![ड्रीमर अँड डुअर्स](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2021/04/26/Presentation1.jpg)
दुचाकीवरून सात देशांची सफर करणाऱ्या कृषी शास्त्रज्ञांच्या नजरेतून तेथील शेतीचा रोचक आणि रंजक आढावा...
"काय? बुलेटवरून वीस हजार किलोमीटर आणि तेही सात देशांतून? आमची भंकस करताय का राव?" विस्तारलेल्या डोळ्यांनी भूत पाहिल्यासारखे ते उद्गारले. शेती रसायनांविषयी माहिती देणारे साहेब आपल्यासमोर एखादी पुडी सोडताहेत, अशी आळशी शेतकऱ्याच्या शेतात माजलेल्या ताणांगत दाट शंका त्यांना येत होती. ही मोहीम पूर्ण केल्यापासून थोड्याफार फरकाने हाच अनुभव बहुतेक ठिकाणी येत होता. आमच्या पुणे- सिंगापूर- पुणे या मोटरसायकल मोहिमेची माहिती मी त्यांना देत होतो. या मोहिमेदरम्यान अनुभवलेली शेती आणि शेतकरी या विषयावर चर्चेचे गु-हाळ रंगले होते. दोन्ही हातांचा टेकू गालाला देत निरागस बालकाच्या कुतूहलमिश्रित नजरेने पाहत, "अजून कायतरी सांगा की राव!" असा लहान मुलाने गोष्ट सांगायचा हट्ट करावा, तसा आग्रह त्यांनी धरला. मग काय? बुलेटवरचं कृषी आख्यान सुरू झालं.
ही मोहीम पूर्ण केल्यापासून गेल्या काही वर्षात थोड्या फार फरकाने हाच अनुभव सगळीकडे आला. अठ्ठावन दिवसांच्या या आग्नेय आशियायी देशातील सफरीदरम्यान तिथला निसर्ग, अन्नपदार्थ, समाज, शेती, लोकं आणि त्याची दिनचर्या अनुभवली होती. या मोहिमेवर आधारित 'ड्रीमर्स अँड डुअर्स' हे पुस्तक लिहिताना ते क्षण सिनेमाच्या फ्लॅशबॅकसारखे परत जगलो होतो.
लॉकडाउनच्या काळात लक्ष्मीच्या विचारांची धूळ खाली बसल्याने सरस्वतीला आपले रूप दाखवायची संधी मिळाली. पाच हजारांपेक्षा जास्त फोटो आणि व्हिडिओत कैद केलेले मोहिमेदरम्यानचे अनुभव शब्दांत बांधायचा प्रयत्न करताना माझी अवस्था अवखळ बकरीच्या पिलांना बांधायचा प्रयत्न करणाऱ्या गुराख्यागत झाली. एकाला बांधायला गेले की दुसरे निसटतेय. पुस्तकात हे अनुभव बांधताना कोणता प्रसंग मांडू आणि कोणता नको असं झालं. समुद्रकिनारी फेरफटका मारताना एखादा रंगीत दगड किंवा शिंपला नजरेत भरावा, त्याला उचलून खिशात टाकल्या टाकल्या दुसऱ्याने आपल्याला खुणवावे. असे करता आपल्या दोन्ही खिशांचा आकार सावकाराच्या चक्रवाढ पोटासारखा फुगावा अगदी तसाच दीड पावणेदोनशे पानांचे पुस्तक लिहायचा निर्णय ३६० पानांपर्यंत फुगत गेला, तरीही सर्व प्रसंगांना, अनुभवांना पुस्तकात जागा देऊ शकलो नाही, याची खंत होतीच.
परगावी निघालेल्या लग्नाच्या व-हाडात नंतर वर्णी लागलेल्या आजोबांना जागा करून देण्यासाठी जसे लहान मुलाला उठवले जाते. तसेच रंजक प्रसंगांसाठी काही माहितीपूर्ण प्रसंगांना पुस्तकातून पायउतार करावे लागले. "त्यात काय मोठं साहेब! शेतीसंबंधी अनुभवांवर लिवा की एखादं पुस्तक!" असा आपुलकीचा सल्लाही मिळाला. पण लॉकडाउनच्या काळात लॉक झालेल्या लक्ष्मीला अनलॉक करण्याच्या घडपडीत परत हा पुस्तक प्रपंच परवडणारा नव्हता. मग यावर एक भन्नाट तोडगा सुचला. आठवणींचा हा रानमेवा 'ॲग्रोवन'च्या वाचकांसाठी लेखमालेच्या माध्यमातून खुला केला तर? भावना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अंग्रोवनसारखं प्रभावी माध्यम दुसरे असूच शकत नाही, याची जाण होती. मग काय? ठरले तर मग! सात देशातील बुलेटवरील ऍग्रो सफारीची सुरुवात नवीन वर्षात करायची. बळीराजाला बुलेटच्या मागच्या सीटवर बसवून भुतान, म्यानमार, थायलंड, कंबोडिया, मलेशिया आणि सिंगापूर या देशातील गावागावांतून आणि शेतकऱ्याच्या शेतातून शिवार फेरी घडवून आणायची.
मग काय! आठवणींच्या मुंग्या गूळ पाहिल्यागत गोळा झाल्या. ईशान्य भारतातील हिमालयाच्या कुशीतील शेती, ब्रह्मदेशातील चहा खाणारे आणि शेतीला तरंगत ठेवणारे शेतकरी, थायलंडमधला बांबूमधील राइस; दोन हजारांपेक्षा जास्त भाताच्या स्थानिक जाती कोणताही जातिभेद न पाळता उगवणारा कंबोडियन शेतकरी, नाकतोडे, विंचू आणि साप याची वळवळणारी शेती, आपल्या घरच्या शेंगदाणा, तिळाच्या तेलाला घराबाहेर करून भारतीयांच्या खिशाला तेल लावणारे पामतेल ज्या शेतातून येते, ते अवाढव्य मलेशियन पामवृक्षांचे मळे, अशा एक ना अनेक आठवणी "पहिले स्वप्न मी! पहिले मी!" अश्या उत्साही, उतावीळ मुलांगत पेनच्या टोकावर गर्दी करू लागल्या. मग मीही म्यानातून सळसळत्या तलवारीला मोकळं करावं तसं पेनचं टोपण उघडून त्यांना मोकळं केलं.
या कहाणीची सुरुवात होते आम्ही आठ बायकर एकत्र येण्यानेएकत्र येण्याने. आम्ही एकत्र आलो आणि त्या संघाला नाव दिले, "ड्रीमर्स अँड डुअर्स" आपल्या मराठीत स्वप्न पाहणारे आणि ते सत्यात उतरवणारे. आम्ही आठही उद्योजकांनी आंतरराष्ट्रीय मोटरसायकल मोहीम करावी, या विचाराने प्रेरित होऊन तयारीला सुरुवात केली. बऱ्याच घासाघिशीनंतर आठ जणांमध्ये चार बुलेट घ्यायचं ठरलं. त्यात तीन थंडरबर्ड, एक क्लासिक आणि माझी ५०० सीसी डेझर्ट स्टॉर्म अशा पाच जणींची निवड केली. "आदमी आठ और बाइक पाच?" असा गब्बर स्टाइल सवाल बऱ्याचदा विचारला गेला. पण दरडोई एक अश्या आठ बाइक न घेतल्यामुळे कागदपत्रे आणि आंतरराष्ट्रीय परवान्यांचा जास्तीचा खर्च वाचला होता. आणि अगदी कट टू कट चार बाइक घेऊन सामानाची अडचणही झाली असती. म्हणून बुद्धाचा मध्यम मार्ग अवलंबला. पाच बाइकमध्ये दोन सिंगल सीट बाइकवर सामानासाठी जास्तीची जागा मिळाली.
या मोहिमेचा रूट ठरवणे हे एक महत्त्वाचे काम होते. कुठे जायचं हे ठरले तरी कसे जायचे हे ठरवणे सोपे जाते. सिंगापूरला जायचे हे ठरले होत. मंत्रिमंडळाच्या हिवाळी- उन्हाळी सत्रासारखी चर्चासत्रे होऊन रूट ठरला. पुण्याहून- नागपूर- रायपूर- रांचीमार्गे चिकन नेकमधून सिलिगुडीला जायचे. तिथून भूतानमध्ये प्रवेश करायचा. भूतानमधून परत भारतात गुवाहाटीला उतरायचे. काझीरंगामागे मणिपुरात यायचे. तिथून ब्राह्मदेशात म्हणजे म्यानमार उर्फ बात सीमोल्लंघन करायचे. म्यानमारच्या ऐतिहासिक शहरांना भेटी देत थायलंडमध्ये गृहप्रवेश करायचा. येथील निसर्गसौंदर्य अनुभवत कंबोडियात पुसायचे. कंबोडियातील आठशे वर्षे जुने आणि चारशे एकरावर पसरलेले, जगातील सर्वात मोठे धार्मिक स्थळ, अंकोरवाटचे विष्णू मंदिर पाहून परत थायलंडमध्ये वापसी करायची तेथून मलेशियामागें सिंगापूर गाठायचे. अशा दहा हजार किलोमीटरचा रूट ठरला.
या देशातून प्रवास करताना तेथील लोकांशी संवाद साधायचा. त्यांची संस्कृती, शेती, समाज, राहणीमान, खाद्य संस्कृती, सणसमारंभ या साऱ्या अनुभवांची शिदोरी जमा करत, स्वतःला समृद्ध करायचं हा अजेंडा होता. पुण्यातून सिंगापूरपर्यंत सलग रस्ता असल्याने कुठेही समुद्र ओलांडावा लागणार नव्हता. इथे राजकीय स्थैर्य असल्याने प्रवासादरम्यान अडचणी येणार नाही, असा विश्वास वाटत होता. संपूर्ण दक्षिणपूर्व आशियायी देशांशी भारताची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक भावकी असल्याने आपल्या भाऊबंदांना भेटण्याची उत्सुकता होती. लहानपणी शेतमजुरी आणि मोठेपणी शेतीक्षेत्रात संशोधन आणि व्यवसाय अशी अंतर्बाह्य शेतीशी नाळ जुळली असल्यामुळे तेथील शेती आणि शेतकऱ्यासंबंधीची उत्सुकता तर रबरासारखी ताणली गेली होती.
या देशातील बळीराजा कसा असेल? तोही आपल्यासारखाच निसर्ग, व्यापारी आणि शासकीय यंत्रणांच्या (राम?) भरोसे जगत असेल का? जसे खादीधारी साहेब दरवर्षों एकाच खड्ड्यात वृक्षारोपण करतात, तस्साच दर पाच वर्षानंतर येणाऱ्या राजकीय सुगीच्या हंगामात त्यालाही कर्जमाफीचा लॉलीपॉप दिला जात असेल का? त्याचं शेताचं तंत्र आपल्यापेक्षा वेगळं असेल का?
या मोहिमेदरम्यान पुणे ते सिंगापूर असा दहा हजार किलोमीटरचा प्रवास आम्ही आठ जणांनी केला. सिंगापूर ते पुणे हा परतीचा दहा हजार किलोमीटरचा प्रवास मी एकट्याने संपवत पुणं गाठलं. अशा या वीस हजार किलोमीटरच्या प्रवासात ऐकलेले. पाहिलेले, अभ्यासलेले आणि अनुभवलेले क्षण या लेख मालिकेतून हलक्याफुलक्या भाषेत मांडायचा हा छोटासा प्रयत्न. तो आपल्याला आवडेल अशी आशा करतो.
या लेखमालेतील इतर भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा:
लेख-१: माझी मुशाफिरी....सात देशांच्या शेत शिवाराची सैर! https://www.maayboli.com/node/78689
लेख-२: . माझी मुशाफिरी!.... चंद्रावरील माती अन् प्रोटिनची शेती! https://www.maayboli.com/node/78696
लेख-३: . माझी मुशाफिरी!..... https://www.maayboli.com/node/78744
लेख-४: . माझी मुशाफिरी!.....आनंद पिकवणारा देश !..... https://www.maayboli.com/node/78839
…… लेखक हे ड्रीमर अँड डुअर्स पुस्तकाचे लेखक आहेत.
भन्नाटच स्वप्न पाहिलंत की..
भन्नाटच स्वप्न पाहिलंत की..
येऊ द्यात लेखमाला...
वाह !! फारच मस्त. लेखमाला
वाह !! फारच मस्त. लेखमाला नक्की वाचायला आवडेल. पुलेशु
खूप छान..!!
खूप छान..!!
सात देशांच्या शेतांच्या शिवाराच्या सैरीतले तुम्ही अनुभवलेले क्षण वाचायला आवडतील.
छान सुरुवात! पुढच्या भागाच्या
छान सुरुवात! पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
छान
छान
खूपच छान आणि interesting,
खूपच छान आणि interesting, वाचते आहे.
हे भारी आहे! येउ द्या अजून.
हे भारी आहे! येउ द्या अजून.
वाह.. सतीश..अखेर तुझे अनुभव
वाह.. सतीश..अखेर तुझे अनुभव पून्ह्यांदा चवी चवीने वाचायला मिळणार... Dreamers and doers हातात मिळाल्यावर घटाघटा वाचून काढले होते....काही भाग सोडला तर...
आता हळू हळू तूझ्या प्रवासाचा आनंद घेता येईल...
Interesting.! पुढील भाग येऊ
Interesting.! पुढील भाग येऊ द्या लवकरच
वा! पुढील भागांची वाट पाहते.
वा! पुढील भागांची वाट पाहते.
अरे वाह ! फारच छान. लेखमाला
अरे वाह ! फारच छान. मायबोलीवर स्वागत
लेखमाला नक्की वाचायला आवडेल. पुढील भागांच्या प्रतिक्षेत
पुस्तक केवढ्याला आहे, कुठे मिळेल ते ही कळवाल तर बरे
वॉव वाचायला मजा येईल. छान
वॉव वाचायला मजा येईल. छान लिहिलय
अरे वा ! छानच , बऱ्याच
अरे वा ! छानच , बऱ्याच दिवसांनी प्रवासवर्णनाची लेखमाला !!! पुढच्या भागांच्या प्रतीक्षेत
भारीच!
भारीच!
हे मस्त आहे. संपुर्ण लेखमाला
हे मस्त आहे. संपुर्ण लेखमाला वाचायला आवडेल
वाचू.
वाचू.
परतीचा प्रवास एकट्याने केला? बाकीचे सात पुढे आणखी कुठे गेले?
छान सुरुवात!
छान सुरुवात!
___/\___ ग्रेट
___/\___ ग्रेट![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लेखनशैलीही छान आहे शिवाय दृष्टिकोनही कौतुकाचा!
खुप मजा येईल वाचताना। धन्यवाद शेअर केल्याबद्दल
बाकीचे सात पुढे आणखी कुठे
बाकीचे सात पुढे आणखी कुठे गेले?>>> वेडात दौडले.
माहितीप्रचुर लेख. पुणे ते
पुणे ते सिंगापोर हा प्रवास रस्त्याने करता येतो हि माहिती माझ्यासाठी नवीन आहे. थायलंडला जाता येते हे याआधी ऐकून होतो. पण तोच प्रवास पुढे सिंगापोरपर्यंत होऊ शकतो हे या लेखाद्वारे प्रथमच कळले. तब्बल वीस हजार किमी एकूण अंतर असे आपल्या पुस्तकाच्या मुखपृष्ठ वरून कळते. तो सगळा अनुभव अद्वितीयच असणार.