त्रेस लेचेस केक

Submitted by Adm on 11 May, 2021 - 02:24
tres letches
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

केकसाठी:
१. दिडकप मैदा / केक फ्लोअर
२. दिड टीस्पून बेकिंग पावडर
३. पाव टीस्पून मीठ
४. पाच अंडी.
५. एक कप साखर - पाऊण कप आणि पाव कप अश्या दोन भागांत
६. एक टीस्पून व्हॅनिला इसेन्स
७. १/३ कप दूध

दुधाचं मिश्रण
१. १४ Oz कन्डेन्स्ड मिल्क (स्वीट)
२. १२ Oz इव्हॅपोरेटेड मिल्क
३. १ कप होल (फुल फॅट) मिल्क (आपलं नेहमीचं दुध)

फ्रॉस्टींग साठी
१. २ कप हेवी व्हिपींग क्रिम
२. २ टेबलस्पून साखर
३. आवडीनुसार फळं. स्ट्रॉबेरी, रासबेरी, किवी, संत्र्याच्या बारक्या फोडी, पिचचे तुकडे वगैरे.

क्रमवार पाककृती: 

परवा 'मदर्स डे'च्या दिवशी मला अचानक ऑन-कॉल ड्युटी आली. तसही सध्या फार कुठे जाता येत नाही पण जर बाहेर ऊन असेल तर चालायला किंवा हायकिंगला जाता येतं पण आता दिवसभर घरात बसायला लागणार होतं. घरातली मदर ग्रोसरीला जाणारच होती. तिला म्हंटलं तुला जर केक खायचा असेल तर मी यादी देतो त्याप्रमाणे सामान आण. एकंदरीत ऑन-कॉल आघाडीवर शांतता असल्याने दुपारी हा केक करायला घेतला.
*
Cake_Full.jpg
अटलांटाला एक 'मँबो कॅफे' नावाचं क्युबन रेस्टॉरंट होतं. तिथे हा 'त्रेस लेचेस' म्हणजे शब्दशः अर्थ 'तीन प्रकारची दुधं' असलेला केक खूप भारी मिळायचा. मायबोलीकर प्रॅडी हिच्या घरीच पहिल्यांदा खाल्ला होता. नंतर बरेचदा आणला जायचा. पुढे पॅसिफिक नॉर्थवेस्टात आल्यावर हा केक खाणं जरा कमी झालं कारण इथे लॅटीन अमेरिकन / मॅक्सिकन रेस्टॉरंट अटलांटापेक्षा कमी आहेत. पण तरीही आठवण यायचीच. परवा फ्लॅन केक केला तेव्हाच पुढचं बेकिंग त्रेस लेचेस केक करायचा हे ठरवलं होतं. तीन प्रकारची दुधं असल्याने हा केक ओला असतो पण तरी लिबलिबित नसतो. केकमध्ये दुधं पुरेसं शोषलं जातं.

१. मोठ्या भांड्यात मैदा, बेकिंग पावडर आणि मीठ चाळून घेतलं.
२. वेगळ्या दोन भांड्यांमध्ये अंड्यांमधलं पिवळं आणि पांढरं वेगवेगळं करून घेतलं.
३. अंड्यातल्या पिवळ्यामध्ये पाऊण कप साखर घालून हँडमिक्सरने हाय स्पिडवर फेटून घेतलं. ( मिश्रणाचा रंग फिकट पिवळा झाला पाहिजे). नंतर त्यात दुध आणि व्हॅनिला इसेन्स घालून ढवळून घेतलं.
४. अंड्यातल्या पांढरं हँडमिक्सरने हायस्पिडवर 'सॉफ्ट पीक्स' येईपर्यंत फेटून घेतलं. हे करत असताना उरलेल्या पाव साखरेतली थोडी थोडी साखर त्यात घालत रहायचं. हे करण्याआधी हँडमिक्सरचं पातं स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं. वरचं पिवळ मिश्रण ह्यात जाता कामा नये नाहीतर सॉफ्ट पीक्स नीट येत नाहीत. मी मागे एकदा हाताने फेटून हे करायचं प्रयत्न केला होता पण अजिबात पीक्स आली नाहीत आणि दुसर्‍या दिवशी जिम केल्यावर दुखतो तसा हात दुखला !
५. आता पीठाच्या मिश्रणात पिवळं मिश्रण ओतलं आणि हलक्या हाताने ढवळून घेतलं. आता फेटायचं नाही फक्त पीठ व्यवस्थित गुठळ्या न रहाता मिसळलं गेलं पाहिजे.
६. आता ह्या मिश्रणात पांढर मिश्रण ओतून अतिशय हलक्या हाताने एकत्र करून घेतलं. सॉफ्ट पीक्स मोडायचे नाहीत कारण केक ह्या पीक्समुळेच फुगतो. हे सगळं मिश्रण नेहमीच्या केकपेक्षा हलकं आणि फेसाळ होतं (कारण ह्यात फक्त दीड कपच पीठ आहे आणि पाच खूप फेटलेली अंडी आहेत).
७. ९ X १३ च्या बेकींग ट्रेल थोडा बटर किंवा तेलाचा हात लावून मिश्रण त्यात ओतून ३५० डी.फॅ. वर तीस ते पस्तिस मिनिटे बेक करून घेतलं. (टूथपीक कोरडी बाहेर येईपर्यंत). हे जर काचेच्या किंवा चिनी मातीच्या डीशमध्ये केलं तर केक चांगला फुलतो म्हणे शिवाय केक संपेपर्यंत त्यातच ठेऊन देता येतो. आम्ही त्यानिमित्ताने नवीन काचेची बेकींग डीश आणली.
८. केक झाल्यावर अवनबाहेर काढून (बेकींग डीशमध्ये तसाच ठेऊन) पूर्ण गार करून घेतला. कितीही मोहं झाला तरी कापून खाऊ नये (आणि मुख्य म्हणजे घरातल्या बाकी मेंब्रांना तसं करू देऊ नये!).
९. दुधाचं मिश्रण करण्यासाठी तीन दुधं मिक्सरमध्ये मिनिटभर घुसळून घेतली.
१०. गार झालेल्या केकला काट्याने टोचून भोकं पाडली आणि दुधाचं मिश्रण सगळीकडे सारखं ओतलं. भोकांमुळे दुध आतपर्यंत झिरपतं. बघताना दुध खूप जास्त आहे असं वाटेल पण ते सगळं केकमध्ये व्यवस्थित शोषलं जातं. त्यामुळे वाटलं तरी वगळू नये. साधारण अर्धातास मुरण्यासाठी ठेऊन द्यावं.
११. आता व्हिपींग क्रीम एका भांड्यात घेऊन हॅंड मिक्सरने घट्ट(पसरता येण्याइतकं) होईपर्यंत फेटून घेतलं.
१२. व्हिपींग क्रिमचा सारखा थर पूर्ण केकला लावून घेतला आणि गार करण्यासाठी फ्रिजमध्ये ठेऊन दिलं.
१३. खाण्यासाठी स्ट्रॉबेरीज आणि किवीचे पातळ काप करून केकवर लावले आणि मग उभे स्लाईस करून खाल्ले. केक कापताना लिबलिबीत होत नाही पण तरीही केक छान ओलसर आणि गोड लागतो.
*
Slice_cut.jpg
*

वाढणी/प्रमाण: 
खाण्यावर अवलंबून आहे. पण साधारण १० जणांच्या पार्टीला पुरेसा होईल.
अधिक टिपा: 

१. फळं अगदी ऐनवेळी लावावी. आधीपासून लाऊन कदाचित आंबट होऊ शकतात. हापूस आंबे असतील तर त्याचे कापही ह्यावर लाऊन भारी लागतील! (अर्थात हापूस आंबा केक वगैरे लावणं म्हणजे जरा.......... !)
२. ह्या केकमध्ये अजिबात बटर घातलेलं नाहीये पण बाकी भरपूर फॅट्स आहेत!
३. केल्या केल्या कदाचित थोडास अंड्याचा वास येई शकतो पण नंतर तो जातो. केक गार करताना जर त्याला वारा लागला तर अंड्याचा वास येतो असं नेटवर वाचलं. त्यामुळे गार करताना जाळी ठेऊन गार करावा. फेटलेल्या अंड्यांमुळे केक खूपच हलका होतो.

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट वर दोन-तीन रेसिप्या बघून हे प्रमाण घेतलं.
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी आहे प्रकरण . करून पाहण्याची हिंमत नाही . इथे लॅटिन अमेरिकन रेस्टॉरंट शोधायला हवं .

वाह
काय प्रो झालाय.चवीला पण छान लागत असेल मऊ मऊ.
खरंच बेकिंग चा जोड धंदा चालू करा.सुंदर गोष्टी करता तुम्ही.

कसला भारी दिसतोय. रेसिपीही जमण्याजोगी आहे.

मी हा इथे मुंबईत क्वात्रो मध्ये खाल्लाय. अधून मधून स्टारबक्स मध्येही असतो पण त्यांचे मेन्यु बदलत असतात.

भन्नाट! फोटोही जबरी

टेक्स्चर, दूध आणि गोडीचे प्रमाण जमले तर जगात भारी प्रकारचा केक आहे हा. अभारतीय डेझर्ट्स मधे नं १ फेवरिट!

कॅलिफोर्नियामधे कोठेही सहज मिळतो. इतर अनेक ठिकाणी, जेथे मेक्सिकन्स कमी आहेत तेथे बहुधा मेक्सिकन (किंवा लॅटिन अमेरिकन) रेस्टॉ मधेच मिळत असावा. मात्र चांगला मिळेलच असे नाही. नुसती साखर ठोसून गोडमिट्ट करून टाकतात अनेक ठिकाणी.

त्यामुळे असा स्वतःच करता आला तर मस्तच.

टेक्स्चर, दूध आणि गोडीचे प्रमाण जमले तर जगात भारी प्रकारचा केक आहे हा. अभारतीय डेझर्ट्स मधे नं १ फेवरिट! >>> टोटली!!!

'बिग वाय' मध्ये बेस्टेस्ट मिळतो.

भारी दिसतोय!

परवा मदर्स डे ला हा केक खाल्ला.. पण आम्ही आपला होल फूड्स मधून आणलेला. कॉस्टको मध्ये पण हा केक मिळतो. मस्त असतो.

टेक्स्चर, दूध आणि गोडीचे प्रमाण जमले तर जगात भारी प्रकारचा केक आहे हा. अभारतीय डेझर्ट्स मधे नं १ फेवरिट! >>> +१
भारी फोटो आहे, एकदम तोंपासू Happy

तीन प्रकारची दुधं वाचून मला वाटलं म्हशीचं, गाईचं, बकरीचं असं काहीतरी असेल. इथे एकाच प्रकारचं दूध कमीजास्त आटवलेलं आहे.

केक नावाला अगदी जागतो.... डोळ्यांना लैच त्रासदायक.... Happy Happy

तीन तीन प्रकारचे दूध घालण्यामागे काय कारण असावे? Evaporated व कंडेन्सड मध्ये फक्त कृत्रिम गोडीचा फरक की अजून काही असते?

आता एकदा या गरीबाच्या डोळ्यांच्या शांती साठी घरी रेड वेलवेट आणि रेनबो पेस्ट्री पण करून फोटो टाका.

वॉव! काय सुंदर दिसत आहे केक!
हा केक प्रचंड आवडतो. सेफवे मधला नेहेमी आणला जातो. मध्यंतरी घरी करायचा प्रयत्न केला. आयत्या वेळी फिजमध्ये असलेल्या व्हिप्ड क्रिमची मुदत संपल्याचं लक्षात आलं. मग ते दुधाचं मिश्रणच घट्ट करुन केकवर थापलं. चवीला बरा लागला. पण ते प्रकरण दिसायला म्हणजे 'करायला गेले गणपती, झाला मारुती' असं झालं Proud

तुझ्या रेसिपीने करुन बघेन एकदा Happy

सगळ्यांना प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. Happy

खरंच बेकिंग चा जोड धंदा चालू करा.सुंदर गोष्टी करता तुम्ही. >>>> थॅंक्स Happy

Evaporated milk म्हणजे काय? >>> डब्यात मिळणारं आटवलेलं दुध. ह्यात साखर नसते.

अभारतीय डेझर्ट्स मधे नं १ फेवरिट! >>> हो नक्कीच. बकलावा पण!

कॉस्टको मध्ये पण हा केक मिळतो >>>> कॉस्टको मधला मला खूप आवडला नाही. होलफूडमधला मी खाल्ला नाहीये. अटलांटाला पब्लिक्स मध्ये मिळायचा तो मस्त असायचा.

तीन प्रकारची दुधं वाचून मला वाटलं म्हशीचं, गाईचं, बकरीचं असं काहीतरी असेल. >>>> Lol

पण करण्याइतका पेशन्स नाही. या वीकांताला आणण्यात येईल >>> हे बर्‍याच जणांनी लिहिलय. पण करायला एव्हडा अवघड नाहीये. मुख्य कृती स्पाँजचीच आहे. बाकी सगळं 'गार्निशिंग' प्रकारातलं आहे.

केक नावाला अगदी जागतो.... डोळ्यांना लैच त्रासदायक.... >>>>> Happy

तीन तीन प्रकारचे दूध घालण्यामागे काय कारण असावे? Evaporated व कंडेन्सड मध्ये फक्त कृत्रिम गोडीचा फरक की अजून काही असते? >>>> त्यांचा दाटपणा पण वेगळा असतो. शिवाय तीनही दुधांची चव वेगळी लागते, त्याने केकच्या चवीत किती आणि कसा फरक पडतो ते माहित नाही मात्र.

आता एकदा या गरीबाच्या डोळ्यांच्या शांती साठी घरी रेड वेलवेट आणि रेनबो पेस्ट्री पण करून फोटो टाका. >>>> रेड वेलवेट मला खूप आवडत नाही आणि रेनबो पेस्ट्री मी खाल्लेल्या नाहीत. शोधून बघतो.

करायला गेले गणपती, झाला मारुती' असं झालं >>>> Proud

परत एकदा धन्यवाद. Happy

हा ही अप्रतिम झाला आहे. धन्य ती माता जिला हा असा केक मदर्स डे ला मिळाला. मी रेसीपी वाचली होती पण फोन वरून इंग्रजीत प्रतिक्रिया द्यायची नव्हती. आमच्याकडे त्रेस लेचेस फ्लेवर आहे. दुधाचे तीन प्रकारचे वेग वेगळे फ्लेवर्स हीच तर त्यातली गंमत आहे. मला वरून फ्रेश क्रीम व फ्रू ट वाले केक्स फारच आव्डतात. पण लेकीसाठी नेहमीच चॉकोलेट केक आणले जातात. इथे चेंबूर मध्ये एक बेकर आहे तिला विचारते हा करून पाठिवतेस का ते.

आम्ही सध्या डाएट प्लॅन वर आहोत त्यामुळे काहीच गोड प्रोसेस्ड अलाउड नाही. पण चीट डे ला मागवू/ थिओब्रोमा मध्ये पण आहे का बघते.
नाही तर अडीनडीला पाय नापल पेस्ट्री.

आमच्या कडे एक सिंधी बाई घरपोच हाफ डन अन्न पुरवतात त्यांनी आज पापलेटे( स्टीम करून डाए ट मेंबर साठी) व
घरच्या फ्रिज मध्ये स्टोअरेज मध्ये ठेवायला चिकन कटलेट्स, आलू टूक बैंगन टुक कांदा कोकी दिली आहे व तिच्या कडे उरलेले होते म्हणून तीन तंदुरी चिकन लेग पीसेस दिलेत. काय पाठवू बोला.

आज मी पण वर्क फ्रॉम होम पक्षी फोन शेजारी ठेवुन यु ट्युब लावुन ठेवून सोफ्यावर डुलक्या!!. दोन केक पीसेस नक्केच उडवले असते.

आपल्या फर्गुसन रोड वरील बेकरीत ठेवायचा हं हा केक.

Pages