कलूआजी! - संपूर्ण!

Submitted by अज्ञातवासी on 6 May, 2021 - 14:06

बऱ्याच दिवसांनी काल मामाकडे निघालो.
दोन तासाचा प्रवास, वर्षभर जाणं होत नाही.
तसही मामा मामीला काहीही प्रेम राहिलेलं नाही. आजीसाठी जावं लागतं.
म्हातारी गेली, तर मग तेही बंद...
संध्याकाळी गेलो, गावात शिरलो, पेठेत आलो.
रात्र झालेली, भरपूर पाऊस....
कलूआजीचं दार उघडं दिसलं...
कलूआजीचं दार उघडं बघूनच आनंद झाला.
कलूआजी म्हणजे एका अतिशय मोठ्या घराचा शेवटचा खांब. तसं बघायला गेलं, तर कलूआजी आणि माझं काहीही नातं नव्हतं, पण काही जिव्हाळ्याची नाती फार मोठी असतात.
चार पिढ्यांपासून संबंध... आताच्या पिढीत घट्ट नसले, तरीही तुटले तरी नव्हते.
या घराने जे पचवलं, ते शक्य नाही कुणाला.
कलूआजीच्या घराला घर म्हणता येणार नाही. लांबच लाम्ब रेल्वेचा डबा, तसली बोळ, आणि उजव्या बाजूला खोल्या.
म्हणजे बघा ना. सुरुवातीला छोटासा दिवाणखाना, त्यानंतर भलीमोठी माडी दुसऱ्या मजल्यावर.
मग मधली खोली, त्यातच देवघर. मागे स्वयंपाकघर. स्वयंपाकघराच्या बाजूला मोकळी जागा. तिथे कायम गोवऱ्या, लाकडे रचलेली. एक भलामोठा हौद.
मागे गोठा, गोठ्याच्या मागे शौचालय...
लहानपणी तर मला भीतीच वाटायची... मी या टोकापासून त्या टोकापर्यंत पळतच जायचो.
मलाच काय भीती, आईसुद्धा असच म्हणायची!
मी घरात गेलो, आणि आजीला आवाज दिला.
"कलूआजी... ओ कलूआजी.…"
कुठलाही प्रतिसाद नाही.
मी पुन्हा आवाज दिला.… प्रतिसाद नाही.
नाईलाजाने जायला शेवटी मी मागे वळलो तेवढ्यात.
"कोण?"
मागून आवाज आला.
किती बदलली होती कलूआजी...
नऊवारी जाऊन आता कलूआजी चक्क गाऊनवर आली होती.
वयाने तर अजून तरुण दिसत होती.
"भाऊ तू... आई कुठेय???" तिचा आनंद मावत नव्हता.
"मी एकटाच आलोय. तिची तब्येत बरी नव्हती."
"आईलाही घेऊन यायचं. बस मी आलेच."
"बसा हो आजी. पाणी वगैरे काही नको."
"असं कसं. अरे मस्त चिवडा आणि रव्याचा लाडू बनवलाय. थांब आणते."
नको नको म्हणतानाही आजी आत गेली. थोड्यावेळाने मस्त डिशमध्ये फराळ घेऊन आली.
मी चिवडा खाऊ लागलो, खोबरं बाजूला वेचून ठेवलं तशा आजी हसल्या.
"खोबऱ्याची चव न आवडणारा तू महाभागच. पण बरं झालं तू भेटलास. मीही नसते इकडे, मुंबईला तेजुकडे असते. ती निघूच देत नाही."
तेजुमावशी... कलूआजीची मुलगी...एकुलती एक...
"आजी काहीही म्हणा, पण तुम्ही पूर्ण बदलल्या मुंबईला जाऊन."
"भाऊ... माझी तब्येत मला साथ देत नाही. पूर्वीसारखी चापून चोपून नऊवारी नेसणं जमत नाही. आता मला कुणी लाज सोडली म्हटलं तरी चालेल, पण मी आता गाऊनच घालते. त्या परमेश्वराने मेल्यावर मात्र नऊवारीवर न्यावं"
मी फक्त हसलो.
"तुझी पणजीआजी असती ना, उभं जाळलं असतं मला."
"काहीही काय? पणजीआजी किती प्रेमळ होती."
"पणजीआजी आणि प्रेमळ. ते फक्त तुमच्यासाठी. आम्हा सुनांचा जीव घ्यायला मागेपुढे बघितलं नसतं. अवघड होती म्हातारी. तिचंही काय म्हणा... पोरांनी एवढ्या गरिबीतून इतक्या श्रीमंतीत आणलं तिला, पण तिचे जुने दिवस आठवले तर अंगावर काटा येतो..."
"म्हणजे आजी?"
"पणजीआजी रोजावर कामाला जायची. दोन पोरं, एक पोरगी पदरात... अक्षरशः कोंड्यात झाडून ठेवलेले भाताचे दाणे म्हातारी निवडायची, आणि त्याच्या पेजेवर पोरं जगवायची."
मी थक्कच झालो.
"भाऊ... हे घर आहे ना, सगळं त्यातून उभं राहिलंय. तुझे अप्पाबाबा आणि दादाबाबा, स्वतःला बैलाच्या जागी जुंपून त्यांनी भाताची शेती केली. शेवटी या घराच्या बाहेर पथारी अंथरून धंदा वाढवला."
मी अचंबित होऊन पाहतच राहिलो.
"आजी, हे तर मला काहीच माहिती नाही."
"काय जुन्या आठवणी काढाव्यात? अरे या घरात आम्ही तिघीजणी दिवसरात्र राबायचो, तेव्हा कुठे येणारे जाणारे सगळेजण तृप्त होऊन जायचे. आजीला विचार, कितीदा बिचारी रात्री उशिरापर्यंत वाटण करत बसली असेल."
"आजी पण इतकं सगळं कसं कमावलं आजोबांनी? इतक्या कमी वयात?"
आजी चमत्कारिकपणे हसली.
"काय लपवावं आता? अमावस्येला असेच दोघे भाऊ पडवीत झोपले असतील. तेव्हा घाट उतरून गोलीबाबा त्यांना भेटला."
"कोण गोलीबाबा?"
"माणूस की पिशाच माहिती नाही. सगळा तालुका त्याला टरकून होता. पण त्याने ह्या भावाना उठवलं, आणि एक नारळ त्यांना दिला... बस, तेव्हापासून या घराची लक्षणीय भरभराट चालू झाली. पैसा ठेवायला जागा पुरत नव्हती."
मी फक्त ऐकत होतो,
"...आणि त्याच नारळाने घात केला..."
आजी विवश होऊन म्हणाली.
"म्हणजे?"
"भाऊ आपला आदिवासी भाग. व्यापारी लोक कमी. व्यापार वाढला, पण सगळी नारळाची कृपा, असं भाऊ म्हणायचे. पण एक रुखरुख होती. घराला वारस नव्हता. भिमाबाईनाही नाही आणि उषालाही नाही... मग आणलं मला, बाईंची सवत म्हणून. बाईंनी मात्र कधीही जाच केला नाही. दोन मुली झाल्या, आणि मलाही मुलीच... अप्पानी धरला मग, झेंडाचौक. घरात राजरोस दुसऱ्या बाया यायला लागल्या.
बाईंनी हाय खाल्ली, कायम विचारात... त्यातच एकदा बंधाऱ्यावर पाय घसरून पडल्या, आणि गेल्या."
मी सुन्न झालो.
"भाऊ, खूप बोलली रे मी. तुला निघायचं असेल ना, जा...आजी वाट बघेल."
"नाही आजी, बोला ना." मलाही आता उत्सुकता लागली होती.
"काय बोलू? शेवटी उषाला मुलगा झाला. गंगेत घोडं न्हाल. काशिताईंचं तेव्हाच लग्न झालं. काशिताई म्हणजे काळ्याकुट्ट... शेवटी ते गावातलं घर आणि रेशन दुकान, सुभ्याच्या नावावर केलं, आणि त्याने ताईंशी लग्न केलं. त्यानंतर अप्पा आजाराने गेले... विचारू नको कसला आजार, पण गेले. हाय खाऊन दादाही गेले...
...आणि त्यादिवशी नारळ गायब झाला.
शोध शोध शोधलं, नाही मिळाला. पोरं लहान, घर सैरभैर झालं. पण उषा खमकी. सगळं सांभाळलं. अगदी सगळं. भाड्याच्या खोल्या, दुकानं, सगळं.
पाहवत नव्हतं लोकांना. अरुण मोठा झाला. तालुक्यातील सगळ्यात मोठं लग्न झालं, पण..."
"काय आजी?"
"दुसऱ्याच दिवशी गेला... मारलं त्याला... खून केला त्याचा. जंगलात सापडला. जीव गेला रे माझा, जीव गेला. उषाने तर जीव सोडला असता, कसं सावरलं तिने, देव जाणे.
"तरीही उषाने सावरलं, पण उषाची कल्पना गेली, आणि तिच्या पोरांसाठी नाशिकला गेली. बाईंच्या प्रियाला शहापूरला दिलं, आणि तेजू मुंबईला."
आजींना दम लागला.
"वाडा राहिला. कुठेच जाणार नव्हता वाडा. थांब हं, जरा येते."
आजी घरात निघाल्या.
"काय करणार, जीवच होता माझा वाड्यात. हा वाडा फक्त माझा. या वाड्यात मला कुणीही आवडतं नव्हतं. कुलूप लावलं ना, वाडा कसा तिजोरीत ठेवल्यासारखा वाटायचा.
बाईंच्या नावावर अप्पा वाडा करणार होते, म्हणून गेल्या बिचाऱ्या बंधाऱ्यात पडून. मीच होते त्यांच्याबरोबर!
अप्पांना म्हणे विषबाधा झाली, आता मी रात्री दूध द्यायचे, त्यात माझा काय दोष?
कळव्या भिल्ल माझा जिगरी दोस्त, मग मी अरुणला मारलं होय? वेडेपणा…
ते नारळ मी खाल्लं, मला खोबरं खूप आवडतं. ओलं, सुकं, पण म्हणे नारळ गायब झाला..."
"आजी मी येतो," माझा थरकाप उडाला.
"थांब, हे तुझ्या आजीला नऊवारी लुगडं घेऊन जा." आतून आवाज आला.
मला जीवावर आलं होतं आत जाणं, पण तरीही मी जीवाचा हिय्या करून गेलो.
कलूआजीनी एक पिशवी माझ्या हातात दिली, आणि माझ्याकडे बघून हसल्या...
"...मी गेले ना, त्यादिवशी तुझ्या आजीने हे लुगडं अंगावर टाकलं. शेवटची इच्छा पूर्ण झाली..."
...त्याक्षणी मी पळत सुटलो....
"अरे लहान राहिला का तू पळत जायला?"
आजी माझ्याकडे हळूहळू सरकत येत होती...
मी दार उघडायचा प्रयत्न करू लागलो...
..पण वाड्याचं दार आता कुलुपबंद झालं...
"मला वाडा कुलूपबंद आवडतो..."
भेसूर हसत आजी माझ्याकडे सरकतच होती...
"आणि या वाड्यात मला कुणीही आवडत नाही...."
आणि ती माझ्याकडे झेपावली...

समाप्त.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद.. Happy
बऱ्याच दिवसानंतर काहीतरी लिहिलं. तुम्हा सगळ्यांना आवडलं यातच आनंद आहे.
पुढचा भाग टाकला आहे. इथेच संपवायची होती... पण काय करणार..
...पणजीआजी बाकी आहे Wink

Pages