जागतिक महिला दिनाच्या हार्दीक शुभेच्छा !
मागच्या भागाकडे जाण्यासाठी कृपया इथे
टिचकी मारावी ही विनंती
मला राहवलं नाही.
पोटात राहत नाही असं नाही. पण ही गोष्ट मोठ्यांपासून खूप काळ लपवणे मला धोक्याचे वाटले.
आम्ही जो उद्योग केला तो आगाऊपणा मधे मोडत होता.
त्यात ऋतु हा परका. मी सुद्धा परकीच की.
आम्ही आशीच्या मनातून भीती घालवतो असे सांगितले होते. त्यासाठी परवानगी घेतली होती.
मात्र फाईल्स वगैरे मागवणे, स्टडी करणे हे नव्हतं सांगितलं.
आम्ही केलेली ही ढवळाढवळच एक प्रकारे.
ती वेळेत सांगितली तर तात्पुरता भडका उडेल. पण लपवून ठेवण्याने त्याला अजून वेगळे वळण लागेल ही माझी भीती होती.
मुलं बेपर्वा असतात. ती इतका बारीक विचार करत नाहीत. त्यांचं वावरणं वेगळ्या वातावरणात असतं.
बंधनं नसतात. पण एखाद्या मुलीचा त्यात सहभाग असेल तर बघणा-याचे दृष्टीकोण बदलतात.
पाहुणी असेन पण ठाकूर होते मी. ठाकूरांच्या घरातल्या मुलीने मुखर्जींच्या मुलीच्या अशा संवेदनशील केस मधे आपल्या बॉयफ्रेण्डला घेऊन केलेली ढवळाढवळ असंच कुणीही बघणार होतं.
आणि मग चर्चा झालीच तर मग जीभेला हाड नसतं काही.
मी अनामिका मामीला सगळं सगळं सांगून टाकलं. अगदी हेतू सुद्धा सांगितला.
माझ्या बोलण्यातला निर्मळपण तिला जाणवला असेल. नाहीतरी आता दोघी जवळपास मैत्रिणी झालो होतो.
तिला फारसं खटकलं नाही.
तरीही " न विचारता असं काही करत जाऊ नकोस. मला सांगितलंस हे बरं केलंस" असं म्हणायला ती विसरली नाही.
रात्री झोपायला खाली जाऊ नकोस असं तिने बजावलं होतं.
जेवणं झाल्यानंतर आम्ही आउटहाऊस मधे बसलो होतो खिडक्या लावून घ्याव्यात इतकी थंडी होती.
इथे फायरप्लेसच्या ऐवजी ऑईल हीटर्स होते. ते चालू करावे लागले.
आता मामी सगळं खोदून खोदून विचारू लागली.
पण प्रश्न विचारताना झरना आंटी दोषी आहे या दृष्टीने प्रश्न यायचा. अशा दूषित प्रश्नांची उत्तरं देणं अवघड असतं.
हो किंवा नाहीच्या स्वरूपात तर नाहीच नाही. पुन्हा तूच नाहीस का म्हणाली असा त्याचा वापरही होऊ शकतो.
मला मोकळेपणी बोलता आलं नाही. सावध उत्तरं द्यावी लागत होती.
मामीच्या दृष्टीने आशी ही व्हिक्टीम होती.
झरना आंटी अतिशय बेजबाबदार आई होती. तिच्यामुळे तिची अशी अवस्था झाली.
तिने बदला घेणं हे चुकीचं आहे हे मान्य होतं, पण ती तरी काय करणार ना ?
झरना आंटीने तिच्यावर केव्हढे तरी अत्याचार केले.
आणि माझा भाऊ बिचारा.
त्याचं तोंड चालत नाही बायकोसमोर.
तिचा हा अॅंगल होता. हे तिचं सत्य होतं. तिला यापेक्षा वेगळं ऐकूनच घ्यायचं नव्हतं .
माझ्य़ा आशीचं वाटोळं झाल्ं हे तिचं म्हणणं मात्र खरं होतं.
आशी यात कुठेच चूक किंवा बरोबर या तराजूत बसत नव्हती.
तिचं वय, तिची समज, तिचं आकलन, तिची स्वभाववैशिष्ट्ये, जडणघडण... अनेक बाबी होत्या.
स्वभावावर नियंत्रण मिळवता येईल, तो बदलता येतो का ?
निसर्गाने मुद्दामून प्रत्येकाला आपापला वेगवेगळा भाव ठरवून दिला असेल ना ?
सगळेच गोड असते तर ?
*********************************************************
झरना आंटीला भेटायची परवानगी डॉ. खन्ना यांच्याकडून मिळाली होती.
त्यांचे जवळचे नातेवाईक अथवा मित्रपरिवारातील लोकच आत जाऊ शकणार होते.
मला जाता आलं असतं, अनामिका मामीचा प्रश्नच नव्हता.
पण ऋतूचं कसं करायचं ?
अनामिका मामीला झरना आंटीबद्दल फारसं प्रेम दिसत नव्हतं. ती सरळच आशीच्या त्रासाला तिला जबाबदार धरत होती.
तर मग आंटीशी तिच्यासमोर बोलायचं तरी कसं ?
पण अनामिका मामीचं येणं रद्द झालं. मला हायसं वाटलं.
या सर्व प्रकरणात कुठलीही अमानवी शक्ती नाही हे आंटीला कळायला हवं होतं असं मला वाटत होतं.
रविवारी सकाळी सहा वाजताच बुलेटचा हॉर्न ऐकू आला.
ऋतूला चहाला वर बोलावलं पण त्याने लवकर खाली ये अशी खूण केली.
थंडी होतीच. पण बुलेटवरच्या प्रवासाची मजा कुठल्याच चार चाकी वाहनात येत नाही.
त्यातून ड्रायव्हर खास असेल तर !
मी अंगावर शाल सुद्धा ओढून घेतली होती.
कानटोपी नाकावर ओढून घेतली.
शिमला झटक्यात मागे पडलं.
सोलन वगैरे पर्यंत नेहमी येतच होतो.
आता अपरिचित गावं दिसायला लागली.
थंड वारं असल्याने शरीर गोठून जात होतं.
ऋतूचं उबदार जाकीट असल्याने त्याला काही होत नसावं. तसंही मुलं जरा कणखरच असतात वातावरण झेलायला.
थोडा वेळ का होईना गाडी थांबणं गरजेचं होतं.
आता संपूर्ण मोकळा परीसर होता.
रस्त्याच्या कडेला एक झोपडीवजा चहाची टपरी होती. चुलीवर चहाची किटली चढवलेली होती.
मला खूपच गरज होती.
अशा थंड हवेत गरमागरम चहा म्हणजे खरंच अमृततुल्य.
दोन घोट घेताच जिवात जीव आला.
सूर्यमहाराजांचं दर्शन झालं. ढगाळ हवामान स्वच्छ होऊ लागलं.
आता थंडी कमी झाली.
मग बुलेटचा वेग शंभरच्या पुढे गेला. भीतीही वाटत होती आणि गंमतही.
रस्ता खूपच वळणावळणाचा होता.
एकदाची बियास नदी दिसली.
डोळ्याचं पारणं फिटलं.
दोन्ही बाजूंनी ओक वृक्षांची हिरवाई. दोन्ही किना-यावर पांढ-या शुभ्र दगड गोट्यांची सजावट. त्याचीच रेती पसरून किनारे बनलेले.
आणि स्फटिकासारखं स्वच्छ पाणी !
नदीकडे बघत बघत पुढचा प्रवास कसा संपला समजलंच नाही.
कुलू गावाला वळसा घालून गाडी मनालीच्या जुन्या रस्त्याने भरधाव पुढे निघाली.
एक टाटा मोटर्सचं सर्व्हिस स्टेशन लागलं.
पॅराग्लायडिंग सेंटरचा बोर्ड दिसला. तंबूही होते.
वैष्णोवीचं एक मोठं देऊळ गेलं.
हुंडई बाबा म्हणून एका स्थानिक संतांच्या देवळापासून आम्ही कच्च्या रस्त्याला लागलो.
सोबघ नावाचं गाव होतं
आत शिरताना दूरवर एक मां दश्मीवर्दा पॅलेस नावाचा बोर्ड दिसला. हे देऊळ आहे की आश्रम की हॉटेल समजलं नाही.
पण गिरीमल देवता चे बोर्डस सतत लागत राहीले.
अतिशय निसर्गसुंदर परीसर.
जंगलाने वेढलेला. बियास नदीचं वळण इथून डौलदार दिसत होतं.
पाठीमागे हिमाच्छादीत शिखरं.
स्वच्छ प्रकाश, हवा.
आणि डॉ. खन्नाज हिमाचल मेंटल हेल्थ अॅण्ड रिहॅबिलिटेशन सेंटर असा फलक दिसला.
वीस पंचवीस एकराचा परीसर होता.
आत आल्यावर पार्किंग.
एक सुंदर बगिचा मन प्रसन्न करत होता. त्यातूनच चालत पुढे गेलं की एक लाकडी बैठी इमारत लागत होती.
इथे अॅडमिशन, रिसेप्शन, बिलिंग अशा रूम्स होत्या.
रिसेप्शन वर माझं नाव सांगून आम्ही मिसेस झरना मुखर्जींना भेटायचंय हे कळवलं.
आधी मुखर्जीं अंकलनी कळवलं होतं तरीही फॉर्म भरून घेणं, ओळखपत्रं मागणे इत्यादी सोपस्कार अर्ध्या तासात पूर्ण झाले.
वेलींनी आच्छादीत व्हरांड्यातून पाठीमागे असलेल्या छोट्या छोट्या खोल्यांकडे आम्ही निघालो.
मनोरूग्णच का ? सर्वांनाच इथे आठ दिवस राहता आलं पाहीजे. कसला सुंदर परीसर होता,
व्हरांड्यातून दिसलं. उजवीकडे मोकळ्या जागेत जायला ठिकठिकाणी उघड्या जागा होत्या. एक हौद होता. त्यातून हिरवळीला पाणी सोडलेले होते.
सफरचंदाच्या बागा होत्या. भाज्या होत होत्या.
एक ओपन किचन होतं,
आणि ओपन डायनिंग होतं.
वर पत्र्याची शेड ठोकलेली होती.
छोट्या युनिट्समधे दोन दोन खोल्या होत्या. एक दोन व्हीआयपी सूट्स होते.
तिथे झरना आंटी होत्या.
मी दारावर टकटक केलं.
ऋतूला रिसेप्शनवरच मला सोडून लगेच परतायला बजावलं होतं.
त्याचंही इथे एक काम होतं जे नेहमीप्रमाणे मला माहीत नव्हतं.
दार उघडलं आणि ..
माझा डोळ्यावर विश्वास बसेना.
झरना आंटी ?
आशीने आईचा चेहरा घेतला होता. तिला मी मौशुमी म्हणायचे आणि झरना आंटींना लीना चंदावरकर.
लीना चंदावरकर बंगाली म्हणून सहज कोणत्याही बंगाली चित्रपटात सहज खपली असती. तसेच घडीचे डोळे. गोल चेहरा.
चेह-यावरचा गोडवा. अगदी रसगुल्लाच.
त्या चेह-यावरचे रंग उडालेले. निस्तेज असा चेहरा.
करडे झालेले आणि वाळलेल्या गवतासारखे केस.
खूप आजारी असल्यासारखे आणि ओळख हरवलेलेडोळे.
त्या भोवतालची मोठी काळी वर्तुळे...
खूप वेळाने ओळख आली चेह-यावर
" सलोनी ? मोठी झालीस बेटा ! कित्ती दिवसांनी पाहतेय तुला"
मला काहीच सुचलं नाही.
त्यांच्या गळ्यात पडून मी रडले.
त्याच मला शांत करू लागल्या.
" अगं अगं असं काय ते ? "
माझा चेहरा ओंजळीत घेताना मी पाहीलं त्यांच्याही डोळ्यात पाणी होतं.
न बोलता स्पर्शाची भाषा एकमेकींना समजली होती.
" किती सुंदर दिसतेस बेटा " हे बोलताना त्यांचा आवाज कातर वाटत होता.
कौतुकाने झालेला आनंद आणि त्यांच्या आवाजातला कंप.
संमिश्र भावनांनी त्यांचा हात प्रेमाने दाबला.
त्यांनी बसायला खुर्ची दिली.
मला खायला देण्यासाठी शोधत होत्या त्या. त्या ही परिस्थितीत.
मला पुन्हा एकदा आवंढा दाटून आला.
काही फळं होती. ती मिळाल्यावर त्यांना आनंद झाला.
" सलोनी सफरचंद खातेस ? द्राक्ष ? थांब थांब तुझ्यासाठी ना इथला खास मेवा मागवते "
" आंटी, मी खाईन. नका मागवू काही. मला तुमच्याशी खूप बोलायचंय. म्हणून आले "
" बरं बाई ! कशी काय आठवण झाली आंटीची ?"
आंटी व्यवस्थित बोलत होत्या. असंबद्ध काहीच नव्हतं.
मग हळूहळू विषय निघाला. आता इथे त्यांना काहीही त्रास नव्हता. हे ऐकून छान वाटलं.
आंटींनी पुन्हा एकदा सगळं सांगितलं.
आता त्यांना भय वाटतंय असं वाटलं नाही.
त्या कदाचित ब-या झाल्या होत्या.
त्यांना इथून सोडलं तरी चाललं असतं.
मी तसं विचारलं. तशा त्या खिन्न हसल्या.
मला आशीबद्दल सांगायचं होतं.
विषय त्या दिशेने न्यायचा प्रयत्न केला की त्या भलतीकडेच जात.
शेवटी मी हिय्या करून त्यांना सांगायचा प्रयत्न केला तर त्यांनी हाताने मला थांबवलं.
त्यांना मन मोकळं करण्यासाठी कदाचित कधीच कुणी विश्वासार्ह माणूस मिळालं नाही.
आज त्या थांबायचं नावच घेत नव्हत्या.
दोघी मग खूप बोललो. अगदी कधीपासूनचं त्या सांगत गेल्या.
किती वेळ गेला ते समजलंच नाही.
व्हीआयपी सूट वाल्यांना वेळेचं तसं बंधन नव्हतं. फक्त पेशंटला त्रास नाही व्हायला पाहीजे इतकीच अपेक्षा होती.
झरना आंटींशी बोलताना वारंवार डोळे भरून येत होते.
कुठे तरी मन भविष्याबद्दल सावधानतेचे इशारे देत होतं.
जेव्हां निघाले तेव्हां सगळं सगळं समजलं होतं.
--------------------------------------------------------
झरना आंटी
आपण पाहीलंच की मुखोपाध्यायांनी अनामिकेच्या लग्नानंतर विश्वजीत अंकलसाठी कुळातलं कुटूंब पाहीलं होतं. त्यांना हवी तशी मुलगी त्यांनी शोधून काढली होती.
पक्क सनातनी घर.
अमेरिकेतून आले तरी मुखर्जी बदलले नव्हते.
मुलगी संस्कारी. घर एकत्र ठेवेलशी. मुलगी पाहताना त्यांच्या आत्याला नेलं होतं.
तिने सगळ्या परीक्षा घेतल्या.
त्य़ात झरना आंटी पास झाल्या.
त्यांना छान गाणं येत होतं. सुंदर आवाज होता. सुंदर चित्र काढायच्या त्या.
वाद्यं वाजवता यायची.
नृत्य शिकलेल्या होत्या. कार्यक्रम झाले होते.
त्यांना गाणं गायला सांगितलं गेलं. नृत्याचे फोटो पाहीले.
मग आत्याबाईंनी थेट सांगितलं
" मुलगी पसंत आहे, पण लग्नानंतर नाच गाणं चालणार नाही आमच्या घरी. "
मुलगी इतक्या श्रीमंत घरात चाललीय याचंच कोण कौतुक होतं तिच्या आईवडीलांना. शिवाय अमेरिकेत राहूनही संस्कार जपलेले हे जास्त कौतुक होतं. सनातनी घर असलं तरी कलासक्त होतं. मुलीला जमतील त्या सर्व विद्या दिल्या होत्या. त्यावर आता पाणी सोडायचं होतं.
" आमची मुलगी तुम्ही सांगाल तशी राहील "
आत्याने समाधानाने मान डोलावली.
विश्वजीत अंकल एका शब्दानेही काही बोलले नाहीत.
आणि लग्न होऊन झरना आंटी दुर्गापूरला आल्या.
संसार सर्वात महत्वाचा.
***********************************************
हळू हळू त्या रमल्या नवीन वातावरणात.
मग काही करायला नसल्य़ाने नोकरांची छुट्टी केली. स्वयंपाक त्या स्वत: बनवू लागल्या.
सुपरमॉम असतात तशा सुपरबहू.
नवीन नवीन सून आलेली. आपलं महत्व ठसवण्याची घाई.
त्या वेडात सगळ्या जबाबदा-या येत गेल्या.
एव्हढ्या मोठ्या घरात कमी वेळ जात असेल का ?
घर आवरणे, भांडी घासणे, कपडे धुणे.
नोकरमाणसं, बायका मनासारखं काम करत नाहीत अशी तक्रार केल्यावर सासरे कौतुकाने हसले होते.
सून अगदी मनासारखी मिळाली होती.
श्रीमंत घरात पडूनही पैसे उडवत नाही. राखणारी आहे. उडवणारी नाही. त्यांच्या मनात विचार आले.
त्यांच्या आत्यालाही त्यांनी सूनेचं कौतुक सांगितलं.
आत्या म्हणाली " सूनेचं असं कौतुक करू नये. डोक्यावर बसायला वेळ लागत नाही "
लग्नानंतर प्रेमाचे काही क्षण वाट्याला आले.
विश्वजीत अंकल आंटीच्या सौंदर्यात बुडाले होते.
मंतरलेले दिवस होते.
त्यातून आशी जन्माला आली.
अगदी त्यांचीच प्रतिकृती दिसायला.
आता या वेळी त्यांना नोकरांची गरज वाटत होती.
पण त्यांनी स्वत:च काढले असल्याने त्या वाट बघत होत्या,
कुणीतरी स्वत:हून पुढाकार घेईल आणि मदतीला बाई नाहीतर गडी कामाला ठेवेले.
पण ना सासरे काही बोलले ना नवरा.
माहेरपणावरून आल्यावरही लहान बाळ होतं.
तान्हुलं होतं.
काही दिवस त्यांची लहान बहीण सोबत राहिली. पण किती दिवस राहणार ?
ती होती तोपर्यंत कधी त्या बाळाला बघायच्या. कधी बाळाची मावशी.
एक जण घरातली कामं करत.
ती गेल्यानंतर मात्र त्यांची तारांबळ उडू लागली.
बिझनेस मधे काही तरी डामाडौल चालू होते.
विश्वजीत अंकल सतत ताणाखाली असायचे.
सास-यांनी अंथरूण धरलं होतं.
बाळाचं करायचं की सास-यांचं ?
त्यांच्या आजारपणाचा संसर्ग होऊ नये ही रोजची भीती होती.
झरना आंटी आता मानसिक दृष्ट्या ताणाखाली राहू लागल्या.
मोठं घर हे कौतुक आता केव्हांच विरलं होतं.
सुख होतं पण
एखाद्या झोपडीत पण आनंद मिळाला असता हे कळून चुकलं होतं.
सासरेबुवा गेले.
पै पाहुणे, बघायला येणार आणि आंटी त्यांचं करायला.
मुखर्जींचा परीवार मोठा. किती जण तरी येऊन गेले.
पण कुणीही मदतीला आलं नाही.
त्या डोळ्यात पाणी आणून करत राहील्या.
नाही म्हणायला भाजी आणून द्यायला , बाजारहाट करायला एक मुलगा मिळाला होता.
विश्वजीत अंकलच्या पेढीवर कामाला लागलेला होता.
आंटीचं दुर्लक्ष झालं की आशी घर रडून डोक्यावर घ्यायची.
मग वयस्कर बाया तिला अधिकाराने " अगं बाळ रडतंय, लक्ष कुठे असतं " अशी विचारणा करत.
ते दहा दिवस सरले कसे बसे.
आशीने रडून गोंधळ घालून आपल्याला बोलणी बसू नयेत म्हणून त्यांनी पाळण्याला खेळणी बांधली होती.
बाळ त्याकडे बघून गुंगेल आणि झोपेल असं त्यांना वाटायचं.
पाहुणे गेले त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं.
धंदा जोपर्यंत चांगला चालला होता , विश्वजीत अंकल खूप बारकाईने लक्ष देत होते.
पण अडचणी आल्या.
नुकसान झालं.
लोक तगादा मागे लावू लागले तसे अंकल तोंड लपवू लागले.
एकदा अनामिका मामी पण बोलता बोलता बोलल्या होत्या.
त्यांचे वडील सुद्धा अशाच परिस्थितीतून गेले होते. ताणाला कंटाळून अमेरिकेतला व्यवसाय गुंडाळून ते भारतात आले होते.
अनामिकेला तिच्या आईने सांगितले होते.
त्या वेळी अनामिकेची आई ठाकूरांकडे मदतीसाठी गेली होती.
मुखर्जी खचले होते.
ठाकूरांनी मग त्यांना आपल्या धंद्यात घेतलं.
त्यांच्या जमिनीची करारपत्रं केली.
तेव्हांपासून बरं चाललं होतं.
मॉल्स आले तेव्हां त्यात भागीदारी मिळाली.
विश्वजीत अंकल म्हणायचे "आमच्या परिस्थितीचा ठाकूरांनी फाय़दा घेतला. आमचा हिस्सा कमी ठरवला "
अनामिका म्हणायची " पण त्या वेळी दादा खचलेले होते. काही का असेना उत्पन्न चालू झाले. शिवाय डोक्याला ताण नाही "
मात्र अजूनही मुखर्जींचे एकट्याचे काही व्यवसाय चालू होते.
त्यात अडचणी आल्या आणि विश्वजीत अंकल दिवाभीताप्रमाणे लांब पळू लागले.
झरना आंटी सासूबाईंप्रमाणे मग खंबीरपणे उभ्या राहील्या.
सर्व देणेक-यांशी घेणेक-यांशी त्या बोलल्या.
हितचिंतकांशी बोलल्या.
आणि मग बरेचसे व्यवसाय विकून टाकायच्या निर्णयापर्यंत आल्या.
खूप फायदा नव्हता होणार. पण नुकसान टळणारे होते.
शिवाय मन:शांती मिळणार होती.
थोडे पैसे गाठीशी येणार होते.
विश्वजीत अंकलने मौनानेच संमती दिली.
***************************************
विश्वजीत अंकल आता धंद्यापासून अलिप्त झाले.
मन रिझविण्यासाठी गाणे ऐकायला जाऊ लागले. त्यांच्या राहून गेलेल्या इच्छा आता पूर्ण करू लागले.
ते स्वत:ही गायचे.
त्यांच्या भोवती खूशमस्क-यांचा वेढा पडला.
आणि मग ते दारू पिऊन घरी येऊ लागले.
आंटीला धक्का बसला होता.
अंकल रोजच दारू पिऊन येऊ लागले.
मुखर्जींच्या घराण्याला मान होता. प्रतिष्ठीत घराणं होतं ते.
माहेरही घरंदाज होतं.
दोन्हीचं नाव गेलं असतं.
त्या ताणाखाली राहू लागल्या.
आजवर त्यांनी जे केलं नाही ते हिय्या करून पाहीलं.
त्यांनी विश्वजीत अंकलना जाब विचारला.
त्यांनाही झरना आंटीचं हे रूप नवीन होतं.
त्यांचा इगो हर्ट झाला. त्या काय सांगतात या पेक्षा त्या कशा काय उलटून बोलू शकल्या हे त्यांना जास्त बोचलं होतं.
मग भांडणांना सुरूवात झाली.
विश्वजीत अंकल आपली चूक समजून घेत नव्हते. ते फक्त दुखावलेले होते. आणि आता आंटीला दुखावण्याची संधी शोधत होते.
" माझा सगळा व्यवसाय फुंकून टाकलास तू. भिकारड्या घरातून आलीस आणि सगळं होत्याचं नव्हतं केलंस "
जिथे आभार मानायचे तिथे असे आरोप झाले.
आंटी खूप रडल्या.
कुठेतरी अंकल सुखावले असतील.
त्यांचा पुरूषी इगो सुखावला असेल.
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात.
मुलगी दिसण्यात आपल्यावर गेलीय पण स्वभावाने घराण्याच्या वळणावर हे त्यांना तेव्हांच लक्षात आले होते.
संताप संताप करून घेणे हे लक्षण दिसत होतेच.
शिवाय खानदानी भित्रेपणा.
ताण सहन न होणे, पळ काढणे हे गुण या घरात होते.
उपकारकर्त्याबद्दल नंतर कुरकुरी करणे किंवा गरीब गाय असेल तर थेट बोलून त्याला दुखावणे.
भलतंच इगो कुरवाळणारं घराणं होतं.
आपल्या कामाचं कौतुक आता होणार नाही हे आंटीला समजत होतं.
आता वेळ निघून गेली होती.
एका मोलकरणीत त्यांचं रूपांतर झालं होतं.
सुपरमॉम, सुपरबहू हे सगळं मागे पडलं होतं.
विश्वजीत अंकल तर कुठलीच मदत करणार नाहीत ही काळ्या दगडावरची रेघ.
ते कधी आशीचा आवाज ऐकून उठले नाहीत.
पण ती रडली की आंटीला उपदेश करायला चुकायचे नाहीत.
रोज दारू पिण्यात जाणारा वेळ मुलीला द्यावा असं आंटीला वाटत होतं.
त्या रोज बोलू पहायच्या. पण त्याचं रूपांतर भांडणात व्हायचं.
महिना महिना मुलीचं तोंड बघत नव्हते अंकल. ते स्वत:मधे मग्न होते.
असंही नाही की ते कुठल्या बाईच्या नादाला लागले होते. त्या बाबतीत ते क्लीन होते.
पण ते परवडलं असं म्हणायची वेळ आली होती.
बाहेरच्यांना विश्वजीत मुखर्जी हे सभ्य, सुसंस्कृत खानदानी पुरूष दिसत होते.
त्यांना आंटीचा जाच होतो हे लोकांना दिसत होतं.
अनामिका मामीला ही त्यामुळे वाईट वाटायचं.
भावाला ही बोलते हे लागायचं.
तरी त्यांना ब-याच गोष्टी माहीत होत्याच की.
आशी मोठी होईल तशी आंटीची तारेवरची कसरत वाढली होती.
मग त्या तिला भीती घालून तिच्या पोटात काही न काही पौष्टीक जाईल हे पाहू लागल्या. त्यांना तिच्याजवळ बसून भरवायचं असायचं.
पण तिकडे अंकल, न संपणारी कामं..
अजूनही तगादा लावायला येणारे लोक.
खानदानकी इज्जत !
आंटी किती फ्रंटवर लढत होत्या.
आंटी सांगत असताना कित्येक जणी डोळ्यासमोर यायला लागल्या.
आमच्या मॅडम असाच आयुष्यभर नव-याला आवडेल तशा राहिल्या.
मिस्टर गेल्यानंतर मात्र आपल्या क्षमता चाचपडून पाहण्यासाठी बाहेर पडल्या आणि यशस्वी झाल्या.
घरीदारी, ओळखी पाळखीत, नात्यात, भावकीत सगळीकडे कुणी ना कुणी दिसू लागली.
असं कोणतं गाव नाही, शहर नाही जिथे अशी कुणी आठवली नाही.
आंटी किती ताणाखाली वावरल्या असतील !
सर्वात जास्त ताण तर त्यांच्यावर होता आनि सहानुभूती मात्र अंकल आणि आशीच्या वाट्याला.
जे व्हिक्टीम समजले ते तर शोषक निघाले.
चरकातून उसाचा रस काढावा तसा बाईमाणसाचा घरोघरी जीवनरस शोषून घेतला जातो.
ते सर्वांच्या अंगवळणी पडतं. अगदी बाईच्याही.
सोन्याच्या पिंज-यातली कैद असते ती.
पंख छाटलेल्या पाखरासारखी बाई संसाराच्या पिंज-या कैद असते.
जिला जाणवतं तिला त्रास होतो..
आणि म्हणून तिचाही आजूबाजूच्या सर्वांना त्रास होतो.
एक बाईच बाईने कसं रहावं याचं प्रवचन देते आणि तिला डोक्यावर घेतलं जातं त्या समाजात बाईच्या या जाणिवांची काय किंमत ?
गुलामी जर आनंदाने केली तर जीवन सुखकर होतं असं काहीसं तत्वज्ञान व्यवस्थेनं जन्माला घातलंय. जर तक्रारी केल्या तर तुम्हालाच त्रास होणार.
या ही परिस्थितीत आशीची गंमत करावी आणि मुख्य म्हणजे तिने खावं म्हणून त्या हळूच बाहेर जाऊन आवाज काढायच्या.
नंतर आत येऊन कसं फसवलं या आविर्भावात त्या तिला जवळही घ्यायच्या.
पण तिनेही आपल्याला भीती घातली इतकंच लक्षात घेतलं.
तिचीही चूक नव्हती.
तिला स्वभावातले दोष गोडीने दाखवून त्यातून कसं बाहेर पडायचं हे शिकवण्याचं ज्ञान आंटीकडे नव्हतं.
अंकलकडे असेल तर त्यांना वेळ नव्हता.
गावाकडे पत्ते खेळणारे, जुगार खेळणारे पुरूष.’
संध्याकाळी दारू पिऊन येणारे पुरूष.
बायकांना मारहाण करणारे नवरे..
यांच्या घरच्यांचं काय होत असेल ? का सहन करतात हे सर्व ?
याची उत्तरं मिळत होती.
काहीच दिवसांपूर्वी आमच्यात सिरीयस रिलेशनशिप सुरू झाल्यावर माझ्यातली बाईही डोकं वर काढत होती. इतके दिवस आईला हसायचे मी. आता सगळा सगळा उलगडा होत होता.
.........................................................................
इतकं आंटी कुणाकडे बोलल्या असतील या आधी ?
माहेरी मुलगी एकदा दिली की तिच्या मयतीला जायचं असं तत्वज्ञान होतं. तिने तक्रारी घेऊन यायच्या नाहीत.
माहेरी घर सोडून रहायला यायचं नाही. सणवाराला काय यायचं ते या आणि गोडीत परत जा असे संस्कार होते.
कुणाला सांगणार ?
मी आशीबद्दल सांगायचा प्रयत्न केला.
त्यांनी मला हाताने थांबवलं.
" मी तिच्या विरोधात काही ऐकू शकत नाही. माझ्या काळजाचा तुकडा आहे "
मग त्या थांबल्या.
" सलोनी, तुला जे सांगायचंय ना ते मला माहीत आहे "
मला हा धक्का होता.
" म्हणजे ?"
" सुरूवातीला मला नाही समजलं. डोक्यात पण नाही आलं. पण इथे आल्यावर मला मागच्या बाजूला तिच्या गोळ्या सापडल्या"
" खरंच ?"
" आशी गोळ्या घेत नाही हे लक्षात आलं. ती कधीच घेत नसेल हे पण समजलं "
" मग ते आवाज ?"
" ते पण इथे आल्यावरच समजलं "
त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं.
" माझ्या डोक्यात कधीही आलं नसतं हे सलोनी. पण माझ्या फोनवर त्या वेळी एकच मिस कॉल असायचा.
आणि तो आशीच्या नंबरवरून आलेला असायचा. ती झोपेत होती. पण एक दिवस मी रात्री तपासणी केली.
तिच्या उशाखाली पैंजण होतं आणि खाली शटल कॉक्सचा कंटेनर. फोन खालीच ठेवलेला होता. त्या दिवशी मला उलगडा झाला "
" मग पडदे ? "
" केरोसीनचा वास आला होता मला "
मी मग शांत बसले.
पण एक प्रश्न होताच.
"मग आंटी तुमचं हे आजारपण ? मानसिक धक्का ?"
" सलोनी , ज्यांच्यासाठी केलं त्यांच्याकडून आयुष्यभर मला काय मिळालं ? मी नैराश्यात जाऊ लागले होते. पण एका विश्वासावर. माझी मुलगी माझं अपत्य मला समजून घेईल... त्यालाच तडा गेला. तेव्हां मी संपूर्ण हरले सलोनी. मी कोसळले. माझा शक्तीपात झाला. पूर्ण खचून गेले. मला काही समजत नव्हतं. भान गेलं होतं.. "
माझ्य़ा मनावर सुद्धा आघात होत होते.
आशी मोठी होईल तेव्हां तिला नक्की समजेल हे सगळं. शेवटी ती स्त्री होती.
आत्ता तिचे लाड होत होते. अंकलचे शब्द कानावर पडायचे त्यातून ती आईला खलनायिका समजत होती.
दोघांनीही तिचं वाटोळं केलं हे खरंच...
पण झरना आंटीच्या या वेदना कुणाला समजणार ?
माझ्यापुढे हाच प्रश्न होता.
कोण समजून घेणार हे ?
ही केस कधीच सुटलेली नाही. कधी सुटेल सांगता येत नाही.
-----------------------------------------------------------------------
खूप वेळ झाला.
ऋतू यायची वेळ झाली.
त्याची वाट बघायला रिसेप्शनला येऊन बसले.
मेसेज टाकला होता.
तोपर्यंत दोघातले अनेक प्रसंग डोळ्यासमोरून गेले.
सहा सात वर्षांपूर्वीचा हळवा ऋतू,
ते कोवळे प्रेम !
आता जबाबदार झाल्यानंतर, स्वत:च्या पायांवर उभा राहील्यानंतर त्याच्यातला पुरूष दिसत होता.
त्याला हवे ते मिळाल्यावर त्याच्यातले बदल.
नाही, त्याने फसवले नाही. फसवणारही नव्हता.
पण मालकी हक्क निर्माण झाल्यानंतर पुरूषाच्यात होणारा बदल स्त्रीच्या नजरेतून कसा सुटेल ?
माझ्यासारख्या मुक्त विचाराच्या मुलीला ते खटकणारे होते.
आणि त्याच्या गावीही नव्हते.
मिरवण्यासाठी आधुनिक गप्पा मारणारे पुरूष वेळ आली की पुरूषसत्तावादी असतात हे दिसतंच.
दुर्दैवाने ऋतूही अपवाद नाही असं अनेकदा वाटून गेलं.
झरना आंटीसारखी वाईट परिस्थिती नव्हती. पण तिची जडणघडण माझी जडणघडण यात अंतर होतं !
पुढच्या आयुष्य़ावर आता सावट उभं राहत होतं.
केस यशस्वीरित्या सुटूनही भय वाटत होतं.
संध्याकाळ होत आली होती. थंड वारं सुटलं होतं.
अंधार दाटून येईल. अशा वेळी प्रवास करायची भीती वाटत होती.
त्याची साथ आहे म्हणून काही वाटत नव्हतं, पण...
त्याला उशीर होईल वगैरे मेसेज करायची फुरसत मिळालेली नव्हती.
मी सरळ बाहेरच्या वॉचमनला कॅब बोलवायला सांगितली आणि एकटीच निघाले !
त्याला कळवण्याची तसदीही न घेता.
(समाप्त )
(एका स्थानिक गाजलेल्या प्रकरणाचा आधार घेतला आहे. मात्र शेवट आणि मांडणी वेगळी केली आहे).
ही कथा पूर्ण करण्यासाठी वेळ
ही कथा पूर्ण करण्यासाठी वेळ लागला. त्यामुळे वाचनाची कंटीन्युइटी जाते याची कल्पना आहे. तरीही ज्या वाचकांनी वेळो वेळी उत्साह टिकून राहण्यासाठी प्रोत्साहन दिले त्यांची मी ऋणी आहे. इतक्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर वाचकांची निराशा होणार नाही ही आशा आहे.
शेवट आवडला राभु, कथाही आवडली.
शेवट आवडला राभु, कथाही आवडली. वास्तववादी दृष्टीने लिहिलेस. त्यात सलोनीचा दृष्टिकोनही येत गेला. मला उगाचच अजून नाट्यमयता अपेक्षित होती पण हे जास्त प्रामाणिक आणि थेट असल्याने व्यवस्थित पोचलं. तुझी एकुणच घरांची, व्यक्तींची, शहरांची, निसर्गांची वर्णने अतिशय आवडली. मी बंगाली पार्श्वभूमींंची चाहती आहेच त्यामुळे अधिकच आवडले.
लेखन आवडले. पुलेशु
मस्तच
मस्तच
खूप मस्त. मनाच्या गुंत्याचे
खूप मस्त. मनाच्या गुंत्याचे धागे अतिशय छान उलगडले आहेत. शेवटही फार आवडला. आजूबाजूला घडणार्या घटनांतून नेमकं आपल्याला काय शिकायचं आहे हे नायिकेला व्यवस्थित लक्षात आलं.
अस्मिता आणि मामीना अनुमोदन.
अस्मिता आणि मामीना अनुमोदन.
खूप विचारपूर्वक केलेले लिखाण जाणवते आहे.
इतकी वर्णने असूनही कुठेच कंटाळवाणे वाटले नाही.
लिहीत रहा.
दोन लेवलवर गोष्ट लिहिली आहे.
दोन लेवलवर गोष्ट घडत आहे. एक कोडे उलगडत जाते तर दुसरे कोडे गहन होत जाते. म्हणून आवडली.
मस्त!
खूप छान लिहिली आहेस रानभुली.
खूप छान लिहिली आहेस रानभुली. बायकांनी स्वताच्या बाबत स्वार्थी होणे किती गरजेचे आहे हे झरना आंटी कडे पाहून कळते. कोणितरी स्वतहून मदत करेल ही अपेक्षा तिच्या साठी आणि आशी साठी किती घातक ठरली. वेळीच कोणाची पर्वा न करता निर्णय घ्यावे लागणे किती गरजेचे आहे. पण तिची माहेरची शिकवण पण सनातनी असल्यामुळे झरना आंटी पण बिनधास्त निर्णय घेऊ शकली नाही. नवरा आणि सासरे नाहीतरी कचखाऊ वृत्तीचे होते. पण अशी लोक त्यांच्या चुका मान्य न करता दुसर्यला दोष देउन मनाचे समाधान करुन घेतात.
पहिल्या भागापासून नियमित
पहिल्या भागापासून नियमित वाचतोय.
यात प्रत्यक्ष रहस्याचा भाग तुलनेने लहान असला तरी तिथपर्यंत पोहोचायचा प्रवास खूप छान वाटला. आणि हे मी रहस्य सोडवायच्या प्रवासाबद्दल बोलत नाहीये तर कथेच्या प्रवासाबद्दल बोलतोय.
वेगळ्या जागा, वेगळा आसमंत आणि अतिशय छान वातावरणनिर्मिती.
ही कथा खरं तर रहस्यकथा नाहीच आहे. हा खरं तर नात्याचा आणि नात्यांचा शोध आहे. आणि रहस्यकथा असलीच तर ती आशी किंवा झरना आंटीच्या रहस्याबद्दल नसून इतर पुरुषांच्या स्वभावाच्या पार्श्र्वभूमीवर ॠतुपर्णच्या स्वभावाचा झालेला उलगडा यावर आहे, असं माझं मत.
एकंदरीत हा कथाप्रवास खूप आवडला..
अस्मिता >>> धन्यवाद. मला मोह
अस्मिता >>> धन्यवाद. मला मोह झाला होता शेवटी धक्का देण्याचा. पण शेवट माझ्यासाठी महत्वाचा होता. त्याचा प्रभाव नाहीसा झाला असता म्हणून आवरला.
लावण्या - आभार.
मामी - खूप खूप आभार. प्रत्येक भाग लिहील्यानंतर तुमच्या आणि अन्य काही वाचकांनी इथे व अन्यत्र दिलेल्या प्रतिसादांमुळे कथा पूर्ण करता आली. कथा आवडली हे समजल्यावर छान वाटलं.
प्रभूदेसाई - बरोबर बोट ठेवलंत तुम्ही. तुमच्यासारख्या प्रयोगशील लेखकाचे आशिर्वाद मिळाले हे भाग्यच समजते. धन्यवाद.
सियोना - मनःपूर्वक आभार. मला जे म्हणायचं ते छानच मांडलं आहे. खूप खूप आभार.
निरुदा - धन्यवाद. ही रहस्यकथा नाहीच हे बरोबर आहे.
रानभुली, छान उलगडले आहेत
रानभुली, छान उलगडले आहेत प्रत्येकाचे द्रुष्टीकोन.
ऋतुपर्ण चा सहभाग आणि सलोनीची मतं, सगळंच आवडलं.
छान झाली कथा. अभिनंदन.
खूप सुंदर कथा... रानभुली..!!
खूप सुंदर कथा... रानभुली..!!
कथेत प्रत्येक पिढीतल्या नातेसंबंधावर प्रकाश टाकलायं तू... नात्यांचा अचूक वेध घेतलायेसं...!
वर्णनशैली अफाट आहे तुझी ... गुंतवून ठेवलसं.... भाग पटापट टाकलेस...!
तुझ्या पुढील कथेच्या प्रतिक्षेत...!
कथेत प्रत्येक पिढीतल्या
कथेत प्रत्येक पिढीतल्या नातेसंबंधावर प्रकाश टाकलायं तू... नात्यांचा अचूक वेध घेतलायेसं...!
वर्णनशैली अफाट आहे तुझी ... गुंतवून ठेवलसं.... भाग पटापट टाकलेस...!
+1000
सगळे भाग एकदम वाचले. जबरदस्त लेखनशैली आहे
छान फुलवली आहेस कथा. शेवट ही
छान फुलवली आहेस कथा. शेवट ही छान.
मात्र, शुद्धलेखनाकडे अधिक लक्ष द्यावे. शब्द तोडून खालच्या ओळीत कधी लिहू नये. पूर्ण शब्द खालच्या ओळीत लिहावा.
आणि भाषाही थोडी 'refine' करता आली तर अधिक चांगली वाटेल...हे असे मनात विचार आले तसे..बोलल्यासारखे लिहिणे थोडे खटकते...!
पण उत्तम वातावरण निर्मिती, सुरेख प्रयत्न!
रानभुली, खूप सुंदर कथा लिहिली
रानभुली, खूप सुंदर कथा लिहिली आहेस. अशीच उत्तमोत्तम कथा लिहित रहा.
मनाच्या गुंत्याचे धागे अतिशय छान उलगडले आहेत. खूप विचारपूर्वक केलेले लिखाण जाणवते आहे. इतकी वर्णने असूनही कुठेच कंटाळवाणे वाटले नाही.++१११
कथेचे सर्व भाग नियमितपणे पोस्ट करून कथा पूर्ण केलीस त्यासाठी विशेष अभिनंदन आणि आभार.
खूप आवडली. नात्यांचे आणि
खूप आवडली. नात्यांचे आणि मनाचे गुंते सोडवताना सलोनीला जे उलगड जाते, नात्याचे जे भान येते ते खूप छान दाखवले आहे. धक्का तंत्र वाला शेवट नसल्याने कथेने एक वेगळीच उंची गाठली.
धनवन्ती >> मनापासून आभार.
धनवन्ती >> मनापासून आभार. कंटाळवाणी वाटली नाही, आवडली याबद्दल धन्यवाद.
मृणाली >> मनःपूर्वक आभार. उत्साह टिकवून ठेवल्याबद्दल विशेष आभार
रूपाली >> खूप खूप आभार. अशा प्रतिसादांनी हुरूप वाढतो.
मनिम्याऊ >>> आभारी आहे प्रतिसादाबद्दल
आंबट गोड >>>>> मनःपूर्वक आभार. केकेल्या सूचनांबद्दलही आभार. लक्षात ठेवीन. वाक्यं किंवा शब्द तुटताहेत ते टायपिंग करताना तोडलेले नाहीत. डेस्कटॉपवर आणि मोबाईलवर वेगळं दिसतंय. मोबाईलवर बरेच शब्द आपोआप तुटले आहेत. डेस्कटॉपलाही दोन तीन शब्द असे झाले होते.
ते लिखाणाच्या खिडकीच्या बाहेर गेलेल्या वाक्यांमुळे झाले असावे. खरं तर संपूर्ण शब्दच खालच्या ओळीला जायला हवा होता.
रिफाईन्ड भाषेच्या सूचनेवर पण विचार करीन. पण मला नेमकं समजलं नाही ते. अर्थात पुन्हा वाचून पाहीनच.
प्रथम पुरूषी नमुन्यात गप्पा मारल्यासारखे निवेदन जाणीवपूर्वक ठेवले आहे. तुटक वाक्यं वगैरे म्हणायचं आहे का ? बघते मग पुन्हा.
अशा सूचनांचे मनापासून स्वागत आहे. धन्यवाद.
एस - आभार
स्वाती -२ --- शेवटाबद्दलच्या मताबद्दल आभार. विचारपूर्वक केलं होतं तसं.
फार छान कथा. सुरूवातीपासून
फार छान कथा. सुरूवातीपासून पकड घेते. आणि रहस्य कसं अलवार उलगडत जातं. तुम्ही लिहीत रहा.
छान होती कथा. आवडली.
छान होती कथा. आवडली.
राभु खूप छान झाली कथा..शेवटचा
राभु,खूप छान झाली कथा..शेवटचा भाग तर अतिशय सुंदर...सलोनीच्या मनातील भावना किती सहज उतरवल्या आहेस..वर्णनं तर खूप सुंदर लिहतेस तू...पुढील लेखनास तुला खूप शुभेच्छा.
रा भु, मस्त च होती पूर्ण कथा.
रा भु, मस्त च होती पूर्ण कथा. आवडली.
आताच संपूर्ण वाचली. छान
आताच संपूर्ण वाचली. छान मांडणी केलीये. कुठेही कंटाळवाणी वाटली नाही. आणि पूर्व भारताची बॅकग्राऊंड पण जमलीये कथेला.
शेवटचं नायिकेचे स्वगत पण मुद्देसूद आहे.
लिहीत रहा
छान झालीये कथा. प्रवासवर्णन
छान झालीये कथा. प्रवासवर्णन, शिमल्याचं निसर्ग सौंदर्य , मानवी भावनांचे वेगवेगळे पैलू , आणि विशेष म्हणजे बंगाली पार्श्वभूमी सगळंच खुप छान जमून आलंय. रहस्यकथा म्हणता म्हणता शेवटी वेगळ्याच वळणावर येऊन संपली हेही वेगळेपण. छानच. लिहीत रहा. फक्त वर आंबट गोड जे म्हणाल्या तेही जाणवलं थोडं आणि काही काही ठिकाणी discontinuity आल्यासारखं वाटलं मागील भागांत. कदाचित परत वाचलं की कळेल काय ते.
मा़झे मन, चैत्रगंधा, राणि १,
मा़झे मन, चैत्रगंधा, राणि १, ए श्रद्धा, जाई , भाग्यश्री १२३ - सर्वांचे आभार.
भाग्यश्री - ते शब्द मी तोडलेले नाहीत. दुस-या एडीटर मधे टंकून इकडे पेस्ट केल्यावर खिडकीच्या बाहेर गेलं की आपोआप शब्द तोडले जात आहेत. मोबाईलवर जास्त.
पण माझ्या फोनवर त्या वेळी एकच
पण माझ्या फोनवर त्या वेळी एकच मिस कॉल असायचा.... हे समजलं नाही गं.....
म्हणजे आशी फोन करायची का आईला?
आणि निवेदिका म्हणते..काहीही झालं तरी ठाकूर होते मी....हे कसं काय? ठाकूर हे तिचं आजोळ ना?
Refined भाषा..म्हणजे मी तुटक वाक्यांबदलच म्हणतेय.
आणि एव्हढा उलगडा होऊनही....हे रहस्य कुणाला सांगितले तरी काय फरक पडणार होता?
पण माझ्या फोनवर त्या वेळी एकच
पण माझ्या फोनवर त्या वेळी एकच मिस कॉल असायचा.... हे समजलं नाही गं >>>> त्या भीतीच्या क्षणी नंबर बघितला गेला नाही, अंधार असेल. पण दुस-या दिवशी म्हणा किंवा नंतर म्हणा रात्रीच्या त्या वेळी आलेला एकुलता एक कॉल कुठून आला हे त्या चेक करणारच ना ?
काहीही झालं तरी ठाकूर होते मी. >>>> निवेदिका ज्या घरी आली आहे त्यांची प्रतिनिधी आहे. एक ठाकूरांचे घर आणि एक मुखर्जींचे. मुखर्जी नात्यात नाहीत. ठाकूरांच्या नात्यातल्या मुलीने काही केलं तर ती जबाबदारी ठा़कूरांवर येणार अशा अर्थाने लिहीलेले आहे.
तुटक म्हणजे आलं लक्षात. मी पुन्हा वाचून यावर काय करता येईल का हे बघते. फक्त सगळे भाग एकदम वर येतील म्हणून थांबतेय.
फक्त सगळे भाग एकदम वर येतील
फक्त सगळे भाग एकदम वर येतील म्हणून थांबतेय-----उत्तम लिखाण आहे. कंमेंट्स ऍड झाल्यावर ते पुन्हा वर येणारच आहेत....
आवडली कथा. त्या बेगुनकोडोर
आवडली कथा. त्या बेगुनकोडोर च्या ट्रेनच्या गोष्टीपेक्षा ही जास्त आवडली.
Awadali. Swati tai +1
Awadali.
Swati tai +1
.>>>खूप आवडली. नात्यांचे आणि
.>>>खूप आवडली. नात्यांचे आणि मनाचे गुंते सोडवताना सलोनीला जे उलगड जाते, नात्याचे जे भान येते ते खूप छान दाखवले आहे. धक्का तंत्र वाला शेवट नसल्याने कथेने एक वेगळीच उंची गाठली.
Submitted by स्वाती२ on 9 May, 2021 - 06:19>>>>>
धक्का तंत्र वाला शेवट नसल्याने +१
सगळे भाग वाचले. छान मांडणी.
सगळे भाग वाचले. छान मांडणी. सुरेख कथा.
असंच लिहित रहा.
Pages