प्रत्येक माणसात असंख्य माणसं कोंबलेली असतात. वेगवेगळा स्वभाव, वेगवेगळ्या प्रवृत्ती घेऊन आलेली ही माणसं शोधणं फार कठीण असतं. तेंडुलकरांना मात्र ते सहज जमलं होतं. या भेदक नजरेचा वापर करून तेंडुलकरांनी आपल्या नाटकांत, एकांकिकांत असंख्य पात्रं जिवंत केली. त्यांच्या कथा, कादंबर्या, नाटकं, एकांकिका भारतातच नव्हे, तर जगभरात गाजल्या त्या त्यांच्यातील माणसांमुळे. माणसातील लैंगिकता, हिंसा, प्रेम, द्वेष, ईर्षा, उदात्तता, अधमता या सार्यांचा तेंडुलकरांनी अतिशय सजगतेने वेध घेतला. पराकोटीच्या कुतूहलाने माणसाकडे पाहण्याच्या त्यांच्या निर्मळ दृष्टीमुळे विविध प्रकारची पण अतिशय जिवंत माणसं तेंडुलकरांनी आपल्या लेखनात उतरवली.
अशा या प्रतिभावान लेखकानं स्वतःचा शोध घ्यायचं ठरवलं. आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहायचं ठरवलं. पूर्वी भेटलेल्या माणसांना परत भेटायचं. तो काळ परत अनुभवायचा. स्थित्यंतराचा ताळेबंद मांडायचा. या आठवणी, साठवणी परत जगायच्या. पण का? तर या काही माणसांमुळे तेंडुलकर घडले होते. या माणसांचा प्रभाव कुठेतरी, कधीतरी त्यांनी मिरवला होता.
तेंडुलकरांना आत्मचरित्र लिहायचं नव्हतं. पण हे लिखाण काहीसं त्याच अंगाचं आहे. पूर्ण झालं असतं तर कदाचित त्यांनी त्यात बदलही केले असते. पण तेंडुलकरांच्या मृत्यूमुळे हे लिखाण अपूर्ण राहिलं. तीच ही तेंडुलकरांनी आरंभ केलेली, पण अपूर्ण राहिलेली अर्धीमुर्धी संहिता - 'तें' दिवस (आरंभकाळ).
तेंडुलकरांचं अखेरचं पुस्तक आज, त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी, प्रकाशित होत आहे.
त्यातील ही काही पानं..
![te_cover.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u4614/te_cover.jpg)
अभ्यासावरचे लक्ष उडाले होते. वर्गात लक्ष लागत नव्हते. वारंवार शाळेला हरताळ फासल्याने अभ्यास मागे पडला होता. वडील आता लायब्ररी बंद करून पुण्यातल्या एका पुस्तकांच्या दुकानात नोकरी करू लागले होते. बहीण एका शाळेत शिक्षिका झाली होती. घरची आर्थिक परिस्थिती बरी नव्हती. माझ्यावरचे घरच्यांचे लक्ष मध्यंतरीच्या काळासारखे राहिले नव्हते.
आता आम्हाला तेव्हाचे विचारवंत आणि लेखक पु. ग. सहस्रबुद्धे मराठी शिकवीत होते. इंग्रजीला करंदीकर म्हणून सर होते. (यांचे माझ्या नंतरच्या आयुष्याला मोठी कलाटणी मिळण्यात अत्यंत महत्त्वाचे स्थान.) संस्कृत अरविन्द मङ्गरूळकर शिकवीत. त्यांचे नाव असे लिहिले, कारण त्यांचे मराठीचे आणि संस्कृतचे उच्चारण इतके शुद्ध आणि नाजूक होते.
पु. ग. सहस्रबुद्धे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक पण सुभाषचंद्र बोस वेषांतर करून जर्मनीमार्गे जपानमध्ये पोहोचल्यापासून ते सुभाषचंद्रांचे निहायत चाहते झाले होते आणि आझाद हिंद सेना घेऊन ते कधी भारतात पोहोचतात याची वाट पाहात होते. बोस आले की ते त्यांच्या सेनेत जातील असे वाटावे इतके त्यांचे बोसांविषयीचे प्रेम ज्वलंत होते.
याउलट कवी मोरोपंत हा त्यांचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू होता. आमच्या क्रमिक पुस्तकातले मोरोपंतांचे काव्य शिकवताना पु.ग. रागाने लालबुंद होत आणि द्वेषाचे फुत्कार टाकत आहेत असे वाटे. मोरोपंत असते तर त्यांनी मोरोपंतांचे नरडेच दाबले असते असे वाटण्याइतका त्यांना त्वेष अनावर होई. इतकाच राग त्यांचा नाटक या माध्यमावरही होता. हे एक तद्दन खोटे माध्यम आहे असे त्यांचे मत असल्यासारखे ते राम गणेश गडकर्यांचे आमच्या क्रमिक पुस्तकातले उतारे दातओठ खाऊन वाचत. या माध्यमाविषयी बोलताना त्यांच्या वक्रोक्तीला भलतीच धार चढत असे.
याउलट मंगरूळकर अत्यंत प्रेमाने आणि नाजूक शैलीत संस्कृत शिकवीत. उच्चार शुद्ध असावेत असा त्यांचा आग्रह तर होताच, पण संस्कृत भाषेतले अनुनासिक संगीत ते त्यांच्या उच्चारणातून आमच्यापर्यंत जरा जास्तच पोहोचवीत. सहस्रबुद्धे हे असुर तर मंगरूळकर हे किन्नर वाटत.
अडचण एवढीच होती की, आधीच्या दोन यत्तांत हातातल्या वायरचे फटके हाणत आमच्याकडून संस्कृतचे शब्द चालवून घेणार्या नवाथे सरांनी निदान माझ्या मनातून संस्कृत पार उतरवली होती.
उरले करंदीकर सर, इंग्रजी शिकवणारे. हे वरून हिमालयासारखे थंड वाटत. नाकाच्या शेंड्यावर टेकलेला चष्मा, आखूड कापलेले, कोणतेही वळण नसणारे केस, अंडाकृती निर्विकार चेहरा, कधीही न चढणारा सपट आवाज आणि सुटातली उंचनिंच शरीरयष्टी असे ते हातात बाजारात नेण्याची एक पिशवी घेऊन वर्गात शिरत. यात शिकविण्याची पुस्तके, कधी तपासलेल्या वह्या किंवा पेपर असे काही आणि न चुकता एक छडी असे. कोटाच्या कुठल्यातरी एका खिशात तपकिरीची डबी. सहस्रबुद्धे यांच्या आवाजाची आक्रमक पट्टी (विद्यार्थ्यांना उद्देशून ते 'अरे म्हश्या', 'अरे दगडा' अशा हाका सर्रास देत), मंगरूळकरांचे कर्णमधुर अनुनासिक सुस्पष्ट उच्चार तसे करंदीकरांचे तोंडातल्या तोंडात सपाट बोलणे. त्यात चढ-उतार नावालाही नसे.
हे वर्णन कदाचित पूर्वग्रहदूषित मनाने मी करीत असेन. कारण बेचाळीसची चळवळ संपवून (ती तिच्या मरणानेच संपली) आणि शाळा भरपूर बुडवून मी पुन्हा शाळेत दाखल झालो तो करंदीकर सरांच्या रोषाचा ठाम विषय बनून. नव्याने मी हजर झालेल्या दिवसापासून त्यांनी माझ्याशी उभा दावा धरला. माझे स्वातंत्र्य-चळवळीतले अकाली पदार्पण आणि त्यासाठी शाळा बुडवणे त्यांना मुळीच आवडले नसल्याचे त्यांनी चेहर्याने नव्हे (तो नेहमीसारखा थंडगार होता) तर कृतीने करून दाखवले. ते वर्गात आले. त्यांना मी दिसलो. मला इंग्रजी व्याकरणाचा एक प्रश्न विचारून (माझा बराच अभ्यास बुडाला होता) त्यांनी मला उत्तर येत नाही असे ठरताच वर्गातून बाहेर जायला (गेट आउट) फर्मावले. (आवाजात फरक नव्हता. तो निर्विकार.) त्यानंतर रोज त्यांचा तास मला प्रश्न विचारून आणि उत्तर येत नाही असे दिसताच एक तर मला तास संपेपर्यंत बाकावर उभे करून किंवा वर्गाबाहेर घालवून सुरू होऊ लागला.
इंग्रजी हा तोवर माझ्या मते माझा 'स्ट्राँग' विषय. या विषयात मला चांगले गुण मिळायचे. याच विषयात ही रोजची 'मानहानी' घेणे मला कठीण होऊ लागले. करंदीकर सरांच्या चेहर्यासारखा त्यांच्या या भूमिकेतही बदल होण्याची शक्यता दिसेना. माझा मागे पडलेला अभ्यास करवून घेणारे घरी कोणी नव्हते. इंग्रजीच्या तासाविषयी माझ्या मनात एक भीतीच तयार होऊ लागली. त्या तासाला वर्गात असणे नको झाले. पण शाळेत तेवढा एकच तास चुकवणे शक्य नव्हते. मी त्या तासाचा अर्धा दिवस शाळा चुकवू लागलो. पण तेही संकोचाचे व अडचणीचे होत गेले आणि मी पूर्ण दिवस शाळेबाहेर राहू लागलो. शाळेकडेच फिरकेनासा झालो. (त्या वर्षी प्राचार्य म्हणून नारळकर जाऊन दबडघाव म्हणून नवे प्राचार्य आले.)
शाळेचे आणि शाळेबाहेर माझे एक नवे पर्व सुरू झाले. आयुष्याने अनपेक्षितपणे एक भलतेच वळण घेतले. माझे तोवरचे जग जमीनअस्मानासारखे बदलून गेले. मीही बदललो. माझे वय तेव्हा पंधरा-सोळा वर्षांचे असेल.
मला अपराधाच्या भावनेने अंतर्बाह्य घेरले. माझ्या घरातल्या माणसांना मी काही सांगू धजत नव्हतो. सांगितले असते तर तेव्हा कदाचित काही ना काही वाट निघाली असती. किंबहुना करंदीकर सरांची क्षमा मागतो तरी कदाचित प्रश्न संपला असता. माझी शाळा चालू राहिली असती. पण मी सर्व मनात ठेवले. शाळेत जाण्याचा बहाणा करून मी दिवसभर शाळेबाहेर राहू लागलो. शाळेतून येतो आहे असे दाखवून संध्याकाळी घर गाठू लागलो.
शाळेला हरताळ पाडण्याच्या काळातही मी शाळा चुकवत होतोच पण माझ्याबरोबर माझ्यासारखी इतर मुले असत. आमच्यापैकी कुणाच्या तरी घरी आम्ही वेळ काढीत असू. त्यांचे वडील किंवा आईवडील स्वातंत्र्यलढ्यात होते. एकदोन मुलांच्या घरी दिवसभर कोणीच नसे. त्यांच्याकडे घराची चावी होती. यामुळे हा वेळ कुठे काढावा असा प्रश्न तेव्हा नव्हता. आता तो आला. कारण शाळा चुकवणारा मी एकटाच होतो. शाळेत किंवा घरी कुणाला कळून चालणार नव्हते. त्यामुळे ओळखीच्या कुणाच्या नजरेला न पडण्याची गरज होती. शाळेच्या आसपास न फिरकण्याचीही होती.
सुरुवातीला मी सार्वजनिक पार्क, मैदाने यांचा आसरा घेऊ लागलो. पण ती वेळ बहुधा पार्क बंद असण्याची असे आणि मैदानात सावलीतली जागा नसे. असलीच तर ती आधीच कुणी तरी झोपण्यासाठी किंवा पोरगी घेऊन बसण्यासाठी व्यापलेली असे. जागा शोधत तोंड लपवून फिरण्याला मीही फार लौकर कंटाळू लागलो. रस्त्याने जाता येता ओळखीचे कुणी भेटेल ही धास्ती तर सदाची होती. क्वचित तसे कुणी लांब दिसून किंवा दिसले वाटून मी उलट्या दिशेने जवळजवळ पळालो किंवा आडोश्याला लपलो.
असे फार दिवस निभणार नाही हे माझ्या लक्षात आले. तेवढ्यात मला कल्पना सुचली. त्या महिन्याच्यी शाळेची फी मी मागून घेतली. आता खिशात पैसे आले. शाळेत फी भरण्याचा प्रश्नच नव्हता. हे पैसे कोणाच्या लक्षात येईपर्यंत तरी माझे होते. मी ते खर्च करू शकत होतो. मग मी अगदी आडबाजूची हॉटेले शोधून तिथे काहीतरी नावापुरते मागवून बसता येईल तेवढे बसू लागलो. तरी किती वेळ जाणार? बाहेर पडावेच लागे.
लपण्याची पुढची जागा मला सुचली ती सिनेमा थिएटर. एक तर सर्वांत पुढचे तिकिट तसे स्वस्त होते. दुसरे, दुपारच्या आडवेळी आडवारी ओळखीचे- म्हणजे मला ओळखणारे कुणी - सिनेमा बघण्याला येईल ही शक्यता जवळजवळ नव्हतीच. खिश्यात फीचे पैसे होते. मी अगदी पुढचे तिकिट काढून सिनेमाच्या थिएटरात लपू लागलो. (मागून कुणी पाहिले तरी माझा चेहरा दिसणार नव्हताच.) सिनेमा बरा-वाईट हा मुद्दा नव्हता. त्याची भाषा महत्त्वाची नव्हती. अनेक सिनेमे मी पुनःपुन्हा पाहिले. सिनेमा संपून उजेड होणे नको वाटे. तो चालूच राहावा अशी इच्छा मी करी.
दुर्दैवाने पुण्यातली बहुतेक थिएटरे - कॅम्प भागातली सोडली तर - आमच्या शाळेच्या टापूतच होती. हा आणखी एक धोका. शाळेचा रस्ता टाळून मी त्यातल्या त्यात दूरच्या आडरस्त्याने फिरत असे. तोही, चेहरा घालता येईल तेवढा खाली घालून. नजरा चुकवीत. प्रेक्षागृहात अंधार झाला की मला हलकं वाटे.
शाळेजवळच प्रभात नामक थिएटर होते त्यात त्या काळात संध्याकाळपासूनचे मुख्य सिनेमाचे खेळ सोडले तर दुपारी बारा ते सहा हॉलिवूडचे तेव्हाचे चित्रपट अर्ध्या दरात दाखवले जात. मी हे जास्त पाहिले. काही पुन्हापुन्हा पाहिले. एक शो संपला की बाहेर येऊन नवे तिकिट काढायचे आणि तोच सिनेमा पुन्हा पाहायचा म्हणजे शाळेतून घरी जाण्याची वेळ होत असे. हे सिनेमे इंग्रजीत. त्यांचे संवाद मला काही कळत नसत. फक्त दृश्ये बघायची. मध्ये झोप आली (मनातल्या टेन्शनमुळे ती येत असे) की झोपायचे. जाग आली की पुढे पाहायचे. असे हे सिनेमे मी या काळात पुन्हापुन्हा पाहिले.
अशा प्रकारे मी तात्पुरता रोज ठरावीक वेळ तोंड लपवून शाळेत असण्याचा माझा बहाणा चालू होता. मन आतून तक्रार करी. तू करतोस हे बरोबर नाही असे माझे मलाच रात्रंदिवस वाटत होते. शाळेतून ठरावीक दिवशी प्रगतीपुस्तक गोळा करून मीच त्यावर वडलांची सही करी. त्यावरची माझी 'प्रगती' वडलांना कळून चालणार नव्हते. वडलांची सही मी सरावाने पुष्कळच हुबेहूब करू लागलो. त्यांच्या आर्थिक व्यापात माझ्या प्रगतीपुस्तकाची चौकशी करणे त्यांनाही जमत नव्हते.
सिनेमा - कुठलाही - आणि जरूर तर पुन्हापुन्हा पाहणे हा लपण्याचा एक प्रकार झाला, पण फीचे पैसे याला किती पुरणार? पुन्हा, सारखे आणि पुन्हापुन्हा सिनेमे पाहण्याचाही कंटाळा येऊ लागला होता. मला लपण्यासाठी दुसरी सोयिस्कर जागा हवी होती आणि ती सापडली. तीही शाळेपासून थोड्या अंतरावर. पुण्याचे नगर वाचन मंदीर.
कधी तरी दुपारच्या वेळी मी याच्या पायर्या असाच चढलो आणि पाहिले तर हीही लपण्यासाठी बरी जागा होती. यात वाचनालयाचे मोजके कर्मचारी आणि वेळ घालवण्यासाठी आलेले म्हातारे किंवा निरुद्योगी पांढरपेशे एवढेच होते. यात कोणी माझ्या माहितीचे नव्हते. प्रशस्त दालनात अनेक जुन्या आरामखुर्च्या होत्या आणि यात काही जण तोंडे उघडी टाकून निवांत झोपले होते. त्याअर्थी ते वाचण्याऐवजी दुपारच्या वेळी झोपण्यासाठीच इथे येत असावेत. छताला अनेक पंखे गरगर फिरत होते, त्यामुळे गारवा होता. पण मुख्यतः इथे उतरत्या फलकांवर तर्हेतर्हेची आणि देशभरची मराठी-इंग्रजी-हिंदी वृत्तपत्रे आणि नियतकालिके व्यवस्थित लावलेली होती. ही वाचण्याचे माझ्या मनात आले नाही. कुणी ओळखीचे अचानक पोहोचले तर वृत्तपत्र किंवा नियतकालिकाच्या पानाआड तोंड लपवणे शक्य होते, हे माझ्या नजरेने तात्काळ टिपले आणि ही जागा माझे लपण्याचे पर्यायी ठिकाण म्हणून मी ठरवून टाकले.
नंतर नगर वाचन मंदिराच्या या वृत्तपत्र-नियतकालिक विभागाला मी शाळेच्या वेळी नित्य भेट देऊ लागलो. कोणी ओळखीचे फिरकत नाही, याने आत्मविश्वास आला. नित्य येणार्या कुणाला माझ्यात रस नव्हता (असण्याचे कारणही नव्हते) ही आणखी जमेची बाजू.
पण रोज येऊन मी इथे करणार काय? वेळ कसा घालवणार? नुसते बसून करमत नव्हते. झोप येत नव्हती. दुपारच्या वेळी झोपण्याचे ते वयही नव्हते. मग नाईलाजाने मी वर्तमानपत्रे, नियतकालिके पाहू लागलो. आधी फक्त मराठी. पण ती तरी किती वेळा चाळणार? म्हणून मग इतर भाषांतली. प्रथम डोक्यात काही न घेता नुसती शीर्षके, छायाचित्रे, चित्रे, जाहिराती. मग एवढे न पुरून मजकूर, बातम्या, लेख, अग्रलेखसुद्धा. नकळत यात थोडा थोडा रस वाटू लागला. पण मुख्य उद्देश एकच : लपणे. मी शाळा चुकवतो याचा घरी पत्ता लागू न देणे.
घरी कुणाला कल्पनाच नव्हती. शाळेची फी आई माझ्या हाती न चुकता (वास्तविक घर चालवण्यातल्या तिच्या आर्थिक अडचणी वाढत होत्या) ठेवीत होती आणि मी ती खर्च करीत होतो.
मध्येच मनात अपराधाची जाणीव दाटून येई. आयुष्यात प्रथमच मी घरच्यांना फसवून एक चुकीचे आयुष्य जगत होतो आणि त्यासाठी फीचे पैसे वापरत होतो. पण आता मध्येच हे थांबवणे, दुरुस्त करणे मला शक्य वाटत नव्हते आणि मन निगरगट्ट करून मी हे सर्व पुढे चालवीत होतो.
अजून एक गोष्ट या काळात घडली. मी आधी लिहिले की आमची तुकडी सुमार गुणवत्तेच्या मुलांची होती. यात आदल्या वर्षी नापास होऊन मागे राहिलेली तीन-चार मुले होती. हीही अनेकदा शाळा बुडवून उनाडक्या करीत. यांचा एक गट होता. वर्गात ती सदैव सर्वांत मागली बाके अडवून असत, टवाळक्या करीत. यात एक शिवलेल्या वरच्या ओठाचा हेजीब म्हणून मुलगा होता. पोषाखात तो गबाळा असे, पण डोक्याने तेज आणि विशेष म्हणजे त्या काळातले मराठी साहित्य वाचणारा होता. हजरजबाबी होता. शिक्षकांच्या एखाद्या गंभीर वाक्यावर अनावर होऊन हेजीब मागल्या बाकावरून काहीतरी टारगट कॉमेंट करी आणि त्याला त्याची शिक्षा म्हणून पायाचे अंगठे धरून तो तास संपेपर्यंत उभे केले जाई. वर्गात मराठीत पहिला येणार्या 'स्कॉलर' विद्यार्थ्यापेक्षा हेजीबचे बोलण्यातले मराठी चमकदार असे. पेपरात मात्र तो नापास होई. मराठीच नव्हे तर इतरही विषयात त्याची माहिती अद्ययावत, पण पेपरात नापास. मला तो त्याच्या बोलण्यातल्या हुशारीमुळे आवडे. पण त्याला माझ्यात काही रस नसे, कारण मी 'पुढल्या बाका'वरचा.
बेचाळीसच्या हरताळात हा गट उत्साहाने शाळेबाहेर असे. मला तो शाळेजवळच्या एखाद्या हॉटेलात भेटे. आता मी चळवळीनंतर शाळा चुकवू लागलो त्यात या गटाने मला शाळेबाहेर हेरले. समान उद्दिष्टाने आम्हाला एकत्र आणले. त्यांच्या वेळ घालवण्याच्या जागा त्यांनी मला दाखवल्या. पण शाळेत कळता कामा नये हे एक आणि माझ्याहून ते सगळे वयाने थोडे 'वडील'च असल्यानेही मी त्यांच्यात मिसळलो नाही. पण एक कळले की शाळेशी त्यांचे जमत नसले तरी ते (त्यातला एक कुस्तीगीर मुलगा सोडला तर) एरवी हुशार आणि गुणी होते. आयुष्याची त्यांची जाण माझ्यापेक्षा उजवी होती.
पुढे जे व्हायचे होते ते झाले. माझे बेंड फुटले. शाळेतून घरी पत्र गेले. वडलांना बोलावून घेण्यात आले. त्यांना सर्व सांगण्यात आले. त्यांना हा दुसरा मोठा धक्का. माझ्या प्रगतीपुस्तकावरच्या मी केलेल्या त्यांच्या सह्या पाहून त्यांना काय वाटले असेल? शाळेने हेही त्यांच्या कानी घातले की शाळेचे उपस्थितीचे किमान दिवसही न भरल्याने मला वार्षिक परीक्षेला बसू दिले जाणार नाही. आणि माझ्या वर्तनामुळे मला शाळेत ठेवायचा की नाही याचा विचार शाळेला करावा लागेल.
काळ्या ठिक्कर पडलेल्या चेहर्याने वडील घरी आले. घाबरून मी घरीच होतो. मला ते काहीही बोलले नाहीत पण ते न बोलणे कितीही झोंबर्या बोलण्यापेक्षा झोंबणारे होते.
आई, मोठी बहीण, दोघी रडत होत्या.
माझ्या वागण्याची घरी मिळालेली ही शिक्षा बिनतक्रार आणि कोणतीही सबब न सांगता पत्करण्याशिवाय मला पर्याय नव्हता.
मला मुर्दाड होणे भाग होते. मी तसा झालोही. माझ्या बाजूने कसलेही समर्थन मी केले नाही आणि मख्ख मुद्रेने घरात पोटभर जेवत, खात आणि भरपूर झोपत राहिलो.
उलट मनातून हलके वाटत होते. एक चोरटे आयुष्य एकदाचे संपले होते. पुन्हा मी 'नॉर्मल' जगणार होतो. माझे पुढे काय होणार हा प्रश्न माझ्या मनात नव्हता.
वडलांनी माझ्यातले लक्ष काढून घेतले. माझ्यासाठी कोणतीही खटपट करण्याचा त्यांचा विचार नव्हता. आई आणि मोठ्या बहिणीला स्वस्थ राहणे जमणारे नव्हते. त्या दोघी माझ्या शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटण्याला त्यांच्या घरी गेल्या. आईने त्यांचे पाय धरून मला परीक्षेला बसू द्यावे अशी प्रार्थना केली. त्यांनी नकार दर्शवला. दोघी एवढीशी तोंडे करून घरी आल्या. आई त्या रात्री जेवली नाही. पानावर बसून ती एकटीच रडत होती. मी अर्थात नेहमीसारखा पोटभर जेवलो.
माझ्या शाळेत इंग्रजी सहावीच्या परीक्षेला मला बसू देत नाहीत, तर दुसर्या एखाद्या शाळेतून खटपट करावी असे दोघींनी ठरवले आणि अशी एक शाळा शोधून काढली, तिथे परस्पर मला प्रवेशही मिळवला आणि मला त्या शाळेत जाण्यास सांगितले.
माझ्या आधीच्या शाळेच्या तुलनेने ही शाळा अगदीच बेकार होती. मी गेलो, पण माझे लक्ष अभ्यासातून आणि शाळेतून उडाले ते उडालेच. तीही शाळा मी थोड्याच दिवसात सोडली. घरी सांगून सोडली. मी पुढे शिकेन ही घरातल्या माणसांची आशा अशा प्रकारे पुरती संपली. मीच ती संपवली.
मला काय झाले होते, ते मलाच कळत नव्हते. मी बेधडक - आणि माझ्या तोवरच्या सरळमार्गी स्वभावाला सोडून शिक्षणापासून लांब निघालो. मी चुकल्याची अपराधी भावनाही आता बोथट होत चालली होती. माझे पुढे काय याचा विचार मनाला शिवत नव्हता. दोन वेळा खावे, रात्री छान झोपावे, दिवसा घराच्या गॅलरीत एक पाय कठद्यावर टाकून तासनतास रस्ता न्याहाळावा नाहीतर काही न करता आपल्या खोलीत रिकाम्या डोक्याने बसावे हा दिनक्रम झाला. घरातल्या सर्वांशी - आई धरून, जिचा मी लाडका मानला जात असे - बोलणे थांबले होते किंवा कामापुरतेच बोलणे उरले होते.
दिवसचे दिवस मी काहीएक करीत नसे. नुसता असे.
घराबाहेर पडावे तर शाळेबरोबर मित्रही तुटले होते. मीही ते पुन्हा जोडले नव्हते. त्यामुळे सर्व वेळ मी घरीच असे.
वडलांकडे कोणी येत. वेगवेगळ्या विषयांवर बोलणी चालत. पण यात प्रामुख्याने त्या कालातले साहित्य आणि काव्य असे. क्वचित कोणी अध्यात्माची चर्चा करणारे येई. हाही वडलांचा आवडता विषय. रोजची साग्रसंगीत पूजाअर्चा, ध्यानधारणा आणि योगासने हा त्यांचा आमच्या लहानपणापासून नित्यनियम होता. यात व्यत्यय त्यांना खपत नसे. एवढे झाले की ते दिवसभर शांत असत. (तरुण वयात ते फार कडक स्वभावाचे आणि माझ्या वडील भावंडांबाबतीत मारकुटेही होते असे आईने सांगितले होते.) वडलांचा आणखी एक आवडता विषय म्हणाजे ज्योतिष आणि पत्रिका. यातलेही कोणी कधी कधी येत. ग्रहांचा खल होई.
एक आठवण मला आहे. शिक्षण सोडून घरी रिकामा बसण्याचा काळ. वडलांना माझी काळजी असणारच जरी ते याविषयी घरात फारसे बोलत नसत. एकदा पुण्यातले एक तेव्हाचे प्रसिद्ध ज्योतिषी वडलांनी घरी आणले. मी असे त्या खोलीबाहेरच्या खोलीतच त्यांची बैठक बसली. मला सर्व ऐकू येत होते. रिवाजाप्रमाणे वडलांनी आम्हा भावंडांच्या पत्रिका काढल्या. एकेक त्या नामचीन ज्योतिष्यासमोर ते विचारार्थ ठेवू लागले.
वडलांना माझ्या मोठ्या भावाची काळजी कारण तो वडलांच्या सांगण्याबाहेर आणि घरापासून दूर गेलेला. माझी मोठी बहीण आम्हा भावंडात दिसण्याला डावी म्हणून तिच्या लग्नाची काळजी. मग मी, शिक्षण मध्येच सोडून लाकडाच्या ओंडक्यासारखा घरी पडलेला. आणि सर्वात धाकटा भाऊ जन्मतः आजारी आणि शेंडेनक्षत्र - उशिरा झालेले - त्यामुळे त्याची काळजी. साधारणत: याच क्रमाने पत्रिकांची चर्चा सुरू झाली आणि ती माझ्या पत्रिकेवर पोहोचली.
ज्योतिषी गंभीर झाले. (उघड्या दारावाटे मला दिसत होते.) वडील तर गंभीर होतेच. मग ग्रहांची काही तांत्रिक चर्चा. साडेसातीचा अखेरचा फटका वगैरे काहीतरी बोलणे. आणि ज्योतिषी हातातल्या चारमिनार सिगारेटचे काही झुरके वेगाने घेऊन निराशेने मान हलवीत त्यांच्या खणखणीत आवाजात अखेर निकाल द्यावा तसे निर्णायक स्वरात म्हणाले, धोंडोपंत (माझे वडील), मी सांगतो हा तुमचा मुलगा फार तर फार इथल्या म्युनिसिपालिटीत कारकून होईल !
हे मी स्वच्छ ऐकले. पाठमोर्या वडलांच्या चेहर्याचे हे ऐकून काय झाले काय माहीत, पण मलाच आश्चर्य म्हणजे माझ्यावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही.
नंतर दोन-तीन मिनिटे बाहेर सर्व शांत होते. चर्चा थांबलीच होती. ऐकलेल्या भाकिताच्या असराबाहेर येण्याला वडलांना वेळ लागत असावा पण मी अंतर्बाह्य मख्ख. जणू दगडावर आदळावेत तसे ते भाकिताचे शब्द माझ्यावर आदळून खाली पडले होते.
मात्र एवढे खरे की ते शब्द मी नंतर कधीच विसरलो नाही. याचा अर्थ ते 'आत' पोहोचले होते. त्यांचा तात्कालिक परिणाम शून्य होता.
माझी तेव्हाची अवस्थाच तशी होती.
हे एकोणीसशे चव्वेचाळीस साल. माझे वय सोळा.
------------------------------------------------------------------------------------
'तें' दिवस
लेखक - श्री. विजय तेंडुलकर
प्रकाशक - राजहंस प्रकाशन, पुणे
पृष्ठसंख्या - १४६
किंमत - २०० रुपये
------------------------------------------------------------------------------------
पुस्तकातील निवडक भाग राजहंस प्रकाशन, पुणे, यांच्या सौजन्याने.
टंकलेखन साहाय्य - अंशुमान सोवनी
------------------------------------------------------------------------------------
हे पुस्तक आता मायबोली खरेदी विभागात उपलब्ध आहे.
http://kharedi.maayboli.com/shop/product.php?productid=17119
वा! Wish List
वा! Wish List मध्ये आणखी एक भर.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
योगायोगाने आत्ताच लोकसत्तेच्या लोकरंग पुरवणीतला हा लेख वाचला.
चिनूक्स, अक
चिनूक्स,
अक्षरवार्तामध्ये अजुन एका चांगल्या पुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद. गेल्या रविवारच्या लोकसत्तेच्या पुरवणीत याच पुस्तकाबद्दल वाचायला मिळाले होते.
वाचून
वाचून बघायलाच हवे हे पुस्तक.
चिनूक्स आणि आर्फी - धन्यवाद
चिनूक्सा,
चिनूक्सा, धन्यवाद. आता हे पुस्तक पण मागवावे लागेल.
अरे वा.. !
अरे वा.. ! मस्त आहे हा भाग पण.. वाचलं पाहिजे आता..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हा भाग
हा भाग वाचून पुस्तक वाचलेच पाहिजे असे वाटले... अजून एका चांगल्या पुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद, चिन्मय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चिनुक्स,
चिनुक्स, हा मजकुर लिहून तू एक फार चान्गले काम केले आहेस![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
)
त्यान्चे सहकार्य अवर्णनीय
सकाळीच लोकसत्तेत यावरच एक बातमी निसटती वाचली!
हे पुस्तक विकत घेऊन वाचलेच पाहिजे!
स्वगतः
आईशप्पथ!
हे शालेय जीवन, हे तर आमच्याच आयुष्याचे वर्णन! फक्त कालखन्ड बदलला! १९७३ ते ७६
आता कळतय, तेव्हा नुस्त ऐकुन माहीत होत, पहिली साडेसाती सुरू झालेली होती!
तपशीलात सर्व गोष्टी सारख्याच! काही अधिकच असतील......... !
नगर वाचन मन्दिर म्हणजे लक्ष्मीरोडवरचे का?
आम्ही विश्रामबागवाड्यातील वाचनालयात जाऊन बसायचो!
सिनेमे देखिल बघितले खुप, पण नन्तर नन्तर थेटरवरचे रखवालदार खाकी अर्धी चड्डी बघुन आत सोडायचे नाहीत, परवडायचे देखिल नाही, म्हणून मग वाचनालयाचा शोध लागला!
फी मात्र कधी चुकवली नाही, मात्र "इतर" बाबीतून पैसा काढायचो! (कसे ते सुस्पःष्ट सान्गणार नाही कुणाला इतक्यात
वाचनालयाचा एक फायदा असा की असन्ख्य पुस्तके वाचून काढली! वाचनालयाच्या कर्मचार्यान्च्या दृष्टीने आम्ही "अभ्यासू" "हुषार" होतो!
बाह्य जगात, म्हणजे कुठे? तर गल्लोगल्ली रस्त्यारस्त्यातून फिरत राहिल्यामुळे, प्रत्यक्ष जीवन फार जवळून निरखता आले!
एकमेकान्च्या तोन्डिचा घास पळवणार्या कुत्र्यामान्जरान्प्रमाणे वागणारी "माणसे" जशी बघितली, तशीच धड ओळख ना पाळख, पण मदत करणारी तुरळक "माणसेही" बघितली! अनुभवली!
सुदैवाने, इतके सगळे होऊनही, माझी शालेय वर्षे वाया गेली नाहीत, थोरला याबाबत नशिबवान नव्हता! कोणत्याही शाळेत सर्व इयत्तात पहिला नम्बर मिळवणार्या त्याचे मात्र एक वर्ष या भानगडित, अन दुसरे आजारपणात वाया गेले!
असो,
गेलेला कालखण्ड परत येत नाही, अन आता त्याबद्दल काही खन्त, दु:ख, चिडचिड, सन्ताप करुन उपयोग नाही!
एक नक्की, ते देखिल एक आयुष्यच होत, बरच काही शिकवुन गेलेल! मनाच्या कोपर्यात दडलेल्या त्याच्या स्मृती आयुष्यभर "सावध" जगण्यास भाग पाडण्यास समर्थ होत्या! तोच एक फायदा!
स्वगत समाप्त.
...;
***** या राष्ट्रास निधर्मी म्हणून घोषित करणे व पुरुषासारख्या पुरुषाने स्वतःस हिजडा म्हणवुन घेऊन तसे वागणे या दोन्हीत अर्थाअर्थी, मला तरि फरक वाटत नाही! ****
मस्त आहे
मस्त आहे हा उतारा.. पुढे त्यांची वाटचाल कशी झाली?- याची उत्सुकता वाढवणारा.. पुस्तक वाचलंच पाहिजे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
धन्यवाद चिनूक्सा, आर्फी
सचिन कुंडलकरचा लोकसत्तामधला लेख अतिशयच अंतर्मुख करणारा आणि टचिंग! पाणी आलं डोळ्यात वाचता वाचता
----------------------------------------------------
No matter how you feel, get up, dress up and show up.
परत एकदा
परत एकदा धन्यवाद
हे सहीच आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रच्याबा, ही शाळा कुठली कळले ना ?
***
Finagle's Second Law : No matter what the anticipated result, there will always be someone eager to (a) misinterpret it, (b) fake it, or (c) believe it happened to his own pet theory.
मस्त उतारा
मस्त उतारा चिन्मय. पुस्तक घेऊन वाचलेच पाहिजे आता. पुस्तकाचे मुखपृष्ठही अतिशय सुरेख, लक्षवेधक आहे.
तुला आणि आर्फ्याला धन्यवाद.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
There is no charge for awesomeness.... or attractiveness.
चिनुक्सा /
चिनुक्सा / अंशुमान- आभार. जबरी उतारा आहे.
अरे व्वा!
अरे व्वा! छान वाटतय पुस्तक. वाचलच पाहिजे.
चिनुक्स, अंशुमान..धन्यवाद
धन्स
धन्स चिन्मय, आता हे पुस्तक घेइनच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
***********************************
मनामधली कविता घेऊन, कागद माझा उडतो आहे,
उतरेल त्याच प्रदेशात, चंद्र जेथे बुडतो आहे !!
धन्यावद
धन्यावद चिन्मय आणि आर्फी!! पुस्तक वाचायलाच हव आता.
ही बंडखोरी
ही बंडखोरी उपजतच होती, असे म्हणायला हवे तर!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता उत्सूकता लागून राहिली आहे, हे पुस्तक वाचायची.
--
कसा चंद्र! कसं वय! कशी तुझी चांदणसय..!
कसा निघेल इथून पाय! वेड लागेल, नाहीतर काय!
हे पुस्तक
हे पुस्तक आता मायबोली खरेदी विभागात उपलब्ध आहे.
http://kharedi.maayboli.com/shop/product.php?productid=17119