न ठेवता लोकांना चंद्र दाखवणारा जॉन डॉब्सन, कुठल्याही फळाची अपेक्षा न करता सर्वे भवन्तु सुखिन: म्हणत हिमालयात बसलेले समाधिस्त योगी, “किंबहुना सर्वसुखी” म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज हे सगळेच आठवले आणि डोळ्यात पाणी मावलं नाही... मोट सोडून, झापडं काढून आजूबाजूला बघायचा असा एखादाच वेडाबागडा क्षण डोकावतो आपल्या आयुष्यात... मरेपर्यंत जगायचं आहेच तर या अश्याच क्षणांना आयुष्य म्हणत जगायच.....
समाप्त

Come see the moon....
https://www.youtube.com/watch?v=UTF-uUDb500

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख आहे
हे कम सी द मून चं पण पहिल्यांदा पाहिलं.

किती गोड लिहिलय
सगळं समोर उभं राहिलं अन टचकन पाणी आलं डोळ्यात
थांकु आणि स्टे ब्लेस्ड

अहाहा! काय सुंदर काय सुंदर! असं काहीतरी वाचलं की दिवस खरच सुंदर होऊन जातो. वाचता वाचता डोळ्यात पाणीच शेवटी. निर्लेप खरंच! थोडे क्षण जरी असे जगता आले तरी खूप होईल.

खूप छान लिहीलंय.
जॉन डॉब्सन फारच क्यूट वाटले. त्यांना मिळायला हवी होती तेवढी प्रसिद्धी त्यांना मिळाली नसावी असं वाटलं. आणि असा विचार करून वाईटही वाटलं. काही काही लोकं कसले वेडे असतात ना! फुल झपाटलेले!! ते तसेच वाटले मला. मस्त व्हिडिओ.

खूप सुंदर लेख.
बर्‍याच दिवसांनी तुमचा लेख वाचला. छान वाटलं.