सकाळ पेपर्स मध्ये प्रसिद्ध झालेला अड्रोईड कुंजाप्पन व्हर्जन 5.25 मल्याळी भाषेतील चित्रपट परिचय व रसास्वाद

Submitted by सतीशगजाननकुलकर्णी on 15 May, 2021 - 05:16

अन्द्रोईड कुंजाप्पन व्हर्जन 5.25

WILL ROBOTS INHERIT THE EARTH? YES. BUT THEY WILL BE OUR CHILDREN ,,, MARVIN MINSKY

अड्रोईड कुंजाप्पन व्हर्जन 5.25 २०१९ सालचा दिग्दर्शक राथीश पौडवाल यांचा मल्याळी भाषेतील वैशिठ्यपूर्ण चित्रपट. या चित्रपटास केरळ राज्य सरकारची बेस्ट अक्टर, ( सुरज वेंजरमोडू) बेस्ट डायरेक्टर आणि बेस्ट आर्ट डायरेक्टर ( जोथीश शंकर ) अशी तीन पारितोषके प्राप्त झाली होती.
विज्ञान आणि भावना यांचे नाते सांगणारा , त्याचे महत्व अधोरेखित करणारा आणि हळुवार विनोदाचा मुलामा देत प्रेक्षकांना शेवटपर्यत खिळवून ठेवणारा वेगळ्या विषयावरचा हा चित्रपट.!

भास्करन खेड्यामध्ये राहणारी वयस्कर व्यक्ती. आपले खेड्यातील वातवरण,दैनदिन जीवन यातच तो नेहमी समाधानी आहे. पण आजकाल वयोमानानुसार त्याची तब्बेत बिघडत असते. भास्करनला पस्तीस वर्षाचा चुपन नावाचा मुलगा आहे. त्याचेही वय वाढत चालले आहे. त्यामुळे गावाच्या, घराच्या बाहेर पडाव, चांगली नोकरी मिळवावी, विवाह करावा असे त्याला वाटत असते पण आपल्या वडिलांच्यामुळे त्याला बाहेर पडता येत नाही. कारण वडिलांना मुलगा नेहमी त्यांची काळजी घेण्यासाठी जवळ पाहिजे आहे. ते त्याला सांगत असतात “ नोकरी अशी बघितली पाहिजे कि जी स्वत:च्या घरी शांतपणे झोपून देईल” अर्थातच, चूपनला हे मान्य नाही.

एक दिवस चुपन भास्करनला सांगतो त्याला एका जपानि कंपनीत नोकरी मिळाली. पण ज्या देशान शून्यातून विश्व निर्माण केल त्या देशाबद्ल सुद्धा भास्करनला हरकत आहे कारण एकच तेथील सर्व लोक दिसायला सारखेच दिसतात. भास्करन जुन्या पिढीतील आहे. प्रगतीशील जगाशी भास्करनचा संबध नाही. आणि त्याचमुळे एकीकडे आपल्या वडिलांचा स्वभाव, त्यांच्या तब्बेतीची काळजी आणि दुसरीकडे चांगल्या नोकरीची आशा अशा द्वीधा मनस्थितीत चुपन आहे.

शेवटी विचारांती चुपन परदेशी जाण्याचे ठरवतो. रोबट तयार करणाऱ्या कंपनीत त्याला नोकरी मिळाली आहे. वडिलांची काळजी घेण्यासाठी त्यांनी एक “ हौस मेड” घरी ठेवली आहे. भास्करनने सुद्धा रशियाला याव असे चूपनला वाटत असते पण स्वत:चे गाव भास्करनला सोडायचे नाही. अखेर वडिलांचा निरोप घेऊन चुपन एकटाच रशियाला जातो..

चुपनचे रशियात रुटीन बसत आहे. आपले नेहमीचे काम करत असतानाच हितोमी( केंडी झिर्डो) नावाची मैत्रीण सुद्धा त्याला मिळाली आहे आणि विशेष म्हणजे योगायोगाने हितोमिला मल्याळी चांगले माहिती आहे.. दोघांच्यातील जवळीक वाढवण्यासाठी हा चांगला दुवा असतो. पण असे असले तरी वडिलांची काळजी मात्र चुपनला सातत्याने छळत असते. एक दिवस वडिलांची तब्बेत बरी नसल्याचे त्याला कळते म्हणून चुपनला पुन्हा त्याच्या गावाकडे परतावे लागते.

हौस मेड व्यवस्थित काळजी घेत नाही म्हणून चुपन विचारांती घरामध्ये रोबट आणतो. जो आता वडिलांची काळजी घेऊ शकेल, त्यांची सर्व कामे करू शकेल आणि चुपनला विना काळजी रशियाला राहता येईल. रोबोट आता ती कामे करणार असतो जी एखादी सक्षम कामवाली स्त्री करू शकणार होती आणि तेही थोड्या वेळात. नव्या पिढीची सुधारणावादी मते, उपलब्ध असणार्या सुविधा आणि जुन्या पिढीतील चाकोरीबद्ध जिणे यांचा भावनिक संघर्ष येथून सुरु होतो. आणि भास्करन हे जुन्या पिढीतील व्यक्तिमत्व रोबोट मध्ये कसे भावनिक रित्या कसे गुंतते हे आपल्यापुढे साकार होऊ लागते.

रोबोट नावाच्या मशीनचे घरातील अस्तिव भास्करनला मान्य नाही. त्याला उच्च जातीचे लोक घरात पाहिजे आहेत आणि भास्करनच्या दृष्टीने रोबोट फक्त धातूचा पुरुष किंवा स्त्री आहे. भास्करनला खंत आहे माझा स्वत:चा मुलगा माझी काळजी घेत नाही तर या परक्या मशीनला मी आपले कसे मानु? पण चुपन आधुनिक काळातला आहे. आपल्या वडिलांना टी. व्ही , फ्रीज मोबाईल काहीच नको तर त्याचं जगण किती अवघड आहे याची त्याला काळजी आहे. पण भास्करनला तसच जगायचं आहे कारण ती त्याची पद्धत आहे.

भास्करनची पद्धत काही असली तरी रोबोटची सुद्धा एक पद्धत आहे. सगळी कामे तो वेळच्या वेळी करतो पण त्याला सांगितले तेवढेच कळते. पहिल्या दिवशी तो भास्करनसाठी चहा तयार करतो पण भास्करनला त्याच्या हातचा चहा नको आहे. तो नाराजीने निघून दुसऱ्या खोलीत निघून जातो. पण रोबोटला मानवी मनाचा हा नकार माहित नाही. जो पर्यत त्याला त्याच्या भाषेत नकार कळत नाही तोपर्यत तो भास्करनला चहा पिण्यासाठी मागे लागतो. राग व्यक्त करण्याची सर्वसामन्य माणसाची अजुनी पद्धत असते. भास्करन चहा “ओत माझ्या डोक्यावर” म्हणतो तेव्हा रोबोट म्हणतो “ रोबोट आपल्या मालकाला जोपर्यत नाईलाज असत नाही तो पर्यत कधीच इजा करत नाही”

रोबोट शिस्तबद्ध आहे.. त्या दिवशी त्याने घर असेच शिस्तबद्ध रित्या आवरले आहे. देवाजवळ ठेवलेले भास्करनच्या बायकोचे अस्थी कलश सुद्धा त्याने घराच्या बाहेर त्याने नेऊन ठेवले आहेत. पण भास्करनच्या अस्थीबद्दलच्या भावना नाजूक आहेत. कारण त्या त्याच्या बायकोच्या आहेत. अर्थातच तो मोठ्याने चिडतो. रोबोटने अस्थी कलश बाहेर ठेवले कारण त्याचा खतासारखा उपयोग करता येतो. त्याची जागा बाहेरच आहे. मानवी मन रोबोटला कळणे शक्य नाही.

भास्करनचा दिनक्रम चालूच असतो आणि त्याचबरोबर रोबोटचे घरातील वावरणे बघून हळूहळू भास्करनचा राग कमी होत असतो. दोघांच्यात जवळीक होउ लागते. जेव्हा रोबोट यांत्रिक पद्धतीने गाणे म्हणत असतो त्याचवेळी गोठ्यामध्ये भास्करन सुद्धा गाणे गुणगुणत असतो .रोबोटचा भास्करने स्वीकार केला आहे हे सांगणारा हा सूचक प्रसंग आहे.

रोबोटला गावात एक नाव ठेवले आहे कुंजाप्पन. कुंजाप्पन नावाची गावात व्यक्ती पूर्वी राहत असते. पण ती बरेच दिवस सापडत नसते. ती व्यक्ती वारली आहे असा समज असतो पण त्याचा मृतदेह मिळालेला नसतो. जेव्हा भास्करनच्या घरी कुणाला तरी माणसासारख्या रोबोटचे ओझरते दर्शन होते तेव्हा तो कुंजाप्पन आहे असा लोकांचा समज अज्ञानाने करून दिला जातो. कालांतराने हा गैरसमज दूर होतो पण रोबोटचे नाव कुंजाप्पन होते.

भास्करनच्या एकाकी आयुष्यात कुंजाप्पन हि एकमेव हालचाल असते आणि त्याचमुळे कुंजाप्पनला भास्करन आपल्या घराचा घटक मानत असतो. जणू त्याचा मुलगाच. त्याला नवीन कपडे करणे किंवा त्याला बाहेर फिरायला घेऊन जाणे या गोष्टी तर आता नित्याच्या होऊन गेलेल्या असतात. पूर्वी कधी तरी वर्तमानपत्र हातात घेऊन वाचणे यात आनंद आहे असे मानणारा भास्करन, आता ऑनलाईन वाचणे कसे सोयीचे आहे हे सांगत असतो. कुंजाप्पनच्या जीवाला धोका आहे असे उगीचच त्याला वाटत असते. स्वत:च्या मनातील शंका दूर करण्यासाठी तो त्याला ज्योतिषाकडे घेऊन जातो. . भास्करनच्या मनात कुंजाप्पन विषयी भावनिक ओलावा निर्माण झाला आहे.आणि म्हणूनच एका मशीनची काळजी तो माणसासारखी घेत असतो.

एक दिवस मुन्सिपालटीचे लोक येतात आणि लायसेन्स नाही म्हणून कुंजाप्पनला घेऊन जातात त्यावेळी भास्करन भाऊक होतो. आपल्या मुलाशी फोनवर बोलताना तो सांगतो “ तो किती लहान आहे. आपल्या भावना व्यक्त करताना त्याला त्याला रडता सुद्धा येत नाही.” कुंजाप्पनचे कसे होणार म्हणून तो काळजीत आहे.

पण रोबोट जवळ ठेवण्याचे लायसेन्स चुपन पाठवून देतो. आणि रोबोटची सुटका होते, रोबोटला लोक घेऊन गेले होते म्हणून उद्विग्न झालेला भास्करन अधिकारी वर्गाला विचारतो. चार्ल्स शोभराज ने जे गुन्हे केले ते इंटरनेटच्या साह्याने केले होते का ? जेव्हा जेव्हा अबलावर बलत्कार होतात तेव्हा गुगलचा वापर केला होतो का ? किंवा कृष्णाला १६ सहस्त्र बायका होत्या कारण त्याचा फेसबुक अकौंट होता का ? आधुनिक तंत्रज्ञानाला दुरुत्तर करणारे हे प्रश्न आपल्यालाही विचार करायला लावतात.

रोबोट जरी सध्या भास्करन जवळ असला तरी त्याची परवानगी कंपनीने चार महिन्यासाठी दिली होती. त्यामुळे कंपनी आता रोबोट परत देण्याची मागणी करत होती . चुपनच्या मनात वडिलांच्यासाठी रोबोट ठेवावा असे आहे पण कंपनी अधिकाऱ्यापुढे नाईलाज आहे. वडिलांची समजूत घालण्यासाठी तो हितोमिला घेऊन एक दिवस खेड्यात परत येतो.

रोबोटच्या सहवासामुळे भास्करन मध्ये आता पूर्ण फरक पडला आहे. आता चुपनला वडिलांच्या जवळ राहयचे आहे आणि भास्करन तो परत केव्हा जाणार याची वाट बघत आहे. पण भास्करन आणि कुंजाप्पन यांचे एकूण नाते बघून चुपन मात्र काळजीत आहे कारण भास्करन कुंजाप्पन मध्ये पूर्ण गुंतला आहे इतका कि तो मनोरुग्ण वाटावा.

रोबोटला परत करायचे आहे हे नक्की म्हणून हितोमी रोबोट पूर्ण खोलु लागते पण हे बघितल्यावर भास्करन संतापतो, भाऊक होतो. चुपन त्याला सांगतो रोबोट कधीतरी तुम्हाला इजा करेल कारण बऱ्याच ठिकाणाचे रोबोट अपयशी झाले आहेत. भास्करन त्याला म्हणतो, बऱ्याच मुलांनी पालकांचे खून केले म्हणून काय कुणी पालक व्हायचे राहिले का? ते जर मशीन असेल तर माणूस सुद्धा कुणीतरी “ प्रोग्रामिंग” केलेलं मशीनच आहे. त्यालाच आपण नशीब म्हणतो.

रोबोटला आपल्यापासून कुणी नेऊ नये म्हणून भास्करन त्याला एका पब्लिक ट्रान्सपोर्ट मधून दूर घेऊन जातो. पावसाची बारीक रिमझिम चालू आहे. आणि एके ठिकाणी भास्करन रोबोटला घेऊन उतरतो. रोबोटच्या अंगावर रेनकोट आणि दूरवर जंगलात दोघे चालत जातात जिथे रोबोटला कुणी पळवू शकणार नाही. एके ठिकाणी दमून बसल्यावर स्वत:च्या पत्नीच्या अस्थी, सौदामिनी नावाच्या मुलीवर तरुणपणी असणारे प्रेम या सार्या भावना तो व्यक्त करू लागतो. काही वेळाने हताश होऊन म्हणतो “ तू लहान आहेस तुला काय कळणार? “ रोबोट त्याला स्वत: सांगतो “ मी माणूस नाही. मला भावना नाही. मला प्रेम कळत नाही कारण मी मशीन आहे” भास्करन हताश होऊन हसू लागतो आणि हसता हसता मोठ्यादा रडू लागतो.

भास्करन आणि कुंजपनच्या मागे चुपनहि आलेला आहे आणि गावातील एक गुंड माणूस. चुपनला आपल्या वडिलांची काळजी आहे आणि गुंडाला रोबोटचा नाश करायचा आहे. गुंड जेव्हा रोबोटवर हल्ला करू लागतो तेव्हा तिथे आलेला चुपन मध्ये पडतो आणि अचानक “self defense activated” ची कमांड सुरु होते आणि रोबोट चुपनचा गळा धरतो. आपल्या मुलाचा गळा धरला आहे हे बघून भास्करन अचानक भानावर येतो आणि चूपनची सुटका होते. दोघेही एकमेकाला मिठी मारतात.

एकीकडे निखळलेला रोबोट आणि दुसरीकडे गाडीवरून जाणारे चुपन आणि भास्करन आपल्याला दिसतात. भास्करन प्रेमाने आपल्या मुलाला मिठी मारतो त्याच्या डोळ्यासमोर रोबोट बरोबर काढलेले प्रेमाचे दिवस आहेत तो अलगद उच्चारतो “ कुंजपन” आणि चित्रपट संपतो.
सुरज वेंजरमोडू यांचा सहज सुंदर अभिनय. रोबोटचे घारातील अस्तिव नाकारणे आणि नंतर त्याच्या प्रेमात पडणे, सौदामिनी वरचे प्रेम व्यक्त करत असताना त्याला वाटत असणारा संकोच आणि बायकोच्या अस्थीबदल वाटणारी भाऊकता. मुलाचे घरात असावेसे वाटणे आणि तोच मुलगा दूर जावा यासाठी आतुर होणे या सर्वच भावभावना अप्रतिम

चुपनच्या भूमिकेत सौबीन साहीर उत्तम. रोबोटची भूमिका केली आहे सुरज ठेलकाड.

शेवटी मनात विचार येतात भास्करन रोबोट वर प्रेम का करत होता कारण तो माणसाच्या प्रेमाचा भूकेजला होता. जीवन सुलभ करण्यासाठी, प्रगतीसाठी विज्ञानाचा उपयोग केलाच पाहिजे पण म्हणून लोकिक अर्थाने होणारी प्रगती म्हणजेच जीवन नाही. प्रेम, नातेसंबध यांना आयुष्यात अनन्य साधारण महत्व निश्चितच आहे. माणूस चंद्रावर जाऊन आला हि प्रगती खचितच अभिमानास्पद आहे पण शेजारच्या घरात जाऊन त्याची विचारपूस करणे हि माणुसकी कुठेतरी लोप पावत चालली आहे का ? हा खरा प्रश्न आहे. फोन आणि मोबाईलने संपर्कांची साधने वाढली पण लोकांची मने खरच जुळली का? कुसुमाग्रज एका कवितेत म्हणतात “ अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत आमुची आशा. किनारा तुला पामराला” नक्कीच ध्येये अनंत पाहिजेत पण आयुष्यात प्रेमाच्या किनाऱ्याला तितकेच महत्व नि:संशय दिले पाहिजे हे तितकेच खरे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults