Show must on...

Submitted by Kashvi on 20 May, 2021 - 13:50

2 महिन्याखाली माझ्या वडिलांचे आणि सासूबाईचें करोनाने निधन झाले.एकाच वेळी दोन जवळच्या व्यक्तींच्या मायेला आम्ही पारखे झालो.असं माझ्यासोबत का झालं, एकदाच दोन मोठे आधार जाण्यासारखं मी काय पाप केलं? असे अनेक प्रश्न डोळ्यातल्या पाण्यासोबत येऊ लागले. सांत्वनाचे बरेच फोन आले. बऱ्याच नातेवाईकांनी चौकशी वजा सांत्वन करत त्यांच्याही नकळत नवीन शंका व्यक्त केली .उदा. काही दिवसांपूर्वी माझ्या मुलाची मुंज झाली होती तर काहीजणांनाच म्हणणं होतं मुंजीला दृष्ट लागली असेल किंवा मुहूर्त चांगला नसेल, हॉस्पिटल बदलायला हवं होत किंवा योगायोग असं अजून काही काही…..
एकामागून एक जवाबदारी आमच्या दोघांवर पडत गेली, दुःख करत बसण्यापेक्षा आहे ती परिस्थिती स्वीकारणे भाग पडले.पण काही प्रश्न तसेच आहेत, खूपदा वाटत बाबांना माझी आठवण येत असेल का? की देह सोडल्यावर सगळ्या भावना नष्ट होतात? ते मला रोज सकाळी फोन करायचे आता त्यांना सकाळी माझ्याशी बोलावंसं वाटत असेल का ? दुसरा जन्म लगेच मिळतो का? का असं काही नसतं?
माझ्या सासूबाईचा घरात, माझ्या मुलांमध्ये खूप जीव होता, आता आम्ही गावाकडच्या घरी आहोत तर सासूबाईंना आमच्यात यावं वाटत असेल का? मी मुलांना रागावलेलं त्यांना आवडत नसे, आताही मी मुलांना रागावल्यावर त्यांना त्रास होत असेल का? की हे सगळे आपल्या मनाचे खेळ असतात?

असं म्हणतात आपले आधार गळून पडू लागले की समजायचं आपण दुसर्यांचा आधार व्हायची वेळ आली आहे,खरंच आहे. किती कमाल असते नियतीची,बघता बघता डोळ्यासमोरचा माणूस निर्जीव होतो, किती तरी गोष्टी नंतर बोलायच्या सांगायच्या राहून जातात ज्या त्याच व्यक्तीसाठी असतात. खरंतर खूप जण म्हणतात आम्ही आहेत तू एकटं नको वाटून घेऊ पण त्या गेलेल्या व्यक्तीची जागा कोणीही घेऊ शकत नाही. अगदी आता आई सुद्धा बाबांची जागा घेऊ शकत नाही.

जवळच्या व्यक्तीचा मृत्यू हे माझ्यासाठी नवीन असलं तरी जगासाठी जुनंच आहे, दर मिनिटाला कितीतरी लोक मरत असतात जन्म मृत्यू हा तर नियमच आहे. आपण मात्र जाणाऱ्याच कारण शोधत बसतो हॉस्पिटल बदललं असत तर वाचले असते का? दुसऱ्या मोठ्या शहरांत शिफ्ट केलं असत तर? कोणामुळे झाला असेल करोना? अगदी मी तर माझ्या सासूबाई माझी मुलगी जेवत नव्हती तेव्हा सहज म्हणाल्या होत्या तिला की , “अवनी तू फार त्रास देत आहेस आता तू पुढच्या वेळी आली ना की तुला मी घरात दिसणार नाही मी पिशवी घेऊन कुठंतरी दूर जाणार आहे, “आणि लगेच माझी मुलगी जेवू लागली पण वास्तूपुरुष तथास्तु म्हणतो म्हणतात त्या प्रमाणे आम्ही परत आलो तेव्हा त्या घरात नव्हत्या फार दूर देवाकडे निघून गेल्या होत्या आता वाटत त्या असं बोलल्या नसत्या तर…असे बरेच विचार मनात येऊन जातात पण या सगळ्याचा काहीच फायदा नसतो जे व्हायचं असत ते कशानेच थांबत नाही. या मनस्थितीत खूप जण चौकशी करत होते की आम्ही पुढे आता काय करणार, कुठे आहात अजून गावाकडेच का? घर भाड्यानी देणार की विकून टाकणार? असे अनेक प्रश्न आमच्या आधी त्यांना पडलेले होते. काही मात्र खूप आपुलकीनी बोलत होते. करोना मुळे कोणीही घरी येऊ शकत नव्हते.
आम्ही दोघे नवरा बायको 15 दिवस नुसतं एकमेकांकडे बघत होतो कारण बोलण्यासाठी शब्दच नव्हते माझे वडील गेलेले आणि त्यांची आई, आम्ही सारख्याच मनस्थितीतुन जात होतो, आम्हाला ही करोना होऊन गेल्यामुळे प्रचंड शारीरिक ताण,12 तास प्रवास केल्यामुळे शीण , अनपेक्षित पणे वडिलांच्या आणि सासूबाईंच्या जाण्यामुळे आलेला मानसिक ताण दोघांमध्ये सारखाच होता. पण थकून रडून चालणार नव्हतं, दोन लहान मुलं करोनातून नुकतेच नीट झालेले सासरे यांची काळजी आम्हाला घ्यायची होती. सासूबाईंचे सर्व विधी पार पडायचे होते, जसं जमेल तस आम्ही दोघे सर्व करू लागलो.
माहेरी ही असच काहीस चालू होत वडील गेले त्या दिवशी आईचा रिपोर्ट पॉसिटीव्ह आला वडिलांना अग्नी देऊन भाऊ तासाभरातच आईसाठी बेड मिळतो का हे बघत हॉस्पिटल मध्ये विचारू लागला तेव्हा आमच्या गावात करोना वाढल्यामुळे बेड मिळण कठीण झालं होतं . आई घरात नसताना भावाने एकट्याने 93 वर्षाच्या आजी ला सांभाळत सगळे विधी केले. मी माझे पती आणि भाऊ रडणं, वाईट वाटणया सगळ्याच्या किती तरी पली कडे गेलो होतो. सजीव रोबोट सारखं आम्ही सगळं करत होतो डोकं तेवढं सुन्न झालं होत. गोडजेवणाच्या दिवशी माहेरी जाताना गाडी जेव्हा कॉलनीकडे वळली तेव्हा मन खूप जड झालं होतं. घर तसंच होतं पण गेटवर मी आले म्हणून आई ला लवकर ये लवकर ये म्हणून हाका मारणारे बाबा नव्हते. माझी माय आली म्हणायला कोणी नव्हतं भकास जीव घेणी शांतता होती.
आता आम्ही सावरलो आहोत हळूहळू जमत आहे सगळं हाताळायला. आपल्या आधीच्या पिढ्यानीही असच गिळून टाकलं असेल दुःख…..हेच चालू राहणार…,…… पिठ्यामागून पिठ्या बदलत जाणार. काळ कोणासाठीच थांबत नाही show must go on सारखं होऊन जात आयुष्य, आपल्या आधीच्या पिढी सारखं आपणही पचवतो सगळं आणि चालू लागतो पुढे………..

Group content visibility: 
Use group defaults

माझी धाकटी बहीण ह्या परिस्थितीतून जातेय. १८ एप्रिलला तिचा नवरा गेला. >>> ओह धनुडी, फारच दुखःद घटना. वयही कमी असणार. आपल्या बहिणीला आणि सर्व कुटुंबियांना यातून सावरण्याचे बळ लाभो.

अगदी असाच प्रसंग माझ्या एका पुतण्यावर आलाय. आधी त्याला , मग वडिलांना (माझा मावसभाऊ) करोना झाला. दोघांनाही अ‍ॅडमिट व्हावं लागलं. दरम्यान त्याच्या बायको आणि सासूलाही करोना झाला. सासूही अ‍ॅडमिट. पुतण्या घरी आला, पण त्याच्या वडिलांना म्युकर मायकोसिस झाला. कोव्हिड सेंटरमधून हॉस्पिटलमध्ये हलवले. सासूलाही कोव्हिड सेंटरमधून हॉस्पिटल मधे हलवावं लागलं. आय सी यू - व्हेंटिलेटर.. वडीलही आयसीयूत हलवले गेले. ऑपरेशन करता येतंय का म्हणून दोन हॉस्पिटल्स बदलली. पण उशीर झाला होता.
एके संध्याकाळी वडील गेल्याची बातमी आली. नवरा बायको त्याच्या काकासोबत ( माझा मामेभाऊ) कारने हॉस्पिटलात चालले होते. वाटेतच त्याची सासू गेल्याचा फोन आला.
इतके भयंकर आघात एका मागोमाग एक आणि त्या आधीचा महिनाभराचा ताण.
त्याची आई गेल्या फेब्रुवारीत गेली होती. सासरे खूप आधीच गेले होते.

कोव्हिड प्रोटोकॉलमुळे जाऊन भेटणं शक्य नव्हतं. मला त्यांच्याशी फोनवर बोलायचंही धैर्य झालं नाही. त्यांना आणखी त्रास द्यावा असंही वाटत नव्हतं. मेसेज केला. याआधी त्याची आई गेली तेव्हा समाचाराला गेलो होतो.

अरेरे.. भरत, खूपच वाईट प्रसंग आलाय तुमच्या पुतण्याच्या कुटुंबात.
माझ्या मामीची धाकटी बहीण, तिचे यजमान, दीर, जाऊबाई सगळे कोविडमुळे आयसीयूमधे admitted होते. आधी दीर गेले. पुढच्या आठवड्यात मामीची बहीण गेली. तिला कॉलेजच्या वयाचा एकुलता एक मुलगा आहे. त्याच्यावर हे सगळं सहन करायची वेळ आली. दिरांना काय मुलं आहेत ते माहिती नाही. तिच्या नवऱ्याला आणि जाऊबाईंना हे सांगितलेलंच नव्हतं. माझीही हिंमत झाली नाही मामीशी बोलण्याची. मामाला मेसेज केला फक्त.
अशी अजून किती कुटुंबं असतील. वाईट याचं वाटतं की कुठे तरी हे सगळं टाळता येण्यासारखं होतं का? अनावश्यक कारणांसाठी गर्दी करणारे (उद्यापासून लॉकडाऊन आहे म्हणून आज गहूतांदूळ कणीक घ्यायला गर्दी करणारे, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये जणू काही करोना संपला असं समजून साखरपुडे, लग्नं आणि डोहाळजेवणं साजरी करणारे मध्यमवर्गीय) , मास्क नीट न घालणारे, यांचा राग येतो. एवढी भराभर नसती पसरली साथ, तर लस घेऊन हे सगळे वाचले असते. पण आता गेलेली माणसं तर परत येणार नाहीत.

Kashvi स्वतःला सांभाळा.

काय हे एक एक भयंकर प्रसंग. माझ्याकडे सुद्धा वेगळी परिस्थिती नाही. मोठ्या नणंदेचा तीस वर्षाचा मुलगा गेला काही दिवसांपूर्वी. अजूनही या गोष्टीवर विश्वास ठेवायला मन तयार होत नाही. सतत हसतमुख असणारा, कष्टाळू आणि निरोगी मुलगा. तिला आणि तिच्या मिस्टरांना सुद्धा कोविड झाला होता. त्या वेळेला त्यांना बेड आणि ऑक्सिजन मिळवुन देण्यासाठी धडपड करण्याच्या नादात याला सुद्धा लागण झाली आणि स्वतःकडे दुर्लक्ष झाले. किती महागात पडले हे सारे . उरलेल्यांनी कशी आयुष्यं काढायची Sad

खूपच दुःखद आणि वेदनादायी काळ आहे हा..
ह्या दुःखातून सावरायला देव तुम्हांला शक्ती देवो ..
काळजी घ्या..

खूप वाईट वाटलं वाचून.
तुम्हाला ह्या सगळ्यातून बाहेर पडायला बराच काळ लागेल.
तुम्ही तुमच्या मुलांकडे बघून धीर घ्या एवढंच सांगेन.

बापरे काय एकेक भयंकर प्रसंग Sad भरत, वावे, प्राजक्ता

हो, मामी , माझी धाकटी बहीण आहे आम्हा बहिणींमध्ये सगळ्यात लहान आहे.शेंडेफळ लाडकी.आणि तिच्या नशिबी हे असं यावं. खुप च तुटतं आतमध्ये.

वाईट वाटलं वाचून. लेखात प्रश्न उपस्थित केलेत. त्याबाबत प्रत्येक व्यक्तीची उत्तरे वेगवेगळी असतील. मी म्हणेन "अजिबात विचार करू नका. जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर जरतर असा विचार आपण करतो, अनेकजण करतात. पण त्याला काही अर्थ नसतो. तसेच व्हायचे असते ते होऊन जाते. त्यात कुणाचा दोष नसतो. त्यामुळे असे झाले असते तर त्या वाचल्या असल्या का वगैरे प्रश्न अर्थहीन आहेत. गदिमांची ओळ सतत आठवते - मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा! तेंव्हा जास्त विचार करू नये हेच उत्तम"

>> घर तसंच होतं पण गेटवर मी आले म्हणून आई ला लवकर ये लवकर ये म्हणून हाका मारणारे बाबा नव्हते.

हे फार फार फार वाईट असते Sad त्या व्यक्तीच्या मृत्यूवेळीसुद्धा होत नाही इतके दु:ख यावेळी होते, इतके हे वाईट असते. यातून गेलेलो आहे. नेहमीप्रमाणे आतून घाईघाईने डोळ्यात प्रेम व कौतुक ओसंडून वाहत स्वागताला येणारी आई त्यादिवशी दरवाजात आली नाही आणि आता इथून पुढे ती कधीही येणार नाही हे जाणवताच दरवाजातच कोसळलो होतो. आज बरीच वर्षे झाली पण तो दिवस आठवला तरी गहिवरून येते.

भरत, वावे, प्राजक्ता Sad

दिवस चांगले नाहीत. सर्वांनी आपापली व आप्तेष्टांना काळजी घ्यायला सांगा.

मी तुमची मन:स्तिथी अगदीच समजू शकते. माझ्या सोबत हेच झालय. आमचेकडे कोणीच corona ने नाही गेले. पण असच काहीस झालं. माझे वडिल गेले Oct मध्ये, अचानकच. डॉक्टर म्हणाले cardiac arrest. ते खूप healthy होते. काहीच आजार नाही. अगदी उभ्या उभ्या गेले, शेजाऱ्याशी बोलता बोलता. मी emergency व्हिसा वगैरे सगळे सोपस्कार करून भारतात गेले. वडिलांनंतर पंधरा दिवसात आजी गेली , वयोमानानुसार. आजीला जाऊन नऊ दिवस झाले तो सासूबाई गेल्या. त्याच दिवशी मला डेंग्यु झाला. हॉस्पिटलला admit करावं लागलं. माझ्या प्लेटलेट्स अगदी २०००० झाल्या होत्या. कशीबशी वाचले.
एका व्यक्तीला निरोप द्यायला गेलेली मी तीन लोकांना निरोप देऊन आले. तेही तब्बल दीड महिन्याने. आता कुठे जरा सावरतीय. खूप मिस करते मी वडिलांना. ते दरवर्षी २ महिने राहायला येत होते माझ्याकडे. आम्ही सगळी भावंडे अमेरिकेत असल्याने त्यांची वार्षिक फेरी असायची. शेवटचा निरोपही घेतला नाही कोणाचाच. खूप अस्वस्थ वाटत रहात. माझे वडील म्हणायचे एकदा माणूस गेला कि मागे काहीच उरत नाही. त्यांच्या बाबतीत तेच खर ठरलं. ते आम्हाला कोणालाही स्वप्नातसुद्धा दिसले नाहीत गेल्यावर. माझ्या आजीचं मात्र अस्तित्त्व जाणवत अजूनही आईकडे पण वडिलांचं नाही. सासूबाईंनी पण १२व्या दिवशी काही वचन घेतलं मुलांकडून. माझाही आधी विश्वास नव्हता ह्या सगळ्यावर. पण प्रत्यक्ष घडलय डोळ्यासमोर. काहीच नाकारता येत नाही.
सगळे म्हणतात माझे वडील किती पुण्यवान, कुठलाही त्रास न होता गेले. असच मरण यावं. त्यांच्या दृष्टीने चांगलच झालं पण मागे राहणाऱ्यानी कस समजवायचं स्वतःला. खूप त्रासदायक आहे सगळं.

त्यांच्या दृष्टीने चांगलच झालं पण मागे राहणाऱ्यानी कस समजवायचं स्वतःला. खूप त्रासदायक आहे सगळं.>>>>>>>> +++=१११११

Pages